तलाठी कार्यालय नोंदवह्यामहाराष्ट्र जमीन महसूल कायदावृत्त विशेषसरकारी कामे

तलाठी कार्यालयातील गाव नमुना १ ते २१ नोंदवही विषयीची संपूर्ण माहिती – Gav Namuna 1 to 21

आपल्या मिळकतीच्या बाबतीत तलाठी कार्यालयाकडून आपण आवश्‍यक ती माहिती मिळवू शकतो. मिळकतीबाबत आपणास आवश्‍यक असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते याबाबत ही माहिती.

तलाठी कार्यालयातील गाव नमुना १ ते २१ नोंदवही विषयीची संपूर्ण माहिती – Gav Namuna 1 to 21:

जमिनीच्या किमती दिवसेंदिवस भरपूर वाढत आहेत. त्यामुळे सहाजिकच जमिनीच्या मालकी व वहिवाटीसंबंधी वाद निर्माण होतात. जमीन मालक व मिळकत घेणार यांच्यादरम्यान या संदर्भातील केसेस (दावे) चालू होतात. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 (महा. लॅण्ड रेव्हेन्यू कोड) अन्वये प्रत्येक गावातील जमिनीची कागदपत्रे ही त्या गावातील तलाठी कार्यालयात असतात, नोंदी असतात. जमीन महसूल कायद्यान्वये जमिनीच्या तलाठी दप्तरामध्ये अनेक प्रकारच्या नोंदवह्या असतात. तलाठी दप्तर नमुना नंबर 1 ते 21 गाव नमुन्यांमध्ये असते. या नोंदवहीस वेगवेगळा अर्थ असतो. आपणास हवी असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते, हे सामान्य नागरिकाला माहिती असणे गरजेचे आहे. आपल्या मिळकतीच्या बाबतीत तलाठी कार्यालयाकडून आपण आवश्‍यक ती माहिती मिळवू शकतो. मिळकतीबाबत आपणास आवश्‍यक असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते याबाबत ही माहिती.

गाव नमुना १:

गाव नमुना एक हा महसुली लेख्यांचे आरंभ स्थान आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६, कलम १०२ अन्वये जमाबंदी लागू केल्याबरोबर जमीन महसूल संहिता, १९६६, कलम ९४ ( ३ ) मधील सूचनेनुसार भूमी अभिलेख विभागातर्फे जमीन महसूल संहिता, १९६६, कलम ८४ अन्वये भूमापन क्रमांक आणि त्याचे उपविभाग यानुसार क्षेत्र व आकारणी याचे विवरणपत्र तयार केले जाते. जमीन महसूल संहिता, १९६६, कलम ९२ अन्वये महसुली भूमापन झाले नसले तरीही जमाबंदी लागू करता येते. याच विवरणपत्राच्या आधारे गाव नमुना एक तयार केला जातो. यात एकूण अकरा स्तंभ असतात. गाव नमुना १ (जमिनींची नोंदवही) विषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

गाव नमुना १ चा गोषवारा:

गाव नमुना नंबर -१ च्या गोषवाऱ्यावरून गाव नमुना पाच ( गावाचा ठरावबंद ) बनतो. तालुका आणि जिल्हा नमुने यावर अवलंबून असतात त्यामुळे हा नमुना अत्यंत महत्वाचा ठरतो. गावात संबंधित बदल असल्यास तो दरवर्षी यात नोंदवण्यात यावा. जर एखाद्या वर्षी बदल नसेल तर ” …. या वर्षी कोणताही बदल नाही. ” असा स्पष्ट शेरा तलाठी यांनी लिहावा. तो शेरा तपासून तहसिलदाराने यावर स्वाक्षरी करावी. तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील अभिलेखाशी हा नमुना जुळत असावा. गाव नमुना १ चा गोषवारा विषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

गाव नमुना १-अ:

या नोंदवहीमध्ये वन जमिनीची माहिती मिळते तसेच गावातील वन विभागातील गट कोणते याची नोंद या वहीत असते. ज्या गावात पाचपेक्षा अधिक भूमापन क्रमांक ‘वन’ म्हणून अधिसूचित करण्यात आलेले असतात अशाच गावात हा स्वयंस्पष्ट नमुना ठेवला जातो. पाचपेक्षा कमी भूमापन क्रमांक ‘वन’ म्हणून अधिसूचित करण्यात आलेले असतील तर वनाबाबतचा आवश्यक सर्व तपशील गाव नमुना क्रमांक एकच्या स्तंभ आठ मध्ये ( सार्वजनिक मार्गाधिकार आणि सुविधाधिकार ) घ्यावा. गाव नमुना १-अ (वन जमिनींची नोंदवही) विषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

गाव नमुना १-ब:

या नोंदवहीमध्ये सरकारच्या मालकीच्या जमिनीची माहिती मिळते. गाव नमुना एक-ब नमुना ही भोगवट्याच्या (सरकारी) जमिनीची नोंद असणारी एक दुय्यम नोंदवही आहे. ज्या गावात दहा किंवा दहापेक्षा अधिक बिन भोगवट्याच्या ( सरकारी ) जमिनीचे भूमापन क्रमांक आहेत त्या गावात ही नोंदवही ठेवण्यात येते. गाव नमुना १-ब (बिन भोगवट्याच्या (सरकारी) जमिनींची नोंदवही) विषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

गाव नमुना १-क:

या नोंदवहीमध्ये कुळ कायदा, पुनर्वसन कायदा, सिलिंग कायद्यानुसार भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी याबाबतची माहिती असते. सातबाराच्या उताऱ्यामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन आहे असे ठरविता येते. सुधारित गाव नमुना १-क (भोगवटादार वर्ग दोन म्हणून मंजूर केलेल्या जमिनी आणि ग्रामपंचायतीकडे निहित केलेल्या जमीनी यांची नोंदवही) विषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

गाव नमुना १-ड:

या नोंदवहीमध्ये कुळवहिवाट कायदा अथवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी, त्यांचे सर्व्हे नंबर व गट नंबर याबाबतची माहिती मिळते. गाव नमुना एक-ड हि एक दुय्यम नोंदवही आहे. यात कुळ वहिवाट कायदा आणि महाराष्ट्र शेत जमीन ( जमीन धारणेची कमाल मर्यादा ) अधिनियम १९६१ च्या उपबंधानुसार अतिरिक्त म्हणून घोषित केलेल्या जमीनी दर्शविणारी माहिती नोंदवली जाते. गाव नमुना १-ड विषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

गाव नमुना १-इ:

गाव नमुना एक – इ ही एक स्वयंस्पष्ट दुय्यम नोंदवही आहे. या नोंदवहीमध्ये शासकीय जमिनीवरील अतिक्रमणाबाबत माहिती असल्यामुळे याचा बराच उपयोग होतो. गाव नमुना १-इ (शासकीय जमिनींवरील अतिक्रमणांची नोंदवही) विषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

गाव नमुना २:

या गाव नमुना दोन मध्ये गावातील सर्व कायम बिनशेती ( अकृषिक ) जमिनींची नोंद असते. गाव नमुना नंबर दोन हा महाराष्ट्र जमीन महसूल ( महसूल भूमापन व भूमापन क्रमांकाचे उपविभाग ) नियम, १९६९ चे नियम २२ अन्वये तयार केलेल्या अकृषिक भोगवट्यांच्या नोंदवहीवर आधारित असतो. यात आपण बिनशेती असणाऱ्या जमिनींपासून येणारा कायम स्वरूपी महसूल दर्शवतो. कायम बिनशेती नसणाऱ्या नोंदींसाठी समांतर गाव नमुना नंबर दोन ठेवण्यात यावा. गाव नमुना २ (अकृषिक महसुलाची नोंदवही) विषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

गाव नमुना ३:

या गाव नमुना नंबर तीन मध्ये शेतीसाठी आणि बिनशेतीसाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या सर्व ( सरंजाम / देवस्थान इनाम ) दुमाला जमिनीच्या महसुलाची नोंद केली जाते. गाव नमुना ३ (दुमाला जमिनींची नोंदवही) विषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

गाव नमुना ४:

गाव नमुना ४ या रकान्यात, गावातील पाच वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी निश्चित केलेल्या संकीर्ण महसुलाच्या हिशोबाची नोंद असते. या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते. हा दररोज भरावयाचा नमुना आहे. आवश्यकता भासताच यात नोंद केली जाते. गाव नमुना ४ (संकीर्ण जमीन महसुलाची नोंदवही) विषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

गाव नमुना ५:

गाव नमुना पाच हा गाव नमुना एक ते चार मधील माहितीचा गोषवारा आहे. गाव नमुना एक ते चार मध्ये नमूद स्थायी व अस्थायी महसूल बाबींना ‘ठराव बंद बाबी’ म्हणत असल्यामुळे गाव नमुना पाचला ‘ठराव बंद’ असेही म्हणतात. या गाव नमुना पाचचा उपयोग प्रामुख्याने जमिनीच्या विविध उपयोगावरील क्षेत्र आणि त्यांच्यावरील जमीन महसूल यांचे ऑडिट करण्यासाठी केला जातो. त्यामुळे याला ‘जमाबंदी पत्रक’ असेही म्हणतात. गाव नमुना पाचचा मागणी किंवा वसुलाशी प्रत्यक्ष संबंध नाही.

या नोंदवहीत गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती मिळते. गाव नमुना ५ (क्षेत्र आणि महसूल यांचा सर्वसाधारण गोषवारा) विषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

गाव नमुना ६:

(हक्काचे पत्रक किंवा फेरफार) या नोंदवहीमध्ये जमिनीच्या व्यवहारांची माहिती, तसेच खरेदीची रक्कम, तारीख व कोणत्या नोंदणी कार्यालयात दस्त झाला याची माहिती मिळते.

फेरफारांची नोंदवहीला ‘हक्काचे पत्रक’ किंवा ‘फेरफार रजिस्टर’ असेही म्हणतात. जमिनीच्या अभिलेखात सातत्य राखण्यासाठी, कोणत्याही जमिनीच्या हक्कामध्ये सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगी शिवाय बदल होता कामा नये आणि झालेला कायदेशीर बदल हा गाव दफ्तरी, योग्य ती प्रक्रिया पार पाडून नोंदविण्यात यावा हा अधिकार नोंदणीचा मूळ उद्देश आहे. फेरफार नोंदीबाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम १४७ ते १५९ अत्यंत महत्वाची आहेत. त्यांचे नेहमी वाचन करावे. गाव नमुना ६ (फेरफारांची नोंदवही) विषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

गाव नमुना ६-अ:

या नोंदवहीमध्ये फेरफारास (म्युटेशन) हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार व चौकशी अधिकाऱ्यांचा निर्णय याबाबतची माहिती मिळते. गाव नमुना सहामध्ये नोंद केल्यानंतर, तलाठीमार्फत नमुना नंबर ९ मधील नोटीस बजावली जाते. गाव नमुना ६-अ (विवादग्रस्त प्रकरणांची नोंदवही) विषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

गाव नमुना ६-ब:

ही एक दुय्यम नोंदवही आहे. जी व्यक्ती, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम १४९ ( अधिकार संपादनाचे वृत्त ) किंवा कलम १५१ अन्वये ( हक्क हितसंबंध, दायित्वे बाबत आवश्यक माहिती पुरविणे ) विहित केलेल्या मुदतीत ( तीन महिन्याच्या आत ) देण्यात हयगय करेल ती व्यक्ती महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम १५२ अन्वये दंडासाठी पात्र राहील. असा दंड जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करता येतो. ( दंडाच्या रकमेसाठी अद्ययावत तरतूद बघावी.) गाव नमुना ६-ब (विलंब शुल्क प्रकरणांची नोंदवही) विषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

गाव नमुना ६-क:

या नोंदवहीमध्ये वारस नोंदीची माहिती मिळते. ही एक दुय्यम नोंदवही आहे. खातेदार मरण पावल्यावर, मयत खातेदाराच्या मालमत्तेचा उत्तराधिकार प्राप्त होणाऱ्या सर्व वारसांच्या नावाची हिंदू उत्तराधिकार अधिनियम उपबंधान्वये वारसाहक्क नोंदवहीत नोंद करावी लागते. एखादा खातेदार मयत झाल्यानंतर त्याचे वारस तलाठी यांचेकडे, मयत व्यक्तीच्या नावाऐवजी वारसाहक्काने वारसांची नावे दाखल करण्यासाठी अर्ज देतात. त्यानुसार काही ठिकाणी तलाठी वारसांची नोंद प्रथम गाव नमुना सहा-क मध्ये करतात. गाव नमुना सहा-क मधील नोंदींबाबत नोटीस काढण्याची प्रथा बऱ्याच ठिकाणी दिसून येत नाही. तलाठी अशा नोंदीची वारसांबाबत स्थानिक चौकशी केली असा शेरा लिहितात. मंडलअधिकारी अर्ज आणि तथाकथित स्थानिक चौकशीवर अवलंबून गाव नमुना सहा-क मधील ‘वारस ठराव’ मंजूर करतात. गाव नमुना ६-क (वारसा प्रकरणांची नोंदवही) विषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

गाव नमुना ६-ड:

या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा भूमी संपादन याबाबतची माहिती मिळते. हि एक दुय्यम नोंदवही आहे. नवीन उपभाग किंवा पोट हिस्सा म्हणजे भूमापन क्रमांकाच्या ज्या विभागाचे क्षेत्रफळ आणि आकारणी, भूमिअभिलेखात ज्या भूमापन क्रमांकाचा तो भाग असेल त्या क्रमांकावर स्वतंत्र दर्शक क्रमांक देऊन स्वतंत्रपणे नांदलेला असेल तो भाग. [ महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम २ ( ३५ )]

गाव नमुना सहा – ड मध्ये केवळ वाटण्या झाल्यामुळे होणारे भूमापन क्रमांकातील नवीन हिस्साचाच समावेश होत नाही तर संपादन, एकत्रीकरण, मळईची जमीन, पाण्याने वाहून गेलेली जमीन, अकृषिक जमीन यांसारख्या अनेक कारणांमुळे सीमांमध्ये होणारे सर्व बदलसुद्धा दर्शवले जातात. यासाठी तलाठी यांनी असे पोटहिस्से झालेल्या जागेला प्रत्यक्ष भेट देणे आणि झालेले बदल नोंदविणे आवश्यक असते. या बदलांप्रमाणे मोजणी करून नवीन सीमाचिन्हे व हद्दी भूमी अभिलेख विभागामार्फत निश्चित करण्यात येतात. गाव नमुना ६-ड (नवीन उपभाग (पोट हिस्से) नोंदवही) विषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

गाव नमुना ७:

(7/12 उतारा) या नोंदवहीमध्ये जमीन मालकाचे नाव, क्षेत्र, सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, पोट खराबा,आकार, इतर बाबतीची माहिती मिळते. या गाव नमुन्याला महसुली भाषेत “अधिकार अभिलेख पत्रक” असेही म्हणतात. “महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्तिथित ठेवणे) नियम १९७१” यातील नियम ३, ५, ६, आणि ७ मध्ये पहिल्यांदा सातबारा (७/१२) कसा तयार करावा याचे मार्गदर्शन केले गेले आहे. गाव नमुना ७ विषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

गाव नमुना ७-अ:

या नोंदवहीमध्ये कुळ वहिवाटीबाबतची माहिती मिळते. उदा. कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड याबाबतची माहिती मिळते. महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे आणि सुस्थितीत ठेवणे) नियम, १९७१ यातील नियम ३२ नुसार गाव नमुना ७ अ – या नोंदवहीमध्ये कुळ वहिवाटीबाबतची माहिती मिळते. उदा. कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड याबाबतची माहिती मिळते आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे आणि सुस्थितीत ठेवणे) नियम, १९७१ यातील नियम ३१ नुसार अधिकार अभिलेखानुसार जमीन कब्ज्यात असल्याचे मानण्यात येणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त इतर व्यक्तींची नोंद गाव नमुना सात-ब मध्ये असते. गाव नमुना सात-अ (कुळ वहिवाट नोंदवही) विषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

गाव नमुना ७-ब:

या नोंदवहीचा मुख्य उद्देश अनधिकृतपणे शेतजमीन कसण्यास/ कब्ज्यात ठेवण्यास प्रतिबंध व्हावा आणि शेतकऱ्याला अशा बेकायदेशीर बाबींपासून संरक्षण मिळावे हा आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे आणि सुस्थितीत ठेवणे) नियम १९७१ मधील नियम ३१ अन्वये हि नोंदवही ठेवली जाते. गाव नमुना ७-ब विषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

गाव नमुना – ८-अ:

या नोंदवहीत जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर,आपल्या नावावरील क्षेत्र व इतर माहिती मिळते. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १६८ ( १ ) अन्वये महसुलाचे प्रदान करण्यासाठी प्रथमतः जबाबदार असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने राज्य शासनाला जमीन महसूल आणि उपकर म्हणून देय असणाऱ्या रकमेचा हिशोब करण्यासाठी हा नमुना उपयोगी आहे. यालाच “खातेनोंदवही” असेही म्हणतात.

गाव नमुना आठ-अ मध्ये गावातील प्रत्येक शेतकऱ्याची, त्या गावात विविध ठिकाणी जी शेतजमीन आहे त्याची नोंद असते. गाव नमुना सात- बारा आणि आठ-अ च्या सहाय्याने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १५१ अन्वये खातेपुस्तिका तयार करणे व विहित फी भरल्यानंतर त्याची प्रत देणे तलाठी यांना शक्य होते. गाव नमुना ८-अ उतारा धारण जमिनींची नोंदवही विषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

गाव नमुना ८-ब:

गाव नमुना ८ ब ही नोंदवही वसुली व ताळेबंद यांच्या लेखांशी ही संबंधित असल्यामुळे अत्यंत महत्वाची नोंदवही आहे. या नोंदवहीत शेतजमिनीवरील वार्षिक जमीन महसूल, बिनशेती जमिनीचा महसूल, संकीर्ण जमीन महसूल यांची मागणी रक्कम व वसुलीची नोंद असते. वसुलीचा कालावधी साधारणतः ऑक्टोबर महिन्यात सुरु होतो, त्यापूर्वी सप्टेंबर महिन्याच्या शेवटी गाव नमुना नंबर ८ ब तयार असावा. गाव नमुना ८-ब विषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

गाव नमुना ८-क:

गाव नमुना ८ क म्हणजे जमीन महसुलाव्यतिरिक्त इतर मागण्या व वसुलीची नोंदवही. या नोंदवहीत महसुलाव्यतिरिक्त इतर सरकारी येणे (पोट हिस्सा फी, सिंचन कर, आयकर, विक्री कर, आर.टी.ओ. कर इ.) यांची नोंद केली जाते. ज्या विभागाची मागणी असते तो विभाग या नमुन्यातील स्तंभ १ ते ५ भरून तीन प्रतीत वर्षाच्या १५ डिसेंबर पर्यंत तहसिलदार यांच्याकडे पाठवायची असतात. गाव नमुना ८-क विषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

गाव नमुना ८-ड:

गाव नमुना आठ-ड म्हणजे तलाठी आणि मंडलअधिकारी यांच्याकडेची दैनिक रोख रकमेची नोंदवही ( कॅशबुक ) होय. तलाठी आणि मंडलअधिकारी यांनी त्यांच्याकडे जमा झालेल्या किंवा त्यांनी रोख वसूल केलेल्या जमीन महसूल प्रदानाच्या तसेच इतर शासकीय येणे यांच्या रोख रकमेची नोंद दररोज या नोंदवहीत करतो. गाव नमुना ८-ड विषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

गाव नमुना ९:

गाव नमुना नऊ म्हणजे दैनिक जमा पुस्तक आहे जे अलग करण्याच्या पावत्यांसह शासनाकडून पुरविण्यात येते. गाव नमुना ९ (दैनिक व जमापुस्तक) विषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

गाव नमुना ९-अ:

गाव नमुना ९-अ म्हणजे जमीन महसूलाखेरीज इतर येणे रकमांच्या वसुलीसाठीचे जमापुस्तक. जमीन महसूल आणि स्थानिक उपकर म्हणजेच एकत्रीकृत जमीन महसुल म्हणून वसूल केलेल्या रकमेच्या पावत्या गाव नमुना नऊच्या नमुन्यात देण्यात येतात. मागणी नोंदवहीमध्ये दर्शविलेल्या इतर येणे रकमा आणि जमीन महसूलाखेरीज इतर येणे रकमांच्या वसुलीच्या पावत्या गाव नमुना नऊ-अ नमुन्यात देण्यात येतात. गाव नमुना ९-अ (किर्द व जमापुस्तक) विषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

गाव नमुना ९-ब:

तलाठ्यांना पुरविण्यात येणाऱ्या पावती पुस्तकांवर योग्य नियंत्रण ठेवणे हे या गाव नमुन्यामागचे कारण आहे. तलाठी यांनी त्यांना देण्यात येणाऱ्या सर्व पावती पुस्तकांची नोंद गाव नमुना नऊ-ब मध्ये न चुकता करावी. सर्व निरीक्षकांना गाव नमुना नऊ-ब निरीक्षणासाठी उपलब्ध करून द्यावा. गाव नमुना ९-ब (गाव नमुना नऊची पावती पुस्तके व इतर पावती पुस्तके यांच्या संग्रहाची नोंदवही) विषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

गाव नमुना १०:

चलान म्हणजे वसुलीची रक्कम शासकीय कोषागारात भरण्याचे पत्रक. चलान वरून महसूल वसुलीची प्रगती कळते. चलान दोन प्रतीत सादर करावे. त्यापैकी एक प्रत तालुका कार्यालयामध्ये ठेवायची असते आणि दुसरी प्रत तलाठी यांनी स्वतःच्या अभिलेखात ठेवावी. गाव नमुना १० विषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

गाव नमुना १०-अ:

चलान म्हणजे वसुलीची रक्कम शासकीय कोषागारात भरण्याचे पत्रक. चलान वरून महसूल वसुलीची प्रगती कळते. उपरोक्त चलान जमीन महसुलाच्या रखमेखेरीज इतर रक्कम कोषागारात जमा करण्यासाठी वापरावे. गाव नमुना १०-अ विषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

गाव नमुना ११:

या नोंदवहीत प्रत्येक गटामध्ये सर्व्हे नंबर, पीकपाणी व झाडांची माहिती मिळते. गाव नमुना अकरा हा गाव नमुना बारा मधील माहितीमधून संकलित केलेला नमुना आहे. पिकपाहणी पूर्ण केल्यानंतर लगेचच तलाठी यांनी हा नमुना तयार करावा. गाव नमुना अकरातील एकूण क्षेत्र गाव नमुना एकच्या गोषवाऱ्याशी जुळले पाहिजे. गाव नमुना अकरा या नमुन्यात दिलेल्या ‘पिकांचे वर्ग’ या सदराखाली न येणारी पिके ‘इतर’ या सदराखाली नमूद करावीत. गाव नमुना ११ विषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

गाव नमुना १२:

महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्तिथित ठेवणे) नियम, १९७१ यातील नियम २९ अन्वये असलेल्या गाव नमुना बारा (पिकांची नोंदवही) हा तक्ता स्वरूपात असतो. हा नमुना पीक पाहणी आणि पैसेवारीसाठी अत्यंत महत्वाचा असतो. याची नोंद गाव नमुना अकरा मध्येही असते. या गाव नमुना बारामध्ये त्या शेत जमीनींतील पिकांची आणि जलसिंचनाच्या साधनांची सविस्तर माहिती असते. दिनांक १/१/१९७६ पासून “महाराष्ट्र जमीन महसूल नियम पुस्तिका-खंड ४” मध्ये विहित करण्यात आलेला गाव नमुना बारा, अंमलात आला. यामध्ये पंधरा स्तंभ होते, पंधरावा स्तंभ “शेरा” हा होता. दिनांक १० मे १९७६ रोजीच्या शासन परिपत्रकानुसार, गाव नमुना बारामध्ये एक स्तंभ वाढवण्यात यावा आणि स्तंभ पंधरा मध्ये “प्रत्यक्ष लागवड करणाऱ्याचे नाव” लिहावे आणि नवीन सोळावा स्तंभ शेऱ्यासाठी ठेवावा असा आदेश पारित झाला होता. मात्र महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्तिथित ठेवणे) नियम, १९७१ यातील नियम २९, ३० व ३१ यांचे एकत्रित वाचन केल्यास फक्त ज्या व्यक्तींना अधिकार अभिलेखातील नोंदींप्रमाणे जमीन कसण्याचा अधिकार आहे अशाच व्यक्तींची नावे स्तंभ पंधरा मध्ये लिहिणे योग्य ठरते त्यामुळे प्रचलित गाव नमुना बारामध्ये पंधराच स्तंभ ठेवण्यात आले आहेत. गाव नमुना १२ विषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

गाव नमुना १३:

या नोंदवहीमध्ये गावाची लोकसंख्या व गावातील जनावरे याबाबतची माहिती मिळते. गाव नमुना तेरा गावची समृद्धी दर्शवतो. यात गावची लोकसंख्या, घरांचे प्रकार, गुरे, जनावरे, आणि गावात उपलब्ध शेतकी अवजारांची माहिती समाविष्ट असते. या नमुन्यात लोकसंख्येविषयी आकडे असल्यामुळे, दर दहा वर्षांनी जनगणनेनंतर तलाठी यांनी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा नमुना अद्ययावत करून मार्च शेवटच्या आठवड्यात तहसिलदारांना सादर करावयाचा आहे. गाव नमुना १३ विषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

गाव नमुना १४:

गाव नमुना १४ ही गावात असणाऱ्या आणि माणसांना तसेच प्राण्यांना करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या साधनांची आणि शेतीसाठी करण्यात येणाऱ्या जलसिंचन संबंधित आकडेवारीची नोंदवही आहे. ही नोंदवही सतत चालू रहाणारी आहे, यात दरवर्षी वाढ, दुरुस्ती, घट यांच्या नोंदी घेऊन हि नोंदवही साधारणतः दरवर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अद्ययावत करावी आणि अद्ययावत गाव नमुना चौदाचा गोषवारा दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तहसिलदारांना सादर करावयाचा आहे. गाव नमुना १४ विषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

गाव नमुना १५:

गाव नमुना १५ मध्ये तलाठ्याकडे येणाऱ्या तसेच त्याने बाहेर पाठवलेल्या सर्व पत्रव्यवहाराची नोंद ठेवावी लागते. तलाठी यांनी प्रत्येक गावासाठी स्वतंत्र बारनिशी ठेवावी. तलाठ्याने त्याच्याकडे प्राप्त झालेल्या प्रकरणाची नोंद या नमुन्यात तात्काळ करावी. गाव नमुना १५ विषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

गाव नमुना १६:

या नोंदवहीमध्ये माहिती पुस्तके, शासकीय आदेश व नवीन नियमावली याबाबतची माहिती मिळते. गाव नमुना सोळा हा पुस्तके, नियम पुस्तिका व स्थायी आदेश इत्यादींची सूची आहे. यासाठी शासनाने कोणताही विशिष्ट नमुना विहित केलेला नाही. तलाठी यांच्याकडे मार्गदर्शनासाठी जी पुस्तके असतात, नियम पुस्तिका असतात व शासन तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्थायी आदेश प्राप्त होत असतात. तलाठी यांनी या प्रत्येक गोष्टीला अनुक्रमांक द्यावा व ते दफ्तरामध्ये जतन करावे. गाव नमुना १६ विषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

गाव नमुना १७:

या नोंदवहीमध्ये महसूल आकारणी याबाबतची माहिती मिळते. ज्या प्रकरणात संकीर्ण महसूल बसवण्यासंबंधीच्या विषयाच्या अंतर्भाव आहे अशा कोणत्याही बाबींच्या बाबतीत तलाठी किंवा मंडलअधिकारी यांनी पाठवण्याची प्रतिवृते या नमुन्यात पाठवावी. गाव नमुना १७ विषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

गाव नमुना १८:

या नोंदवहीमध्ये सर्कल ऑफिस, मंडल अधिकारी यांच्या पत्रव्यवहाराची माहिती असते. गाव नमुना १८ मध्ये मंडलअधिकारी यांच्याकडे येणाऱ्या तसेच त्यांनी बाहेर पाठवलेल्या सर्व पत्रव्यवहाराची नोंद ठेवावी लागते. मंडलअधिकारी यांनी प्रत्येक गावासाठी स्वतंत्र बारनिशी ठेवावी आणि त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या प्रकरणाची नोंद या नमुन्यात तात्काळ करावी. गाव नमुना १८ विषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

गाव नमुना १९:

या नोंदवहीमध्ये सरकारी मालमत्तेबाबतची माहिती मिळते. तलाठी आणि मंडलअधिकारी याना त्यांच्या ताब्यात असलेल्या सर्व शासकीय मालमतेची ( टेबल, खुर्ची, कपाट, घड्याळ इत्यादी ) नोंद गाव नमुना एकोणीस मध्ये ठेवावी लागते. तलाठी आणि मंडलअधिकारी यांनी या नोंदवहीत नमूद साहित्याखेरीज इतर कोणतेही साहित्य कार्यालयात ठेऊ नये अन्यथा त्याबाबत खुलासा विचारला जाऊ शकतो. गाव नमुना १९ विषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

गाव नमुना २०:

या नोंदवहीमध्ये पोस्ट तिकिटांची नोंद याबाबतची माहिती मिळते. गाव नमुना वीस हा तलाठी / मंडलअधिकारी यांच्यासाठी पोस्टाच्या तिकिटांची नोंदवही आहे. सद्याच्या संगणक युगात बहूतांश संदेश इलेक्ट्रानिक उपकरणांमार्फत पाठवले जात असले तरी शासकीय कार्यपद्धतीत टपालाचे महत्व संपलेले नाही. सर्वच शासकीय कार्यपद्धतीत पोस्टाच्या तिकिटांची कायम कमतरता राहिली आहे. तरीही गाव नमुना वीसची नोंदवही तलाठी / मंडलअधिकारी यांनी कार्यालयात ठेवणे आवश्यक आहे. गाव नमुना २० विषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

गाव नमुना २१:

या नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते. गाव नमुना २१ ही अशी मंडलअधिकारी यांची मासिक दैनंदिनी आहे. मंडलअधिकारी यांनी हि मासिक दैनंदिनी दरमहा पाच तारखेच्या आत तहसिलदार यांना दोन प्रतीत न चुकता सादर करायची असते. तहसिलदार यांनी या दैनंदिनीची एक प्रत उपविभागीय अधिकारी यांनी सादर करायची असते. गाव नमुना २१ विषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

अशा प्रकारे तलाठी कार्यालयात सामान्य नागरिकांना गाव कामगार तलाठी यांच्याकडून वरील माहिती विचारणा केल्यास मिळू शकते. आपणास आपल्या मिळकतीबाबत व गावाच्या मिळकतीबाबत माहिती मिळाल्यामुळे मिळकतीच्या मालकी व वहिवाटीसंबंधीचे वाद कमी होण्यास व मिटण्यास मदत होऊ शकते.

हेही वाचा – तलाठ्यांची कर्तव्य कोणती आहेत? तलाठ्यांकडून माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकार अर्ज कसा करायचा?

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.