वृत्त विशेष

ग्रामीण भागातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यात ‘महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान योजना’

राज्यातील ग्रामीण भागातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामविकास विभागामार्फत येत्या जागतिक महिला दिनापासून (8 मार्च) महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामविकासमंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी दिली.

महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान योजना:

महिलांचा आत्मसन्मान वाढविण्यासाठी शेत दोघांचे, घर दोघांचे उपक्रम
प्रदर्शने, कॉप शॉप तसेच सहकारी आणि कॉर्पोरेट मॉलमध्ये बचतगटांना उत्पादन विक्रीची संधी
महिलांना पायाभूत प्रशिक्षण व उद्योजकता विकासासाठी कौशल्य प्रशिक्षण
तंबाखूमुक्ती, मशेरीमुक्ती, तपकीरमुक्ती आदींसाठी जनजागृती
कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी कायद्यांबाबत मार्गदर्शन

या अभियान काळात शासनाच्या विविध योजना महिलांपर्यंत पोहोचवून त्याचा त्यांना लाभ मिळवून देण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने महिला बचतगटांना प्रदर्शने, कॉप शॉप तसेच सहकारी आणि कॉर्पोरेट मॉलमध्ये उत्पादनांच्या विक्रीची संधी उपलब्ध करुन देणे, महिलांचा आत्मसन्मान वाढविण्यासाठी शेत दोघांचे (7/12 वर पती व पत्नीचे नाव लावणे) आणि घर दोघांचे (नमुना नंबर 8 वर पती व पत्नीचे नाव लावणे) या संकल्पनेअंतर्गत मालमत्तेवर पती व पत्नीचे नाव लावणे, महिलांचे हिमोग्लोबिन व बीएमआय तपासणी करुन त्यांना पोषणाबाबत मार्गदर्शन करणे, महिलांमधील तंबाखूमुक्ती, मशेरीमुक्ती, तपकीर मुक्ती आदीबाबत जनजागृती करणे, महिलांचे उपजीविकेचे स्त्रोत वाढविणे, महिलांना पायाभूत प्रशिक्षण व उद्योजकता विकासासाठी कौशल्य प्रशिक्षण देणे आदी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असेही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, गावपातळीवर राबविण्यात येणाऱ्या विकासाच्या विविध योजनांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग वाढविणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने ‘महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान’ राबविण्यात येईल. शासनाच्या संबंधित सर्व विभागांचा यात सहभाग घेतला जाईल. अभियानात विविध उपक्रम राबविण्यात येतील. बचतगट, ग्रामसंघ आणि प्रभागसंघाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षम संस्था निर्माण करण्यात येतील. महिलांचे उपजीविकेचे स्त्रोत वाढविण्यासाठी निधी आणि कर्ज उपलब्धतेसाठी मदत करण्यात येईल. महिला बचतगटांच्या उत्पादनांचे मार्केटिंग करण्यासाठी आकर्षक ब्रँडींग व पॅकेजिंगवर काम करण्यात येईल. यासाठी प्रशिक्षणे व अभ्यास दौऱ्यांचे आयोजन केले जाईल. शासनाचे विविध विभाग, कार्यालये, संस्था, पंचायतराज संस्था यांना आवश्यक असणाऱ्या विविध वस्तूंची खरेदी ही बचतगटांकडून होण्यासाठी सामंजस्य करार आदी प्रयत्न करण्यात येतील. शासकीय कार्यालये आणि आवारामधील उपहारगृहे बचतगटांना चालविण्यासाठी देणे, बचतगटांना उद्योग आधार व अन्न परवाना मिळवून देणे आदीसाठी प्रयत्न करण्यात येतील. बचतगटांना उपजिविकेचे स्त्रोत उपलब्ध करण्यासाठी घरकुल मार्ट सुरु करणे, महिलांचे गवंडी प्रशिक्षण आयोजित करणे, विविध स्वास्थ्य आणि विमा योजनांमध्ये महिलांची नोंदणी करणे यासाठी कार्यक्रम घेतले जातील. महिलांना कौटुंबिक हिंसाचार व कायद्यांबाबत मार्गदर्शन करणे व कायदेविषयक मोफत सहाय्य व सल्ला देण्यासाठी उपक्रम राबविण्यात येतील. महिला लाभार्थ्यांच्या बांधकाम पूर्ण झालेल्या घरकुलांमध्ये गृहप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात येतील, तर घरकुल मंजूर झालेल्या महिला लाभार्थ्यांच्या घरकुलांचे भूमिपूजन करुन बांधकाम सुरु करण्यात येईल. अस्मिता योजनेंतर्गत सॅनिटरी नॅपकिनची उपलब्धता आणि विक्रीस चालना देण्यात येईल. यासोबतच नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या महिला सदस्यांना पंचायतराजविषयक विविध प्रकारची प्रशिक्षणे देण्यात येतील. असे विविध उपक्रम या अभियानांतर्गत राबविण्यात येणार आहेत, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

उत्कृष्ट कामगिरीसाठी होणार गौरव

यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवून तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन करीत, काळजी घेत हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात यावे, अशा सूचना सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आल्या आहेत. येत्या 8 मार्च रोजी राज्यस्तरावर या अभियानाचा शुभारंभ करण्यात येईल. त्याचवेळी जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत पातळीवरही महिला मेळावे, प्रदर्शने आदींचे आयोजन करुन या अभियानाचा प्रारंभ करण्यात येईल. अभियानाची प्रभावी अंमलबजावणी, संनियंत्रण व मूल्यमापन होण्याच्या दृष्टीने राज्य, विभाग, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणारे जिल्हे, तालुके आदी विविध घटकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल, अशी माहितीही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिली.

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.