गाव नमुना 13 विषयीची संपूर्ण माहिती

गाव नमुना तेरा गावची समृद्धी दर्शवतो. यात गावची लोकसंख्या, घरांचे प्रकार, गुरे, जनावरे, आणि गावात उपलब्ध शेतकी अवजारांची माहिती समाविष्ट असते. या नमुन्यात लोकसंख्येविषयी आकडे असल्यामुळे, दर दहा वर्षांनी जनगणनेनंतर तलाठी यांनी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा नमुना अद्ययावत करून मार्च शेवटच्या आठवड्यात तहसिलदारांना सादर करावयाचा आहे. 

गाव नमुना 13 विषयीची संपूर्ण माहिती

गाव नमुना 13 विषयीची संपूर्ण माहिती:

गाव नमुना तेरा - स्तंभ १ अनुक्रमांकाचा आहे. 

गाव नमुना तेरा - स्तंभ २ मध्ये गावातील सर्व घर क्रमांक व घर मालकाचे नाव आणि कुटुंब प्रमुखाचे नाव लिहावे. शिधापत्रिकांची पडताळणी या स्तंभावरून करता येईल. 

गाव नमुना तेरा - स्तंभ ३ मध्ये  मोठ्या घरांची नोंद घ्यायची आहे. नागरी क्षेत्रामध्ये १५० चौरस मीटर व त्यापेक्षा जास्त फरसबंद क्षेत्र असलेली पक्की घरे तर अनागरी क्षेत्रामध्ये २५० चौरस मीटर व त्यापेक्षा जास्त फरसबंद क्षेत्र असलेली पक्की घरे 'मोठी घरे' या संज्ञेत येतात. 

गाव नमुना तेरा - स्तंभ ४ मध्ये मध्यम घरांची नोंद घ्यायची आहे. नागरी क्षेत्रामध्ये १५० चौरस मीटरपेक्षा कमी फरसबंद क्षेत्र असलेली पक्की घरे तर अनागरी क्षेत्रामध्ये २५० चौरस मीटरपेक्षा कमी फरसबंद क्षेत्र असलेली मध्यम घरे या संज्ञेत येतात. विटा किंवा दगड व कमावलेला चुना यांनी बांधलेली घरे पक्के बांधकाम समजावे. 

गाव नमुना तेरा - स्तंभ ५ मध्ये लहान घरांची नोंद घ्यायची असते. वरील स्तंभ ४ आणि ५ मधील प्रकारची घरे वगळता इतर सर्व घरे , झोपड्या ,तात्पुरत्या छपऱ्या, कच्ची बांधकामे 'लहान घरे ' या संज्ञेत येतात. विटा किंवा दगड व कमावलेला चुना यांनी न बांधलेली घरे कच्चे बांधकाम समजावे. 

गाव नमुना तेरा - स्तंभ ६ आणि ७ मध्ये गावची लोकसंख्या नमूद करायची आहे. त्यात स्तंभ ६ मध्ये पुरुषाची तर स्तंभ ७ मध्ये स्त्रियांची संख्या नमूद करायची आहे. दर दहा वर्षांनी जनगणनेनंतर तलाठी यांनी हा स्तंभ अद्ययावत करावयाचा आहे. 

गाव नमुना तेरा - स्तंभ ८ ते १६ मध्ये गावातील गुरे आणि जनावरांची संख्या नमूद करायची आहे. त्यात स्तंभ ८ मध्ये बैलांची, स्तंभ ९ मध्ये गायींची, स्तंभ १० मध्ये रेड्यांची स्तंभ ११ मध्ये म्हशींची, स्तंभ १२ मध्ये घोड्यांची, स्तंभ १३ मध्ये घोडींची, स्तंभ १४ मध्ये मेंढ्यांची, स्तंभ १५ मध्ये बकऱ्यांची, तर स्तंभ १६ मध्ये गाढवांची संख्या नमूद करायची आहे. जेव्हा गावाशी संबंध नसलेली जनावरे फक्त चरण्यासाठी गावात येतात तेव्हा या वस्तुस्थितीची नोंद स्तंभ २३ या शेरा स्तंभात घ्यावी. कोणाच्याही मालकीची नसलेली, देवासाठी सोडलेली जनावरे यांची नोंद या नमुन्यात तळाशी घ्यावी. तलाठी यांनी जिल्हाधिकारी, ग्राम अधिकारी आणि वन अधिकारी यांच्याशी समन्वय करून दरवर्षी जून महिन्याच्या आधी गुरांची संगणना करावी. व दरवर्षी जून महिन्याच्या शेवटी हा स्तंभ अद्ययावत करावा. ज्या गावात, या नमुन्यात नमूद गुरांपेक्षा इतर प्रकारची जनावरे सापडतात तेथे या नमुन्यात जादा स्तंभ जोडावा.

गाव नमुना तेरा - स्तंभ १७ ते २२ मध्ये गावातील शेतकी अवजारांची नोंद करायची आहे. त्यात स्तंभ १७ मध्ये नांगराची, स्तंभ १८ मध्ये बैलगाड्यांची, स्तंभ १९ मध्ये तेल इंजिनांची, स्तंभ २० मध्ये विदयुत पंपाची, स्तंभ २१ मध्ये ट्रॅक्टरची आणि स्तंभ २२ मध्ये शेतीसाठी वापरात येणाऱ्या इतर साधनांची त्यांच्या नावांसह नोंद करायची आहे. 

गाव नमुना तेरा - स्तंभ २३ हा शेरा स्तंभ आहे.

गाव नमुना 13 नमुना

हेही वाचा - गाव नमुना सातबारा (७/१२) उतारा म्हणजे काय? सातबारा उताऱ्या विषयीची संपूर्ण माहिती

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी हिथे क्लिक करा !!

Post a Comment

0 Comments