गाव नमुना ६ (फेरफारांची नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती

फेरफारांची नोंदवहीला 'हक्काचे पत्रक' किंवा 'फेरफार रजिस्टर' असेही म्हणतात. जमिनीच्या अभिलेखात सातत्य राखण्यासाठी, कोणत्याही जमिनीच्या हक्कामध्ये सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगी शिवाय बदल होता कामा नये आणि झालेला कायदेशीर बदल हा गाव दफ्तरी, योग्य ती प्रक्रिया पार पाडून नोंदविण्यात यावा हा अधिकार नोंदणीचा मूळ उद्देश आहे. फेरफार नोंदीबाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम १४७ ते १५९ अत्यंत महत्वाची आहेत. त्यांचे नेहमी वाचन करावे. 

गाव नमुना ६ (फेरफारांची नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती

गाव नमुना ६ (फेरफारांची नोंदवही):

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६, कलम १५४ अन्वये नोंदणी अधिकाऱ्याने पाठविलेली जमीन हस्तांतरणाची माहिती वगळता इतर बाबींची माहिती ( वारस इत्यादी ), हक्क संपादन करणाऱ्या व्यक्तीने, तीन महिन्याच्या आत गाव कामगार तलाठी याना कळविणे आवश्यक आहे. अन्यथा हक्क संपादन करणारा दंडास पात्र ठरतो. 

सन २०१४ मध्ये महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३० अन्वये, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम १५० ( २ ) मध्ये नवीन परंतुक समाविष्ट दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यानुसार ज्या ठिकाणी साठवणुकीच्या यंत्राचा वापर करून, ( महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६, कलम २ ( ३३ अ. ) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम १४८ अन्वये अधिकार अभिलेख ठेवण्यात आलेले असतील, तेथे तालुक्यातील तहसिलदार यांनी कलम १५४ अन्वये सूचना मिळाल्यानंतर लगेचच, अशी मिळालेली सूचना ती सूचना, फेरफारामध्ये ज्याचा हितसंबंध आहे असे अधिकारांच्या अभिलेखावरून किंवा फेरफार नोंदवहीवरुन तहसिलदाराला दिसून येईल, अशा सर्व व्यक्तींना आणि अशा सूचनेत ज्या व्यक्तींचा हितसंबंध आहे असे तहसिलदाराला सकारण वाटत असेल अशा इतर कोणत्याही व्यक्तीला व त्याबरोबर गावच्या संबंधित तलाठ्यास, लघुसंदेश सेवा ( एस . एम. एस. ) किंवा इलेट्रॉनिक मेल ( इ - मेल ) किंवा विहित करण्यात येईल अशा इतर कोणत्याही उपकरणाद्वारे पाठवील. अशी सूचना मिळाल्यानंतर गावाचा तलाठी, तातडीने, फेरफार नोंदवहीत त्याची नोंद करील. 

परंतु 'भारतीय नोंदणी अधिनियम, १९०८ अन्वये दस्तऐवजांची नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यासमोर ( उप निबंधक इत्यादी ) ज्या व्यक्तींनी स्वतः दस्तऐवज निष्पादीत  केले असतील, अशा व्यक्तींना, तहसिलदार कार्यालयातील तलाठीद्वारे, वरील तरतुदीनुसार अशी कोणतीही सूचना पाठविणे आवश्यक असणार नाही. 

हेही वाचा - 1880 सालापासूनचे जुने फेरफार, सातबारा, खाते उतारे ऑनलाईन कसे पाहायचे? जाणून घ्या सविस्तर 

कोणत्याही जमिनीच्या मालकी हक्कात १ . नोंदणीकृत दस्ताने, २. वारसाने किंवा मृत्यूपत्रान्वये, ३. न्यायालयाच्या किंवा सक्षम अधिकाऱ्याच्या आदेशानेच बदल होतो. इतर अन्य कोणत्याही प्रकारे किंवा अनोंदणीकृत दस्त किंवा अर्जाद्वारे जमिनीच्या मालकी हक्कात कधीही बदल होत नाही हे लक्षात ठेवावे. 

अधिकार अभिलेखातील नोंद आणि गाव नमुना सहा. ( फेरफार नोंदवही ) मधील प्रमाणित करण्यात आलेली नोंद विरुद्ध आहे असे सिद्ध करण्यात येईपर्यत किंवा  त्याबद्दल नवीन नोंद कायदेशीररित्या दाखल करण्यात येईपर्यंत, अशी अभिलेखातील नोंद आणि गाव नमुना सहा ( फेरफार नोंदवही ) मधील प्रमाणित करण्यात आलेली नोंद खरी असल्याचे गृहीत धरण्यात येईल. ( महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६, कलम १५७. )

काही ठिकाणी फेरफार प्रकरणात प्रमाणन अधिकारी एखादा दस्त कमी असल्यास 'अमुक दस्त हजर करवून घेऊन फेरनोंद करावी' असा शेरा लिहितात. प्रमाणन अधिकाऱ्यास फेरफार नोंद एकतर प्रमाणित करता येते किंवा रद्द करता येते. फेरनोंद करण्याचा आदेश देणे बेकायदेशीर आहे. फेरनोंद घेण्याच्या तरतुदीबाबत कायद्यात कुठेही उल्लेख नाही. फेरफार प्रकरणात एखादा दस्त कमी असल्यास, तो सादर करण्यासाठी मुदत द्यावी. जरूर तर तसा उल्लेख शेरा स्तंभात करावा. अशा नोंदीबाबत तात्काळ निर्णय घेणे अत्यावश्यक असल्यास ती नोंद कागदपत्र अपूर्ण असल्यामुळे रद्द करावी आणि संबंधिताला त्याबाबत सक्षम अधिकाऱ्याकडे ( उप विभागीय अधिकारी ) अपील दाखल करण्याचा सल्ला द्यावा. 

एक महत्वाची सूचना: कोणत्याही दस्तावरुन गाव नमुना सहामध्ये नोंद घेतांना, संबंधित मिळकतीबाबत झालेला जुना फेरफार जरूर काढून बघावा. उदा. 'अ' ने 'क' ला मिळकत विकली. 'क' ने नोंदीसाठी अर्ज केल्यावर 'अ' चे नाव सदर मिळकतीवर कोणत्या फेरफाराने आले ते जरूर बघावे. यामुळे सदर मिळकत विकण्याचा हक्क फक्त 'अ' ला होता कि या व्यवहाराला इतरही सहधारकाच्या परवानगीची आवश्यकता होती ते समजेल. अशीच दक्षता इतर सर्व नोंदी ( विशेषतः वारस नोंदी ) करतानाही घ्यावी. 

गाव नमुना सहामध्ये नोंद कशी करावी. 

गाव नमुना सहाच्या स्तंभ १ मध्ये नोंदीचा अनुक्रमांक नोंदवावा. गाव नमुना सहा या अनुक्रमांक देताना १ ते १ लाख, त्यानंतर राजभाषा मराठीचे स्वर आणि व्यंजने वापरण्यात यावीत. जसे अ - १ ते अ - १ लाख, त्यानंतर आ - १ते आ - १ लाख असे करून ज्ञ - १ ते ज्ञ - १लाख याप्रमाणे दिले जातात. 

गाव नमुना सहाच्या स्तंभ २ मध्ये संपादन केलेल्या अधिकाराचे स्वरूप लिहावे. यावेळी प्रथम 'फेरफाराचा दिनांक' या सदराखाली तलाठी यांनी नोंद नोंदविल्याचा दिनांक लिहावा. त्या खाली 'फेरफाराचा प्रकार' या सदराखाली प्राप्त झालेल्या दस्ताचा / कागदपत्रांचा प्रकार ( खरेदी नोंद/ आदेश / बोजा / हक्कसोड दस्त / दुरुस्ती दस्त इत्यादी ) नोंदवावा. त्याखाली 'विवरण / तपशील' या प्राप्त झालेल्या दस्त / कागदपत्र / आदेश इत्यादींचा तपशील थोडक्यात लिहावा. असा तपशील लिहिताना दस्त क्रमांक, आदेश क्रमांक इत्यादी तपशील दिनांकासह कटाक्षाने नोंदवावा. 

गाव नमुना सहाच्या स्तंभ ३ मध्ये प्राप्त झालेल्या दस्त / कागदपत्र / आदेश इत्यादींमुळे ज्या भूमापन क्रमांक व उपविभाग क्रमांकावर परिणाम होणार आहे त्यांचे क्रमांक आणि जितक्या क्षेत्रावर परिणाम होणार आहे तितके क्षेत्र लिहावे. 

गाव नमुना सहाचा स्तंभ ४ हा प्रमाणन अधिकाऱ्याच्या शेऱ्यासाठी आहे. तलाठी यांनी या स्तंभात काहीही लिहू नये. 

वरील प्रमाणे स्तंभ १ ते ३ लिहून झाल्यानंतर तलाठी यांनी स्तंभ २ मध्ये शेवटी स्वतःची दिनांकीत स्वाक्षरी करावी व स्वतःचे नाव, पद, सझ्याचे नाव, तालुका, जिल्हा, हा तपशील लिहावा किंवा त्याबाबतचा शिक्का उमटवावा.

गाव नमुना ६

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम १४९, १५०, १५१ अन्वये.. 

 1. हक्क धारण केल्यानंतर तीन महिन्यात संबंधिताने तलाठी याना त्याबाबत कळविणे आवश्यक आहे. 
 2. नोंदणीकृत दस्ताने किंवा जिल्हाधिकारी यांचे आदेशावरून असा हक्क धारण केला असेल तर वरील प्रमाणे तलाठी यांना कळविण्याची आवश्यकता नसते. 
 3. कोणताही हक्क धारण केल्याची माहिती प्राप्त झाल्यावर तलाठी यांनी त्याची नोंद गाव नमुना सहा मध्ये नोंदविणे आवश्यक आहे. 
 4. गाव नमुना सहामध्ये नोंद घेतल्यावर गाव नमुना सहाची एक प्रत गाव चावडीच्या नोटिस बोर्डवर लावणे आवश्यक आहे. 
 5. झालेल्या व्यवहाराशी संबंधित सर्व लोकांना सदर व्यवहाराची नोटीस ( फॉर्म नं ९ मध्ये ) बजावणे आवश्यक आहे. 
 6. जर झालेल्या व्यवहाराबाबत कोणाचीही हरकत असल्यास त्याची नोंद विवादग्रस्त प्रकरणाची नोंदवहीत ( गाव नमुना सहा - अ मध्ये ) करणे व त्याबाबत संबंधिताला पोहोच देणे आवश्यक आहे. 
 7. गाव नमुना सहा मधील कोणतीही नोंद सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केल्याशिवाय त्याची नोंद हक्क नोंदणी अभिलेखात नोंदविता येत नाही. 
 8. हक्क धारण केल्याची माहिती तीन महिन्यात गाव कामगार तलाठी यांना कळविण्यात कुसूर केल्यास त्या व्यक्तीकडून दंड देण्यास वसूल करता येतो. ( महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ कलम १५० (२) ).
 9. संबंधित व्यक्तीस सुनावणीची पुरेशी संधी दिल्याशिवाय मालकी हक्क, कुळ हक्क किंवा कोणत्याही अधिकार नोंदीत बदल करता येत नाही. (महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ कलम १५०(२))

गाव नमुना सहामध्ये मालकी हक्क बदलाच्या नोंदीबाबत खात्री :

मालकी हक्क बदलाची नोंद गाव नमुना सहामध्ये नोंदविताना तलाठी यांनी खालील बाबींची खात्री करावी. 

1. नोंदणीकृत दस्ताशिवाय व्यवहार झाला आहे काय ? ( होय / नाही )
2. नोंदीसाठी दिलेली कागदपत्रे प्रमाणित व योग्य आहेत काय ? ( होय / नाही )
3. तुकडेजोड - तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार झाला आहे काय ? ( होय / नाही )
4. परवानगीशिवाय बिगर शेतकरी व्यक्तीने जमीन खरेदी केली आहे काय ? ( होय / नाही )
5. कुळकायदा कलम ४३ चा भंग करून व्यवहार झाला आहे काय ? ( होय / नाही )
6. कमाल जमीन धारणा कायद्याचा भंग करून व्यवहार झाला आहे काय ? ( होय / नाही )
7. भूसंपादन कायद्याचा भंग करून व्यवहार झाला आहे काय ? ( होय / नाही )
8. विविध निरसीत कायद्यांविरुद्ध व्यवहार झाला आहे काय ? ( होय / नाही )
9. इतर हक्कातील बँक / सोसायटी बोजे असताना ना हरकत दाखल्याशिवाय व्यवहार झाला आहे काय ? (होय /नाही )
10. जमिनीचा धारणा प्रकार सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय व्यवहाराला संमती देतो काय ? ( होय / नाही)
11. विविध कायद्यातील तरतुदींविरुद्ध व्यवहार झाला आहे काय ? ( होय / नाही ) 
12. जमिनीच्या क्षेत्राचा मेळ बसतो काय ? ( होय / नाही ) 

वरिष्ठ अधिकाऱ्याच्या किंवा न्यायालयाच्या आदेशान्वये नोंदविण्यात येणाऱ्या नोंदीबाबत, संबंधित आदेशाचा मतितार्थ समजून घ्यावा. जरूर तर वरिष्ठ किंवा जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्यावा.

हेही वाचा - गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार पहा ऑनलाईन.

गाव नमुना सहामध्ये नोंद केल्यानंतर ती प्रमाणित होण्याआधी खालील बाबींची खात्री करून घ्यावी. 

 1. सर्व हितसंबंधितांना नोटीस ( नमुना नं ९ मधील ) बजावली गेली आहे. ( होय / नाही ) 
 2. गाव नमुना सहामधील नोंदीबाबत कोणाची हरकत आहे किंवा कसे. ( होय / नाही )
 3. गाव नमुना सहामध्ये नोंद नोंदविल्यानंतर कायद्यात नमूद केलेला वरिष्ठ काळ लोटला आहे. ( होय / नाही ) 

गाव नमुना सहामधील नोंद प्रमाणित झाल्यानंतरची कार्यवाही 

 1. गाव नमुना सहामधील नोंदी तपासण्याचे, त्या बरोबर असल्याची खात्री करण्याचे, त्यात दुरुस्ती करण्याचे आणि अशा नोंदी प्रमाणित करण्याचे अधिकार अव्वल कारकुनाच्या दर्जाहून कमी दर्जाचा नसेल अशा महसूल अधिकारी किंवा भूमापन अधिकारी यांना आहेत. ( महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६, कलम १५० ( ६ ). ) यानुसार मंडलअधिकारी, गाव नमुना सहामधील नोंदीबाबत सर्व कायदेशीर बाबींची खात्री करून सदर नोंदी प्रमाणित करतात. मंडलअधिकारी यांनी गाव नमुना सहामधील नोंद प्रमाणित केल्यानंतर तलाठी यांनी : 
 2. गाव नमुना सात-बारा, गाव नमुना आठ-अ ( खातेदारांची नोंदवही ) तसेच जरूर त्या इतर सर्व संबंधित गाव नमुन्यांवर सदर प्रमाणित गाव नमुना सहानुसार अंमल द्यावा. असा अंमल देताना संबंधित गाव नमुना सहाचा अनुक्रमांक वर्तुळात नोंदवावा. 
 3. गाव नमुना सहामधील नोंदीशी संबंधित सर्व हितसंबंधी व्यक्तींना सदर निर्णयाबाबत कळवावे. 

विवादग्रस्त नोंदीबाबतची कार्यवाही 

गाव नमुना सहामध्ये नोंद केल्यानंतर, तलाठीमार्फत नमुना नं ९ मधील नोटीस बजावली जाते. अशी नोटीस बजावल्यानंतर, सदर नोंद प्रमाणित होण्याआधी जर त्या नोंदीबाबत कोणीही तक्रार नोंदवली तर : 

 1. तलाठी यांनी अशी तक्रार लेखी स्वरूपात स्वीकारावी. 
 2. सदर तक्रारीची नोंद गाव नमुना सहा - अ ( विवादग्रस्त प्रकरणांच्या नोंदवही ) मध्ये करावी. 
 3. तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीला ( नमुना १० मध्ये ) पोहोच द्यावी. 
 4. सदर हरकतीची कागदपत्रे तात्काळ मंडलअधिकारी यांना सुपूर्त करावीत. 

Post a Comment

0 Comments