कृषी योजनापोकरा योजनावृत्त विशेषसरकारी योजना

रुंद वाफा व सरी पेरणी यंत्र (बीबीएफ यंत्र) अनुदान योजना (पोकरा अंतर्गत) ऑनलाईन अर्ज करा

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी हवामान अनुकूल तंत्रज्ञान अवलंब करण्यास प्रवृत्त करणे या उद्देशाने प्रकल्पांतर्गत विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. मागील काही वर्षातील हवामानातील बदल व पर्जन्यमानातील अनिश्चितता जसे पावसाचे एकूण कमी दिवस, कमी वेळेत जास्त पाऊस, सरासरीपेक्षा कमी पाऊस, पावसाचा तीन आठवड्यांपेक्षा जास्त खंड, मान्सूनचे उशिरा आगमन व वेळेपुर्वी निघून जाणे, गारपीट व अवेळी पाऊस या सर्व हवामानातील बदलामुळे पाणी टंचाई (पिण्यासाठी, जनावरांसाठी, पिकांसाठी, पिकांच्या उत्पादनात व उत्पादकतेत घट, कृषी उत्पादन वाढीचा दर घटणे, अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांमध्ये नैराश्य, ग्रामीण भागाकडून शहराकडे स्थलांतर होऊ लागले इ. परिणाम दिसून येत आहेत. तसेच वाढत्या तापमानामुळे कोरडवाहू पिकाच्या उत्पादकतेवरील परिणाम तसेच जमिनीतील कर्बामध्ये व ओलाव्यामध्ये घट, कमी कालावधीत पडणाऱ्यां आणि पावसामुळे होणारी प्रचंड जमिनीची धूप, अनियमित पावसामुळे कोरडवाहू पिकाकरीता पाणी उपलब्धतेवर प्रतिकूल परिणाम इ. शेतावर वातावरणातील बदलामुळे संभाव्य दूरगामी परिणाम दिसून येतील.

वरील सर्व दूरगामी परिणामांचा विचार करता बदलत्या वातावरणाचा अभ्यास करून हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा प्रसार व अवलंब करणे आवश्यक आहे. सदर हवामान अनुकूल तंत्रज्ञानापैकी रुंद वाफा व सरी (Broad Bed Furrow) या तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत प्रभावी दिसून आलेला आहे. ज्या शेतकऱ्यांनी अशा तंत्रांचा अवलंब केला त्यांना हवामानातील लहरीपणामुळे तौलनिक रित्या कमी नुकसान सहन करावे लागले असून उत्पादनामध्ये वाढ देखील दिसून आली आहे.

प्रकल्प अंमलबजावणी सुरु झाल्यापासून सलग दोन्ही खरीप हंगामामध्ये सरासरी २१-२५ दिवसाचा पावसामध्ये खंड पडला होता. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी रुंद वाफा व सरी (बीबीएफ) तंत्रज्ञान अवलंब करून पिकाच्या पेरण्या केल्या होत्या त्यांचे शेतामध्ये पावसातील खंड काळात पिकांवर प्रतिकूल परिणाम जाणवला नाही. परंतु याच काळात गादीवाफ्यावर पेरणी न केलेल्या पिकांना मात्र जमिनीतील ओलाव्याचा मोठा ताण बसून उत्पादनात कमालीची घट आढळून येते. तसेच जेथे खरिपानंतर जमिनीतील ओलाव्यावर रब्बी हंगामात हरभरा या पिकाची पेरणी केली तिथे देखील रूंद वाफा व सरी (बीबीएफ) तंत्राने पेरलेल्या पिकाची वाढ तौलनिक रित्या जोमाने झालेली दिसून येते. सदर तंत्रज्ञान केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थेने (Central Research Insttute for Dryland Agriculture- CRIDA, Hyderabad) यांनी संशोधित केलेले असून आणि राज्यातील कृषी विद्यापीठांनीसुद्धा सदर तंत्रज्ञानाची शिफारस केलेली आहे.

रुंद वाफा व सरी पेरणी यंत्र (बीबीएफ यंत्र) अनुदान योजना:

प्रकल्पांतर्गत प्रत्येक गावातील शेतकऱ्यांपर्यंत रुंद वाफा व सरी (बीबीएफ) हे तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी शेतीशाळा, प्रशिक्षण, अभ्यास दौरे, कार्यशाळा, तांत्रिक साहित्य इ. माध्यमातून प्रसार करण्यात येत आहे. शेतीशाळा या माध्यमातून खरीप हंगामात गावांमध्ये रुंद वाफा व सरी या पद्धतीने बीबीएफ यंत्राच्या साहाय्याने पेरणी केलेली आढळून आलेली आहे.

सदर तंत्रज्ञान अवलंब करताना काही अडचणी देखील येत असल्याबाबत प्रक्षेत्र भेटीमध्ये शेतकरी आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. यामध्ये बीबीएफ यंत्राची उपलब्धता, बीबीएफ यंत्र वापरणेबाबत कौशल्य, बीबीएफ यंत्राची किंमत, बीबीएफ यंत्राची जोडणी, यंत्राची देखमाल इ. बाबी समाविष्ट आहेत. तथापि सदर तंत्राची उपयुक्तता लक्षात घेता त्याचा अवलंब वाढवणे क्रमप्राप्त आहे त्यासाठी सदर उपक्रम प्रकल्पामध्ये समाविष्ट करण्यात येत आहे.

उद्देशः

१) प्रकल्पांतर्गत समावेश करण्यात आलेल्या गावसमुहातील शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम बनविणे.

२) प्रकल्प क्षेत्रामध्ये रूंद वाफा व सरी (बीबीएफ) तंत्रज्ञानाचा व्यापक प्रसार करणे.

३) पावसातील खंड तसेच अतिपाऊस या दोन्ही परिस्थितीत अनुक्रमे पाण्याचा ताण सहन करण्यास आणि अति पाण्याचा निचरा करण्यास शेतकऱ्यांना सक्षम करणे.

४) रूंद वाफा व सरी (बीबीएफ) तंत्रज्ञानाचा वापर वाढवून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे व पिकाच्या उत्पादकतेत वाढ करण्यास मदत करणे.

५) शेतकऱ्यांच्या शेतावर प्रात्यक्षिकाद्वारे रुंद वाफा व सरी (बीबीएफ) तंत्रज्ञानाचा वापर करणे व त्याद्वारे कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे.

रुंद वाफा व सरी तंत्राचे (बीबीएफ) फायदे:

१) रूंद वाफा व सरी पद्धतीमुळे कमी पाऊस झाल्यास पडलेल्या पावसाचे पाणी पिकांच्या मुळाभोवती मुरण्यास मदत होते म्हणजेच मूलस्थानी जलसंधारण होऊन उभ्या पिकास त्याचा फायदा होतो.

२) अधिक पाऊस झाल्यास किंवा कमी वेळेत अधिक पाऊस झाल्यास त्याचा निचरा अतिशय योग्य प्रकारे करण्यास मदत होते यामुळे अधिक पावसात पाणी साचून पिकांचे होणारे नुकसान टाळता येते.

३) रुंद वाफा व सरी पद्धतीमुळे चांगली मशागत होते, चांगल्या प्रकारे सीड बेड तयार होतो. पाणी व हवा याचे संतुलित प्रमाण राखले जाते. पिकांची उगवण होऊन वाढ जोमदार होते.

४) रुंद वाफा व सरी पद्धतीमध्ये बियाण्याचे योग्य प्रमाण, बियाण्याची योग्य खोली व अंतरावर पेरणी करता येते, खतांची पेरणी ही करता येते.

५) यंत्राचा वापर केल्यामुळे पेरणीसाठी कमी वेळ लागतो. योग्य प्रकारे दोन ओळीतील अंतर ठेवल्यास आंतरमशागतही करता येते.

६) बियाण्यामध्ये बचत होते.

७) National Innovation in Climate Resillent Agriculture (NICRA) या प्रकल्पाच्या अमरावती जिल्ह्यातील निष्कर्षानुसार तूर, कापूस व सोयाबीन या पिकाच्या उत्पादनामध्ये अनुक्रमे ३४%, १५% व २२% ने वाढ झालेली आहे.

व्याप्ती:

प्रकल्पातील प्रत्येक गावांमध्ये किमान २ बीबीएफ यंत्र असावेत. गरजेनुसार सदर संख्या वाढू शकते.

अर्थसहाय्य:

सदर घटकासाठी २ हेक्टर पर्यंत जमीनधारणा असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तसेच २-५ हेक्टर पर्यत जमीनधारणा असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्याचे प्रमाण १००% किंवा २००० रुपये इतके राहील.

लाभार्थी निवडीचे निकषः

१. प्रकल्पांतर्गत निवड केलेल्या गावासाठीच्या ग्राम कृषि संजीवनी समितीने (VCRMC) मान्यता दिलेले अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांना, अनु. जाती/जमाती, महिला, दिव्यांग व इतर शेतकरी या प्राधान्यक्रमाने निवड करून लाभ देण्यात येईल.

२. बीबीएफ यंत्र यासाठी इतर कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना लाभ देय नाही.

३. बीबीएफ यंत्र खरेदीसाठी एका कुटुंबातील फक्त एका सदस्यास अर्ज करण्याची मुभा राहील.

४. इच्छुक शेतकऱ्यांकडे स्वमालकीचा ट्रॅक्टर असणे बंधनकारक राहील आणि सदर ट्रॅक्टरचे अश्वशक्तीनुसार बीबीएफ यंत्र खरेदी करणे बंधनकारक राहील.

५. अर्जदाराचे कुटुंबातील आई वडील अथवा त्यांच्यावर अवलंबुन असलेल्या अविवाहीत अपत्यांच्या नावे ट्रॅक्टर असल्यास सदर अर्जदारास बीबीएफ यंत्र खरेदीसाठी अनुदान अनुज्ञेय राहील. या करीता संबधीत अर्जदारास कुटुंबातील सदस्यांच्या नावावर ट्रॅक्टर असल्याचा पुरावा (RC पुस्तिका प्रत) सादर करणे बंधनकारक राहील.

अंमलबजावणीची कार्यपद्धती: अंमलबजावणीतील विविध स्तरावरील जबाबदाऱ्या

लाभार्थी-

१. इच्छुक शेतकऱ्यांनी नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या https://dbt.mahapocra.gov.in संकेतस्थळावर समूह सहाय्यकाच्या मदतीने नोंदणी करून अर्ज करावा, तसेच आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावीत.

२. पूर्वसंमती प्राप्त झाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत सदर घटकाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. विहित मुदतीत घटकाची अंमलबजावणी पूर्ण न झाल्यास सदर घटकाच्या अर्जासाठी दिलेली पूर्वसंमती रद्द समजण्यात येईल.

३. मार्गदर्शक सूचनानुसार दिलेल्या तांत्रिक निकषाप्रमाणे साहित्य खरेदी करणे बंधनकारक राहील.

४. पूर्वसंमतीनुसार आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करुन घेण्याची जबाबदारी संबंधित लाभार्थ्यांची राहील तसेच त्यासाठी आगाऊ (अग्रिम) रक्कम मिळणार नाही.

५. निवडलेल्या लाभार्थीना त्यांच्या पसंतीनुसार तसेच योग्य गुणवत्तेची खात्री करून सेवा पुरवठादार संस्थांकडून बीबीएफ यंत्र खरेदी करण्याची मुभा राहणार आहे.

६. पूर्वसंमती मिळालेल्या शेतकऱ्यांनी बाजारातील अधिकृत विक्रेत्याकडून बीबीएफ यंत्राची खरेदी करताना स्वत:च्या बँक खात्यातून इलेक्ट्रॉनिक पध्दतीने/धनादेश/धनाकर्षाद्वारे विक्रेत्यास रक्कम अदा करणे बंधनकारक राहील.

७. खरेदी केलेले बीबीएफ यंत्र प्रकल्पस्थळी आणल्यानंतर खरेदीची पावती/बिले व विक्रेत्यास अदा केलेल्या रकमेबाबत अर्जदाराचे बैंक खाते पुस्तकातील संबधित नोंद असलेल्या पानाची प्रत इत्यादी आवश्यक कागदपत्रे स्वसाक्षांकित करावीत व ऑनलाईन अनुदान मागणी करावी.

८. बीबीएफ यंत्र खरेदीनंतर सदर यंत्र चालविण्याचे प्रशिक्षण घेणे तसेच सेवा पुरवठादाराकडून देखभाल दुरुस्तीबाबत प्राथमिक माहिती घेऊन अधिकच्या माहितीसाठी अथवा येणाऱ्या अडचणीचे निराकरण करणेसाठी सेवा पुरवठादाराचा संपर्क तपशील स्व:ताकडे ठेवणे.

९. बीबीएफ यंत्राद्वारे स्वताच्या शेतामध्ये तसेच मागणीनुसार इतर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पेरणी करणे.

१०. अर्थसहाय्य प्राप्त झालेल्या यंत्राचा कोणत्याही परिस्थितीत गैरवापर हस्तांतरण होणार नाही याची दक्षता घेणे. यंत्राचा लाभ घेतल्यापासून प्रकल्प कालावधीपर्यंत किंवा किमान ३ वर्षापर्यंत सदर यंत्र हस्तांतरीत करता येणार नाही किंवा त्याची विल्हेवाट लावता येणार नाही. सदर अटीचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास लाभधारकाकडून प्रकल्पातर्गत मिळालेल्या अर्थसहायाची रक्कम व्याजासहित वसुल करण्यात येईल.

११. सदर घटकांतर्गत अर्थसहाय्य देय असलेल्या औजारांवर “नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थसहाय्यीत” असे नमूद करावे.

ग्राम कृषि संजीवनी समिती (VCRMC ):

१. प्रकल्प गावात हंगामाच्या सुरुवातीस रुंद वाफा व सरी पद्धतीने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी प्रवृत्त करावे.

२. गाव समूहातील इच्छुक शेतकऱ्यांचे घटकांतर्गत बाबीचा लाभ घेण्यासाठीचे ऑनलाईन अर्ज प्राप्त करून सर्व अर्ज व अपलोड केलेली कागदपत्रे समूह सहाय्यक यांचे मदतीने छाननी करून अर्जाची अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांना, अनु. जाती/अनु. जमाती, महिला शेतकरी, दिव्यांग व इतर शेतकरी या प्राधान्यक्रमाने निवड करावी.

३. इच्छुक लाभार्थ्यांचे ऑनलाईन प्राप्त अर्जाच्या पात्र अपात्रतेबाबत निर्णय घेऊन अपात्र अर्जदारांना अपात्रतेबाबत कारणासह अवगत करणे.

४. पूर्वसंमती पात्र अर्जदार आणि त्यांनी मागणी केलेल्या बीबीएफ यंत्र पुरवठादार/उत्पादक यांचेमध्ये सुसंवाद घडवून आणणे.

५. अंमलबजावणी करण्यात आलेल्या घटकांतर्गत बाबींचे सामाजिक लेखापरीक्षण करावे.

६. अर्थसहाय्य प्राप्त झालेल्या यंत्राचा कोणत्याही परिस्थितीत गैरवापर/हस्तांतरण होणार नाही याबाबत लाभार्थ्यास स्पष्ट जाणीव करून देणे.

समूह सहाय्यक

१. इच्छुक लाभार्थी शेतकऱ्यांना नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या https://dbt.mahapocra.gov.in संकेत स्थळावर नोंदणी व अर्ज करण्यासाठी मार्गदर्शन व मदत करावी.

२. शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी व शेतकऱ्यांने अपलोड केलेल्या कागदपत्राची छानणी करुन अर्जाची अत्यल्प व अल्प भूधारक अशी प्रवर्गनिहाय अनु.जाती/अनु.जमाती/दिव्यांग महिला शेतकरी/इतर सर्वसाधारण शेतकरी या प्राधान्यक्रमाने वर्गवारी करावी.

३. सर्व ऑनलाईन प्राप्त अर्ज ग्राम कृषि संजीवनी समितीसमोर मान्यतेसाठी सादर करणे व मंजुरी प्राप्त झाल्यानंतर तसा ठराव संकेतस्थळावर अपलोड करणे.

४. शेतकऱ्यांस योजनेच्या अटी व शर्ती तसेच घटकाबाबतचेआर्थिक व तांत्रिक निकष समजावून सांगावे.

५. ऑनलाईन अपलोड केलेल्या कागदपत्रांची छानणी करताना शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज, शेतकऱ्यांच्या मालकी हक्काचा ७/१२ उतारा, ८-अ, यापूर्वी इतर योजनेतून लाभ घेतलेला आहे काय? या बाबतचा तपशिल, प्राधिकृत अधिकाऱ्याचे संवर्ग प्रमाणपत्र (अ.जाती, अ.जमाती शेतकऱ्यांसाठी आहे काय?, इत्यादी सर्व अनुषंगीक बाबीची पडताळणी करावी.

६. पात्र अर्जाच्या अर्जदारांना भेटून प्रकल्पाबद्दल व घटकाबद्दल माहिती सांगणे आणि अर्जदारासह (GEO- TAGGING) फोटो घेणे व उपविभागीय कृषि अधिकारी यांचेकडे पुढील कार्यवाहीसाठी ऑनलाईन अपलोड करणे.

७. अर्जदाराकडील स्वमालकीच्या ट्रॅक्टरची RC पुस्तिका प्रत ऑनलाईन अपलोड करणे.

८. शेतकऱ्याने इतर अथवा या योजनेतून शासकीय अनुदान घेतले असल्याबाबत त्याची कृषी सहाय्यकाच्या सहकार्याने खात्री करून ही बाब मंजूरीसाठी ग्राम कृषी संजीवनी समितीसमोर सादर करणे.

९. पात्र शेतकऱ्यांना पूर्वसंमती बाबत अवगत करणे.

१०. पूर्व संमती प्राप्त शेतकऱ्यांना बीबीएफ यंत्र खरेदी करणेसाठी प्रोत्साहित करणे.

कृषी सहाय्यक

१. पूर्व समंती प्राप्त शेतकऱ्याने साहित्य प्रकल्प स्थळी पुरवठा झाल्याचे ऑनलाईन कळविल्यानंतर खरेदी केलेल्या साहित्याची अथवा पूर्ण केलेल्या कामाची ऑनलाईन मोका तपासणी करणे. तसेच खरेदी केलेले साहित्य मार्गदर्शक सूचनेत दिल्याप्रमाणे तांत्रिक दर्जाचे असल्याबाबत खात्री करणे.

२. प्रकल्प स्थळ, पत्र/औजाराचे व लाभार्थीचे नै़ऋत्य कोपरा बाजुवरुन अक्षांश/रेखांशसह भौगोलिक स्थानांकन (GEO- TAGGING) करून फोटो घेणे. मोका तपासणी अहवाल विहित प्रपत्रामध्ये उपविभागीय कृषि अधिकारी यांचेकडे ऑनलाईन अपलोड करणे

३. अनुदान अदायगीसाठी बीबीएफ यंत्र खरेदीचे बिल व विक्रेत्यास अदा केलेल्या रकमेबाबत अर्जदाराचे बैंक खाते पुस्तकातील संबंधित नोंद असलेल्या पानाची प्रत इत्यादी आवश्यक कागदपत्रे प्रमाणित करून संकेतस्थळावर अपलोड करणे.

४. अर्थसहाय्य प्राप्त झालेल्या यंत्राचा कोणत्याही परिस्थितीत गैरवापर हस्तांतरण होणार नाही याबाबत लाभार्थ्यास स्पष्ट जाणीव करून देणे.

५. बीबीएफ यंत्र खरेदीनंतर सदर यंत्र चालविण्याचे प्रशिक्षण देणेची व्यवस्था करणे तसेच सेवा पुरवठादाराकडून देखभाल दुरुस्तीबाबत सेवा प्राप्त होण्यासाठी सगन्वयक करणे.

कृषि पर्यवेक्षक:

कृषी सहाय्यक यांनी ऑनलाईन अवगत केल्यानंतर कृषि पर्यवेक्षक यानी राबविलेल्या घटकाची २५ टक्के तपासणीसोबत जोडलेल्या विहित नमुन्यात करावी. तपासणी अहवालावर लाभार्थीची स्वाक्षरी घ्यावी व त्याखाली लाभार्थीचे नाव नमूद करून तपासणी अहवाल उपविभागीय कृषि अधिकारी यांचेकडे सादर करावा.

उपविभाग स्तर (लेखाधिकारी)

अनुदान प्रस्ताव व तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर लेखाधिकारी उपविभाग स्तर यांनी अनुदान प्रस्ताव तपासून पडताळणी करून पात्र प्रस्तावांना उप विभागीय कृषि अधिकारी यांचेकडे अनुदान अदायगीसाठी शिफारस करावी.

उपविभागीय कृषि अधिकारी:

१. सर्व शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर कागदपत्रांची छाननी, ग्राम कृषि संजीवनी समितीची मान्यता व स्थळ तपासणी अहवाल विचारात घेवून अर्जाच्या पात्र/अपात्रतेबाबत निर्णय घ्यावा व अपात्र असल्यास लाभार्थीस कारणासहित अवगत करणे.

२. अर्ज सादर केलेल्या पात्र शेतकऱ्यांस ऑनलाईन पूर्वसंमती देणे. सदर पूर्वसंमती देण्यापूर्वी संबधित शेतकऱ्यास कृषी विभागामार्फत सुरु असलेल्या यांत्रिकीकरणाच्या इतर योजनेंतर्गत यापूर्वी म्हणजेच प्रस्तुत घटक प्रकल्पामध्ये समाविष्ट करण्यापूर्वी लाभ दिलेला नाही याची खात्री करण्यात यावी.

३. शेतकऱ्यांस ऑनलाईन पूर्वसंमती देतांना पूर्वसंमती पत्रासोबत्त खरेदीची प्रक्रिया व देय अनुदान याबाबत अवगत करणे.

४. पूर्वसंमती प्राप्त झालेनंतर ४५ दिवसांच्या आत सदर घटकाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. विहित मुदतीत घटकाची अंगलबजावणी पूर्ण न झाल्यास सदर घटकाच्या अर्जासाठी दिलेली पूर्वसंमती रद्द होईल याबाबत अर्जदारास अवगत करणे.

५. शेतकऱ्याने काम पूर्ण झालेबाबत ऑनलाईन अवगत केल्यानंतर कृषी सहाय्यक यांचेकडून मोका तपासणी पूर्ण करून घेणे.

६. लेखाधिकारी यांनी अनुदान प्रस्तावाचे ऑनलाईन पडताळणी केलेनंतर पात्र लाभार्थीच्या आधार संलग्न बैंक खात्यावर DBT द्वारे अनुदान अदायगी करण्यास मंजुरी देणे.

७. उपविभागांतर्गत राबविलेल्या घटकापैकी ५% लाभार्थ्याची अनुदान अदायगी पूर्वी तपासणी करणे.

८. बीबीएफ यंत्र खरेदीनंतर सदर यंत्र चालविण्याचे प्रशिक्षण देणेची व्यवस्था करणे.

९. अर्थसहाय्य प्राप्त झालेल्या यंत्राचा कोणत्याही परिस्थितीत गैरवापर/हस्तांतरण होणार नाही याबाबत लाभार्थ्याला स्पष्ट जाणीव करून देणे.

१०. सेवा पुरवठादाराकडून यंत्राच्या देखभाल दुरुस्तीबाबत सेवा प्राप्त होण्यासाठी समन्वयन करणे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी :

१. जिल्ह्यामध्ये उपविभाग स्तरावर लाभार्थी निवड व अनुदान अदायगी यासह सर्व कार्यवाही मार्गदर्शक सूचनेनुसार होत असलेबाबत वेळोवेळी पडताळणी करणार.

२. उपविभाग स्तरावर झालेल्या कामाची आकस्मिक तपासणी करावी व विहित नमुन्यात पर्यवेक्षीय तपासणी अहवाल सादर करणार.

३. कृषि विज्ञान केंद्राच्या/कृषि विद्यापीठाच्या सहाय्याने बीबीएफ वापराबाबत विशेष मोहीम घ्यावी. सदर मार्गदर्शक सूचना प्रकल्पाच्या https://mahapocra.gov.in वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

हेही वाचा – नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध पोकरा अनुदान योजना – POCRA Yojana

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.