महाराष्ट्र ग्रामपंचायतवृत्त विशेषसरकारी कामे

ग्रामपंचायत सरपंच, उप-सरपंचाच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य विषयीची सविस्तर माहिती

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, कलम ३८ नुसार पंचायतीचे कार्यकारी अधिकारी सरपंच व उपसरपंच यांची कार्ये. कलम ३८ (१) या अधिनियमाचे उपबंध पंचायतीने संमत केलेले ठराव अमलात आणण्याचा प्रयोजनासाठी कार्यकारी अधिकार सरपंचाकडे निहित असेल व तो या अधिनियमान्वये किंवा तद्नुसार पंचायतीकडे सोपवलेली कर्तव्य रीतसर पार पाडण्यासाठी प्रत्यक्षपणे जबाबदार असेल. नियमांद्वारे अन्यथा विहित केले असेल त्या व्यतिरिक्त, सरपंचाचा अनुपस्थित उपसरपंच हा सरपंचाच्या अधिकारांचा वापर करील व त्याची कर्तव्य पार पाडील. मागच्या लेखामध्ये आपण ग्रामपंचायतीचे काम कसं चालते? सरपंच, उपसरपंच व सदस्यांना मानधन किती? ग्रामस्थ म्हणून गावच्या विकास कामात कसं सहभागी व्हायचं आणि विकासकामांवर लक्ष कसं ठेवायचं? त्याची सविस्तर माहिती पाहिली आहे.

सरपंचाच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य:

ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख हा सरपंच असतो. गावातील लोकसेवक या नात्याने ग्रामपंचायतीच्या सरपंचांला सर्व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. जो कोणी सरपंच निवडून येईल त्याने आपल्या गावाला समृद्ध करण्याची जबाबदारी घेऊन विकासाच्या पथावर घेऊन जाणे हे त्याचे आद्य कर्तव्य आहे.

१) कलम ३८ (अ) अधिनियमात अन्यथा उपबंधित केले असेल ते खेरीज करून पंचायतीच्या सभेचा अध्यक्ष म्हणून काम चालविल आणि पंचायतीच्या सभेचे कामकाज पार पाडणे.

२) कलम ३८ (क) पंचायतीच्या सर्व अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी केलेली कृत्ये आणि केलेली कार्यवाही यावर देखरेख व नियंत्रण ठेवील, यात पंचायतीचे अभिलेख व नोंदवह्या सचिवाच्या अभिरक्षक ठेवणे व त्याची व्यवस्था ठेवणे यावरील देखरेखी चा समावेश होतो.

3) कलम ३८ (ह) या अधिनियमान्वये किंवा तदनुसार आवश्यक असलेली सर्व विवरणपत्रे व प्रतिवृत्ते तयार करण्याची व्यवस्था करील;

4) कलम ३८ (आय) या अधिनियमान्वये किंवा त्याअन्वये केलेल्या नियमान्वये त्याला प्रदान करण्यात येतील अशा अन्य अधिकारांचा वापर करील व त्याच्यावर लादण्यात येतील अशी अन्य कामे पार पाडील;

5) कलम ३८ (आय-अ) सरपंच, शासनाच्या कोणत्याही निदेशान्वये देणे आवश्यक असतील अशी उत्पन्नाची प्रमाणपत्रे, आपल्या सहीने आणि पंचायतीच्या शिक्क्यानिशी देता येतील.

6) कलम ३८ (ज) कलम ७ मध्ये तरतूद केल्याप्रमाणे ग्रामसभेच्या बैठकी बोलवील व त्यात अध्यक्षाचे काम चालवील.

7) कलम ३८ (के) सरपंच, पंचायतीच्या सभांच्या कार्य सूचित अंतिम रूप देईल:

परंतु, जर तीन किंवा अधिक सदस्य, लगत नंतरच्या सभेच्या कार्यसूची वर कोणत्याही बाबीचा समावेश करण्याची मागणी करतील तर, सरपंच ती बाब पुढच्या सभेच्या कार्य सूचीत समाविष्ट करील.

परंतु आणखी असे की, कोणतेही अनौपचारिक वित्तीय कामकाज हे अग्रेषित कार्यसूची चा भाग असल्याखेरीज चालविले जाणार नाही;

8) कलम ३८ (ल) सरपंच, पंचायतीचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करील;

9) कलम ३८ (म) सरपंच, पंचायतींशी विचारविनिमय करून, योजना राबविण्यासाठी इतर सर्व अधिकारांचा वापर करील;

(एक-अ) ज्या पंचायतीचा सरपंच या अधिनियमाच्या कलम ३० अ- १अ अन्वये थेट निवडून दिला असेल अशा पंचायतीच्या संबंधात तो सरपंच पुढील अधिकारांचा देखील वापर करील आणि पुढील कार्य व कर्तव्य पार पाडील.-

(अ) पंचायतीच्या सभांच्या कार्य सूचित अंतिम रूप देणे:

परंतु, जर तीन किंवा त्यापेक्षा अधिक सदस्य, लगत नंतरच्या सभेच्या कार्यसूची वर कोणत्याही बाबीचा समावेश करण्याची मागणी करतील तर, सरपंच ती कोणतीही बाब पुढच्या सभेच्या कार्य सूचीत समाविष्ट करील:

परंतु आणखी असे की, कोणतेही अनौपचारिक वित्तीय कामकाज हे अग्रेषित कार्यसूची चा भाग असल्याखेरीज चालविले जाणार नाही:

परंतु तसेच, जर सरपंचाच्या मते, पंचायतीचा कोणत्याही विषयावरील ठराव हा त्या गावाच्या व्यापक हितास बाधक ठरणारा असेल तर, सरपंच, तो ठराव लगत नंतरच्या पुढील ग्रामसभेपुढे अंतिम निर्णयासाठी ठेवण्याची व्यवस्था करील आणि त्यावरील ग्रामसभेचा निर्णय अंतिम असेल.

(ब) पंचायतीचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे;

(क) पंचायतीशी विचारविनिमय करून, योजना राबविण्यासाठी इतर सर्व अधिकारांचा वापर करणे;

उप-सरपंचाच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य:

सरपंचा बरोबरच जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये एक उपसरपंच असतो. ग्रामपंचायत मध्ये सरपंचानंतर उपसरपंच हाच मुख्य कार्यकारी अधिकारी असतो आणि त्याला सरपंचासारखेच अधिकार प्राप्त होतात.

१) कलम ३८ (अ) अधिनियमात अन्यथा उपबंधित केले असेल ते खेरीज करून सरपंचाच्या अनुपस्थितीत पंचायतीच्या सभेचा अध्यक्ष म्हणून काम चालवील आणि पंचायतीच्या सभांचे नियमन करील;

2) कलम ३८ (ब) सरपंचाच्या अधिकारांपैकी व कर्तव्यांपैकी सरपंच वेळोवेळी त्याच्याकडे सोपविल अशा अधिकारांचा वापर करील व अशी कर्तव्ये पार पाडील;

3) कलम ३८ (क) सरपंचाची निवडणूक होईपर्यंत किंवा सरपंच गावात सतत पंधराहून अधिक दिवस अनुपस्थित असेल किंवा तो काम करण्यास असमर्थ झाला असेल, तर सरपंचाच्या अधिकारांचा वापर करील व त्याची कर्तव्ये पार पाडील.

4) कलम ३८ (३) सरपंच व उपसरपंच हे दोघेही अनुपस्थित असतील, तर त्या बाबतीत पंचायतीच्या प्रत्येक सभेत उपस्थित असलेल्या सदस्यांपैकी अशा ज्या एका सदस्याची त्याप्रसंगी सभापती म्हणून निवड करील तो सदस्य अशा सभेत अध्यक्ष म्हणून काम चालवील.

5) कलम ३८ (४) या अधिनियमान्वये अन्यथा उपबंधित केले असेल त्या व्यतिरिक्त, जेव्हा कोणत्याही कारणास्तव सरपंचाच्या अधिकारांचा वापर करण्यास, किंवा त्याची कर्तव्ये व कामे पार पाडण्यास कोणतीही व्यक्ती सक्षम नसेल तर अशा बाबतीत, निवडून येण्यास पात्र असलेल्या ग्रामसभेच्या ज्या सदस्यास पंचायत समितीने नामनिर्देशित केले असेल असा कोणताही सदस्य अशा अधिकारांचा वापर करील आणि अशी कर्तव्य व कामे पार पाडील. अशा रीतीने नामनिर्देशित केलेल्या सदस्याला पंचायतीच्या कोणत्याही सभेत अध्यक्ष म्हणून काम चालवताना विहित केलेले अधिकार असतील व विहित केलेली कार्य पद्धती, तो अनुसरील परंतु त्याला मत देण्याचा हक्क असणार नाही.

6) कलम ३८ (४-अ) जर, सरपंचाचा किंवा सभेच्या अध्यक्षस्थानी आहे अशा व्यक्तीच्या मते, पंचायतीच्या कोणत्याही विषयावरील ठराव हा त्या गावाच्या व्यापक हितास बाधक ठरणारा असेल तर, सभेच्या अध्यक्षस्थानी असणारी व्यक्ती, तो ठराव लगत नंतरच्या पुढील ग्रामसभेपुढे अंतिम निर्णयासाठी ठेवण्याची व्यवस्था करील आणि त्यावरील ग्रामसभेचा निर्णय अंतिम असेल.

7) कलम ३८ (५) या कलमातील कोणत्याही गोष्टींमुळे, कलम ५७, पोटकलम (४) खाली ज्या कोणत्याही कृत्यासाठी सचिवास संपूर्णपणे जबाबदार धरण्यात येईल अशा, सचिवाने केलेल्या कोणत्याही कृत्याबद्दल सरपंचास जबाबदार धरता येणार नाही.

ग्रामपंचायत ग्रामसूची किंवा अनुसूची-१:

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ४५ मधील ग्रामसूची किंवा अनुसूची-१ नुसार सर्व कामे करण्याची जबाबदारी सरपंचाची असते. मागील लेखा मध्ये आपण ग्रामपंचायत ग्रामसूची किंवा अनुसूची-१ (ग्रामपंचायत कामाचे विषय – विकास विषयक कामे) विषयीची सविस्तर माहिती आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ४५ नुसार ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकार व कर्तव्ये सविस्तर पाहिली आहे.

ग्रामसूची या अधिनियमाचे अनुसूची १ मध्ये दिलेली आहे. त्यामध्ये ७८ विषय असून, त्यांची विभागणी खालील भागात केलेली आहे. १) कृषी, २) पशुसंवर्धन ३) वने, ४) समाज कल्याण, ५) शिक्षण, ६) वैद्यकीय आणि आरोग्य, ७) इमारती व दळणवळण, ८) पाटबंधारे, ९) उद्योगधंदे व कुटीर उद्योग, १०) सहकार, ११) स्वसंरक्षण व ग्राम संरक्षण, १२) सामान्य प्रशासक. ग्रामसुची राज्यसरकारने अ.नं. १८-अ, ४३-अ आणि ७३-अ यामध्ये दिलेल्या विषयांची भर टाकली आहे.

ग्रामपंचायत मधील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक हे गावातील मुख्य शासकीय अधिकारी म्हणून काम पाहत असतात. मागील लेखामध्ये आपण ग्रामसेवकाची कामे व जबाबदाऱ्या सविस्तर पाहिले आहे.

हेही वाचा – ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य निरर्हता/अपात्र नियम विषयीची संपूर्ण माहिती

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.