Agneepath Scheme : सशस्त्र दलांमध्ये युवावर्गाच्या भरतीसाठी “अग्निपथ योजना”
अग्निपथ लष्कर भरती योजना लष्कर, नौदल आणि वायुदलातील सैनिक भरतीसाठी केंद्र सरकारने ‘अग्निपथ’ योजना जाहीर केली आहे.
- परिवर्तनात्मक सुधारणा करताना केंद्रीय मंत्रिमंडळाने सशस्त्र दलांमध्ये तरुणांच्या भरतीसाठी ‘अग्निपथ’ योजनेला दिली मंजुरी.
- संबंधित सेवा कायद्यांतर्गत अग्निवीरांची चार वर्षांसाठी नोंदणी केली जाईल.
- तीन सेवा दलांमध्ये लागू असलेल्या खडतर मेहनत भत्त्यांसह आकर्षक मासिक पॅकेज.
- चार वर्षांचा प्रतिबद्धता कालावधी पूर्ण झाल्यावर अग्निवीरांना एक वेळचे ‘सेवा निधी’ पॅकेज दिले जाईल.
- यावर्षी 46,000 अग्निवीरांची भरती होणार आहे.
- भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सशस्त्र दलांमध्ये तरुण, तंदुरुस्त, वैविध्यपूर्ण प्रोफाइल असणे आवश्यक.
भारतीय तरुणांना सशस्त्र दलात सेवा करण्यासाठी दाखल होता यावे यासाठी अग्निपथ या आकर्षक भरती योजनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या योजनेअंतर्गत निवडलेले युवक अग्निवीर म्हणून ओळखले जातील. देशभक्तीने प्रेरित या युवकांना चार वर्षांच्या कालावधीसाठी सशस्त्र दलात सामील व्हायची परवानगी या योजनेनुसार मिळणार आहे.
सशस्त्र दलांना अधिक सक्षम करण्यासाठी अग्निपथ योजनेची रचना करण्यात आली आहे. समकालीन तंत्रज्ञानाशी अधिक सुसंगत असलेल्या समाजातील तरुण प्रतिभांना आकर्षित करून कुशल, शिस्तबद्ध आणि प्रेरित मनुष्यबळ पुन्हा समाजात परत आणणारी ही योजना आहे. सैनिकांचा गणवेश परिधान करण्यास उत्सुक असलेल्या तरुणांना या योजनेद्वारे संधी मिळेल. सशस्त्र दलांतील तरुणांच्या संख्येत वाढ होऊन या दलांमध्ये नव्याने ‘जोश’ आणि ‘जज्बा’ तयार होईल त्याच वेळी अधिक तंत्रज्ञान जाणणाऱ्या युवकांच्या भरतीमुळे सशस्त्र दलांत काळानुरूप परिवर्तनशील बदल घडेल. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे भारतीय सशस्त्र दलांचे सरासरी वय अंदाजे 4-5 वर्षांनी कमी होईल. स्वयं-शिस्त, परिश्रम आणि लक्ष्य याची सखोल समज असलेल्या प्रेरित तरुणांना, जे पुरेसे कुशलही आहेत आणि इतर क्षेत्रात योगदान देण्यास सक्षम आहेत अशा तरुणांच्या सशस्त्र दलातील अंतर्भावाचा फायदा राष्ट्रीय स्तरावर होईल. देशाला, समाजाला आणि देशातील तरुणांना या अल्प कालावधीच्या लष्करी सेवेचा मोठा लाभ होणार आहे. यामध्ये देशभक्ती, सांघिक कार्य, शारीरिक तंदुरुस्ती वाढवणे, देशाप्रती दृढ निष्ठा वाढवण्यावर भर आहे. बाह्य धोके, अंतर्गत धोके आणि नैसर्गिक आपत्तींच्या काळात राष्ट्रीय सुरक्षा वाढवण्यासाठी प्रशिक्षित कर्मचार्यांसची उपलब्धता या योजनेद्वारे साध्य होईल.
लष्कराच्या तीन सेवांच्या मनुष्यबळ विकास धोरणात नवीन युग सुरू करण्यासाठी सरकारने सादर केलेली ही प्रमुख संरक्षण धोरण सुधारणा आहे. हे धोरण, तात्काळ लागू होईल. त्यानंतर तीन सेवांसाठी नावनोंदणी नियंत्रित करेल.
काय आहे अग्निपथ योजना?
50 हजार याप्रमाणे प्रत्येकी चार वर्षांसाठी तरुणांची सैन्यभरती करण्यात येईल. 4 वर्षांनी त्यातील 25% तरुणांना नियमित लष्करी सेवेत सामावून घेतले जाईल व उर्वरीत उमेदवारांना निवृत्तीवेतनाचा लाभ मिळेल.
अग्निपथ योजनेचे स्वरूप:
- दरवर्षी किमान 46 हजार तरुणांची लष्कर भरती होईल.
- 4 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर यातील 75% सैनिकांना सेवेतून मुक्त केले जाईल.
- पुढील काळात सशस्त्र दलांतील विविध भरतीसाठी त्यांना प्राधान्य दिले जाईल.
- 25% तरुणांना सैन्यदलांत पुढे सेवेची संधी.
- मात्र जेव्हा सैन्यभरती होईल तेव्हाच या 25% युवकांना पात्रता निकष पूर्ण केल्यावर सेनेत सामावून घेतले जाईल.
- 4 वर्षांनी सेवामुक्त होणाऱ्या सैनिकांना प्रत्येकी 11 लाख 71 हजारांचे ‘सेवा निधी पॅकेज दिले जाईल.
अग्निवीरांना लाभ:
अग्निवीरांना तिन्ही सेवांमध्ये लागू असलेल्या जोखीम आणि खडतर मेहनत (hardship) भत्त्यांसह आकर्षक कस्टमाइज्ड मासिक पॅकेज दिले जाईल. चार वर्षांचा प्रतिबद्धता कालावधी पूर्ण झाल्यावर, अग्निवीरांना एकवेळचे ‘सेवानिधी’ पॅकेज दिले जाईल ज्यामध्ये त्यांचे योगदान त्यावरील जमा व्याज आणि त्यांच्या योगदानाच्या जमा झालेल्या रकमेइतके सरकारचे योगदान असेल ज्यामध्ये खाली दर्शविल्याप्रमाणे व्याज समाविष्ट असेल:
वर्ष | सानुकूल पॅकेज (मासिक) | इन हँड (70%) | अग्नीवीर कॉर्पस फंडसाठी योगदान (30%) | भारत सरकारकडून कॉर्पस फंडसाठी योगदान |
सर्व आकडे रुपयांमध्ये (मासिक योगदान) | ||||
1st Year | 30000 | 21000 | 9000 | 9000 |
2nd Year | 33000 | 23100 | 9900 | 9900 |
3rd Year | 36500 | 25580 | 10950 | 10950 |
4th Year | 40000 | 28000 | 12000 | 12000 |
चार वर्षानंतर एकूण अग्नीवीर कॉर्पस फंड | रु 5.02 लाख | रु 5.02 लाख | ||
Exit 4 वर्षानंतर | Rs 11.71 लाख सेवानिधी पॅकेज (यासह, लागू व्याजदरांनुसार वरील रकमेवर जमा झालेले व्याज देखील दिले जाईल) |
‘सेवानिधी’ला प्राप्तिकरातून सूट मिळेल. ग्रॅच्युइटी आणि सेवानिवृत्ती (पेन्शनरी) फायद्यांचा कोणताही हक्क असणार नाही. अग्निवीरांना भारतीय सशस्त्र दलातील त्यांच्या व्यस्त कालावधीसाठी 48 लाख रुपयांचे विना-सहयोगी जीवन विमा संरक्षण प्रदान केले जाईल.
राष्ट्रसेवेच्या या कालावधीत अग्निवीरांना विविध लष्करी कौशल्ये आणि अनुभव, शिस्त, शारीरिक तंदुरुस्ती, नेतृत्वगुण, धैर्य आणि देशभक्तीचे प्रशिक्षण दिले जाईल. चार वर्षांच्या या कार्यकाळानंतर, अग्निवीरांना नागरी समाजात समाविष्ट केले जाईल जिथे ते राष्ट्र उभारणी प्रक्रियेत ते मोठे योगदान देऊ शकतील. प्रत्येक अग्निवीराने मिळवलेले कौशल्य त्याच्या अनोख्या बायोडेटाचा भाग बनवण्यासाठी प्रमाणपत्रात समाविष्ट केले जाईल. अग्निवीरांनी त्यांच्या तारुण्याचा चार वर्षांचा कार्यकाळ सेवेत पूर्ण केल्यावर, ते प्रौढ आणि स्वयंशिस्तबद्ध होतील. ते व्यावसायिक पातळीवर आणि वैयक्तिकरित्या अधिक चांगले नागरिक बनतील. अग्निवीर पुन्हा नागरी जगात आल्यानंतर त्यांच्या प्रगतीसाठी जे मार्ग उपलब्ध होतील आणि ज्या संधी मिळतील त्याचा फायदा राष्ट्र उभारणीसाठी होईल. समाजाच्या आर्थिकदृष्ट्या वंचित स्तरातील तरुणांवर आर्थिक दबाव असतो. अशा वंचित अग्निवीराला आर्थिक दबावाशिवाय (त्याच्या/तिच्या) भविष्यातील स्वप्नांचा पाठपुरावा करण्यास अंदाजे रु. 11.71 लाखांचा सेवा निधी मदत करेल.
नियमित केडर म्हणून सशस्त्र दलांमध्ये नावनोंदणीसाठी निवडलेल्या व्यक्तींना पुढील किमान 15 वर्षांच्या कार्यकाळासाठी सेवा देणे आवश्यक आहे आणि ते भारतीय सैन्यातील कनिष्ठ आयोग अधिकारी/इतर पदांच्या विद्यमान अटी व शर्तींनुसार नियंत्रित केले जातील. वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार भारतीय नौदल आणि भारतीय हवाईदलामधील त्यांचे समतुल्य आणि भारतीय वायुसेनेमध्ये नावनोंदणी केलेले नॉन कॉम्बॅटंट असतील. या योजनेमुळे सशस्त्र दलातील तरुण आणि अनुभवी कर्मचारी यांच्यात सुदृढ संतुलन राखलं जाईल. त्यामुळे अधिक तरुण आणि तांत्रिकदृष्ट्या निपुण लढाऊ दल निर्माण होईल.
फायदे
- सशस्त्र दलांच्या भरती धोरणात परिवर्तनकारी सुधारणा.
- तरुणांना देशाची सेवा करण्याची आणि राष्ट्र उभारणीत योगदान देण्याची अनोखी संधी.
- सशस्त्र दलांचे प्रोफाइल तरुण आणि गतिमान राहील
- अग्निवीरांसाठी आकर्षक आर्थिक पॅकेज.
- अग्निवीरांना सर्वोत्तम संस्थांमध्ये प्रशिक्षण देण्याची आणि त्यांची कौशल्ये आणि पात्रता वाढवण्याची संधी.
- नागरी समाजात लष्करी नैतिकता असलेल्या चांगल्या शिस्तबद्ध आणि कुशल तरुणांची उपलब्धता.
- समाजात परतणाऱ्या आणि तरुणांसाठी आदर्श म्हणून उदयास येऊ शकणाऱ्यांसाठी पुरेशा पुनर्रोजगाराच्या संधी.
अटी व शर्ती:
- अग्निपथ योजनेंतर्गत, अग्निवीरांची चार वर्षांच्या कालावधीसाठी संबंधित सेवा कायद्यांतर्गत नोंदणी केली जाईल.
- सशस्त्र दलात इतर कोणत्याही विद्यमान रँकपेक्षा वेगळी अशी त्यांची रँक असेल.
- चार वर्षांची सेवा पूर्ण केल्यावर, संघटनात्मक आवश्यकता आणि सशस्त्र दलांनी वेळोवेळी जाहीर केलेल्या धोरणांच्या आधारे, अग्निवीरांना सशस्त्र दलात कायमस्वरूपी नावनोंदणीसाठी अर्ज करण्याची संधी दिली जाईल.
- या अर्जांचा त्यांच्या चार वर्षांच्या व्यस्त कालावधीतील कामगिरीसह वस्तुनिष्ठ निकषांवर आधारित केंद्रीकृत पद्धतीने विचार केला जाईल आणि अग्निवीरांच्या प्रत्येक विशिष्ट तुकडीच्या 25% पर्यंत सशस्त्र दलाच्या नियमित केडरमध्ये नोंदणी केली जाईल.
- तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे स्वतंत्रपणे जारी केली जातील. ही निवड करणे हे सशस्त्र दलांचे विशेष अधिकारक्षेत्र असेल.
- तीनही सेवांसाठी ऑनलाइन केंद्रीकृत प्रणालीद्वारे विशेष रॅलीजसह आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि राष्ट्रीय कौशल्य पात्रता संस्था अशा मान्यताप्राप्त तांत्रिक संस्थांच्या कॅम्पस मुलाखतींद्वारे नावनोंदणी केली जाईल.
- ‘ऑल इंडिया ऑल क्लास’ आधारावर नावनोंदणी केली जाईल आणि पात्रतेसाठी वय 17.5 ते 21 वर्षे दरम्यान असेल. सशस्त्र दलांमध्ये नावनोंदणीसाठी निर्धारित केलेल्या वैद्यकीय पात्रता अटींची पूर्तता अग्निवीरांना करायला लागेल.
- संबंधित श्रेणींसाठी वेगवेगळ्या अटी लागू होतील.
- अग्निवीरांची शैक्षणिक पात्रता विविध श्रेणींमध्ये नावनोंदणीसाठी प्रचलित राहील. {उदाहरणार्थ: जनरल ड्युटी (GD) शिपाई मध्ये प्रवेशासाठी, शैक्षणिक पात्रता इयत्ता 10 उत्तीर्ण आहे).
संरक्षण मंत्रालय; भारत सरकार प्रेसनोट: संरक्षण मंत्रालय, भारत सरकार ची प्रेसनोट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!