वृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवार २० ऑक्टोबर रोजी जाहीर होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवार, दि. २० ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. हा निकाल http://www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असून या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होतील.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापुर अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत इ. दहावीची पुरवणी परीक्षा दिनांक २२ सप्टेंबर, २०२१ ते ८ ऑक्टोबर २०२१ व इ. बारावीची पुरवणी परीक्षा दिनांक १६ सप्टेंबर २०२१ ते १२ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. सदर परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येत असून त्याची कार्यपद्धती व कार्यवाहीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून इ. दहावी व इ. बारावी पुरवणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयाव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून इ. दहावीसाठी http://verification.mh-ssc.ac.in व इ. बारावीसाठी http://verification.mh-hsc.ac.in स्वतः किंवा शाळा / कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी/ शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.

गुणपडताळणीसाठी गुरुवार दिनांक २१ ऑक्टोबर २०२१ ते शनिवार दिनांक ३० ऑक्टोबर २०२१ पर्यंत व छायाप्रतीसाठी गुरूवार, दिनांक २१ ऑक्टोबर २०२१ ते मंगळवार ९ नोव्हेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरता येईल.

सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ पुरवणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छाया प्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहीत नमुन्यात विहीत शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

सन २०२२ मधील इ. दहावी व इ. बारावी परीक्षेस ज्या विद्यार्थ्यांना प्रविष्ट व्हावयाचे आहे अशा पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत प्रविष्ट होणारे व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांद्वारे Transter of Credit घेणाऱ्या विद्यार्थ्याची आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने स्विकारली जातील. त्याच्या तारखा मंडळामार्फत स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील.

सन २०२१ मध्ये प्रथम नोंदणी करून परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्याची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत परीक्षेस पुनःश्च प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यानुसार सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ च्या इ. दहावी व इ. बारावी परीक्षेस सर्व विषय घेऊन प्रथमच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तरतुदीच्या अधीन राहून पुढील सलगच्या दोन संधी उपलब्ध राहतील.

सन २०२२ मधील परीक्षेसाठी नोव्हेंबर-डिसेंबर २०२०, सन २०२१ अथवा सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ मधील परीक्षेमध्ये एकाच वेळी सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच श्रेणी सुधार योजनेंतर्गत आवेदन पत्र भरून परीक्षेस प्रविष्ट होता येणार आहे. त्यामुळे त्यापूर्वीचे असे उत्तीर्ण विद्यार्थी अथवा कोणताही पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी यांना श्रेणीसुधार योजनेंतर्गत परीक्षेस प्रविष्ट होता येणार नाही, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी कळविले आहे.

हेही वाचा – COVID 19 स्कॉलरशिप 15 ते 75 हजारसाठी असा भरा ऑनलाईन फॉर्म – HDFC Bank launches Covid Crisis Support Scholarship

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.