नियोजन विभागमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी योजना

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम – Chief Minister Fellowship Program

सन २०१५-१६ ते २०१९ -२० या कालावधीत “मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम” राज्यात राबविण्यात आला होता. राज्यातील विकास प्रक्रिया व त्यातील टप्पे जाणून घेता यावेत व ते समजून घेत असताना शासकीय यंत्रणेतील कामकाज, त्यातील घटकांचा ताळमेळ व निर्णय प्रक्रियेचा अनुभव तरुणांनी मिळवावा त्यातून समर्पित वृत्तीने समाजसेवा करण्यासाठी प्रामाणिक, ध्येयवादी, सुजाण नागरिक तयार व्हावेत या करीता मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम राबविण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळाला व त्या सोबतच त्यांच्या ज्ञानाच्या अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत झाली. तरुणांमधील कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमता याचा उपयोग प्रशासनास झाला आणि तरुणांमधील उत्साह, तंत्रज्ञानाची आवड या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियांना गती मिळाली.

खालील शासन निर्णयातील संदर्भ क्र. २ येथील शासन निर्णयानुसार “मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम” संपुष्टात आणण्यात आला. परंतु “मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम” पुन्हा सुरु करण्याबाबत होत असलेली आग्रही मागणी लक्षात घेता सदर कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याची तसेच फेलोंना भविष्यातील वाटचालीस उपयुक्त ठरेल या दृष्टीने सदर कार्यक्रमास शैक्षणिक कार्यक्रमाची जोड देण्यासाठी देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांना सहभागी करून घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम – Chief Minister Fellowship Program :

>

“मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम” पुन्हा सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सदर कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्या अनुषंगाने फेलोंच्या निवडीचे निकष, अटी व शर्ती निश्चित करण्याच्या दृष्टीने तसेच नामांकित शैक्षणिक संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्याच्या दृष्टीने सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

“मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम” करिता फेलोंच्या निवडी संदर्भातील निकष, फेलोंच्या नियुक्ती संदर्भातील अटी व शर्ती तसेच शैक्षणिक संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमाची रूपरेषा व अंमलबजावणी बाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

(अ) फेलोंच्या निवडी संबंधातील निकष :

  1. अर्जदार भारताचा नागरिक असावा.
  2. अर्जदार महाराष्ट्राचा अधिवासी असावा. अर्जदारास महाराष्ट्राबद्दल ज्ञान असणे आवश्यक आहे.
  3. शैक्षणिक अर्हता– कोणत्याही शाखेतील पदवीधर ( किमान ६० % गुण आवश्यक ) असावा. तथापि, उच्चतम शैक्षणिक अर्हतेस प्राधान्य दिले जाईल.
  4. अनुभव – किमान १ वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव आवश्यक राहील. तसेच, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्णवेळ इंटर्नशिप / अप्रेंटीसशिप / आर्टीकलशिपसह १ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. पूर्णवेळ स्वयंरोजगार, स्वयंउद्योजकतेचा अनुभवही ग्राह्य धरण्यात येईल. अर्जदारास तसे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागेल.
  5. भाषा व संगणक ज्ञान : – मराठी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक राहील. हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहील. तसेच, संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान आवश्यक राहील.
  6. वयोमर्यादा – उमेदवाराचे वय अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास किमान २१ वर्षे व कमाल २६ वर्षे असावे.
  7. अर्ज करावयाची पद्धत अर्थ व सांख्यिकी संचालनालयाद्वारे विहीत केलेल्या ऑनलाईन अॅप्लिकेशन सिस्टीमद्वारे उमेदवाराने अर्ज करावयाचा आहे.
  8. अर्जाकरिता आकारण्यात येणारे शुल्क : – रुपये ५०० /
  9. फेलॉची संख्या सदर कार्यक्रमात फेलोंची संख्या ६० इतकी निश्चित करण्यात आली असून, त्यापैकी महिला फेलोंची संख्या फेलोंच्या एकूण संख्येच्या १/३ राहील. १/३ महिला फेलो उपलब्ध न झाल्यास त्याऐवजी पुरुष फेलोंची निवड करण्यात येईल.
  10. फेलोंचा दर्जा : – शासकीय सेवेतील गट – अ अधिकाऱ्यांच्या समकक्ष असेल.
  11. नियुक्ती संदर्भातील कार्यवाही फेलोंच्या निवडीसाठी जाहिरात देणे, अर्ज मागविणे, अर्जांची छाननी करणे, परीक्षा घेणे, उमेदवारांची निवड करणे, नियुक्ती देणे यासाठी तसेच सदर कार्यक्रम राबविण्याकरिता कंत्राटी तत्वावर मनुष्यबळ नियुक्ती आवश्यकतेनुसार वेबसाईट / वेबपेज तयार करणे व अद्ययावत ठेवणे, कार्यक्रमाचा प्रचार व प्रसिध्दी या कामांसाठी आवश्यक संस्थांची नेमणूक इ. बाबतची कार्यवाही ” अर्थ व सांख्यिकी संचालनालय , मुंबई ” यांच्यामार्फत पार पाडण्यात येईल.
  12. निवडीची कार्यपद्धती
  •  फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन अर्ज करून ऑनलाईन परीक्षा शुल्क भरावे लागेल. तसेच ऑनलाईन अर्ज करताना आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र असणे अनिवार्य आहे.
  • परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षा Online ( Objective Test ) द्यावी लागेल,
  • ऑनलाईन परीक्षा देण्याची कार्यपद्धती संचालनालयाच्या mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल व त्यातील अटी व शर्तीचे उमेदवाराने पालन करणे आवश्यक राहील.
  • देशातील प्रमुख शहरे आणि राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. तथापि, प्राप्त अर्जाची संख्या विचारात घेता उमेदवारास उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या परीक्षा केंद्राबाबत अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचा निर्णय अंतिम राहील.
  • यापूर्वी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमात काम केलेले फेलो पुनश्चः या कार्यक्रमांतर्गत फेलो निवडीसाठी पात्र असणार नाहीत. तसे फेलोंनी अर्जात नमूद करणे आवश्यक राहील.
  • वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या २१० उमेदवारांना विशिष्ट कालावधीत दिलेल्या विषयांवरील निबंध ऑनलाईन सादर करावे लागतील.
  • वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या २१० उमेदवारांची मुलाखत मुंबई येथे घेण्यात येईल.
  • या २१० उमेदवारांच्या मुलाखतींसाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात यावी.

१. संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई : अध्यक्ष

२. विशेष कार्य अधिकारी, उपमुख्यमंत्री सचिवालय : सदस्य

३. उपमुख्यमंत्री सचिवालयाने नामनिर्देशित केलेला उपसचिव अथवा त्यावरील दर्जाचा एक अधिकारी : सदस्य

४. अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने नामनिर्देशित केलेला गट अ दर्जाचा एक अधिकारी : सदस्य

५. शैक्षणिक संस्थांचे दोन प्रतिनिधी : सदस्य

६. मुख्य संशोधन अधिकारी, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई :सदस्य सचिव

” संबंधित विभागाने त्यांना नामनिर्देशित करणे आवश्यक राहील.

  • मुलाखतीच्या वेळी शैक्षणिक अर्हतेसोबत उमेदवाराची सामाजिक व सार्वजनिक कामासंबंधात बांधिलकी, सशक्त चारित्र्य, सकारात्मक दृष्टिकोन, संघ भावनेने काम करण्याची वृत्ती, संबंधित कामाचा अनुभव, सदर कार्यक्रमासाठी त्याची योग्यता या आणि इतर बाबी विचारात घेतल्या जातील.
  • अंतिम निवड करताना वस्तुनिष्ठ चाचणी, निबंध व मुलाखत यासाठी अनुक्रमे १५, ३० व ५० असे गुण राहतील. मान्यताप्राप्त संस्थेची पदव्युत्तर पदवी वा व्यावसायिक पदवी यांच्या आधारावर ५ गुण राहतील.
  • एकूण ६० उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येईल.

13. फेलोशिप कार्यक्रमासाठी नियुक्तीचा कालावधी : फेलोंची नियुक्ती १२ महिने कालावधीसाठी असेल. यामध्ये वाढ करण्यात येणार नाही. तसेच फेलो रुजु झाल्याच्या दिनांकापासून १२ महिन्यांनी त्याची नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल.

14. विद्यावेतन ( छात्रवृत्ती ) – सदर कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या फेलोंना दरमहा मानधन रुपये ७०,०००/- व प्रवासखर्च रुपये ५,०००/- असे एकत्रित रुपये ७५,०००/- छात्रवृत्तीच्या स्वरुपात देण्यात येतील.

15. शैक्षणिक कार्यक्रम : शैक्षणिक कार्यक्रम हा फेलोशिप कार्यक्रमाचा अविभाज्य भाग असेल. निवड झालेल्या फेलोंसाठी आयआयटी, मुंबई आणि आयआयएम, नागपूर यांच्या सहकार्यातून स्वतंत्र शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले जातील. या कार्यक्रमांतर्गत नियुक्त केलेल्या ठिकाणी काम करताना फेलोंना उपयोगी पडतील अशा विविध विषयांवर फेलोशिपच्या सुरुवातीस दहा दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. या कार्यक्रमाचा उद्देश फेलोंना सार्वजनिक हितासाठी काम करताना व धोरण निर्मिती करताना योग्य साधने व शास्त्रीय पद्धतींचा वापर करण्यासाठी मदत करणे तसेच विकास कार्यक्रम राबविण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये व क्षमता वाढविणे हा असेल. आयआयटी, मुंबई आणि आयआयएम, नागपूर येथे या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल.

शैक्षणिक कार्यक्रमांच्या दुसऱ्या टप्प्यात आयआयटी, मुंबई आणि आयआयएम, नागपूर मार्फत विविध विषयांचे ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाईल. सदर विषयांचा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर फेलोना संबंधित संस्थांमार्फत स्वतंत्र प्रमाणपत्र दिले जाईल. आयआयटी, मुंबई आणि आयआयएम, नागपूर या प्रत्येक संस्थेसाठी प्रत्येकी ५०% फेलो निवडले जातील. सदर निवड उमेदवारांच्या अंतिम गुणवत्तेवर व अर्ज करताना दिलेल्या विकल्पावर ( choice ) आधारित असेल मात्र संस्था निवडीचे संपूर्ण अधिकार अर्थ व सांख्यिकी संचालनालयास राहतील. संबंधित अधिकाऱ्यांवर संस्था निवडीसाठी कोणत्याही प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारास निवड प्रक्रियेतून बाद करण्याचा अधिकार अर्थ व सांख्यिकी संचालनालयास राहील. शासनाकडून फेलोशिप कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नियुक्ती करण्यात आलेल्या संबंधित कार्यालय वा प्राधिकरणासोबत फेलोंनी करावयाचे काम ( फील्ड वर्क ) व शैक्षणिक कार्यक्रम हे दोन्ही यशस्वीपणे पूर्ण करणे फेलोंसाठी अनिवार्य राहील.

16. इतर कार्यक्रम : शैक्षणिक कार्यक्रमाव्यतिरिक्त परिचय सत्र, विविध सामाजिक संस्थांना भेटी मान्यवर व्यक्तींशी संवाद, प्रमाणपत्र प्रदान या उद्देशाने वर्षभरात इतर काही कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल.

( ब ) फेलॉच्या नियुक्तीच्या अनुषंगाने विहित करण्यात येत असलेल्या अटी व शर्ती :

  1. निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर संबंधित अधिकाऱ्यांवर निवडीसाठी कोणत्याही प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारास निवड प्रक्रियेतून बाद करण्याचा अधिकार अर्थ व सांख्यिकी संचालनालयास राहील.
  2. फेलोंच्या नियुक्तीनंतर अ ) पोलीस पडताळणी अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत रुजू झाल्यावर करण्यात येईल. ब ) नोंदणीकृत वैद्यक व्यावसायिकाचे सक्षमतेचे प्रमाणपत्र रुजू होताना सादर करणे बंधनकारक राहील. क ) फेलोंची शैक्षणिक अर्हता, इ. च्या सत्यतेबद्दल कागदपत्रांची तपासणी ( मुलाखतीच्या वेळी ) इत्यादी बाबी अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई यांच्या मार्फत करण्यात येतील.
  3. या कार्यक्रमांतर्गत निवड करण्यात आलेल्या उमेदवाराला १२ महिन्यांच्या कराराने फेलोशिप देऊन नियुक्ती करण्यात येईल. सदर १२ महिन्यांच्या कालावधीत शैक्षणिक कार्यक्रमाचा कालावधी तसेच फेलोशिप कार्यक्रमांतर्गत राबविल्या जाणाऱ्या इतर उपक्रमांचा कालावधी अंतर्भूत धरण्यात येईल. कराराच्या कालावधीत मानधनामध्ये कोणतीही वाढ अनुज्ञेय असणार नाही.
  4. निवड झाल्याचे पत्र मिळाल्यानंतर, निर्देशित केलेल्या ठिकाणी व विहीत मुदतीत उमेदवारास स्वखर्चाने हजर व्हावे लागेल. कोणत्याही परिस्थितीत यात सवलत दिली जाणार नाही. निर्देशित ठिकाणी व विहीत मुदतीत हजर न राहणाऱ्या उमेदवाराची नियुक्ती रद्द केली जाईल. या संदर्भात अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने घेतलेला निर्णय अंतिम राहील.
  5. उमेदवारांकडून विभाग / कार्यालय / प्राधिकरण बाबत पसंतीक्रमाची विचारणा करण्यात आली तरी, शासनाच्या प्राथमिकता तसेच उमेदवाराची योग्यता व उपयुक्तता विचारात घेऊन उमेदवारास विभाग / कार्यालय / प्राधिकरण नेमून दिले जाईल. याबाबत अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई यांचा निर्णय अंतिम राहील. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारास निवड झाल्यानंतरही नियुक्ती न देण्याचा व निवड प्रक्रियेतून बाद ठरविण्याचा अधिकार अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई यांना राहील.
  6. ज्या विभाग / कार्यालय / प्राधिकरणा मध्ये फेलोंची नियुक्ती करण्यात येईल त्या कार्यालयाने संबंधित फेलोला फेलोशिपच्या कार्यकाळात संगणकीय सुविधा इंटरनेट जोडणीसह उपलब्ध करून द्यावी. संबंधित फेलोचा कार्यकाळ संपताच फेलोकडून सदर संगणकीय सुविधा काढून घेण्याची जबाबदारी संबंधित कार्यालयाची राहील.
  7. फेलोंना फेलोशिपच्या कालावधीत तात्पुरते ओळखपत्र व तात्पुरता अधिकृत शासकीय ई – मेल आयडी देण्यात येईल. संबंधित फेलोचा कार्यकाळ संपताच फेलोकडे असणारे ओळखपत्र संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई यांना परत करणे आवश्यक राहील. तसेच, फेलोला देण्यात आलेल्या ई – मेल आयडीची सुविधा बंद करण्यात येईल.
  8. फेलोंना महागाई भत्ता, अंतरिम किंवा वेतन आयोगाचे सेवा विषयक लाभ अनुज्ञेय असणार नाहीत.
  9. फेलोंना करार कालावधीत वैद्यकीय प्रतिपूर्ती अनुज्ञेय असणार नाही.
  10. करार कालावधीतील सेवा ही निवृत्तीवेतन, बोनस, रजा प्रवास सवलत, रजा रोखीकरण किंवा अन्य कोणत्याही आर्थिक लाभासाठी व सेवा विषयक लाभांसाठी विचारात घेतली जाणार नाही.
  11. व्यवसाय कराची वसुली फेलोच्या मानधनातून करण्यात येणार नाही. ( वित्त विभाग, परिपत्रक क्र. पीएफटी १०७६ / प्र.क्र. २९ / ७६, दिनांक ५/६/ १९७६ )
  12. फेलोंचा -समूह वैयक्तिक अपघात विमा जोखीम या योजनेंतर्गत विमा उतरविण्याबाबत वित्त विभागाच्या नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.
  13. सम संवर्गातील अधिकारी जी कर्तव्ये बजावतात, ती कर्तव्ये फेलोंची राहतील. त्यानुसार फेलो कार्यालयातील सर्व नियमांचे पालन करून निर्धारीत वेळेनुसार कार्यालयात उपस्थित राहून कर्तव्य पार पाडतील. तसेच, या कालावधीत फेलो पूर्णवेळ अभ्यासक्रम, खाजगी व्यवसाय व अर्ध / पूर्ण वेळ नोकरी करु शकणार नाहीत. कार्यालयीन कामकाजाच्या दिवसा व्यतिरिक्त सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी जर कार्यालयीन कामकाजासाठी कर्तव्य बजावावे लागले, तर त्यासाठी फेलोंना कामावर हजर राहावे लागेल. त्याकरिता कुठल्याही प्रकारचे अतिरिक्त मानधन अनुज्ञेय असणार नाही.
  14. कराराच्या १२ महिन्यांच्या कालावधीत फेलोंना ८ दिवसांची किरकोळ रजा अनुज्ञेय राहील. अन्य कोणत्याही प्रकारची रजा त्यांनी उपभोगल्यास त्यानुसार मानधनातून कपात करण्यात येईल.
  15. फेलोंनी मुख्यालयात उपस्थित राहाणे आवश्यक असून, संबंधित प्राधिकृत अधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही.
  16. फेलोंचा कालावधी बारा महिन्यांचाच असेल फेलोंची निवड बारा महिन्याचा कालावधी समाप्त झाल्यानंतर आपोआप संपुष्टात येईल. फेलोची निवड ही फक्त तात्पुरत्या स्वरुपाची असेल. फेलोंना सरकारी नोकरीत समाविष्ट होण्याचा हक्क प्राप्त होणार नाही.
  17. करार कालावधीत फेलोचा मृत्यू झाल्यास वा अपंगत्व आल्यास, त्यांच्या कर्तव्य कालावधीतील छात्रवृत्ती / विद्यावेतनाची रक्कम त्यांच्या घोषित कुटुंबियांना देण्यात येईल. परंतु, सानुग्रह अनुदान किंवा अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात येणार नाही.
  18. कराराच्या कालावधीत फेलोना राजीनामा द्यावयाचा असल्यास किमान एक महिना अगोदर स्वाक्षांकित अर्ज नियुक्ती केलेल्या कार्यालयामार्फत संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई यांना सादर करावा लागेल.
  19. राजीनामा किंवा इतर कारणास्तव एखाद्या फेलोची फेलोशिप खंडित झाल्यास सदर फेलोस शैक्षणिक कार्यक्रमही पूर्ण करता येणार नाही.
  20. फेलोंनी केलेल्या कामगिरीबाबत कराराच्या कालावधीत तसेच कार्यक्रमाची मुदत संपल्यानंतरही पूर्ण गुप्तता बाळगण्यात येईल. करार कालावधीत त्यांनी केलेली कामगिरी / संशोधन / जमा केलेली माहिती / मिळालेल्या माहितीच्या आधारे तयार केलेले मुद्दे याबाबत कराराच्या कालावधीत किंवा त्यानंतरही त्यांना कोणतीही माहिती प्राधिकृत अधिकाऱ्याव्यतिरिक्त कोणासही देता येणार नाही.
  21. फेलोशिपच्या कालावधीत फेलो कोणत्याही राजकीय चळवळीत भाग घेऊ शकणार नाही. तसेच त्यांच्याकडून कोणतेही अशोभनीय कृत्य घडणार नाही, याची त्यांनी दक्षता घ्यावी. फेलोंनी सचोटी राखणे, निवडणुकीत भाग न घेणे, वृत्तपत्रांना माहिती न देणे, कोणत्याही स्वरूपाची देणगी न घेणे, इ. बाबत दक्षता घ्यावी.
  22. फेलोंना राज्यातील प्रकल्पांना / आस्थापनांना भेट देताना नियुक्ती केलेल्या कार्यालयाच्या प्रमुखाची पूर्वमंजुरी घ्यावी लागेल. यासंदर्भात प्रकल्पांना / आस्थापनांना भेट द्यावयाची आहे, त्यांच्या प्रमुखाला त्याबाबतची पूर्वकल्पना द्यावी.
  23. फेलोशिपच्या संपूर्ण कालावधीत तसेच त्यानंतर फेलोंनी केलेल्या कोणत्याही स्वरूपाच्या गुन्हेगारी व बेकायदेशीर कृत्यांच्या अनुषंगाने त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या कारवाईची जबाबदारी सर्वस्वी फेलोंवर राहील.
  24. फेलोंच्या कराराच्या कालावधीत असमाधानकारक कामगिरी किंवा गैरशिस्तीच्या कारणामुळे कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांचा फेलो म्हणून नियुक्तीचा करार समाप्त करण्यात येईल.
  25. फेलोंना प्रत्येक महिन्यात त्यांच्या कामगिरीचा अहवाल ईमेल द्वारे नियुक्ती केलेल्या कार्यालयाच्या प्रमुखास व संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई यांना सादर करावा लागेल.
  26. अहवालात फेलोंनी महिनाभरात केलेले कामकाज तसेच त्या कामातून ते काय शिकले व त्या अनुषंगाने त्यांच्या सूचना याबाबत नोंद ठेवणे अपेक्षित आहे.
  27. फेलोच्या नियुक्तीनंतर प्रत्येक तीन महिन्यांनी फेलोंच्या कामगिरीचे मूल्यमापन संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई हे करतील.
  28. शासनाच्या हितासाठी या अटी / शर्तीमध्ये बदल / वाढ करण्यात आल्यास, त्या फेलोंवर बंधनकारक राहतील.
  29. उपरोक्त अटी / शर्ती मान्य आहेत, या आशयाचे संमतीपत्र नियुक्ती देण्यापूर्वी फेलोंकडून घेण्यात येईल.

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपमुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी यांच्या अधिनस्त कंत्राटी तत्त्वावर एका समन्वयकाची सेवा घेता येईल. तसेच अर्थ व सांख्यिकी संचालनालयास आवश्यकतेनुसार कमाल ५ इतक्या मनुष्यबळ मर्यादेत कंत्राटी तत्वावर सेवा घेता येतील.

शैक्षणिक कार्यक्रम व इतर कार्यक्रम आयोजनाकरीता येणारा खर्च तसेच आवश्यकतेनुसार तज्ञ मार्गदर्शकांना निमंत्रित केल्यास त्यांच्या मानधनावरील खर्च मंजूर तरतुदीतून भागविण्यात यावा. या कार्यक्रमांसाठी आवश्यकतेनुसार निवास व भोजन व्यवस्था करणे शक्य न झाल्यास प्रत्येक फेलोस रुपये २.२५०/- ( प्रति दिन ) या दराने भत्ता देण्यात येईल.

सदर योजनेच्या अंमलबजावणी करिता येणारा खर्च मागणी क्रमांक ओ९, ३४५४- जनगणना सर्वेक्षण व सांख्यिकी, ०२- सर्वेक्षण व सांख्यिकी, ११२ आर्थिक सल्ला व सांख्यिकी, ( ०१ ) अर्थ व सांख्यिकी संचालनालय. ( ०४ ) – मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम ( दत्तमत ) ( योजनांतर्गत योजना ) ( ३४५४०५ ९२ ) या लेखाशीर्षाखाली मंजूर तरतुदीमधून भागविण्यात यावा.

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाच्या प्रयोजनार्थ अर्थसंकल्पात विहित अर्थसंकल्पीय पद्धत्तींचे पालन करून आर्थिक तरतूद करणे याबाबतची कार्यवाही नियोजन विभागाच्या अधिपत्याखालील अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई या कार्यालयामार्फत करण्यात येईल.

नियोजन विभाग शासन निर्णय : मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम फेलोंच्या निवडीचे निकष, अटी व शर्ती आणि कार्यक्रमाच्या अंमलबजावणी बाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – मुख्यमंत्री फेलोशिपसाठी ऑनलाईन अर्ज करा ! Apply online for Chief Minister Fellowship

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

One thought on “मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम – Chief Minister Fellowship Program

  • Lokesh Gajanan Zade

    फॉर्म कसा भरायचा आहे . याची माहिती द्यावी अशी नम्र विनंती.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.