वृत्त विशेषमहाराष्ट्र शासन निर्णय - GRसरकारी योजना

केंद्र पुरस्कृत Accredited Agent for Health and Extension of Livestock Production (A- HELP) योजना

राज्यात शेतकरी, पशुपालक यांना ग्रामपातळीवर विविध पशुवैद्यकीय सेवा पुरविण्याकरीता पशुसंवर्धन विभागांतर्गत जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालये, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालये, पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी- १ व पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी-२ कार्यरत असून, तेथे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक आणि परिचर पैकी २ ते ५ अधिकारी / कर्मचारी असतात. प्राण्यांच्या आरोग्याशी संबंधित नियमित कर्तव्ये सोडून या अधिकारी कर्मचाऱ्यांना इतर शासकीय कामांकरीता बराच वेळ द्यावा लागतो. ही पोकळी भरून काढण्यासाठी “आरोग्य आणि पशुधन उत्पादनाच्या विस्तारासाठी मान्यता प्राप्त कार्यकर्ता A HELP (Accredited Agent for Health and Extension of Livestock Production) या नावाने समुदाय आधारित पशुसखी कार्यकर्त्यांचा गट स्थापन करुन प्रथदर्शी केंद्र पुरस्कृत महाराष्ट्र राज्यासह मध्य प्रदेश, कर्नाटक, बिहार, झारखंड, उत्तराखंड व जम्मू आणि कश्मीर या राज्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.

स्वयंसहायता गट (SHG) व्यासपीठाचा लाभ घेण्यासाठी व अभिसरणाद्वारे ग्रामीण आर्थिक वाढीसाठी दीनदयाळ अंतोदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण उपजिविका अभियान (DAY-NRLM), केंद्र शासनाचे ग्रामीण विकास मंत्रालय (MoRD) आणि केंद्र शासनाचे पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग(DAHD) यांच्यामध्ये १ सप्टेंबर, २०२१ रोजी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. सदर सामंजस्य कराराच्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने A HELP करीता संयुक्त अंमलबजावणी मार्गदर्शक सुचना (Joint Implementation Guidelines) निर्गमित केलेल्या आहेत. सदरहू योजनेच्या राज्यातील अंमलबजावणीच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

केंद्र पुरस्कृत Accredited Agent for Health and Extension of Livestock Production (A- HELP) योजना :-

आरोग्य आणि पशुधन उत्पादनाच्या विस्तारासाठी मान्यता प्राप्त कार्यकर्ता A HELP (Accredited Agent for Health and Extension of Livestock Production) या केंद्र पुरस्कृत योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यास याव्दारे प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

A – HELP ची भूमिका व जबाबदाऱ्या:-

 • A-HELP अंतर्गत उपलब्ध होणारे पशुधन संसाधन व्यक्ती (एलआरपी) हे गाव पातळीवर किंवा गावांच्या समुह पातळीवर कार्यरत राहणार असून, आवश्यक असल्यास पशुधन संख्या / कुक्कुट संख्या / गाव संख्येनुसार त्यांची संख्या एकापेक्षा जास्त असू शकेल.
 • निवडलेली व्यक्ती ही पशुसंवर्धन विभागाशी दुवा जोडणारी राहणार असून, सेवा देणारा शेवटचा विस्तार कार्यकर्ता म्हणून शेतकऱ्यांच्या दारात २४x७ सेवा देईल. A HELP यांची कौशल्यवृध्दी आवश्यकतेनुसार निरंतर प्रशिक्षणाद्वारे केली जाईल.
 • पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या स्तरावर विविध दैनंदिन कामकाजामध्ये त्यांचा उपयोग करुन घ्यावयाचा आहे. जसे की, प्रतिबंधात्माक लसीकरण, जंतनाशन, इ. जर अशा व्यक्ती कृत्रिम रेतन सेवादाते म्हणून कार्य करत असल्यास गायी-म्हशींमधील कृत्रिम रेतन कार्य, फिरत्या पशुवैद्यकीय केंद्रांसमवेत समन्वय साधणे, ग्राम पातळीवर पशु आरोग्य शिबीरांचे आयोजन करणे, पशुरुग्णांवर प्रथमोपचार करणे, ग्राम पातळीवरील पशुसंवर्धन समितीच्या बैठकींना उपस्थित राहणे, तसेच, राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या धोरणांची अंमलबजावणी करण्यामध्ये मदत करणार आहेत. विशेषत: ज्या पशुपालकांना पशुवैद्यकीय आरोग्य सेवा मिळण्यामध्ये अडचणी येत आहेत, अशा पशुआरोग्य-संबंधित सेवांसाठी A-HELP कार्यकर्ता हा पहिला दुवा असेल.
 • A-HELP आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व पशुधन आणि कुक्कुट पक्ष्यांच्या नोंदी ठेवून ती माहिती तालुका स्तरावरील उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी व समन्वयासाठी पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांना उपलब्ध करून देईल.
 • A-HELP पशुपालकांमध्ये इनाफ टॅगिंगबद्दल जागृती निर्माण करुन पशुधनास इनाफ टॅगिंगकरीता प्रोत्साहित करेल. पशुधनास इनाफ टॅगिंग केल्यानंतर त्याची इनाफ प्रणालीवर नोंदणी होईल हे सुनिश्चित करेल. तसेच, इनाफ प्रणालीमध्ये माहिती भरण्यास मदत करेल.
 • A HELP कार्यक्षेत्रातील पशुपालक आणि पशुधन निरोगी राहण्याकरीता पशुपालकांमध्ये मूलभूत स्वच्छता आणि स्वच्छ व्यवस्थापन पद्धतींविषयी जागरूकता निर्माण करतील. तसेच, पशुवैद्यकीय आरोग्य सेवांबद्दल इतर माहिती देखील देतील.
 • A-HELP शेतकरी, पशुपालकांना विविध विभाग / संस्थांकडून कर्ज वा इतर लाभ मिळविण्यासाठी समुपदेशन करुन सर्व संबंधीत माहिती देतील आणि कर्जासाठी अर्ज भरण्यास / अपलोड करण्यास किंवा अर्जाच्या प्रगतीचा मागोवा घेण्यास मदत करतील.
 • पशुसंवर्धन विभागाच्या कॉल सेंटरशी समन्वयाकरीता A HELP आपला भ्रमणध्वनी क्रमांक फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्यावरील पशुवैद्यकास उपलब्ध करुन देतील.
 • पशुसंवर्धन विभागाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार पशुपालकांना पशुधनाचा विमा उतरविण्यासाठी मदत करतील.
 • पशुपालकांना चारा उत्पादन तसेच, पशुधनाच्या समतोल आहाराबाबत मार्गदर्शन करतील.
 • एकात्मिक पाहणी योजना आणि पशुगणनेच्या इतर कार्यक्रमांच्या बाबतीत A-HELP प्रगणक म्हणून देखील काम करू शकतील.

केंद्र व राज्य शासनाचा पशुसंवर्धन विभाग, राष्ट्रीय ग्रामीण जिवनोन्नती अभियान आणि राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ यांच्या भूमिका व जबाबदाऱ्या:-

 • केंद्र शासनाचा पशुसंवर्धन विभाग राज्य पशुसंवर्धन विभागास मार्गदर्शक तत्वे निर्गमित करेल.
 • राज्य पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान हे समन्वयाने काम करतील. पशुसंवर्धन विभागाकडून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियानास आवश्यक ते प्रसिध्दी प्रचार व विस्तार साहित्य उपलब्ध करुन देण्यात येईल.
 • A -HELP यांच्यामार्फत केले जाणारे विविध तांत्रिक कामकाज जसे की, लसीकरण, जंतनाशन, कृत्रिम रेतन कार्य इ. यावर पशुसंवर्धन विभाग त्यांच्या अधिनस्त यंत्रणेमार्फत देखरेख करेल. तसेच, या अनुषंगाने आवश्यक ते निर्देश आणि साधनसामग्री उपलब्ध करुन देईल.
 • कृत्रिम रेतन प्रशिक्षण व त्याकरीता लागणाऱ्या साहित्याचा पशुसंवर्धन विभागकडून A-HELP यांना पुरवठा करुन MAITRI च्या धर्तीवर कृत्रिम रेतन कार्यावर देखरेख करेल.
 • राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाकडे उपलब्ध असलेल्या राष्ट्रीय, राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावरील यंत्रणेचा वापर A HELP यांच्यासाठी करेल.
 • पशुसंवर्धन विभागाच्या सहाय्याने A- HELP यांची कौशल्यवृध्दी तसेच, आवश्यकतेनुसार निरंतर प्रशिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ ही नोडल एजन्सीची भूमिका बजावेल.
 • राज्य पशुसंवर्धन विभागातील अधिकारी यांना राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळामार्फत टीओटीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येईल.

A -HELP निवडीची कार्य पद्धत:-

 • महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान यांच्यामार्फत त्यांच्याकडे कार्यरत असलेल्या व पशुसखी म्हणून काम करण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींमधून A-HELP यांची निवड करण्यात यावी.
 • ज्यांनी यापूर्वी पशुसखी म्हणून चांगले कार्य करुन गावपातळीवर शेतकरी, पशुपालक यांचा विश्वास संपादित केला आहे, अशांना प्राधान्य देण्यात येईल.
 • आवश्यकता भासल्यास जिल्हा/ तालुका पातळीवरील A HELP यांची निवड टप्या टप्य्याने करण्यात येईल.

A – HELP निवडीचे निकष:-

 • A-HELP यांची निवड करण्यासाठी राज्य शासनास मुभा राहील तथापि, A-HELP निवडताना सदर व्यक्ती-
 • A-HELP मूळता: दीनदयाळ अंतोदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण उपजिविका अभियान (DAY-NRLI च्या स्वयंसहायता गटाची स्त्री सदस्य असणे आवश्यक आहे.
 • A-HELP संभाषण कौशल्य, नेतृत्व गुणसंपन्न असणे व तिचे शिक्षण किमान इयत्ता आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या शैक्षणिक पात्रतेचे A -HELP उपलब्ध न झाल्यास शैक्षणिक पात्रता कमी करण्याची मुभा राहील.
 • गायी-म्हशींमध्ये कृत्रिम रेतन सेवा पुरिवण्यासाठी योग्य शैक्षणिक अर्हतेचे A- HELP उपलब्ध झाल्यास क्षेत्रीय अधिकारी यांच्याशी सल्ला मसलत करुन शैक्षणिक अर्हता शिथिल करता येवू शकेल.
 • समाजातील वंचित घटकांना आवश्यक ते प्रतिनिधित्व देण्यात यावे.
 • स्वयंसहायता बचत गटातील सदस्यांमधून स्त्री मैत्रिज / कृत्रिम रेतन सेवादाता / पशुसखी यांना प्राधान्य देण्यात यावे.
 • A-HELP डिजिटल साक्षर असावी. आवश्यक असल्यास त्याकरीता त्यांना प्रशिक्षण देण्यात यावे.

A-HELP प्रशिक्षण:-

राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ यांनी A-HELP यांच्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्न अभियान आणि राज्याचा पशुसंवर्धन विभाग यांच्या सहकार्याने १६ दिवसांचे प्रशिक्षण आयोजित करेल.

A -HELP ची कार्ये:-

 • A -HELP च्या कामाचे वेळापत्रक लवचिक असेल व ते शिबिरे आणि प्रशिक्षणासाठीची वेळ वगळता आठवड्यातील चार दिवस दररोज सुमारे दोन ते तीन तासापुरती मर्यादित असेल.
 • पशुसंवर्धन विभागाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार A-HELP कृत्रिम रेतनाचे कार्य करतील. त्याचप्रमाणे, ती फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्यावरील पशुवैद्यक यांच्यासोबत समन्वयासाठी त्यांच्याकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनांचे पालन करेल.
 • तालुका स्तरावर A- HELP पशुसंवर्धन विभागाच्या मदतीने सहकारी दुग्ध व इतर स्वयंसेवी संस्थांशी सल्लामसलत करून पशुआरोग्य शिबिरे तथा जनजागृती शिबिरे आयोजित करेल.
 • A- HELP पशुधनाच्या प्रथमोपचारासाठी आवश्यक औषधे, जंतनाशक औषधे, पोषण पूरक औषधे / खनिज मिश्रणे इत्यादी वितरणासाठी संबंधित पशुवैद्यकाकडून उपलब्ध करुन घेवून साठा करुन ठेवतील. तसेच, गरजू शेतकरी, पशुपालकांकडील रुग्ण पशुंवर प्रथमोपचार / सल्ला / अर्ज भरणे इत्यादी संदर्भात आवश्यक असलेली मदत पशुसंवर्धन विभागाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार करतील.
 • A- HELP आवश्यकतेनुसार गाव पातळीवरील कृषी / पशुसंवर्धन समित्यांच्या बैठकांना उपस्थित राहतील.

A- HELP यांना देय मानधन:-

 • केंद्र शासनाच्या या योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार A-HELP हे मानधन (Honorary) तत्वावर काम करतील व याकरिता त्यांना कोणतेही वेगळे मानधन देय राहणार नाही. तथापि, त्यांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान यांच्यामार्फत ज्या प्रचलित दरांप्रमाणे मानधन देण्यात येते ते शासनाने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयानुसार लागू राहील. तसेच, केंद्र / राज्य शासनाने लसीकरण, बिल्ला लावणे, इनाफ नोंदी, कृत्रिम रेतन करणे इत्यादी कार्यक्रमासाठी वेळोवेळी निश्चित केलेले मानधन देय राहील.
 • शेतकरी, पशुपालक यांना कर्ज मिळविण्याकरीता अर्ज भरण्यास / अपलोड करण्यास किंवा अर्जाच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने वेळोवेळी निश्चित केलेले मानधन A HELP यांना देय राहील.
 • या अनुषंगाने आवश्यक त्या सविस्तर मार्गदर्शक सूचना आयुक्त पशुसंवर्धन, पुणे यांनी सर्व संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांना निर्गमित कराव्यात.

शासन निर्णय: केंद्र पुरस्कृत Accredited Agent for Health and Extension of Livestock Production (A- HELP) या योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकीय मंजुरी प्रदान करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – पशुपालक शेतकऱ्यांना मिळणार किसान क्रेडिट कार्ड – Livestock farmers will get Kisan Credit Card

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.