गृह विभागमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी कामेसरकारी योजना

महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळामार्फत कल्याणकारी योजना !

महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ (Maharashtra Auto-Rickshaw and Metered Taxi Driver Welfare Board) स्थापन करण्याच्या अनुषंगाने दिनांक १६.०३.२०२४ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयामध्ये मंडळाची कार्यपध्दती / कामकाजाबाबतची नियमावली स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने, महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या कार्यपध्दती / कामकाजाबाबतची नियमावली निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ – Maharashtra Auto-Rickshaw and Metered Taxi Driver Welfare Board:

महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी (Maharashtra Auto-Rickshaw and Metered Taxi Driver Welfare Board) मंडळाची कार्यपध्दती व कामकाजबाबतची नियमावली यासोबतच्या “परिशिष्ट अ” मध्ये नमूद केल्यानुसार असेल.

मंडळाची कार्यपध्दती / कामकाजाबाबतची नियमावली.

दिनांक १६ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये (शा.नि. क्र. एमव्हीआर- ०७१९/प्र.क्र.१७०/परि-२) राज्यातील ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालकांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्याच्या अनुषंगाने कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. सदर कल्याणकारी मंडळांतर्गत जीवनविमा व अपंगत्त्व विमा योजना, आरोग्यविषयक लाभ, कर्तव्यावर असतांना दुखापत झाल्यास अर्थसहाय्य योजना, पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, कामगार कौशल्य योजना, इत्यादी योजना राबविल्या जाणार आहेत.

महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी (Maharashtra Auto-Rickshaw and Metered Taxi Driver Welfare Board) मंडळाच्या कार्यपध्दती वा कामकाजबाबतची नियमावली / कार्यपध्दती पुढीलप्रमाणे आहे:-

मंडळाची स्थापना आणि स्वायत्तता :-

“महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ – (Maharashtra Auto-Rickshaw and Metered Taxi Driver Welfare Board)” या नावाने सोसायटी नोंदणी कायदा १८६० अन्वये नोंदणीकृत करण्यात येईल. सदर मंडळ हे परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत कार्यरत राहील.

अधिकार क्षेत्र

हा शासन निर्णय महाराष्ट्र राज्यामध्ये नोंदणीकृत ऑटो-रिक्षा परवानाधारक, ऑटो-रिक्षा/ मिटर्ड टॅक्सी चालकांसाठी लागू राहील.

उद्दीष्ट:

१) ऑटो-रिक्षा परवानाधारक, ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालकांसाठी सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजना राबविणे.

२) ऑटो-रिक्षा परवानाधारक, ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालकांसाठी केंद्र शासनामार्फत व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणाकारी योजनारा बविणे.

३) मंडळाच्या कल्याणकारी निधीचे विनियोजन व व्यवस्थापन करणे, इ.

प्रशासन आणि रचना

१) “महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणाकारी मंडळ – (Maharashtra Auto-Rickshaw and Metered Taxi Driver Welfare Board)” ची रचना दिनांक १६ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार असेल. राज्यस्तरीय मंडळास आवश्यकतेनुसार विशेष निमंत्रित सदस्य बैठकीस निमंत्रित करता येतील.

२) जिल्हास्तरावरील समितीची रचना १६ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार राहील. तसेच जिल्हास्तरीय समितीस त्यांच्या जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील विशेष निमंत्रित सदस्य आवश्यकतेनुसार बैठकीस निमंत्रित करता येतील.

कार्यालयीन रचना

१) महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाचे मुख्य कार्यालय हे मुंबई येथे असेल.

२) महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या अंतर्गत जिल्हास्तरीय समितीची कार्यालये स्थापन केली जातील.

३) सदर मंडळाच्या कामकाजासाठी महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील वर्ग-१ संवर्गातील अधिकारी “मुख्याधिकारी” म्हणून राज्य शासनाच्या मान्यतेने नियुक्त करण्यात येईल. मुख्याधिकारी हे राज्यस्तरीय मंडळाच्या कार्यालयाचे व जिल्हास्तरीय समितीच्या कार्यालयाच्या कामकाजाचे व्यवस्थापन आणि नियंत्रण करतील.

सभासद नोंदणी, सदस्यत्व रद्द करणे:

१) ऑटो-रिक्षा परवाना धारक, ऑटो-रिक्षा / मिटर्ड टॅक्सी चालकांनी मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.

२) जिल्हयातील परिवहन कार्यालयामार्फत याबाबतची नोंदणी प्रक्रिया राबविण्यात यावी.

३) नोंदणीकृत चालकांना लाभ देण्यासाठी मंडळाच्या संबंधीत जिल्ह्यातील कार्यालयाकडून ओळखपत्र जारी करावे.

४) मंडळाचा सभासद होण्यासाठी अर्जदाराने महाराष्ट्र राज्यामध्ये नोंदणी असलेल्या ऑटो-रिक्षा / मिटर्ड टॅक्सी अनुज्ञप्ती व बॅज धारण केले असणे बंधनकारक राहील.

५) पात्र अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्ती मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील. तथापि, कुटुंबातील सदस्य संख्या ही तो / ती, जोडीदार व मुले मिळून ४ पर्यंत मर्यादित असेल.

६) जो सभासद सलग एक वर्षापेक्षा जास्त काळ मंडळाची वर्गणी अथवा मंडळाने विहित केलेली इतर रक्कम मंडळाकडे अदा करणार नाही, अशा सभासदाचे सभासदत्व सुनावणीची एक संधी देऊन रद्द करण्यात येईल.

७) परवानाधारक जर अपंग झाला तर तो परवानाधारक देखील कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र राहील.

८) परवानाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याची अनुज्ञप्ती त्याच्या कायदेशीर वारसास हस्तांतरित करण्यात येते. मयत परवानाधारकाचा कायदेशीर वारस त्याच्याकडे अनुज्ञप्ती / बॅज नसेल तरी सदर कायदेशीर वारस कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र राहील.

निधीचे स्रोत 

महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाचे निधीचे स्रोत खालील प्रमाणे असतील:-

१. वार्षिक कल्याण निधी : मंडळ निधीसाठी प्रत्येक ऑटो-रिक्षा परवाना धारक, ऑटो- रिक्षा/मिटर्ड टॅक्सी चालक, महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ वेळोवेळी वार्षिक रक्कम / वर्गणी संकलित करेल.

२. शासकीय अनुदान : राज्यशासन अथवा केंद्रशासन यांच्या कडून प्राप्त होणारे अनुदान.

३. नोंदणी शुल्क : नोंदणी शुल्क व ओळखपत्र शुल्काची रक्कम रु. ५००/- राहील. सदर नोंदणी शुल्क अर्जासोबत जमा करण्यात येईल. तसेच, नोंदणी शुल्क व ओळखपत्र शुल्काची रक्कम राज्यस्तरीय मंडळ यांनी वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे असेल.

४. वार्षिक सभासद शुल्क : वार्षिक सभासद शुल्क रक्कम रु. ३००/- राहील. तसेच, वार्षिक सभासद शुल्काची रक्कम राज्यस्तरीय मंडळ यांनी वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे असेल.

५. इतर निधी : मंडळास योग्य वाटेल अशा कायदेशीर मार्गाने निधी देणगी स्वरुपात, – कायदेशीर अनुज्ञेय स्रोतातून निर्माण करेल. (उदा. जिल्हा वार्षिक नियोजन योजना, जिल्हा खनिज प्रतिष्ठाण यांच्याकडून निधी, राज्याचे विविध महामंडळे, आमदार निधी, स्थानिक स्वराज्य संस्था, इत्यादी)

६. सदरच्या निधीचे संकलन मंडळाच्या कार्यालयात केवळ डिजीटल/ऑनलाईन पध्दतीने केले जाईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये रोखीने निधी संकलित केला जाणार नाही.

७. राज्यस्तरीय कल्याणकारी मंडळ व जिल्हास्तरीय कल्याणकारी समितीसाठी बँक खाते उघडण्यासाठी संबंधित मंडळ / समितीच्या सदस्य सचिवांना प्राधिकृत करण्यात येत आहे.

८. मंडळाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्याकरीताची कार्यपध्दती राज्यस्तरीय मंडळ शासनाच्या मान्यतेने वेळोवेळी निर्गमित करेल.

९. राज्यस्तरीय मंडळ व जिल्हास्तरीय समितीच्या आवश्यकतेनुसार वेळोवेळी बैठींचे आयोजन करण्यात येईल. तथापी, राज्यस्तरीय मंडळाची बैठक वर्षातून किमान दोन वेळा व जिल्हास्तरीय समितीची बैठक वर्षातून (किमान चार वेळा) तीन महिन्यातून एकदा घेणे आवश्यक असेल.

निधी व्यवस्थापन :-

१. आस्थापना खर्च मंडळाच्या आस्थापनेवरील अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतनाचा खर्च, तसेच आस्थापनेचा खर्च, मंडळाच्या योजना राबविण्याचा खर्च, मंडळाच्या योजनांच्या प्रसिध्दी बाबतचा खर्च, बैठक आयोजित करण्याचा खर्च, बैठक भत्ता. हा खर्च एकूण वार्षिक जमा रकमेच्या ३% पेक्षा अधिक नसावा. तथापि, या मर्यादेच्या वर खर्च करावयाचा झाल्यास त्यासाठी राज्य शासनाची परवानगी आवश्यक राहील.

२. कल्याणकारी योजनेसाठीचा खर्च शासन किंवा “महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ” यांच्या निर्देशान्वये तसेच या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या विविध योजना, उपक्रम, लाभ यावरील खर्च.

३. निधीचा विनियोग हा मंडळाच्या संकलित खात्यामधून होईल. त्यासंबंधीचे धोरण व नियम “महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ” यांच्याकडून निश्चित करण्यात येईल.

४. महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी (Maharashtra Auto-Rickshaw and Metered Taxi Driver Welfare Board) मंडळासाठीचे लेखाशिर्ष परिवहन विभागाकडून निर्माण करण्यात येईल.

५. महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळासाठीचे स्वीय प्रपंजी खाते (पीएलए) परिवहन आयुक्त यांच्याकडून उघडण्यात येईल.

महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळामार्फत कल्याणकारी योजना :-

महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळामार्फत खालील कल्याणकारी योजना राबविण्यात येतील.

१. जीवनविमा व अपंगत्व विमा योजना.

२. आरोग्य विषयक लाभ.

३. कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास अर्थसहाय्य योजना (रु.५० हजारांपर्यंत).

४. पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना.

५. कामगार कौशल्य वृद्धी योजना.

६. ६५ वर्षावरील अॅटोरिक्षा/मिटर्ड टॅक्सी परवानाधारक यांना निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान.

७. नविन ऑटो-रिक्षा / मिटर्ड टॅक्सी खरेदी, गृह खरेदीसाठी घेण्यात येणारे कर्ज.

८. राज्यस्तरीय मंडळाने वेळोवळी मान्यता दिलेल्या इतर कल्याणकारी योजना.

९. शासनाने निर्देशित केलेल्या इतर कल्याणकारी योजना.

१०. वरील लाक्षणिक योजना व्यतिरिक्त शासनाने घोषित केलेल्या अनुषंगिक योजना इ.

वरील सर्व योजनेसंबंधीत नियम, अटी व मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाकडून निर्गमित करण्यात येतील.

कार्य :-

राज्यस्तरीय मंडळाच्या कार्यालयाची कामे:

१. राज्यातील ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालकांसाठी सामाजिक सुरक्षेच्या योजना तयार करणे व राबविणे.

२. राज्यातील ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालकांसाठी सामाजिक सुरक्षेच्या योजनांच्या अंमलबजावणीवर देखरेख व नियंत्रण ठेवणे.

३. राज्य शासन व जिल्हा स्तरीय समिती यांच्यामध्ये समन्वय करणे.

४. मंडळाच्या लाभार्थ्यांना पात्रतेबाबतचे निकष निश्चित करणे.

५. आवश्यकतेप्रमाणे जारी केलेल्या महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी – (Maharashtra Auto-Rickshaw and Metered Taxi Driver Welfare Board) मंडळाची कार्यपध्दती / कामकाजाबाबतची नियमावलीमध्ये बदल करण्यासाठी शासनास शिफारशी करणे.

६. राज्य शासनाने सोपविलेली इतर कार्य पार पाडणे.

७. मंडळाच्या जमा निधी व खर्चाच्या विनियोगाबाबत लेखा ठेवणे, अभिलेख ठेवणे व वार्षिक अंदाजपत्रक तयार करुन शासनास सादर करणे. तसेच संपुर्ण आर्थिक वर्षात केलेल्या कार्याचा वार्षिक अहवाल शासनास सादर करणे.

८. निधी संकलन व त्यावरील नियंत्रण करणे.

९. मंडळाचे कामकाज पार पाडण्यासाठी अधिकारी / कर्मचारी यांच्या नेमणुका करणे.

१०. राज्य स्तरीय मंडळ व जिल्हास्तरीय समिती यांचे दैनंदिन कामकाज पार पाडण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती (बाह्यस्रोत / कंत्राटी पध्दतीने), कार्यालयीन खर्च, प्रशासकीय खर्च, कार्यालय भाड्याने, प्रवास, इत्यादी.

जिल्हास्तरीय समित्यांची कार्ये:

१. राज्यातील ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी व सामाजिक सुरक्षेच्या योजना राबविणे.

२. मंडळाकडे प्राप्त होणारा निधी व खर्चाच्या विनियोगाबाबत लेखा ठेवणे व वार्षिक अंदाजपत्रक तयार करुन मुख्य कार्यालयास आणि शासनास सादर करणे, तसेच संपूर्ण वर्षात केलेल्या कार्याचा वार्षिक अहवाल सादर करणे.

३. लाभार्थी म्हणून ऑटोरिक्षा/मिटर्ड टॅक्सी चालकांची नोंदणी करणे.

४. मंडळाच्या योजनेबाबत लाभ प्रदान करणे बाबत कार्यवाही करणे.

५. वरील उद्देशास अनुसरुन शासनाने घेतलेल्या निर्णयांची व मुख्य कार्यालयाच्या निर्णयांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे.

६. राज्यस्तरीय मंडळाने राबविलेल्या योजनांची अंमलबजावणी करणे.

७. लाभार्थी म्हणून नोंदणी करण्यासंबंधीची कामे.

८. राज्य शासन किंवा “महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ – (Maharashtra Auto-Rickshaw and Metered Taxi Driver Welfare Board)” मुख्य कार्यालय मुंबई कार्यालय वेळोवेळी विहीत करील त्याप्रमाणे कार्ये पार पाडणे.

९. जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिव पात्र लाभधारकांच्या यादीस जिल्हास्तरीय समितीची मान्यता घेवून लाभाचे वितरण करतील.

लाभ मिळवण्याची प्रक्रिया:

१. चालकांनी लाभासाठी जिल्हा कार्यालयांमध्ये विहित नमुन्यात अर्ज करावा.

२. प्रत्येक अर्ज जिल्हास्तरीय समितीकडून त्यांना दिलेल्या निकषानुसार पात्रतेसाठी तपासले जावेत.

३. मंजूर लाभ राज्यस्तरीय मंडळाने व जिल्हास्तरीय समितीने वेळोवेळी विहित केलेल्या कार्यपध्दतीनुसार वितरित केले जातील.

अहवाल आणि लेखापरीक्षण:

१. जिल्हास्तरीय समिती जमा करण्यात येणारा निधी आणि खर्च यांची अचूक नोंद ठेवेल व ते राज्य मंडळास सादर करेल.

२. राज्य मंडळ त्यांच्या कडील निधी आणि खर्च यांची अचूक नोंद ठेवेल तसेच राज्य मंडळाचे लेखे आणि जिल्हा समित्यांचे लेखे एकत्रित करुन शासनास सादर करेल.

३. वार्षिक लेखापरीक्षण स्वतंत्र लेखा परीक्षकाद्वारे करण्यात येईल.

४. मंडळाचे कामकाज आणि आर्थिक स्थितीचा वार्षिक अहवाल शासनास सादर केला जाईल.

इतर:

सदर शासन निर्णयामध्ये समाविष्ट नसलेल्या परंतु, मंडळाच्या दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असलेल्या सुधारणा / बदल करण्यास मंडळ सक्षम राहील.

गृह विभाग शासन निर्णय – Maharashtra Auto Rickshaw and Metered Taxi Driver Welfare Board GR: 

  1. महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची कार्यपध्दती/ कामकाजाबाबतची नियमावली शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
  2. महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना बाबत दि. १६-०३-२०२४ रोजीचा शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – Pink Rickshaw Yojana : पिंक (गुलाबी) ई-रिक्षा योजनेचा शासन निर्णय जारी !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.