अणुऊर्जा विभागाने आणलेल्या अॅक्टोसाईट (AKTOCYTE) या पोषण मूल्य युक्त गोळ्यांच्या उपलब्धतेमुळे कर्करोगाच्या उपचारात होणार परिवर्तन !
अणुऊर्जा विभाग आणि बंगळुरूच्या आयडीआरएस लॅब्स प्रायव्हेट लिमिटेडच्या सहयोगातून पूरक अन्न/ न्युट्रासुटिकल AKTOCYTE – अॅक्टोसाईट टॅब्लेटस (गोळ्या) समारंभपूर्वक बाजारात आणल्या आहेत. या टॅब्लेटसमुळे रेडिओथेरपी घेणाऱ्या कर्करुग्णांचं जीवनमान उंचावणार आहे.
मुंबईचे भाभा अणु संशोधन केंद्र, नवी मुंबईचे कॅन्सर प्रशिक्षण संशोधन आणि शिक्षण प्रगत केंद्र,मुंबईचे टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि आडीआरएस प्रयोगशाळा यांच्या संशोधकांनी ही टॅब्लेट विकसित केली असून या सर्व संस्थांचे अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) कडून अॅक्टोसाईट (AKTOCYTE) ला मंजुरी मिळाली आहे. अणुऊर्जा विभागाच्या अनेक दशकांच्या संशोधनाने या औषधाच्या विकासाला पाठबळ दिले आहे. या गोळ्यांमुळे भारतात परवडणाऱ्या किमतीत कॅन्सर सेवा मिळणार आहे.हे महत्त्वपूर्ण योगदान असून या गोळ्या आता बाजारात उपलब्ध होतील.
या गोळ्यांची परिणामकारता उल्लेखनीय आहे. प्रामुख्याने पेल्व्हिक भागातील कॅन्सरग्रस्तांना रेडिओथेरपीच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. त्यांच्यासाठी या गोळ्या उपयोगी पडतात. रेडिओथेरपीमुले शरीरात निर्माण झालेल्या टॉक्सिसिटी म्हणजेच विषारी घटकांच्या दुष्परिणामापासून रूग्णांचे रक्षण करण्याची ताकद या गोळ्यांमधे असून त्यामुळे रूग्णाला दिलासा मिळतो. कॅन्सर रेडिओथेरपी, रीजनरेटिव्ह न्यूट्रास्युटिकल, इम्युनोमोड्युलेटर आणि अँटिऑक्सिडंटसाठी सहायक रचना असलेल्या या गोळ्या कर्करूग्णांच्या सेवेत झालेल्या लक्षणीय प्रगतीचे द्योतक आहे.
अणुऊर्जा विभागाच्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांचे आणि आयडीआरएसच्या यशस्वी व्यावसायिकतेचे मुंबईचे भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक (बीएआरसी) विवेक भसीन यांनी यावेळी कौतुक केले. सर्व संबंधितांनी मोठ्या प्रमाणावर केलेल्या संशोधनामुळे हे उत्पादन बाजारात आले आहे असेही ते म्हणाले. कर्करोगाच्या उपचारादरम्यान निरोगी ऊतींचे किरणोत्सारामुळे होणारे नुकसान रोखण्यासाठी या गोळ्यांचा उपयोग होईल असेही त्यांनी सांगितले.