खासगी कोचिंग क्लासेसमध्ये आता १६ वर्षांखालील मुलांना प्रवेश नाही; केंद्राच्या नव्या मार्गदर्शक सूचना !
वाढत्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात खाजगी कोचिंग सेंटरशी संबंधित अनेक समस्या आहेत. यामध्ये आत्महत्या प्रकरणे, आगीच्या घटना, सोयीसुविधांचा अभाव तसेच शिकवण्याच्या पद्धती अशा अनेक घटना घडल्या आहेत. तसेच देशात अनियंत्रित खाजगी कोचिंग सेंटर्सची संख्या सतत वाढत आहे. अशा केंद्रांवर जादा शुल्क आकारल्याची उदाहरणे आहेत यामध्ये विद्यार्थ्यांकडून फी, विद्यार्थ्यांवर होणारा अवाजवी ताण यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या यासारख्या घटना घडताना दिसतात.
मेडिकल, जेईईसह विविध प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नावांचा वापर करणाऱ्या खासगी क्लासेसना वठणीवर आणण्यासाठी केंद्र सरकारने आज नवी नियमावली आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मागील वर्षी कोचिंग हब कोटा येथे झालेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. त्याची देशात सर्वत्र अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
खासगी कोचिंग क्लासेसमध्ये आता १६ वर्षांखालील मुलांना प्रवेश नाही; केंद्राच्या नव्या मार्गदर्शक सूचना !
केंद्राच्या नव्या सूचनांनुसार क्लास चालकांना १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करता येणार नाही तसेच ते विद्यार्थी आपले आहेत. असा दावाही करता येणार नाही. विद्यार्थ्यांच्या नावाने मोठ्या जाहिराती करून दिशाभूल करणाऱ्या क्लासेसना यापुढे विद्यार्थ्यांना चांगल्या गुणांची हमी देणे बेकायदा ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे देशभरात पसरलेल्या खासगी क्लासेसना केंद्र सरकारचा हा मोठा धक्का असेल, असे शिक्षणतज्ज्ञांना वाटते. गेल्या काही वर्षांपासून खासगी कोचिंग क्लासेसचे प्रस्थ वाढले आहे. चांगल्या शाळा- महाविद्यालयांत प्रवेश घेतल्यानंतर पालक आपल्या पाल्याला चांगल्या शिक्षणाच्या आशेने खासगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश देतात. यावेळी काही क्लासेस अवाजवी शुल्क आकारत असल्याचे दिसून आले.
विद्यार्थ्याने क्लाससाठी पूर्ण पैसे भरले असतील आणि विहित कालावधीच्या मध्येच क्लास सोडला असेल तर त्या विद्यार्थ्याला उर्वरित कालावधीसाठी आधी जमा केलेल्या शुल्कापैकी १० दिवसांच्या आत प्रो-रेटा आधारावर शुल्काचा परतावा परत केला जाईल. कोचिंग सेंटरना अवाजवी शुल्क आकारल्याबद्दल एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जावा किंवा त्यांची नोंदणी रद्द केली जावी, अशी तरतूदही करण्यात आली आहे.
जेईई, नीट तसेच दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात गुणांच्या हमीचा दावा करणाऱ्या खासगी शिकवण्यांचे जाळेच तयार झाले आहे. मुंबई, पुण्यासह इतर शहरांमध्ये अनुदानित आणि सरकारी शाळांतील शिक्षक आपला वेळ खासगी शिकवण्यासाठी देत त्यातून मोठी कमाई करतात, तर दुसरीकडे अनुदानित संस्थाचालक काही शिक्षकांना जबरदस्तीने आपल्याच शाळांमध्ये खासगी क्लासेसच्या शिकवण्या घ्यायला लावतात, केंद्र सरकारच्या या नव्या मार्गदर्शक सूचनांमुळे शाळा आणि खासगी क्लासेस चालविणारे शिक्षक, संस्थाचालक हे शिक्षण विभागाच्या रडारवर येणार आहेत.
कोचिंग सेंटर साठी मार्गदर्शक तत्त्वांची आवश्यकता:
- कोचिंग सेंटर्सची नोंदणी आणि नियमन करण्यासाठी फ्रेमवर्क प्रदान करणे.
- कोचिंग सेंटर चालवण्यासाठी किमान मानक आवश्यकता सुचवणे.
- कोचिंग सेंटरमध्ये नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करणे.
- कोचिंग सेंटर्सना सह-अभ्यासक्रम क्रियाकलापांवर तसेच समग्रतेवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देणे.
- विद्यार्थ्यांचा विकास, मानसिक आरोग्यासाठी करिअर मार्गदर्शन आणि मानसशास्त्रीय समुपदेशन प्रदान करणे.
क्लासची स्वतंत्र वेबसाइट हवी
कोचिंग सेंटरने शिक्षकाची पात्रता, अभ्यासक्रम, अभ्यासक्रम पूर्ण होण्याचा कालावधी, वसतिगृहांची सुविधा आणि आकारले जाणारे शुल्क यांचा अद्ययावत तपशील असलेली वेबसाइट तयार करावी, तीव्र स्पर्धा आणि विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक दबावामुळे कोचिंग सेंटरने विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी पावले उचलली पाहिजेत आणि त्यांच्यावर अवाजवी दबाव न आणता वर्ग आयोजित केले पाहिजेत, अशीही अट घालण्यात आली आहे. विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी कोचिंग सेंटरमध्ये प्रशिक्षित समुपदेशकांची नियुक्ती करण्यात यावी, असेही सांगण्यात आले.
कोचिंग सेंटर नोंदणीसाठी अटी
- कोणतेही कोचिंग सेंटर पदवीपेक्षा कमी पात्रता असलेल्या शिक्षकांना नियुक्त करू शकत नाही.
- कोचिंग सेंटरमध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी संस्था दिशाभूल करणारी आश्वासने देऊ शकत नाहीत.
- पालकांना दर्जा किंवा चांगल्या गुणांची हमी देऊ शकत नाहीत.
- संस्था १६ वर्षपिक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करू शकत नाही.
- विद्यार्थ्यांची नोंदणी ही माध्यमिक शाळेच्या परीक्षेनंतरच करण्यात येईल.
- गुन्हा दाखल असलेल्या शिक्षकांना कोचिंग सेंटर कामावर ठेवू शकत नाही.
हेही वाचा – पीएम श्री शाळा योजना – PM SHRI Schools (PM ScHools for Rising India)
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!