तलाठी कार्यालय नोंदवह्यामहाराष्ट्र जमीन महसूल कायदावृत्त विशेषसरकारी कामे

गाव नमुना १ चा गोषवारा विषयीची संपूर्ण माहिती

मागील लेखामध्ये आपण गाव नमुना १ (जमिनींची नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती पाहिली आहे, या लेखामध्ये गाव नमुना १ चा गोषवारा विषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

गाव नमुना १ चा गोषवारा:

गाव नमुना नंबर – १ च्या गोषवाऱ्यावरून गाव नमुना पाच ( गावाचा ठरावबंद ) बनतो. तालुका आणि जिल्हा नमुने यावर अवलंबून असतात त्यामुळे हा नमुना अत्यंत महत्वाचा ठरतो. गावात संबंधित बदल असल्यास तो दरवर्षी यात नोंदवण्यात यावा. जर एखाद्या वर्षी बदल नसेल तर ” …. या वर्षी कोणताही बदल नाही. ” असा स्पष्ट शेरा तलाठी यांनी लिहावा. तो शेरा तपासून तहसिलदाराने यावर स्वाक्षरी करावी. तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील अभिलेखाशी हा नमुना जुळत असावा.

गाव नमुना नंबर – १ च्या गोषवाऱ्यात गावातील जमिनींची वर्गवारी खालील पाच प्रमुख गटात केली जाते.

१. लागवडीस उपलब्ध आकारी जमिनी

२. लागवडीस उपलब्ध बिन – आकारी जमिनी

३. लागवडीस अयोग्य जमिनी

४. सार्वजनिक कामांसाठी राखून ठेवलेल्या जामीन

५. बिनशेतीकडे वर्ग झालेल्या जमिनी

वरील गट १ ची ( लागवडीस उपलब्ध आकारी जमिनी ) विभागणी चार उपगटात केली जाते.

अ. ताब्यात असलेल्या भोगवट्याच्या जमिनी.

ब. कोणाच्याही ताब्यात नसलेल्या बिन भोगवट्याच्या पडीत जमिनी.

क. विशेष सवलतींवर किंवा विशेष करारान्वये दिलेल्या जमिनी.

ड. इनाम किंवा दुमाला जमिनी.

गाव नमुना नंबर – १ चा गोषवारा यामध्ये अ – लागवडीकरीता जमीन या स्तंभात आकारी जमिनीच्या बाबतीतील नोंदी करावयाच्या असतात. त्या खालील प्रमाणे कराव्यात.

( एक ) ( अ ) ( १ ) या स्तंभात गावातील भोगवट्याच्या ( बिनदुमला ) जमिनीतील वर्ग १ च्या भोगवटादारांच्या जमिनीचे क्षेत्र हेक्टर – आर मध्ये लिहावे व त्याच्या समोर सदर जमिनीची आकारणी रु. पै. मध्ये लिहावे.

( एक ) ( अ ) ( २ ) या स्तंभात गावातील भोगवट्याच्या ( बिनदुमला ) जमिनीतील वर्ग २ च्या भोगवटादारांच्या जमिनीचे क्षेत्र हेक्टर – आर मध्ये लिहावे व त्याच्या समोर सदर जमिनीची आकारणी रु. पै. मध्ये लिहावे.

( एक ) ( अ ) ( ३ ) या स्तंभात गावातील भोगवट्याच्या ( बिनदुमला ) जमिनीतील सरकारी पट्टेदार भोगवटादारांच्या जमिनीचे क्षेत्र हेक्टर – आर मध्ये लिहावे व त्याच्या समोर सदर जमिनीची आकारणी रु. पै. मध्ये लिहावे.

त्याखालील ( ब ) मध्ये गावातील बिनभोगवट्याच्या जमिनीचे म्हणजेच ज्या सरकारी जमिनी लागवडीस योग्य आणि आकारी आहेत परंतु त्या कोणालाही वहिवाटीसाठी देण्यात आलेल्या नाहीत अशा जमिनीचे क्षेत्र आणि त्यावरील आकाराची नोंद क्षेत्र हेक्टर – आर मध्ये लिहावी व त्याच्या समोर सदर जमिनीची आकारणी रु. पै. मध्ये लिहावी.

त्याखालील ( क ) मध्ये गावात विशेष करारान्वये महसूल माफ केलेल्या किंवा पुनर्वसन संपादन किंवा कमी आकारणी करण्यात येणाऱ्या जमिनीचे म्हणजे ज्या जमिनी शासनाने महसूल माफ करून किंवा महसूल कमी करून एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला ( उदा. शाळा, व्यायाम शाळा, क्रीडा मंडळ, धर्मशाळा इ. ) दिल्या आहेत अशा जमिनीचे क्षेत्र हेक्टर – आर मध्ये लिहावे व त्याच्या समोर सदर जमिनीची आकारणी रु. पै. मध्ये लिहावे. शासनाच्या प्रचलित आदेशानुसार ज्या खातेदाराच्या जमिनीचा शेतसारा रु. ५/- पेक्षा कमी आहे त्याला शेतसारा माफ आहे. हि सारामाफी जमिनीला नव्हे तर व्यक्तीला ( शेतकऱ्याला ) लागू असल्याने याची नोंद या रकान्यात करू नये.

त्याखालील ( ड ) मध्ये गावातील दुमाला जमिनी म्हणजेच इनाम जमिनीचे क्षेत्र हेक्टर – आर मध्ये लिहावे व त्याच्या समोर सदर जमिनीची आकारणी रु. पै. मध्ये लिहावे. स्वातंत्र्यपूर्व काळात ७ प्रकारची इनामे असली तरी सद्या फक्त खालील इनामे अस्तित्त्वात आहेत.

( १ ) संकीर्ण इनाम – ( इनाम वर्ग – ७ ) : काही ठराविक कामांकरिता महसूल माफीने दिलेल्या जमिनींचा समावेश इनाम वर्ग – ७ मध्ये होतो.

( २ ) देवस्थान इनाम – ( इनाम वर्ग – ३ ): देवस्थान इनाम फक्त पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्त्वात आहे.

( ३ ) सरंजाम इनाम – ( इनाम वर्ग – १ ) : महाराष्ट्रात फक्त सातारा जिल्ह्यात सरंजाम इनाम अस्तित्त्वात आहे.

त्याखाली एकूण ( अ ) ( एक ) या स्तंभात वर्ग १, वर्ग २, सरकारी पट्टेदार, विशेष करारान्वये महसूल माफ केलेल्या किंवा पुनर्वसन संपादन किंवा कमी आकारणी करण्यात येणाऱ्या आणि दुमाला जमिनीच्या एकूण क्षेत्राची बेरीज हेक्टर – आर मध्ये व आकारणीची एकूण बेरीज रु. पै. लिहावी.

त्याखालील दोन ( अ ) मध्ये गावातील लागवडीस उपलब्ध बिन आकारी जमिनीच्या क्षेत्राची नोंद करावी. : या जमिनीची विभागणी दोन प्रकारात होते.

( १ ) आकार बसविण्यात आलेला नाही अशा जमीनी.

( २ ) शेती विषयक संशोधन संस्था अथवा शासनाच्या शेती फार्म ( उदा. कृषी क्षेत्र, भात पैदास केंद्रास इ. ) कडे असलेल्या जमिनी.

त्याखाली एकूण ( अ ) ( दोन ) या स्तंभात गावातील लागवडीस उपलब्ध बिन आकारी जमिनीच्या क्षेत्राची आणि वरील प्रमाणे विशेष वापरासाठी नेमून दिलेली जमिनीच्या एकूण क्षेत्राची बेरीज हेक्टर – आर मध्ये व आकारणीची एकूण बेरीज रु. पै. मध्ये लिहावी. त्यानंतर त्याच्या खाली एकूण अ मध्ये वर केलेल्या अ ( एक ) आणि या ( अ ) ( दोन ) ची बेरीज लिहावी.

त्याखालील ब – मध्ये लागवडीसाठी अनुपलब्ध जमिनीच्या स्तंभात

लागवडीस अयोग्य जमिनीच्या एकूण क्षेत्राची नोंद करावी. यात शेतीस उपयुक्त नसलेल्या जमिनींचा समावेश होतो. यातील ( अ ) मध्ये गावातील एकूण पोटखराब क्षेत्राची तर ( ब ) मध्ये गावातील नदी, नाले, इत्यादी खाली येत असलेल्या क्षेत्राची नोंद करावी.

त्याखाली वरील ( अ ) आणि ( ब ) च्या क्षेत्राची बेरीज एकूण ब ( एक ) या स्तंभात करावी.

यापुढील ( दोन ) या स्तंभात वन, कुरण, निशुल्क गायरान, गुरांचा तळ, गावठाण, तलाव, मसणवट, रेल्वे मार्ग, रस्ते, पाण्याचे पाट, रस्ते व मार्ग, नळमार्ग, कालवे, चर, कटक, क्षेत्रात सैनिकी छावणी, गोळीबार क्षेत्र इत्यादींसाठीच्या जमिनी, शाळा, धर्मशाळा, अशा सार्वजनिक किंवा विशेष वापरासाठी नेमून दिलेल्या जमिनींचे क्षेत्र स्वतंत्रपणे नोंदवावे. दोन उपयोगासाठी एकच जमीन वापरण्यात येत असेल तर त्याची नोंद दोन वेळा करू नये. मुख्य उपयोगासमोर योग्य ती नोंद करून इतर उपयोगासमोर दुय्यम उपयोगाबाबत शेरा लिहावा. उदा. गायरान जमिनीच्याच काही क्षेत्राचा वापर स्मशानभूमी म्हणून होत असेल तर शेरा पुढील प्रमाणे असेल:

( क ) गायरान क्षेत्र – २. २१ हेक्टर – आर; आकार – काही नाही

( ख ) स्मशानभूमी – स्मशानभूमीसाठी उपयोगात येणारी १ हेक्टर जमीन उपरोक्त गायरान क्षेत्रात समाविष्ट आहे.

त्याखाली वरील ( दोन ) च्या एकूण क्षेत्राची बेरीज एकूण ब ( दोन ) या स्तंभात करावी.

( तीन ) या स्तंभात अकृषिक वापरासाठी पट्ट्याने दिलेली किंवा प्रदान केलेली जमीन, तसेच वर्ग सात सह म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका आदींच्या स्थानिक फंडामधून किंवा सरकारी मदतीतून दिलेल्या महसूल माफ जमिनी. उदा. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, दवाखाने, हॉस्पिटल, बिगर फायदा सार्वजनिक कामे करणाऱ्या बिगर सरकारी संस्था, ज्यात धार्मिक धर्मादाय संस्थांचा समावेश होतो यांना प्रदान केलेल्या जमिनीचे क्षेत्र लिहावे.

त्याखाली एकूण ब मध्ये लागवडीसाठी अनुपलब्ध जमीन, सार्वजनिक किंवा विशेष वापरासाठी नेमून दिलेली जमीन आणि अकृषिक वापरासाठी पट्टयाने दिलेली किंवा प्रदान केलेली जमीन, तसेच वर्ग सात म्हणून प्रदान केलेली जमीन यांच्या क्षेत्राची बेरीज लिहावी.

त्याखाली एकूण अ ( एक ) + ( दोन ) + एकूण ब ( एक ) + ( दोन ) + ( तीन ) यांची बेरीज लिहावी. हि बेरीज म्हणजे गावातील एकूण क्षेत्राची बेरीज असेल.

गाव नमुना नंबर – १ च्या गोषवाऱ्यातील एकूण क्षेत्राचा मेळ गाव नमुना नंबर – १ च्या एकूण क्षेत्राशी बसणे आवश्यक आहे. यानंतर हा गोषवारा तपासून तलाठी जमाबंदी लिपिक आणि तहसिलदार यांनी त्यावर स्वाक्षरी करावी.

गाव नमुना नंबर – १ चा गोषवारा तयार करण्यासाठी, गाव नमुना नंबर – १ अद्ययावत असणे महत्वाचे आहे.

गाव नमुना नंबर – १ मधील रकाना क्रमांक ४ आणि ५ यांना विशेष महत्व आहे. कारण या रकान्यातच शेतीकरिता उपलब्ध नसलेल्या जमिनीची नोंद असते.

गाव नमुना नंबर – १ चा गोषवारा दरवर्षी ३१ जुलैला तयार असावा. याची एक प्रत तहसिल कार्यालयात तालुका नंबर १ तयार करणे कामी पाठवावी.

हेही वाचा – तलाठी कार्यालयातील गाव नमुना १ ते २१ नोंदवही विषयीची संपूर्ण माहिती

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.