गाव नमुना ५ (क्षेत्र आणि महसूल यांचा सर्वसाधारण गोषवारा) विषयीची संपूर्ण माहिती – Gav Namuna 5
शेतीखालील आणि बिन शेतीखालील पाच वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी म्हणजेच कायम स्वरूपी निश्चित केलेल्या जमीन महसुलाची आणि क्षेत्राची नोंद गाव नमुना एक, दोन आणि तीनमध्ये केली जाते. पाच वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी निश्चित केलेल्या अस्थायी किंवा संकीर्ण जमीन महसुलाची नोंद गाव नमुना चार मध्ये केली जातात. गाव नमुना एक ते चार मध्ये नमूद स्थायी व अस्थायी महसूल बाबींना ‘ठराव बंद बाबी’ म्हणतात.
गाव नमुना ५ (क्षेत्र आणि महसूल यांचा सर्वसाधारण गोषवारा) – Gav Namuna 5:
गाव नमुना पाच हा गाव नमुना एक ते चार मधील माहितीचा गोषवारा आहे. गाव नमुना एक ते चार मध्ये नमूद स्थायी व अस्थायी महसूल बाबींना ‘ठराव बंद बाबी’ म्हणत असल्यामुळे गाव नमुना पाचला ‘ठराव बंद’ असेही म्हणतात. या गाव नमुना पाचचा उपयोग प्रामुख्याने जमिनीच्या विविध उपयोगावरील क्षेत्र आणि त्यांच्यावरील जमीन महसूल यांचे ऑडिट करण्यासाठी केला जातो. त्यामुळे याला ‘जमाबंदी पत्रक’ असेही म्हणतात. गाव नमुना पाचचा मागणी किंवा वसुलाशी प्रत्यक्ष संबंध नाही.
दरवर्षी महसुली वर्ष १ ऑगस्टला सुरु होऊन ३१ जुलैला संपते. त्यामुळे गाव नमुना पाच दरवर्षी ३१ जुलैला तयार करावा. महसुली वर्षात झालेल्या सर्व वाढ किंवा घट गाव नमुना पाच मध्ये दर्शवली आणि या गाव नमुना पाच वर तालुका आणि जिल्हा पातळीवरील नोंदवह्या अवलंबून असतात. त्यामुळे गाव नमुना पाच हा ३१ जुलै पूर्वी तयार करता येत नाही.
गाव नमुना पाच हा प्रामुख्याने गाव नमुना नंबर १ च्या गोषवाऱ्यातील नोंदीवर आधारित असल्याने गाव नमुना नंबर १ चा गोषवारा अचूक तयार करावा. गाव नमुना एक ते पाच मध्ये व्यक्तिगत खातेदाराला दिलेल्या सवलतींची नोंद यात घेण्यात येत नाही. फक्त जमिनीला दिलेल्या सवलतींची नोंदच यात घेण्यात येते.
गाव नमुना पाच तयार करण्याची पद्धत :
गाव नमुना पाचमध्ये चालू आणि मागील वर्षाची माहिती नमूद करावयाची असते. चालू वर्ष म्हणजे ३१ जुलैला संपणारे वर्ष आणि मागील वर्ष म्हणजे त्यापूर्वीच्या ३१ जुलै रोजी संपलेले वर्ष.
गाव नमुना पाच मध्ये चालू आणि मागील वर्षासाठी शेती, बिनशेती, सार्वजनिक कामे आणि शेतीस अयोग्य असलेल्या जमिनीचे क्षेत्र आणि त्यावरील जमीन महसूल तसेच मागील दोन वर्षात क्षेत्रात किंवा महसुलात झालेली वाढ किंवा घट याची नोंद करावयाची असते. तसेच झालेल्या वाढीची किंवा घटीची कारणे स्तंभ ११ मध्ये नमूद करावयाची असतात.
वाढ किंवा घट याची कारणे पुढीलप्रमाणे असतात.
अ. शेत जमिनीचे बिनशेतीमध्ये रूपांतरण .
ब. शेती योग्य पडीत शासकीय जमिनीचे भूमिहीन लोकांना वाटप.
क.शेती योग्य बिन आकारी जमिनीवर आकार लावणे.
ड. शेती योग्य बिन आकारी किंवा आकारी जमीन सार्वजनिक कामासाठी प्रदान करणे.
इ. शर्तभंगामुळे प्रदान केलेल्या बिन आकारी जमीन परत घेणे किंवा त्यावर आकार लावणे.
वरील सर्व बदल जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख यांनी तयार केलेल्या ‘कमी – जास्त पत्रकाने’ महसूल दफ्तरी नोंदवले जातात. उपरोक्त बदलानंतरही गावाचे भौगोलिक क्षेत्र कायम राहते. त्यामुळे स्तंभ ७ मध्ये दर्शविण्यात आलेली क्षेत्राची घट आणि स्तंभ ९ मधील वाढी इतकीच असायला हवी. परंतु महसूल बाबतची वाढ किंवा घट भिन्न असू शकेल. त्यामुळे स्तंभ ८ मध्ये दर्शविण्यात आलेली आकारणीची घट आणि स्तंभ १० मध्ये दर्शविण्यात आलेली आकारणीची वाढ यांचा मेळ बसणार नाही.
प्रत्यक्षात शेतीसाठी उपयोगात येणाऱ्या जमिनीचे क्षेत्र आणि त्यावरील आकार कसा काढावा:
प्रथम गाव नमुना एक मधील एकूण बेरजेच्या आधारे गाव नमुना पाचच्या अनुक्रमांक १ मध्ये माहिती भरावी आणि त्यातून खालील आठ प्रकारच्या जमिनीचे क्षेत्र आणि आकाराची माहिती एकूण क्षेत्रफळ आणि आकारातून वजा करावी.
क . बिन आकारी शेती योग्य जमिनीचे क्षेत्र
ख. शेतीसाठी अयोग्य जमिनीचे क्षेत्र
ग. आकारी पड जमिनीचे क्षेत्र व त्यावरील आकार
घ. सार्वजनिक कामासाठी राखीव जमिनीचे क्षेत्र
च. वन जमिनीचे क्षेत्र
छ. बिनशेतीकडे वर्ग झालेल्या जमिनीचे क्षेत्र व त्यावरील आकार
ज. इनाम जमिनीचे क्षेत्र व त्यावरील आकार
झ. सारा माफी किंवा विशेष सवलतींवर दिलेल्या जमिनीचे क्षेत्र व त्यावरील आकार
उरलेली शिल्लक हि प्रत्यक्षात शेतीसाठी उपयोगात येणाऱ्या जमिनीचे क्षेत्र आणि त्यावरील आकार दर्शवते.
गाव नमुना पाच – अनुक्रमांक २ – यात आकारणीपेक्षा जास्त असलेली जुडी ( असल्यास ) ती यात अधिक ( + ) मिळवावी.
गाव नमुना पाच – अनुक्रमांक ३ – यात उपरोक्त आठ प्रकारच्या ( क ते झ ) जमिनींखालील क्षेत्र त्यावरील आकाराची नोंद करावी.
गाव नमुना पाच – अनुक्रमांक ४ – यात प्रत्यक्षात शेतीसाठी उपयोगात येणाऱ्या शिल्लक जमिनीचे क्षेत्र आणि त्यावरील आकाराची नोंद करावी.
गाव नमुना पाच – अनुक्रमांक ५ – यात इनाम जमिनीच्या क्षेत्राची व त्यावरील आकाराची नोंद करावी.
गाव नमुना पाच – अनुक्रमांक ६ – यात वरील अनुक्रमांक ४ व ५ ची बेरीज दर्शवावी.
गाव नमुना पाच – अनुक्रमांक ७ – यात बिनशेतीकडे वर्ग झालेल्या जमिनीच्या क्षेत्राची व त्यावरील आकाराची नोंद करावी.
गाव नमुना पाच – अनुक्रमांक ८ – यात कायम स्वरूपी महसूल मिळणाऱ्या जमिनीचे एकूण क्षेत्र व त्यावरील आकाराची नोंद करावी.
गाव नमुना पाच – अनुक्रमांक ९ – यात संकीर्ण जमीन महसुलास पात्र जमिनीचे एकूण क्षेत्र व त्यावरील आकाराची नोंद करावी.
गाव नमुना पाच – अनुक्रमांक १० – यात स्थायी आणि संकीर्ण जमीन महसुलास पात्र जमिनीचे एकूण क्षेत्र व त्यावरील आकाराची नोंद करावी.
गाव नमुना पाच – अनुक्रमांक ११- यात स्थायी आणि संकीर्ण जमीन महसुलावरील स्थानिक उपकरांची नोंद करावी.
गाव नमुना पाच – अनुक्रमांक १२- यात सर्व प्रकारच्या जमीन महसूल आणि त्यावरील स्थानिक उपकरांची बेरीज दर्शवावी.
गाव नमुना पाचच्या उपरोक्त अनुक्रमांकातील सर्व रकान्यांत नोंदी घेतांना त्यांचा गाव नमुना नंबर एक ते चार मधील संबंधित नोंदीशी मेळ असेल याची काळजी घ्यावी. या ठरावबंदाची अचूकता गाव नमुना आठ-ब शी पडताळून पाहावी. जर एखाद्यावर्षी गावाच्या क्षेत्र आणि आकारात कोणत्याही प्रकारची वाढ किंवा घट नसेल त्यावर्षी ” ….. यावर्षात कोणताही बदल नाही” असा शेरा लिहावा.
परस्पर संबंध : गाव नमुना पाच हा गाव नमुना एकच्या गोषवाऱ्यातील नोंदीवर आधारित आहे तसेच गाव नमुना एकचा गोषवारा, गाव नमुना एक ते तीन मधील नोंदीवर आधारित आहे. अशा प्रकारे नमुना एक ते चार, गाव नमुना एकचा गोषवारा आणि गाव नमुना पाच यांचा परस्पर संबंध आहे.
पुढील कार्यवाही : प्रत्येक तलाठयाने दरवर्षी ३१ जुलै रोजी त्याच्या सज्यामधील प्रत्येक गावासाठीचा गाव नमुना पाच तयार करून तो गाव नमुना एकच्या गोषवाऱ्यासह तालुका कार्यालयात सादर करावा.
तालुका जमाबंदी लिपिकाने गाव नमुना पाचमध्ये नमूद केलेली वाढ किंवा घट, तालुक्यामध्ये उपलब्ध माहितीशी जुळते कि नाही हे तपासावे. कारण वाढ किंवा घट संबंधित आदेश तालुका कार्यालयातील जमाबंदी शाखेमार्फतच तलाठ्यांना पाठविले जातात.
तलाठीकडून जमाबंदी शाखेकडील एखाद्या आदेशाची नोंद घेण्याचे राहिले असल्यास ही बाब जमाबंदी लिपिकाच्या लक्षात यायला हवी. तलाठीकडून जमाबंदी शाखेकडील एखाद्या आदेशाची नोंद घेण्याचे राहिले असल्यास, गाव नमुना पाचमध्ये योग्य ती दुरुस्ती करून घ्यावी.
जमाबंदी किंवा ठराव बंद पत्रक तयार झाल्यानंतर तहसिलदाराने स्वाक्षरी करून ते तलाठी यांना परत करावे.
हेही वाचा – तलाठी कार्यालयातील – गाव नमुना १ ते २१ नोंदवही विषयीची संपूर्ण माहिती
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!