इच्छापत्र विषयी सविस्तर माहिती
आपण या जगातून निघून गेल्यावर आपल्यामागे काम होते याची कोणालाच माहिती नसते. आपल्या मृत्यूनंतर मागे राहणाऱ्या कुटुंबीयांसाठी ही घटना अतिशय दुःखद असते आणि अशा वेळेस सरकारी कागदपत्रे आणि दस्तावेज बनविण्यासाठी धावपळ करावी लागते. भारतीय कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला आपल्या पश्चात आपल्या मालमत्तेचे संपत्तीचे काय करायचे याबाबत काही सूचना देण्याचा पर्याय उपलब्ध आहे. हा पर्याय अर्थात ‘इच्छापत्र’ म्हणजेच मृत्युपत्र, इच्छापत्र तयार केल्यामुळे त्या पश्चात कायद्यानुसार ज्या काही गोष्टी कुटुंबीयांना कराव्या लागतात. त्या थोड्याफार प्रमाणात सोप्या होतात.
आपल्यानंतर कुटुंबीयांनी आपल्या मालमत्तेसाठी कोर्ट – कचेरी न करता, व्यवस्थित वाटणी करून घ्यावी. असे आपल्याला वाटत असते किंवा एखाद्याला अगदी असेही वाटू शकते, की इच्छापत्र बनविण्याएवढी मालमत्ताच माझ्याकडे नाही. तर कोणाला असेही वाटू शकते, की इच्छापत्र बनविल्यामुळे नंतर माझ्या कुटुंबाला कोर्टाची पायरी चढावी लागेल आणि अशा प्रकारच्या कोणत्याही अडचणीत मला त्यांना टाकायचे नाही. पण ह्या सर्व गैरसमजुती आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी त्या मालमत्तेची योग्य प्रकारे वाटणी केली पाहिजे असे तुम्ही आपल्या इच्छापत्रात लिहिले असल्यास प्रत्यक्षात करताना ते सोपे जाते. इच्छापत्र नसल्यास त्या व्यक्तीच्या मृत्यूपश्चात कोणतीही व्यक्ती तुमच्या मालमत्तेवर खोटा दावा करू शकते. त्यामुळे इच्छापत्र बनविणे आत्यंतिक गरजेचे आहे. आपण गेल्यानंतर जमविलेल्या मालमत्तेच्या संदर्भात आपल्या ज्या काही इच्छा आहेत, त्या पूर्ण करण्याचा एकच मार्ग म्हणजे हा दस्तावेज व्यवस्थित तयार करणे.
मृत्युपत्र म्हणजे काय?
मृत्युपत्र म्हणजे आपल्या मृत्यूनंतर आपल्या मिळकतीचे वाटप कसे व्हावे यासंबंधी मृत व्यक्तीने व्यक्त केलेली इच्छा होय.
कायद्याप्रमाणे मृत्युपत्राची व्याख्या:
“मृत्युपत्र म्हणजे ते करणाऱ्या या व्यक्तीने आपल्या मिळकतीची व्यवस्था आपल्या मृत्यूनंतर कशी व्हावी यासंबंधी इच्छाची कायदेशीरपणे केलेली उद्घोषणा होय.
इच्छापत्र कोण बनवू शकतो:
इच्छापत्र म्हणजे एक असा कायदेशीर दस्तावेज, ज्याद्वारे इच्छापत्रकर्ता आपल्या संपत्तीची वाटणी आपल्या मृत्यूनंतर कशी व्हावी, ते मुक्तपणे आणि स्वेच्छेने ठरवू शकतो. १८ वर्षांवरील कोणतीही व्यक्ती इच्छापत्र बनवू शकते आणि यासाठी लागणारी अट म्हणजे त्या व्यक्तीचे मानसिक संतुलन नीट असले पाहिजे. इच्छापत्र हे साध्या कागदावरही लिहिले जाऊ शकते किंवा तोंडीसुद्धा असू शकते, पण त्याची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी काही काळजी घ्यावी लागते.
इच्छापत्र बनविण्यासाठी पुढील गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते:
१. इच्छापत्र बनविणाऱ्या व्यक्तीच्या नावे असणाऱ्या स्थायी व जंगम (पैसे, दागिने, बँकेचे खाते, शेअर्स, डिबेंचर) तसेच, मूर्त व अमूर्त (घर, जमीन कॉपीराइट, डिजिटल) मालमत्तेची यादी.
२. दोन साक्षीदार, जे तुम्ही सही केलेले इच्छापत्र खरे असल्याची साक्ष किंवा पुरावा देऊ शकतील. ह्या दोन्ही व्यक्ती इच्छापत्र बनविताना कमीत कमी १८ वर्षांच्या असायला हव्यात (Adult).
३. इच्छापत्राचा व्यवस्थापक (Executor) इच्छापत्र अमलात आणण्याची जबाबदारी या व्यक्तीवर असल्याने ही व्यक्ती तुमची व तुमच्या कुटुंबीयांच्या विश्वासातील आणि विश्वासार्ह हवी.
४. लाभार्थी (Beneficiary) तुमची सगळी मालमत्ता कोणाकोणाला कशी आणि किती मिळणार त्या व्यक्तीचे/व्यक्तींची नावे.
इच्छापत्र कसे असावे?
१. इच्छापत्र हे साध्या व सोप्या भाषेत असावे.
२. इच्छापत्राचा व्यवस्थापक म्हणून अतिशय विश्वासातील व्यक्तीच निवडावी. ही व्यक्ती शक्यतो तरुण असावी (जेणेकरून इच्छापत्रकर्त्याच्या पश्चात हा व्यवस्थापक इच्छापत्राची अंमलबजावणी करण्यासाठी जीवित असू शकेल.) तुम्ही दोन संयुक्त व्यवस्थापकही नेमू शकता, जे एकत्र येऊन तुमचे इच्छापत्र कायदेशीररीत्या अमलात आणू शकतील.
३. तुमच्याकडील संपत्तीचे सर्व तपशील स्पष्ट नमूद करा. ही संपत्ती कोणाकडे गेली पाहिजे ते साध्यासरळ व सोप्या भाषेत लिहा. तुमच्या इच्छापत्रात काय लिहिले आहे हे पूर्णतः गोपनीय असते. साक्षीदार, Executor (इच्छापत्राचा व्यवस्थापक) किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला त्यात काय लिहिले आहे हे सांगण्याची गरज नाही.
इच्छापत्रात काय काय नमूद असावे?
१. इच्छापत्रात तुमची सगळी मालमत्ता व गुंतवणूक कोणत्या ठिकाणी केली आहे, याची सोप्या भाषेत समजेल अशी यादी असावी. जेणेकरून आपल्या कुटुंबाला आपल्यानंतर या सगळ्या गोष्टी शोधायला त्रास होणार नाही. यामध्ये कोणत्या सदस्याला काय मिळायला हवे हे देखील स्पष्टपणे नमूद करा, त्यामुळे गैरसमज व भांडण टाळता येईल.
२. इच्छापत्र बनविणाऱ्या व्यक्तीने मी शारीरिक व मानसिकदृष्ट्या उत्तम आहे, असे नमूद करायला हवे. याचा पुरावा म्हणून शक्य असल्यास डॉक्टरांकडून आपले वैद्यकीय प्रमाणपत्र जोडावे.
३. तुमच्या इच्छापत्रात absolute beneficiary (अंतिम लाभार्थी) सुद्धा असायला हवा. कारण दुर्दैवाने तुमच्या इच्छापत्रातील सगळे लाभार्थी तुमच्या मृत्यूच्या वेळेस मृत असल्यास तुमची मालमत्ता सरकारकडे जमा होऊ शकते. हे होऊ नये यासाठी तुमच्या इच्छापत्रात एका तरी absolute beneficiary (अंतिम लाभार्थी) चा समावेश करा.
४. इच्छापत्रात उर्वरित व अविशिष्ट कलम (Rest & Residue Clause) देखील असायला हवे. अर्थात तुमच्या इच्छापत्रात चुकून काही मालमत्तेचा समावेश करायचा राहिला असेल किंवा तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नावे काही मालमत्ता आली तर त्याचे काय करावे, कुटुंबातील कोणत्या सदस्याला ती किती व कशी मिळायला हवी किंवा ती मालमत्ता संपूर्ण कुटुंबाला मिळायला हवी का, याबद्दलच्या सूचना त्यात असाव्यात.
५. इच्छापत्र लिहिण्यासाठी किंवा टायपिंगसाठी जर कोणी तुमची मदत केली असेल, तर त्या व्यक्तीचे नाव नमूद करायला विसरू नका. इच्छापत्र कोणत्या ठिकाणी बनवले, दस्तावेजामध्ये किती पाने आहेत व तुमच्यासोबत असणारे दोन साक्षीदार यांचीसुद्धा त्यात नोंद करा.
६. आपण जिवंत असतानाच आपल्या मृत्यूनंतर आपल्यासाठी बोलणारे इच्छापत्र बनवून ठेवायचे हे कदाचित वेगळ वाटू शकेल. पण तुमच्यानंतर तुमच्या कुटुंबाला तुमच्या संपत्तीच्या बाबतीत कोणतीही कायदेशीर अडचण येऊ नये, यासाठी हा विचार करणे महत्त्वाचे आहे.
इच्छापत्र बनविताना व सही करताना तुमच्या इच्छेचा मान राखला जाणे आवश्यक आहे.
७. इच्छापत्र बनविताना तुमची मुले, पती/पत्नी यांना तुमच्या संपत्तीचा पूर्ण वाटा मिळणार असेल तर व्यवस्थापक म्हणून शक्यतो त्यांचीच निवड करू नका.
८. ज्या व्यक्तीचा तुमच्या इच्छापत्राला विरोध असेल ती व्यक्ती तुमच्या संपत्तीसाठी अपात्र ठरेल (जर त्या व्यक्तीला संपत्तीचा वाटा मिळणार असेल), असा मुद्दाही तुम्हाला नमूद करता येऊ शकतो. पण यासाठी वकिलाचा सल्ला जरूर घ्या.
९. तुम्ही निवडलेले साक्षीदार हे मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम व विश्वासू असावेत. तुमच्या इच्छापत्राला जर कोणी विरोध केला तर ह्या व्यक्तींना न्यायालयासमोर त्याबाबत साक्ष द्यावी लागू शकते. अशी साक्ष ते देऊ शकतील, याची तुम्हाला खात्री हवी. जे तुमच्या इच्छापत्रासाठी लाभार्थी आहेत, त्यांना साक्षीदार म्हणून अजिबात निवडू नका कारण त्याची साक्ष अवैध मानली जाते.
१०. तुम्ही बनविलेल्या इच्छापत्राची नोंदणी (Register) जवळच्या नोंदणी कार्यालयात (Registrar Office) करू शकता. असे करणे कायद्याने बंधनकारक नसले, तरी तुम्ही स्वतः तुमचे इच्छापत्र तयार केले आहे ह्याचा तो एक उत्तम पुरावा ठरू शकतो. यानंतर जर नवीन इच्छापत्र केले किंवा इच्छापत्राची पुरवणी केली असेल तर त्याचीसुद्धा नोंद करावी. जेणेकरून पुढचा गोंधळ टळू शकेल.
११. इच्छापत्राच्या काही प्रती बनवून त्या नोटरीकडे नोंदवून घ्याव्यात. मूळ प्रत गहाळ झाली किंवा त्यास इजा झाली तर ‘नोटराइज्ड’ प्रत उपयोगी पडते. किती प्रती बनविल्या व कुठे ठेवल्या आहेत, याची नोंद हाताशी ठेवा म्हणजे तुमच्या पश्चात तुमच्या वारसदारांना हे इच्छापत्र किंवा त्याच्या प्रती सहज उपलब्ध होऊ शकतील.
१२. तुमचे इच्छापत्र हे तुमच्या मृत्यूपर्यंत अमलात येत नाही. त्यामुळे तुम्ही तुमचे इच्छापत्र कधीही बदलू शकता. शक्य असेल तर आपल्या आयुष्यातल्या महत्वाच्या टप्प्यावर (वाढदिवस, विवाह, मुले/नातवंडांचा जन्म कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू) हे इच्छापत्र अद्ययावत (Update) करत राहा. त्याचबरोबर नवीन खरेदी केलेली मालमत्ता किंवा गुंतवणूक हेसुद्धा त्यात नमूद करायला हवे. ह्यासाठी नवीन इच्छापत्र करणे गरजेचे नाही. तुमच्या असलेल्या इच्छापत्राची एक पुरवणी तुम्ही बनवू शकता- इच्छापत्र बनवले तसेच यासाठी देखील दोन साक्षीदार, लिपिक वगैरे लागतील.
इच्छापत्र कोणकोणत्या कारणासाठी बदलू शकतो?
१) संपत्तीमध्ये वाढ किंवा घट झाली तर आपण इच्छापत्र बदलू शकतो.
२) जर इच्छापत्रामध्ये नमूद असलेल्या लाभार्थीचा मृत्यू झाला तर
३) व्यवस्थापकाचा मृत्यू झाला.तर
४) साक्षीदाराचा मृत्यू झाला तर
५) इच्छापत्रकाराच्या इच्छेत बदल झाला तर
इच्छापत्रामुळे घरातील वादविवाद टाळता येतो.
खरे तर आपण जिवंत असताना स्वतःच्या मृत्यूबद्दल विचार करायचा व त्यासाठी असा दस्तावेज तयार करायचा, जो आपण नसताना आपल्या वतीने बोलू शकेल हे त्रासदायक वाटू शकेल. पण मेहनतीने कमावलेली आपली संपत्ती आपल्या इच्छेप्रमाणे भांडणतंटा न करता वाटली जावी, यासाठी इच्छापत्र बनविणे गरजेचे आहे. यामुळे तुमच्या कुटुंबाला किंवा वारसदारांना तुमच्या पश्चात (सरकारी) व्यवहार सहजपणे करता येतील. तसेच अशा वेळी न्यायालयाची पायरी चढावी लागली, तरी ती सकारात्मक व कमीत कमी त्रासदायक होऊ शकते.
जिवंत इच्छापत्र (Living Will) म्हणजे काय?
जिवंत इच्छापत्र हा एक नव्याने आलेला प्रकार असून जो व्यक्तीला आपला मृत्यू आत्मसन्मानाने निवडण्याची संधी देतो. ज्या वेळी एखादी व्यक्ती जिवंतपणीही (आजारपणात वगैरे) आपल्या इच्छा व्यक्त करू शकत नाही. त्यावेळी याचा उपयोग होतो. वैद्यकीय उपचार सुरू असताना कुटुंबावर येणारे भावनिक ओझे व मानसिक ताण कमी करण्यासाठी असे इच्छापत्र अत्यंत उपयुक्त ठरते.
वैद्यकीय उपचार कधी व कोणत्या परिस्थितीत थांबवावे, याचे मार्गदर्शन त्या व्यक्तीने स्वेच्छेने व कायदेशीररीत्या या पत्रात नमूद केलेले असते. २०१८ पासून भारतामध्ये “जिवंत इच्छापत्रा’ला मान्यता मिळाली आहे. १८ वर्षे व अधिक वयाची आणि मानसिकरीत्या सक्षम असलेली कोणतीही व्यक्ती असे इच्छापत्र बनवू शकते. हा दस्तावेज स्वेच्छेने बनविलेला असावा. त्यामध्ये कोणत्या प्रसंगात वैद्यकीय उपचार थांबवावेत किंवा वैद्यकीय उपचार देऊ नयेत (जिथे उपचारांनी मृत्यू हा फक्त पुढे ढकलला जातो) याचा उल्लेख केलेला असतो.
या पत्राद्वारे अशा प्रसंगात तुमच्या एखाद्या नातेवाइकाला किंवा मार्गदर्शकाला तुम्ही प्रमुख निर्णायक नेमू शकता. थोडक्यात, तुम्ही लिहिल्याप्रमाणे वैद्यकीय उपचार करायचे, की थांबवायचे याचा निर्णय हा नातेवाईक किंवा मार्गदर्शक तुमच्या इच्छापत्रानुसार घेऊ शकतो. या जिवंत इच्छापत्रावर दोन साक्षीदारांच्या उपस्थितीत सही झाली पाहिजे आणि त्यावर प्रथम श्रेणीचे न्यायिक न्यायाधीश (Judicial Magistrate of First Class – JMFC) यांची स्वाक्षरी आवश्यक असते. हे न्यायाधीश (JMFC) आपल्या कुटुंबाला अशा प्रकारचे जिवंत इच्छापत्र आहे हे कळवतात व त्याची एक प्रत आपल्या कौटुंबिक चिकित्सकाकडे (फॅमिली डॉक्टर) देतात.
इच्छापत्र बनविणारी व्यक्ती गंभीररीत्या आजारी असेल किंवा दीर्घ काळापासून आजारी असेल (बरे होण्याची आशा नसेल) तर अशा वेळी हे इच्छापत्र उपयोगात येते. त्या व्यक्तीला उपचार देणारे डॉक्टर या इच्छापत्राप्रमाणे वैद्यकीय उपचार करतात. हे इच्छापत्र तुम्ही कोणत्याही वेळी मागे घेऊ शकता किंवा त्यात फेरबदल करू शकता. फेरबदल करताना त्या व्यक्तीची मानसिक व शारीरिक स्थिती स्थिर असली पाहिजे. जिवंत इच्छापत्र बदलताना अथवा मागे घेतानाही साक्षीदार आणि JMFC यांची सही लागते.
हेही वाचा – कुलमुखत्यारपत्र म्हणजे काय? कुलमुखत्यार पत्राची कायदेशीर नोंदणी करणे का आवश्यक आहे?
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!