सरकारी योजनावृत्त विशेष

प्रधानमंत्री मुद्रा योजना – Pradhan Mantri MUDRA Yojana (PMMY)

देशातील लघु उद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा, या उद्देशाने केंद्र सरकारने ८ एप्रिल २०१५ रोजी २०,००० करोड रुपये भांडवल असलेली ‘मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी’ अर्थात मुद्रा बँकेचे उद्घाटन केले.

या बँकेतून लघु उद्योजकांना 10 लाखांपर्यंतचे कर्ज सहज उपलब्ध होणार आहे. यासाठी सरकारने एकूण 20 हजार कोटींची तरतूद केली आहे. या बँकेच्या माध्यमातून लघु उद्योगांना कर्ज देण्यासाठी देशातील इतर बँकांना प्रोत्साहनही देण्यात येईल. शिवाय या कर्ज योजनांच्या नियमनाचं कामही मुद्रा बँकेच्या हाती असेल.

प्रधानमंत्री मुद्रा योजना – Pradhan Mantri MUDRA Yojana (PMMY):

मुद्रा बँकेद्वारे छोट्या कारखानदारांना आणि दुकानदारांना कर्ज मिळेल. ज्यांना नवा उद्योग, काम सुरु करायचे असेल, त्यांनाही कर्ज मिळेल. त्याच बरोबर भाजीवाले, सलून, फेरीवाले, चहाचे दुकानदार यांनाही लोन दिले जाईल.

पंतप्रधान मुद्रा योजनेत प्रत्येक सेक्टर नुसार स्कीम बनवली जाते. प्रत्येक सेक्टर मध्ये वेगवेगळ्या स्कीम असतील. मुद्रा बँक हि रिझव्‍‌र्ह बँकेच्या नियंत्रणाखाली ती काम करते. मुद्रा ही संस्था मुख्यत: लघु उद्योगांनाच अर्थ पुरवठा करते. व्याजाचा दर कमी आहे.. कर्ज मंजूर झाले की त्यानंतर कर्जदाराला “मुद्रा कार्ड” दिले जाते जे की क्रेडीट कार्ड सारखे असेल आणि जेवढे कर्ज मंजूर झाले आहे तसे वापरता येईल.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेची वैशिष्टय़े:

 • देशातील ५.७७ कोटी उद्योजकांना वित्तसाहाय्य.
 • वार्षिक ७ टक्के दराने १० लाख रुपयांपर्यंत अर्थपुरवठा.
 • २०,००० कोटींचे भक्कम सरकारचे भांडवली पाठबळ.
 • सिडबीची ही उपकंपनी रिझव्‍‌र्ह बँकेच्या अखत्यारीत येणार.
 • सूक्ष्म वित्त संस्थेव्यतिरिक्त बँकेकरिता स्वतंत्र विधेयक.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेतील कर्जाचे प्रकार:

मुद्रा योजनेत खालील तीन श्रेणीचा समावेश आहे.

 • शिशू : शिशू श्रेणीअंतर्गत 50,000 रुपयांचं कर्ज मिळू शकतं.
 • किशोर : किशोर श्रेणीत 50,000 रुपयांपासून 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जाते.
 • तरुण श्रेणी : तरुण श्रेणीअंतर्गंत 5 लाख रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळेल.

मुद्रा लोन साठी आवश्यक बाबी:

 • कोणत्याही प्रकारचा जामीनाची आवश्यकता नाही.
 • कोणत्याही प्रकारचे गहाण ठेवावे लागणार नाही.
 • स्वतःचे 10 टक्के भाग भांडवलाची गरज नाही.
 • हि योजना फक्त सरकारी बँकेतच होणार.
 • वय 18 वर्षे पूर्ण असले पाहिजे.
 • अर्जदार कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.

मुद्रा बँकेतून कर्ज घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे:

 • ओळखीचा पुरावा – मतदान ओळख पत्र, आधार कार्ड इ.
 • रहिवासी पुरावा उदा. – लाईट बिल, घर पावती.
 • आपण जो व्यवसाय करणार आहोत किंवा करत आहोत त्याचा परवाना व स्थायी पत्ता.
 • व्यवसायासाठी लागणारे मटेरियल किंवा यंत्र सामुग्री इ. त्याचे कोटेशन व बिले.
 • आपण ज्या व्यापाऱ्याकडून माल घेतला त्याचे पुर्ण नाव व पत्ता.
 • अर्जदाराचे 2 फोटो.

मुद्रा कार्ड (MUDRA Card):

रोख पत (Cash Credit) स्वरुपात उद्योगासाठी खेळत्या भांडवलाची सुविधा पुरविणारे मुद्रा कार्ड हे एक नाविन्यपूर्ण उत्पादन आहे. मुद्रा कर्जांतर्गत खेळत्या भांडवलासाठी दिलेले डेबिट कार्ड आहे. कर्जदारास मुद्रा कार्डचा वापर हा गरजेनुरुप एकापेक्षा अधिक वेळा कर्ज रक्कम काढण्यासाठी करता येते. कोणत्याही एटीएम/मायक्रो एटीएममधून पैसे काढण्यासाठी मुद्रा कार्ड देशभरात चालवता येते आणि कोणत्याही ‘पॉईंट ऑफ सेल’ मशीनद्वारे पेमेंट देखील करता येते. जेणेकरुन कर्ज रकमेचा उपयोग कार्यक्षम पध्दतीने व्यवस्थापित करुन व्याजाचा बोजा नियंत्रित करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. मुद्रा कार्ड वापरामुळे मुद्रा कर्ज व्यवहाराचे डिजिटलायझेशन होण्यास व कर्ज पूर्वइतिहास जाणून घेण्यासाठी उपयुक्त आहे.

MUDRA Card
MUDRA Card

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस:

आपल्या महाराष्ट्र राज्याअंतर्गत अर्ज करण्यासाठी https://mahamudra.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे पोर्टल ओपन झाल्यनंतर मुख्य मेनू मध्ये ‘अर्जाचे स्वरूप‘ या पर्यायावर क्लिक करा. अर्जाचे स्वरूप’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर अर्ज ओपन होईल, त्यामध्ये खालील प्रमाणे आवश्यक तपशील भरा.

 • कर्जाचा तपशील
 • बँकेचा तपशील
 • अर्जदाराचा तपशील
 • केवायसी दस्तऐवज
 • व्यवसायाचा तपशील
 • कर्जाचा तपशील

वरील आवश्यक तपशील भरल्या नंतर ‘Captcha‘ कोड टाकून अर्ज दाखल केल्यावर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल तो  टाकून “जतन करा” वर क्लिक करा. अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची हार्डकॉपी प्रिंट घेऊन जवळच्या बँकेमध्ये आवश्यक कागदपत्रांसह भेट द्या.

टोल फ्री नंबर: 

 • मुद्रा योनजेचा, महाराष्ट्र राज्य टोल फ्री नंबर – १८००-१०२-२६३६.
 • मुद्रा योनजेचा राष्ट्रीय टोल फ्री नंबर – १८००-१८०-११११ व १८००-११-०००१.

प्रधानमंत्री मुद्रा योजने बाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न:

१. मुद्रा म्हणजे काय?

मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी लि. (मुद्रा ), भारत सरकार द्वारा स्थापित एक वित्तीय संस्था आहे जी सूक्ष्म उद्योगांना वित्त पुरवठा करणेसाठी कार्य करणाऱ्या वित्तीय संस्थांना पुनर्वित्त उपलब्ध करून देते. मा. वित्तमंत्र्यांनी 20१६ च्या केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना या योजनेची घोषणा केली. मुद्राचा उद्देश बॅंका, Non Banking Finance companies (NBFC) आणि Micro Finance Institution (MFI) सारख्या विविध संस्थाद्वारे नॉन-कॉपोर्रेट लघु उद्योग क्षेत्राला निधी पुरवणे आहे.

२. मुद्राची स्थापना का केली आहे?

नॉन कार्पोरेट लघू क्षेत्रातील व्यवसायासाठी पुरेसा वित्त पुरवठा उपलब्ध नसणे, ही एक मोठी अडचण आहे. 90% पेक्षाही अधिक उद्योग क्षेत्रातील व्यवसायांसाठी पुरेसा वित्त पुरवठा उपलब्ध नसल्याचे दिसून येते. नॉन कार्पोरेट क्षेत्रासाठी पुरेसा वित्तीय पुरवठा उपलब्ध करुन या क्षेत्राला मुख्य प्रवाहात आणण्याच्या उदात्त हेतूने केंद्र शासनाने “मुद्रा” ची स्थापना केली आहे. यासाठी केंद्र शासनाने प्रलंबित मुद्रा बँक कायदा मंजूर करुन Small Industries Development Bank of India (SIDBI) च्या अंतर्गत नॉन बँकींग वित्तीय कंपनी “मुद्रा लिमिटेड” ची स्थापना करण्यात आली आहे.

3. मुद्राची भूमिका व जबाबदाऱ्या काय आहेत?

सुक्ष्म/लघु क्षेत्रातील उत्पादन करणाऱ्या, व्यापार करणाऱ्या व सेवा क्षेत्रातील व्यवसायासाठी वित्त पुरवठा करीत असलेल्या सर्व नॉन बँकींग, वित्तीय संस्था, सेक्शन & अंतर्गत नोंदणीकृत व्यापारी संस्था, अनुसूचित ग्रामीण बँका यांना पुनर्वित्त देण्यासाठी बांधील आहे. याच बरोबर राज्यस्तरीय‍/विभागीय स्तरावरील वित्तीय संस्थांकडून लघू उद्योगांना वित्त पुरवठा होणेसाठी भागीदारी करेल.

४.मुद्रा अंतर्गत उपलब्ध योजना कोणत्या आहेत? मुद्रा कसे कार्य करते?

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत शिशू, किशोर व तरुण या तीन गट प्रकारामध्ये कर्ज सुविधा उपलब्ध आहे. लघू उद्योगाची कर्जाची निकड व‍ टप्याटप्याने उद्योगाच्या वाढीनुरुप व गरजेनुरुप आवश्यक कर्जपुरवठा बँकांकडून उपलब्ध करण्याच्या दृष्टीने वरीलप्रमाणे कर्जाचे 3 गटप्रकार केले आहे. अ) शिशू गटांतर्गत रु.50,000/- च्या मर्यादेत, ब) किशोर गटांतर्गत रु.50,000/- च्या पुढील व रु.5 लाखाच्या खालील कर्ज, क) तरुण गटांतर्गत रु.5 लाखावरील परंतु रु.10 लाखाच्या मर्यादेत कर्जाची सुविधा विविध बँका व वित्तीय संस्थांकडून उपलब्ध केली आहे.

५. मुद्रा अंतर्गत लाभार्थी कोण? मुद्रा अंतर्गत कोणत्या प्रकारचे लाभार्थी सहाय्यासाठी पात्र आहेत?

नॉन कार्पोरेट लघुउद्योग क्षेत्रातील प्रोप्रायटर, भागीदारी फर्म ज्यामध्ये उत्पादीत युनिट्स, सेवा क्षेत्रातील युनिट्स, ट्रक ऑपरेटर, अन्न सेवा युनिट, दुरुस्ती दुकाने, मशिन ऑपरेटर, कारागिर, खाद्य प्रक्रिया उद्योग आणि इतर ग्रामीण व शहरी क्षेत्रातील लघूउद्योग हे मुद्राचे लाभार्थी आहेत.

६.प्रादेशिक ग्रामीण बँका या मुद्राअंतर्गत सहाय्यासाठी पात्र आहेत काय?

होय, मुद्रा विभागीय ग्रामीण बँकांना पुर्नवित्त सहाय्य उपलब्ध करुन देते.

७. मुद्रा अंतर्गत व्याजाचा दर काय निश्चित केला आहे?

मुद्रा ही एक बँका व वित्तीय संस्था यांना पुनर्वित्त उपलब्ध करुन देणारी संस्था आहे. मुद्रा ही लघुउद्योगासाठी वित्त पुरवठा करणाऱ्या प्रत्येक व शेवटातील शेवटच्या वित्तीय संस्थेस या योजनेंतर्गत पुनर्वित्त उपलब्ध करुन देईल. व्याज दरात तर्कसंगत बदल करण्यासाठी प्रयत्न करुन कर्जदारांसाठी प्रक्रीया शुल्क कमी करण्यासाठी योग्य तंत्रज्ञानासह अर्थपूर्ण अर्थ निर्देशांचा वापर केला जाईल.

८. मी पेपर सामग्री लघू उद्योगाशी संबंधित आहे, मुद्रा मधून कसा फायदा होऊ शकेल?

मुद्रा कर्ज पेपर सामग्री लघू उद्योगासाठी बँक/एनबीएफसी/सूक्ष्म पत पुरवठा संस्था यांचेकडून उपलब्ध आहे. सर्व प्रकारच्या उत्पादित व्यवसायासाठी, व्यापारासाठी व सेवा क्षेत्रातील व्यवसायासाठी मुद्रा अंतर्गत कर्ज घेता येते. कर्ज प्रकार हे शिशू, किशोर व तरुण या तीन गटप्रकारमध्ये देण्यात येतात. उद्योग व्यवसायाचा टप्याटप्याने विकास करण्यासाठी कमी कर्जामध्ये व्यवसाय सुरु करुन उद्योगाच्या वृध्दीनुसार गरजेनुरुप कर्ज सुविधा उपलब्ध करण्यासाठी कर्ज प्रकाराची तीन गटांमध्ये विभागणी केली आहे.

९. मी नुकताच पदवीधर झालो आहे. मी माझा स्वत:चा व्यवसाय सुरु करु इच्छितो. मुद्रा माझी मदत करुन शकेल?

मुद्रा कर्ज खालील तीन गट प्रकारामध्ये विभागले आहे. लहान व्यवसायासाठी रु.50 हजारापर्यंतची कर्ज “शिशू” गट प्रकारामध्ये आणि रु.50 हजारावरील परंतू रु.5 लाखाखालील कर्ज‍ “किशोर” गटप्रकारामध्ये उपलब्ध आहे. रु.5 लाखावरील व रु.10 लाखाखालील कर्ज “तरुण” गटप्रकारामध्ये उपलब्ध केले आहे. व्यवसायाच्या व प्रकल्पाच्या स्वरुपानुसार मुद्राच्या विहित नियमानुसार लघु उद्योगांसाठी वित्तसहाय्य बॅंका व विविध वित्तीय संस्थांकडून मिळू शकेल.

१०. मी अन्न प्रक्रीया तंत्रज्ञानातील पदविका शिक्षण पूर्ण केले आहे. मला माझा स्वत:चा अन्न प्रक्रीया मधील युनिट सुरु करावयाचा आहे. कृपया याबाबत मला मार्गदर्शन करावे.

अन्न प्रक्रीया उद्योग हा मुद्रा अंतर्गत कर्ज पुरवठयासाठी एक पात्र व्यवसाय आहे. आपण कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्थेकडून अन्न प्रक्रीया उद्योगासाठी कर्ज / वित्तीय सहाय्य घेऊ शकता.

११. मी जरीच्या कामातील कुशल कारागीर आहे. नोकरी करुन दुसऱ्यासाठी काम करण्याऐवजी मी स्वत:चा व्यवसाय करुन इच्छितो. याबाबत मुद्रा मला मदत करेल का?

आपण आपला स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी आपल्या क्षेत्रातील कार्यरत बँक किंवा इतर वित्तीय संस्थेकडून “शिशू” गट प्रकारातील वित्तीय सहाय्य घेऊ शकता.

१२. मी फॅशन डिझाईनींगचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. मला स्वत:चे बूटीक उघडायचे आहे आणि माझा स्वत:चा ब्रँड विकसित करायचा आहे. मुद्रा याबाबत मला काय मदत करु शकेल?

मुद्रा कडून महिला उद्योजकांसाठी विशेष पुर्नवित्त योजना राबवित आहे. उदा.महिला उद्यमी मित्र. यामध्ये शिशू, किशोर व तरुण या तीनही गटप्रकारांमध्ये वित्तीय सहाय्य उपलब्ध करुन दिले जाते. सुक्ष्म वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था व नॉन-कार्पोरेट वित्तीय कंपनीज यांचेकडून महिला उद्योजकांच्या कर्जासाठी 25 बीपीएसची व्याज सवलत उपलब्ध आहे.

१३. माझा फ्रेंचायजी मॉडेलवर “आईस्क्रिम पार्लर” उघडण्याचा मानस आहे. मुद्रा मला याबाबत काय मदत करु शकेल?

व्यापारी आणि दुकानदारांसाठी मुद्रा एक‍ विशेष पुर्नवित्त योजना राबवित आहे. आपल्या क्षेत्रातील कोणत्याही बँक / सुक्ष्म वित्तीय संस्था / नॉन-बँकींग वित्तीय संस्था यांचेकडून आपल्या व्यवसायाच्या गरजेनुरुन वित्तीय सहाय्य घेऊ शकाता.

१४. मी अधिक विविधता आणि डिझाइन याचा वापर करुन माझा भांडी व्यवसाय विस्तृत करु इच्छितो. यासाठी मुद्रा मला काय मदत करेल?

आपल्या स्वत:च्या उद्योग वृध्दीसाठी आपल्या क्षेत्रातील कोणत्याही बँक / सुक्ष्म वित्तीय संस्थेकडून “शिशू” गटप्रकारातील वित्तीय सहाय्य तुम्ही घेऊ शकता.

१५. प्रधानमंत्री मुद्रा योजनेची व्याप्ती काय आहे? आणि कोणकोणत्या प्रकारची कर्ज यामध्ये उपलबध असून कोणत्या संस्थेकडून कर्ज मिळू शकेल?

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँका, क्षेत्रीय ग्रामीण बँका, सहकारी बँका, खासगी क्षेत्रातील बँका, विदेशी बँका, मायक्रो फायनान्स संस्था आणि नॉन बँकींग फायनान्स कंपन्यांसारख्या सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांव्दारे / वित्तीय संस्थाव्दारे उघु उद्योजकांना कर्ज देण्याची सुविधा आहे. उत्पन्न निर्मितीसाठी बँका / वित्तीय संस्था यांचेकडून 8 एप्रिल, 2015 नंतर देण्यात येणारी रु.10 लाखाखालील सर्व कर्ज ही प्रधानमंत्री मुद्रा योजनेतील कर्ज समजण्यात येतील.

१६. प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे संनियंत्रण कोण करते?

राज्यस्तरावर प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे संनियंत्रण राज्यस्तरीय बँकर्स समितीकडून केली जाईल. त्याचप्रमाणे देशपातळीवर या योजनेचे संनियंत्रण वित्तीय सेवा विभाग / मुद्रा कार्यालय, भारत सरकार यांचेकडून करण्यात येते. यासाठी केंद्र शासनाने मुद्राचे संकेतस्थळ विकसित करुन कार्यान्वित केले आहे. ज्यामध्ये योजनेशी संबंधित बँका / इतर कर्ज पुरवठा करणाऱ्या वित्तीय संस्था यांचेकडून माहिती नियमितपणे भरली जाते.

१७.केंद्र व राज्यशासनाची अशी कोणती योजना आहे, ज्यामध्ये जामिनाशिवाय कर्ज दिले जाते?

केंद्र शासनाची प्रधानमंत्री मुद्रा योजना ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये लघू उद्योजकांना बँका वा इतर वित्तीय संस्थांकडून विनातारण रु.10 लाख पर्यंतचे कर्ज दिले जाते.

१८.सुतारकाम व आर.ओ.वॉटर प्लॅट यासाठी मुद्रा अंतर्गत कर्ज मिळेल काय? कर्ज मिळत असल्यास कमीत कमी किती व जास्तीत जास्त किती कर्ज मिळू शकेल?

सुतारकाम व आर.ओ.वॉटर प्लॅट या मुद्रा अंतर्गत रु.10 लाख पर्यंत कर्ज मिळण्यासाठी पात्र व्यवसाय आहे. मुद्रा अंतर्गत उत्पन्न निर्माण करणारी कोणतीही उत्पादन तयार करणारी / प्रक्रीया उद्योग / व्यापार / सेवा क्षेत्रातील कोणताही व्यवसायासाठी रु.10 लाख पर्यंत कर्ज मिळण्यास पात्र आहे.

१९.मुद्रा अंतर्गत कर्ज मिळण्यासाठी व्यक्तींची पात्रता निकष काय आहेत?

भारतीय नागरिक ज्याच्याकडे बिगर शेतकरी उत्पन्न निर्माण करण्याच्या व्यवसायाची योजना आहे जसे की, उत्पादन / प्रक्रीया / व्यापार किंवा सेवा क्षेत्रातील कोणताही उद्योग व्यवसाय ज्यासाठी रु.10 लाखापर्यंत कर्ज रकमेची गरज आहे, अशी व्यक्ती मुद्रा अंतर्गत कर्जासाठी पात्र आहे. प्रधानमंत्री मुद्रा अंतर्गत कर्ज घेण्यासाठी कर्ज देणारी बँका / वित्तीय संस्थेच्या सर्वसाधारण अटी आणि नियमांचा अवलंब करावा लागेल. मुद्रा अंतर्गत कर्जाचे व्याजदर हे भारतीय रिझर्व बँकेच्या वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या मार्गदर्शक सूचनांनुसार लागू आहेत.

२०.प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत अनुदान मिळते काय? तसे असल्यास त्याचा तपशिल?

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत अनुदान लागू नाही. तथापि, जर कर्ज प्रस्तावाची काही सरकारी योजनांशी निगडीत असल्यास व त्यामध्ये शासकीय भांडवल अनुदान मिळाल्यास ते प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत देखील पात्र असेल.

२१.कृपया मुद्रा बाबत संक्षिप्त माहिती द्यावी?

मुद्रा म्हणजे मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी लि. ही एक भारत सरकारची पुनर्वित्त सेवा देणारी संस्था आहे. मुद्रा थेट कर्ज देत नाही. मुद्रा ही मध्यस्थ संस्थांसाठी जसे बँका, मायक्रो फायनान्स संस्था, नॉन बँकींग फायनांन्सियल कंपनीज ज्या उत्पादन, प्रक्रीया, व्यापार किंवा सेवा क्षेत्रातील अकृषी उत्पन्न देणाऱ्या लघू व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करीत आहेत, अशा मध्यस्त संस्थांना पूनर्वित्त पुरविते.

२२.तुम्ही मुद्रा कार्डबाबत माहिती देऊ शकता का?

मुद्रा कार्ड हे एक नाविन्यपूर्ण क्रेडिट कार्ड आहे. ज्यामध्ये कर्जदार कोणत्याही अडथळ्याविना मुक्त आणि लवचिक पध्दतीने कर्जाचा लाभ घेऊ शकतो. मुद्रा कार्ड व्यावसायिकास सी.सी (Cash Credit) / ओव्हरड्राफ्ट च्या स्वरुपात खेळते भांडवलासाठी उपयोगात येते. मुद्रा कार्ड हे “रुपे डेबिट कार्ड” असल्याने एटीएममधून रोख रक्कम काढण्यासाठी किंवा विक्री पाँईंट (पी.एस.ओ.) मशीन वापरुन खरेदी करण्यासाठी मुद्रा कार्ड वापरात येते. अतिरिक्त रोख उपलब्ध असताना आणि नंतर व्याज दर कमी करुन रक्कम परत देण्याची सुविधा देखील आहे.

२३.कुंभार व्यवसायातील लोकांना कुंभार कामासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून फायदा घेता येईल काय?

होय, मुद्रा योजनेतून उत्पादन उद्योग / व्यापार व सेवा क्षेत्रातील सर्व लघू व्यवसायासाठी ज्यामध्ये उत्पन्न निर्मिती होते त्यासाठी बँका / मायक्रो फायनान्स संस्थांव्दारे सुक्ष्म पत योजनेंतर्गत सहाय्य मिळू शकते.

२४.मुद्रा अंतर्गत कर्ज मिळण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?

मुद्रा अंतर्गत कर्ज मिळण्यासाठी भारती रिझर्व बँकेच्या बँकांसाठी लागू असलेल्या प्रचलित अटी व शर्ती त्याचप्रमाणे मार्गदर्शक सूचना लागू आहेत. आवश्यक कागदपत्रांविषयीचे मार्गदर्शन आपल्या परिसरातील कोणत्याही बँक / वित्तीय संस्थेमधून आपणांस मिळू शकेल.

२५.कर्ज नामंजूर झाल्यास बँक अधिकाऱ्यांविरुध्द तक्रार करण्याची यंत्रणा काय आहे?

बँकेच्या अधिकाऱ्यांकडून कर्ज मंजूरीमध्ये चूक झाल्यास त्याबाबत संबंधित बँकेच्या वरिष्ठांकडे उदा.संबंधित बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक / विभागीय व्यवस्थापक यांचेकडे तक्रार नोंदविता येऊ शकते.

२६.मुद्रा कर्जासाठी “सुरक्षा रक्कम” जमा ठेवावी लागते काय? याबाबत विस्तृतपणे सांगाल काय?

लघू उद्योग क्षेत्रातील व्यवस्था यासाठी रु.10 लाखापर्यंतच्या कर्जाबाबत कोणतीही अनूषंगिक तारण न घेण्याबाबत भारतीय रिझर्व बँकेने स्थापन केलेल्या वर्किंग ग्रुपच्या शिफारशीनुसार सर्व बँकांना बंधनकारक केले आहे.

२७.मुद्रा कर्जासाठी मानक स्वरुपातील (Standard Format) अर्जाचा नमूना आहे का?

होय. शिशू गटप्रकारातील कर्जासाठी एक पृष्ठाचे अर्ज तयार केले आहे, जे मुद्रा पोर्टलवर उपलब्ध आहे. किशोर व तरुण गट प्रकारातील कर्जासाठी तीन पृष्ठाचे अर्ज तयार केले असून ते देखील मुद्रा पोर्टलवर उपलब्ध आहे.

२८.मुद्रा अंतर्गत कर्जासाठी लागू असलेल्या परतफेडीच्या अटी, पात्रता आणि कृती आराखडा याबाबत आपण थोडक्यात स्पष्ट करु शकता काय?

कर्जाच्या अटी व शर्ती या भारतीय रिजर्व बॅकेच्या व्यापक मार्गदर्शक तत्वांनुसार कर्ज देणाऱ्या बॅकेच्या / वित्तिय संस्थेच्या नियमास अधिन राहून असतील. कर्ज प्रस्तावाच्या केवळ गुणवत्तेनुसार बॅक‍ / वित्तिय संस्था कर्ज विनंती अर्जावर प्रक्रिया करेल. प्रस्तावित लघू व्यवसायातील उत्पन्न निर्मितीच्या अंदाज पत्रकानुसारच आवश्यक असलेला कर्जाची रक्कम बॅक निश्चित करेल. व्यवसायाच्या उत्पन्नानूसार म्हणजेच रोख प्रवाहानुसार (Cash Flow) परतफेडीचा कालावधी व परतफेडीचा हप्ता निश्चित केला जाईल तसेच कर्जदाराची कर्जासाठी पात्रता ही कर्ज देणाऱ्या संस्थेच्या नियमानुसार ठरविली जाईल.

२९.प्रधान मंत्री मुद्रा योजना भारतातील सर्व बॅकासाठी लागू आहे काय?

होय, वित्तिय सेवा विभाग, भारत सरकार यांचे पत्र दि.14 मे,2015 नुसार सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बॅका आणि अनुसूचित सहकारी बॅका यांना दिनांक 08 एप्रिल, 2018 नंतर रू.10 लाखाखलील सर्व मंजूर होणारी लघूव्यवसाय क्षेत्रातील व्यवसायासाठीची कर्जे ही प्रधानमंत्री मुद्रा योजनेतील समजूनच मंजूर करावीत, असे निर्देश दिले आहेत.

३०. प्रधानमंत्री मुद्रा योजना आम्हाच्या भागामध्ये कधी सुरू होणार?

मुद्रा अंतर्गत कर्ज वितरण दिनांक 08 एप्रिल,2015 पासून सर्व भारतभर एकाच वेळी लागू केली आहे.

३१.मुद्रा कर्जासाठी जीवन विमा असण्याची गरज आहे काय?

जीवन विमा हा प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी आवश्यक नाही.

३२.प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी पॅन कार्ड असणे सक्तीचे आहे काय?

प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी पॅन कार्ड असणे अनिवार्य नाही. तथापि, कर्जदाराने बॅकेच्या नियमानुसार KYC करून घेणे आवश्यक आहे.

३३.मुद्रा कर्जासाठी व्याजाचे दर काय आहे?

भारतीय रिजर्व बॅकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वाजवी व्याजदर आकारण्याचा सल्ला सर्व बँकांना दिला आहे.

३४.जर अग्रणी वित्तिय संस्था / बॅक मुद्रा अंतर्गत कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्यास, कर्ज मिळण्यासाठी मी काय करावे.

अशा परिस्थितीत, सदरील प्रकरणी संबंधित बॅकेच्या वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे दाद मागू शकता. अर्जदार त्यांचे क्षेत्रातील इतर नॉन -बॅकिंग वित्तिय कंपनी / मायक्रो फायनान्स संस्थेकडे कर्ज रक्कमेसाठी अर्ज करू शकतो.

३५.बँकाकडून प्रधानमंत्री मुद्रा योजनेतंर्गत कर्ज मंजूरीवेळी सूरक्षित ठेव रक्कम / किंवा अनूषंशिक तारण ठेवसाठी आग्रह केला जातो त्या विरोधात काय कारवाई केली जाऊ शकते, कारण बऱ्याच ठिकाणी बॅका या सूरक्षा ठेव रक्कमेसाठी किंवा अनूषंशिक तारण ठेवण्यासाठी आग्रही आहेत. अशा परिस्थितील बॅकेच्या विरोधात तक्रार करावयाची झाल्यास ती कोठे केली जाऊ शकते.

कोणत्याही बँक शाखेच्या विरोधात या प्रकरणी आपण संबंधित बँकेचे प्रादेशिक कार्यालय / विभागीय कार्यालय / मुख्यालयामकडे तक्रार नोंदवू शकता. प्रत्येक बँकेच्या तक्रार निवारण पध्दतीचा तपशील बँकेच्या प्रत्येक शाखेमध्ये उपलब्ध केला जाईल.

३६.मुद्रा अंतर्गत कर्जासाठी अपंग व्यक्ती पात्र आहेत काय ?

कोणताही भारतीय नागरीक जे कर्ज घेण्यास पात्र आहेत आणि त्यांचा व्यवसाय हा उत्पन्न निर्मितीची खात्री देत आहे, अशा व्यवसायासाठी मुद्रा कर्ज योजनेचा लाभ घेऊ शकतात. कर्ज मागणीचा प्रस्ताव उत्पादन , प्रक्रिया, व्यापार व सेवा क्षेत्रातील कोणत्याही व्यवसायातील खात्रीशीर उत्पन्न निर्मिती देणारा नवीन / दर्जावाढ व्यवसाय असावा.

३७.मुद्रा अंतर्गत रुपये 10 लाखाखालील कर्जासाठी मागील २ वर्षाचे आयकर परतावा कागदपत्रे बँकेत दाखल करणे आवश्यक आहे काय ?

साधारणपणे, लहान कर्जासाठी आयकर परतावा कागदपत्रांची मागणी बँकेकडून केली जात नाही. तथापि, बँकेच्या प्रचलित नियम व धोरणानुसार संबंधित बँक दस्तऐवजांची आवश्यकता विचारात घेऊ शकते.

३८.प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत शिशु गट प्रकारातील कर्जासाठी कर्ज प्रस्ताव मंजूरीचा कालावधी काय आहे ?

कर्ज मंजूरीसाठी आवश्यक कागदपत्रे बँकेत दाखल केल्यापासून साधारणत: ७ ते १० दिवसांमध्ये बँककडून शिशू गटातील कर्ज मंजूर केली जातात.

३९.प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत पात्र अर्जदार कोण आहेत ?

प्रधानमंत्री मुद्रा योजनंतर्गत महिला उद्योजिकांसह मालकी हक्क, भागीदारी फर्मस्, खाजगी मर्यादीत कंपनी किंवा कोणतीही अन्य संस्था यासह कोणतीही भारतीय व्यक्ती पात्र आहे.

४०.सीएनजी टेंपो /टॅक्सीच्या खरेदीसाठी मुद्रा कर्ज उपलब्ध आहे काय ?

सीएनजी टेंपो /टॅक्सीच्या खरेदीसाठी मुद्रा कर्ज उपलब्ध आहे, परंतु अर्जदाराने सदरील वाहनाचा वापर सार्वजनिक वाहतूक वाहक म्हणूनच करावा.

४१.माझे कार्पोरेशन बँकेमध्ये बचत खाते आहे. तर मला मुद्रा योजनेंतर्गत सदरील बँकेकडून कर्ज मिळू शकेल काय ?

होय. अर्जदार संबंधित बँक शाखेशी संपर्क करुन कर्जासाठी अर्ज करु शकतो. कर्जाच्या अटी व शर्ती या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या व्यापक मार्गदर्शक तत्वावर आधारीत व कर्ज देणाऱ्या बँकेच्या / वित्तीय संस्थेच्या धोरणानुसार असतील. कर्जाची रक्कम ही प्रस्तावित व्यवसायातून निर्माण होणाऱ्या उत्पन्नाच्या गरजेनुसार निश्चित केली जाईल. त्याचप्रमाणे परतफेडीच्या अटी या सदरील व्यवसायाच्या अपेक्षित रोख प्रवाहाद्वारे (Cash Flow) निश्चित केला जाईल.

४२.खादी व्यवसायासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत कर्ज मिळेल काय ?

होय. मुद्रा कर्ज कोणत्याही व्यवसायासाठी ज्यामध्ये उत्पन्न निर्माण होण्याची क्षमता आहे, त्यासाठी लागू आहे, खादी ही वस्त्रोद्योग क्षेत्रांतर्गत पात्र व्यवसाय आहे आणि या व्यवसायामध्ये उत्पन्न निर्मिती निश्चित असल्याने हा मुद्रा अंतर्गत सुध्दा पात्र व्यवसाय आहे.

अधिक माहितीसाठी : प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करून, जवळची आपली बँक शोधा व बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क करा, तसेच महाराष्ट्र शासनाच्या https://mahamudra.maharashtra.gov.in संकेतस्थळावर भेट द्या व केंद्र सरकारच्या https://www.mudra.org.in संकेथळावर भेट द्या.

हेही वाचा – पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी उद्योगांना ९० टक्के कर्ज; ऑनलाईन अर्ज सुरु

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.