निवडणूकमहाराष्ट्र ग्रामपंचायतवृत्त विशेष

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक थेट सरपंच निवडणुक कार्यक्रम २०२३ !

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक – माहे जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित व सन २०२२ मध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे निवडणूका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या ) सार्वत्रिक निवडणूकांसाठी संगणकप्रणालीव्दारे तसेच ग्रामपंचायतीतील रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपारिक पध्दतीने राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम.

संदर्भ – १. राज्य निवडणूक आयोगाचे समक्रमांकांचे दिनांक १२/०६/२०२३, दिनांक १३/०६/२०२३ (सुधारीत) व दिनांक २५/०८/२०२३ चे आरक्षण सोडत कार्यकमाचे आदेश २. राज्य निवडणूका आयोगाचे समक्रमांकाचे दिनांक २७/०७/२०२३ व दि. ०८/०९/२०२३ चे मतदार यादी कार्यक्रमाचे आदेश भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ के व २४३ झेडए अन्वये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पर्यवेक्षण, संचालन व नियंत्रण याची सर्व जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची आहे.

मा. सर्वोच्च न्यायालयामधील विशेष अनुमती याचिका क्र. १९७५६/२०२१ मध्ये दि. १२ जुलै २०२२ रोजी झालेल्या सुनावणीच्यावेळी शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाचे प्रमाण निश्चित करण्याकरिता गठीत केलेल्या समर्पित मागासवर्ग आयोगाने आवश्यक त्या बाबींची पूर्तता करुन दिनांक ७ जुलै २०२२ रोजी आपला अहवाल शासनास सादर केल्याची बाब शासनाने अर्ज क्र. ९२६९५/२०२२ अन्वये मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. २० जुलै, २०२२ रोजीच्या सुनावणीत राज्य निवडणूक आयोगाने यापुढील निवडणुकांमध्ये समर्पित मागासवर्ग आयोगाने केलेल्या शिफारशी विचारात घेऊन पुढील निवडणुका घेण्याबाबत आदेश दिले आहेत. सदर आदेशास अनुसरुन राज्यातील माहे जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित तसेच सन २०२२ मध्ये चुकीची प्रभागरचना / आरक्षण झाल्यामुळे निवडणूका न झालेल्या सुमोर २३६१ ग्रामपंचायतींच्या • आरक्षणाची प्रक्रिया आयोगाच्या संदर्भ क्र. १ येथील आदेशान्वये पूर्ण करण्यात आली आहे.

संदर्भ क्र.२ येथील आयोगाने दिनांक २७/०७/२०२३ रोजी दिलेल्या मतदार यादी कार्यक्रमानुसार राज्यातील माहे जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ मध्ये मुदत संपणाऱ्या, नवनिर्मित व सन २०२२ मध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे निवडणूका न होऊ शकलेल्या सुमारे २२९८ ग्रामपंचायती व निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणामुळे सदस्य/ थेट सरपंचाच्या जागा रिक्त झालेल्या २०६८ ग्रामपंचायतीतील २९५० सदस्यांच्या व १३० थेट सरपंचांच्या रिक्त जागांसाठी दिनांक २५/०८/२०२३ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.

तसेच दिनांक ०८/०९/२०२३ रोजी दिलेल्या मतदार यादी कार्यक्रमानुसार समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसलेल्या ६२ मध्ये आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करुन या ६२ व अन्य १ अशा ६३ ग्रामपंचायतींसाठी दिनांक २७/०९/२०२३ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.

शासनाने महाराष्ट्र अधिनियम क्र. ४२, दिनांक २९ ऑगस्ट, २०२२ अन्वये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामध्ये सुधारणा केली असून सरपंचाची निवड थेट जनतेतून करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र शासन अधिसूचना क्र.७१, दिनांक ५ मार्च २०२० अन्वये पुढील पाच वर्षाकरीता ग्रामपंचायतींचे सरपंचाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. तसेच ग्राम विकास विभागाने दिनांक २१ सप्टेंबर २०१७ च्या पत्रान्वये नवनिर्मित ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षणाबाबत कार्यपध्दती नमूद केली आहे.

उक्त सुमारे २३६१ (२२९८+६३) ग्रामपंचायतींपैकी मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुणे जिल्हयातील ग्रामपंचायत वाकसाई, ता. मावळ व ग्रामपंचायत फुलगाव, ता. हवेली या २ ग्रामपंचायती वगळून उर्वरित सुमारे २३५९ ग्रामपंचायतींसाठी सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणामुळे सदस्य / थेट सरपंचाच्या जागा रिक्त झालेल्या २०६८ ग्रामपंचायतीतील २९५० सदस्यांच्या व १३० थेट सरपंचांच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूका घेणे क्रमप्राप्त आहे.

वरील सर्व बाबी लक्षात घेऊन, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्र. ३) मधील कलम १० अ पोटकलम (४) मधील अधिकारांचा वापर करुन, राज्यातील सुमारे २३५९ ग्रामपंचायतींसाठी सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणामुळे सदस्य / थेट सरपंचाच्या जागा रिक्त झालेल्या २०६८ ग्रामपंचायतीतील २९५० सदस्यांच्या व १३० थेट सरपंचांच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राबविण्यात यावा असे याव्दारे घोषित करण्यात येत आहे. सदरच्या सार्वत्रिक निवडणूका मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल विशेष अनुमती याचिका क्र. १९७५६/२०२१ व संलग्न याचिकांमध्ये होणाऱ्या अंतिम निर्णयाच्या अधीन असतील.

आदेश

परिशिष्ट १ मध्ये दर्शविलेल्या वेळापत्रकानुसार परिशिष्ट २ मध्ये दर्शविलेल्या २३५९ ग्रामपंचायतींसाठी सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम संगणकप्रणालीव्दारे राबविण्यात यावा.

निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणामुळे सदस्य / थेट सरपंचाच्या जागा रिक्त झालेल्या २०६८ ग्रामपंचायतीतील २९५० सदस्यांच्या व १३० थेट सरपंचांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपारिक पध्दतीने निवडणूक कार्यक्रम राबविण्यात यावा. (परिशिष्ट ३)

निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये, निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील. या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती / घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना आचारसंहिता कालावधीत कुठेही करता येणार नाही.

( आयोगाचे आचारसंहितेबाबतचे दि. १४/१०/२०१६ चे एकत्रित आदेश, दि.०६/०९/२०१७ चे अतिरिक्त आदेश व दिनांक १७/१२/२०२० चे पत्र )

सन २०२३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३०, दिनांक २५ जुलै, २०२३ अन्वये राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार सार्वत्रिक किंवा पोटनिवडणूक कार्यक्रमांकरिता नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शेवटचा दिनांक हा ३१ डिसेंबर, २०२३ किंवा त्यापूर्वीचा असेल, त्याबाबतीत नामनिर्देशनपत्रासोबत वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यपत्र किंवा पडताळणी समितीकडे अर्ज केला असल्याबाबतचा अन्य कोणताही पुरावा आणि निवडून आल्याच्या दिनांकापासून १२ महिन्यांच्या आत पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करील, असे हमीपत्र सादर करण्याची मूभा उमेदवारांना दिली आहे.

परिशिष्ट १ येथील निवडणुक कार्यक्रमानुसार मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० अशी असेल. (मात्र नक्षलग्रस्त / दुर्गम भागामध्ये उदा. गडचिरोली, गोंदीया करीता सकाळी ७.३० ते दुपारी ३.०० वा. पर्यंत )

आयोगाच्या दिनांक २०/०७/२०२३ च्या आदेशामध्ये नमूद केल्यानुसार निवडणूक खर्चाचा हिशोब विहित रितीने सादर करण्याच्या कार्यपध्दतीबाबत अवगत करावे. याबाबतची योग्य ती प्रसिध्दी स्थानिक पातळीवर देण्यात यावी.

निवडणूक कार्यक्रम सुरु झाल्यानंतर एखादया ग्रामपंचायतींच्या निवडणूकी संदर्भात मा. न्यायालयाचे स्थगिती आदेश प्राप्त झाल्यास, जिल्हाधिकारी यांना त्यांच्या स्तरावर स्थगितीची कार्यवाही करुन आयोगाला त्वरीत कळविणे आवश्यक राहील.

ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शी पध्दतीने पार पाडण्याच्या दृष्टीने आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या पूर्वतयारी आदेशातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

नवीनतम उपक्रम राबविण्यासंदर्भात वेळोवेळी देण्यात येणाऱ्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात यावी.

आयोगाचे दिनांक ०७/११/२०२२ रोजी दिलेल्या निवडणूक पूर्वतयारी आदेशातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

सोबतच्या परिशिष्ट १ नुसार निवडणूक कार्यक्रमाच्या कोणत्याही टप्प्यावर अतिवृष्टी, पूर इ. नैसर्गिक आपत्ती निवडणूक असलेल्या क्षेत्रात उद्भवल्यास त्याबाबतचा अहवाल तात्काळ आयोगास सादर करण्यात येईल, याची संबधित जिल्हाधिकारी यांनी दक्षता घ्यावी.

अ. क्र.निवडणुकीचे टप्पेदिनांक
1तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांकदिनांक ०६/१०/२०२३ (शुक्रवार)
2नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ ( नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी)दिनांक १६/१०/२०२३ (सोमवार) ते दिनांक २०/१०/२०२३ (शुक्रवार) वेळ. स. ११.०० ते दु. ३.००
3नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी)दिनांक २३/१०/२०२३ (सोमवार) वेळ सकाळी ११.०० वा. पासून छाननी संपेपर्यंत
4नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी)दिनांक २५/१०/२०२३ (बुधवार) दुपारी ३.०० वा. पर्यंत
5निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळदिनांक २५/१०/२०२३ (बुधवार) दुपारी ३.०० वा. नंतर
6आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांकदिनांक ०५/११/२०२३ (रविवार) सकाळी ७.३० वा. पासून ते सायं. ५.३० वा. पर्यंत
7मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक ( मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील)दिनांक ०६/११/२०२३ पर्यंत (सोमवार) व नक्षलग्रस्त तसेच दुर्गम भागासाठी दिनांक ०७/११/२०२३ (मंगळवार)
8जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांकदिनांक ०९/११/२०२३ (गुरुवार) पर्यंत

हेही वाचा – ग्रामपंचायत सरपंच निवडुनिकीसाठी उमेदवारी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता काय लागते ते सविस्तर पाहूया !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.