आपले सरकार - महा-ऑनलाईनमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी योजनासामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुधारित !

सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज केला असेल परंतु वसतिगृह प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांना निवास व भोजनाची व्यवस्था व्हावी याकरिता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार (Swadhar Yojana) योजनेंतर्गत निर्वाह भत्ता देण्यात येतो.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विभाग, जिल्हा व तालुका स्तरावर मागासवर्गीय मुलामुलींच्या शिक्षणासाठी एकूण ४४३ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. त्यामध्ये मुलांसाठी २३० व मुलींसाठी २१३ शासकीय वसतिगृहे सुरू असून, त्यापैकी मुलांच्या वसतिगृहामध्ये २३,२०८ विद्यार्थी प्रवेशित असून, मुलींच्या शासकीय वसतिगृहामध्ये २०,६५० याप्रमाणे एकूण ४३,८५८ विद्यार्थी शासकीय वसतिगृह योजनेचा लाभ घेत आहेत.

सदर वसतीगृहांमध्ये विद्यार्थ्यांना विहित अटी व शर्तीनुसार प्रवेश देण्यात येतो. प्रवेशित विद्यार्थ्यांना निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य व दैनंदिन खर्चासाठी निर्वाह भत्ता व आवश्यक सोयी-सुविधा दिल्या जातात. राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेली व्यावसायिक, बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या आणि तेथे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढत असलेली संख्या यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना वसतिगृहातील जागेची मर्यादा लक्षात घेता प्रवेश देणे शक्य होत नाही. पर्यायाने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शासकीय वसतिगृह प्रवेशापासून वंचित राहतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी विविध अडचणींना सामोरे जावे लागत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस मर्यादा येत आहेत.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ वसतिगृह सुरु करुन तेथे प्रवेश देण्यासाठी जागेची उपलब्धता व बांधकामासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता मर्यादा येतात. सबब, मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती तथा नवबौध्द घटकांतील इयत्ता ११ वी, १२ वी तसेच इयत्ता १२ वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्याना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्याकरीता शासनाने दि. ६ जानेवारी २०१७ च्या शासन निर्णयान्वये “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना (Swadhar Yojana)” सुरु केलेली आहे.

राज्य शासनामार्फत चालू असलेल्या विविध योजना/कार्यक्रम यांचा फेरविचार करणे व कालानुरूप धोरण राबविण्यासाठी नवीन धोरण आखणे या सर्व बाबींचा साकल्याने विचार करण्याच्या अनुषंगाने मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री महोदयांनी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी एकसमान सर्वंकष धोरण तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुषंगाने मा. मंत्रिमंडळाच्या दि. ३ मे, २०२३ रोजी झालेल्या बैठकीत शासनाचे विविध विभाग/ उपक्रम / महामंडळे यांच्या मार्फत उच्च शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचे एकसमान निकष निश्चित करण्याकरीता मा. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मा. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या शिफारशीच्या अनुषंगाने मा. मंत्रीमंडळाच्या दि. १९.१०.२०२३ रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार (Swadhar Yojana) योजनेंतर्गत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ मिळावा तसेच, अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत, म्हणून सदर योजनेचा विस्तार तालुकास्तरावर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना – Swadhar Yojana:

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या तसेच, वसतिगृह प्रवेशासाठी रीतसर अर्ज केलेल्या परंतु शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यापैकी इयत्ता ११ वी व १२ वी तसेच इयत्ता १२ वी नंतरच्या व्यवसायिक तसेच बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी विविध स्तरावरील महाविद्यालयात/ शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक ती रक्कम सबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी शासन निर्णय, दिनांक ६.१.२०१७ अन्वये “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना (Swadhar Yojana)” सुरु केलेली आहे.

स्वाधार (Swadhar Yojana) योजनेंतर्गत शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या तसेच शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी रीतसर अर्ज केलेल्या परंतु शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांपैकी इयत्ता ११ वी, १२ वी तसेच इयत्ता १२ वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयात / शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास, शैक्षणिक साहीत्य, निर्वाह भत्ता, व इतर आवश्यक सोयी-सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी स्वाधार (Swadhar Yojana) योजनेच्या माध्यमातून खालीलप्रमाणे रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात (Aadhar Linked Bank Account) थेट जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.

अ. क्र.खर्चाची बाब मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कमइतर महसुल विभागीय शहरातील व उर्वरीत क वर्ग महानगरपालीका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कमइतर जिल्हयाच्या ठिकाणी तसेच महानगर पालिकेच्या हद्दीपासून ५ कि.मी. परिसरात असलेली महाविदयालये/शैक्षणिक संस्था या ठिकाणी अनुज्ञेय रक्कमतालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम
भोजन भत्तारु.३२,०००/-रु.२८,०००/-रु.२५,०००/-रु.२३,०००/-
निवास भत्तारु.२०,०००/-रु.१५,०००/-रु.१२,०००/-रु.१०,०००/-
निर्वाह भत्तारु.८,०००/-रु.८,०००/-रु.६,०००/-रु.५,०००/-
प्रति विद्यार्थी एकुण देय रक्कम (दोन सत्र, १० महिन्यासाठी)रु.६०,०००/-रु.५१,०००/-रु.४३,०००/-रु.३८,०००/-

टीप:- उपरोक्त रक्कमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रु.५,०००/- व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष रु.२,०००/- इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल.

स्वाधार योजनेचे निकष:

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार (Swadhar Yojana) योजनेचे निकष खालीलप्रमाणे असतीलः-

अ) मुलभूत पात्रता

१. विद्यार्थी शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी पात्र असावा.

२. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

३. शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा.

४. स्वाधार (Swadhar Yojana) योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थी अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गाचा असावा.

५. विद्यार्थ्याने जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.

६. स्वाधार (Swadhar Yojana) योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज केलेले व शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रीयेनंतर वसतिगृह प्रवेश क्षमतेअभावी वसतिगृहात प्रवेश न मिळालेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतील. तथापि, सदर अट ही ज्या महानगर / शहरांमध्ये वसतीगृहांची संख्या एका पेक्षा अधिक असल्यास त्या महानगर/शहरांमधील सर्व वसतीगृहातील विद्यार्थी प्रवेश क्षमता विचारात घेवून वसतीगृह प्रवेश निश्चित करणे बंधनकारक राहील, त्यानंतर प्रवेश न मिळालेल्या उर्वरीत पात्र विद्यार्थ्यांना स्वाधार (Swadhar Yojana) योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील.

७. शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करताना संबंधित विद्यार्थ्यांने अर्जामध्ये स्वाधार (Swadhar Yojana) योजनेचा पर्याय नमूद करणे बंधनकारक राहील.

८. विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक त्याने ज्या राष्ट्रीयकृत/शेडयूल्ड बँकेत खाते उघडले आहे, त्या खात्याशी संलग्न करणे बंधनकारक असेल.

९. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या/तालुक्याच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील तसेच तालुक्यातील सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा.

१०. विदयार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त नसावे. तसेच केंद्र शासनामार्फत ज्या- ज्या वेळी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल, त्यानुसार स्वाधार (Swadhar Yojana) योजनेसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा त्या-त्या प्रमाणे लागू राहील.

११. साधारणतः दरवर्षी जून महिन्यात वसतीगृह प्रवेश प्रक्रीया सुरू होते, त्यावेळी विद्यार्थ्यांनी वसतीगृह व स्वाधार (Swadhar Yojana) योजनेसाठी अर्ज सादर करावेत. यासाठी एक ऑनलाईन पोर्टल बनविण्याचे काम सूरू आहे. ते कार्यान्वित नसल्यास गृहपाल/सहाय्यक आयुक्त यांना ऑफलाईन अर्ज स्विकारण्याची मुभा राहील. अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यास स्वाधार (Swadhar Yojana) योजनेचा अर्ज भरण्याची मुदत प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त ३० नोव्हेंबर पर्यंत राहील. मात्र ज्या विद्यार्थ्यांचा निकाल उशिरा लागल्याने महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रीया उशीरा होईल, अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्रवेशानंतर एका महिन्याच्या आत स्वाधार (Swadhar Yojana) योजनेसाठी अर्ज करता येईल.

१२. विद्यार्थ्यास शासकीय वसतीगृहात मिळालेला प्रवेश रद्द करून म्हणजेच वसतीगृहातील जागा रिक्त करून स्वाधार (Swadhar Yojana) योजनेचा लाभ घेता येणार नाही.

१३. वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार प्रथमतः वसतीगृह प्रवेशासाठी निवड करण्यात येईल व तद्नंतर गुणानुक्रमेच स्वाधार (Swadhar Yojana) योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील.

१४. स्वाधार (Swadhar Yojana) योजनेसाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील तृत्तीयपंथी (Transgender) पात्र असतील.

ब) शैक्षणिक निकष

१. सदर विद्यार्थी इयत्ता ११ वी, १२ वी आणि त्यानंतरचे उच्च शिक्षण घेत असावा.

२. विद्यार्थी स्थानिक नसावा (ज्या महाविदयालय/शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला आहे तो विद्यार्थी ते महाविदयालय / शैक्षणिक संस्था ज्या महानगर पालिका/नगर पालिका/ ग्रामपंचायत/कटक मंडळे यांच्या हद्दीत आहेत त्या महानगर पालिका/नगर पालिका/ ग्रामपंचायत / कटक मंडळे / तालुक्यातील रहीवासी नसावा.)

३. महानगर पालिकेच्या हद्दीपासुन ०५ कि. मी. परिसरात असलेल्या महाविद्यालयात/शिक्षण संस्थेत शिकत असलेले विद्यार्थीसुध्दा या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असतील.

४. स्वाधार (Swadhar Yojana) योजनेसाठी अर्ज करताना विद्यार्थी ज्या अभ्यासक्रमात शिक्षण घेत आहे, त्याच्या केवळ लगतच्या मागील वर्षात किमान ५० टक्के गुण किंवा त्याप्रमाणात ग्रेडेशन/CGPA असणे अनिवार्य आहे. त्यापूर्वीच्या इतर परीक्षेच्या गुणांचा विचार करण्यात येवू नये.

५. एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी स्वाधार (Swadhar Yojana) योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना स्वाधार (Swadhar Yojana) योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.

६. इयत्ता १२ वी नंतर पदविका, पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा दोन वर्षापेक्षा कमी नसावा. तसेच पदवीनंतर पदव्युत्तर पदवी / पदविका अभ्यासक्रमाचा कालावधीही दोन वर्षापेक्षा कमी नसावा. (संबंधित अभ्यासक्रम शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळण्यासाठी अनुज्ञेय असावा.)

७. शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेशास पात्र असलेला विद्यार्थी स्वाधार (Swadhar Yojana) योजनेस पात्र ठरतो. शासकीय वसतीगृह प्रवेश नियमावलीनुसार महाविद्यालयीन अभ्यासक्रमाच्या मध्यंतरीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश देता येत नाही. तथापि, विद्यार्थ्यांने स्वाधार (Swadhar Yojana) योजनेसाठी मध्यंतरीच्या वर्गात शिकत असताना अर्ज केल्यास अभ्यासक्रमातील त्यापूर्वीच्या वर्षामधील पात्रता तपासून केवळ स्वाधार (Swadhar Yojana) योजनेचा पुढील काळाकरीता लाभ देता येईल.

८. व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी (पदवी/पदव्युत्तर) प्रवेश घेतला असल्यास स्वाधार (Swadhar Yojana) योजनेचा लाभ घेता येणार नाही. (उदा. अभियांत्रिकेच्या पदवी बी.ई. नंतर एम.ए. साठी प्रवेश घेतल्यास स्वाधार (Swadhar Yojana) योजनेचा लाभ देण्यात येणार नाही.)

९. बिगर व्यावसायिक पदवीनंतर व्यावसायिक पदव्युत्तरला लाभ अनुज्ञेय राहील. (उदा. बी.ए. नंतर एल.एल.बी., बी.ए.नंतर बी.एड, बी.कॉम. नंतर एम.बी.ए.)

१०. स्वाधार (Swadhar Yojana) योजनेमध्ये दिव्यांग (अनु. जाती व नवबौध्द घटकातील) विदयार्थ्यांना ३% आरक्षण असेल. अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक यांचे ४०% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे. दिव्यांग (अनु. जाती व नवबौध्द घटकातील) विदयार्थ्यासाठी गुणवत्तेची टक्केवारी ४०% इतकी राहील, त्यासाठी त्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.

११. स्वाधार (Swadhar Yojana) योजनेंतर्गत महिलांसाठी ३०% समांतर आरक्षण किंवा शासन वेळोवेळी निर्धारित करेल त्याप्रमाणे आरक्षण अनुज्ञेय राहील.

१२. स्वाधार (Swadhar Yojana) योजनेंतर्गत निवड करण्यात आलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र होईल. मात्र विद्यार्थ्यांस प्रत्येक वर्षी त्या त्या अभ्याक्रमाच्या परिक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.

१३. स्वाधार (Swadhar Yojana) योजनेसाठी खासबाब सवलत लागू राहणार नाही.

क) इतर निकष

१. स्वाधार (Swadhar Yojana) योजनेचा लाभ इयत्ता १० वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांस अनुज्ञेय राहील. एका विद्यार्थ्यांस जास्तीत जास्त ७ वर्षे या योजनेचा लाभ घेता येईल. सदर योजनेस पात्र विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास अनुत्तीर्ण कालावधीमध्ये योजनेंतर्गत लाभ देण्यात येणार नाही. उत्तीर्ण झाल्यानंतर असा विद्यार्थी पुढील लाभास पात्र राहील. तथापि, उपरोक्त ०७ वर्षांचा कालावधी विचारात घेताना उत्तीर्ण व अनुत्तीर्ण अशा दोन्ही कालावधीची गणना करण्यात येईल. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी एका विद्यार्थ्यास जास्तीत जास्त ८ वर्षे सदर योजनेचा लाभ घेता येईल. याकरीता विद्यार्थ्याला स्वाधार (Swadhar Yojana) योजनेचा लाभ अनुज्ञेय होण्यासाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्षे इतकी राहील.

२. स्वाधार (Swadhar Yojana) योजनेसाठी पात्र ठरलेल्या ज्या विद्यार्थ्यांना पदवी/पदव्युत्तर पदवी हे शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करताना एटीकेटी (ATKT) प्राप्त झाली असेल त्या विद्यार्थ्यांला फक्त एकदाच या अटीतून सूट देण्यात येईल. (म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्यास दुसऱ्यावेळेस एटीकेटी (ATKT) मिळाल्यास तो विद्यार्थी स्वाधार (Swadhar Yojana) योजनेचा पुढील लाभ घेण्यास अपात्र असेल)

३. अभ्यासक्रमाच्या मध्यावधीत प्रवेश घेतलेला विद्यार्थी स्वाधार (Swadhar Yojana) योजनेच्या लाभास पात्र राहील.

४. शिक्षणात खंड पडलेला विद्यार्थी स्वाधार (Swadhar Yojana) योजनेच्या लाभासाठी पात्र असेल. तथापि, शिक्षणातील खंड हा २ वर्षापेक्षा जास्त असू नये, तसेच योजनेसाठी निश्चित केलेल्या वयोमर्यादेपेक्षा अधिक वयाचा नसावा.

५. विद्यार्थ्यास शासकीय वसतिगृह, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार (Swadhar Yojana) योजना किंवा व्यावसायिक पाठ्यक्रमाशी सलंग्न असणाऱ्या वसतिगृहात राहणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना विद्यावेतन योजना या तीन योजनांपैकी एकाच योजनेचा लाभ घेता येईल. जर एकच विद्यार्थी एकापेक्षा अधिक योजनेचा लाभ एकाच कालावधीत घेत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित विद्यार्थी फौजदारी गुन्ह्यास पात्र राहील व लाभार्थी विद्यार्थ्याने जो आर्थिक लाभ घेतला आहे ती रक्कम १२ % व्याजासह वसूल करण्यात येईल.

६. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा.

७. विद्यार्थ्याने प्रत्येक सत्र परिक्षेचा निकाल १५ दिवसांचे आत संबधित गृहपालांना सादर करणे बंधनकारक असेल.

८. विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांनी स्वाधार (Swadhar Yojana) योजनेमध्ये फसवणूक केल्याचे आढळल्यास संबंधित विद्यार्थी व शैक्षणिक संस्था कायदेशीर कारवाईस पात्र राहील. तसेच योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्याने शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न करता लाभ घेणे, शिक्षण न घेता नोकरी/व्यवसाय करुन या योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यास असा विद्यार्थी कारवाईस पात्र राहील व सदर योजनेंतर्गत दिलेल्या लाभाच्या रक्कमेची १२% व्याजासह वसुली करण्यात येईल.

ड) अनुदान वितरण :-

१. स्वाधार (Swadhar Yojana) योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी ज्या जिल्ह्यामध्ये शिकत आहे, त्या जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे त्या विदयार्थ्यांनी अर्ज करावा. त्यानुसार सबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण हे विदयार्थ्यांची निवड करतील आणि पात्र लाभार्थ्यांस जवळचे मागासवर्गीय मुला/मुलींचे वसतीगृहांचे गृहपाल यांचेशी संलग्न (Attach) करतील.

२. विद्यार्थ्यांचा प्रवेश ज्या वसतीगृहाशी सलंग्न करण्यात येईल, त्या वसतीगृहाच्या गृहपालाने सादर केलेल्या महाविद्यालयीन उपस्थितीच्या आधारे संबंधीत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण हे प्रत्येक सहामाहीस (सहा महिने) अनुज्ञेय रक्कम संबधित विद्यार्थ्यांच्या आधार सलंग्न बैंक खात्यामध्ये जमा करतील.

३. शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्याने संबंधित शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर सदर योजनेंतर्गत अनुज्ञेय रक्कमेपैकी पहिल्या तिमाहीची रक्कम आगाऊ देण्यात येईल.

४. स्वाधार (Swadhar Yojana) योजनेंतर्गत लाभास पात्र असलेल्या विद्यार्थ्यास भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत प्राप्त होत असलेल्या निर्वाह भत्त्याची रक्कम वजावट करून, उर्वरीत निर्वाह भत्ता, भोजन भत्ता, निवास भत्ता, याची रक्कम अदा करण्यात येईल.

५. विद्यार्थ्याची महाविद्यालयातील उपस्थिती किमान ७५% आवश्यक राहील, याबाबत विद्यार्थ्यास संबंधित संस्थेचे प्रत्येक तिमाहीस उपस्थिती प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहिल. तसेच विद्यार्थ्यांची प्रगती, शिस्त व वर्तणुक समाधानकारक असावी.

६. विद्यार्थ्याने अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक राहील.

७. स्वाधार (Swadhar Yojana) योजनेचा लाभ केवळ पूर्ण वेळ अभ्यासक्रमासाठीच लागू राहील. अर्धवेळ अभ्यासक्रम, दुरस्थ व बहिस्थ अभ्यासक्रम, नोकरीसह करण्यात येणारा Executive Course यासाठी सदर योजनेचा लाभ देण्यात येणार नाही.

८. स्वाधार (Swadhar Yojana) योजनेकरिता सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणुन घोषीत करण्यात येत आहे.

योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रेः-

१. भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवाशी नसल्याचे पतिज्ञापत्र (नोटरी).

२. विद्यार्थ्याने सादर केलेली माहिती खरी व अचूक असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र.

३. कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे प्रमाणपत्र.

४. भाड्याने राहत असल्याबाबतचे भाडे चिठ्ठी व भाडे करारनामा.

५. महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा.

ई) संनियत्रण.

१. आयुक्त, समाजकल्याण आयुक्तालय, पुणे यांनी सर्व प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण यांना त्याच्या विभागाचे उद्दीष्ट ठरवुन द्यावे. प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण यांनी अर्जाच्या उपलब्धतेनुसार त्यांच्या विभागातील सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांना उद्दीष्ट ठरवुन द्यावे. प्रादेशिक विभागांतर्गत उद्दीष्ट कमी-जास्त करण्याचे अधिकार प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण यांना असतील. संबंधित प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण यांना देण्यात आलेले उद्दीष्ट जर पुर्ण होत नसेल, तर ते उद्दीष्ट इतर विभागांना वाटप करण्याचे अधिकार आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांना राहतील.

२. स्वाधार (Swadhar Yojana) योजनेवर सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण तसेच, संबंधित वसतीगृहाचे गृहपाल यांचे संनियंत्रण राहील

३. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी योजनेची महाविद्यालयीन स्तरापर्यंत प्रसिध्दी करावी व सदर बाबीवरील खर्च प्रती वर्ष, प्रति जिल्हा रु. ३ लक्ष मर्यादेपर्यंत संबंधित सहाय्यक आयुक्तांनी करावा. सदरचा खर्च हा योजनेच्या मंजुर तरतुदीमधून भागविण्यात यावा.

४. अर्जदाराने सादर केलेली कागदपत्रे व माहिती यांची आवश्यकतेनुसार पडताळणी करण्याचे अधिकार गृहपाल तसेच सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांना राहतील.

५. स्वाधार (Swadhar Yojana) योजनेच्या अंमलबजावणीची संपूर्ण जबाबदारी आयुक्त, समाजकल्याण, पुणे व सर्व प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण, व सर्व सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण तसेच गृहपाल यांची राहिल.

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय :

अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार (Swadhar Yojana) योजना शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

खालील लेख देखील वाचा !

  1. महाडीबिटी शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु – Apply Online For Maha DBT Scholarship
  2. लेडी मेहेरबाई डी टाटा एज्युकेशन ट्रस्ट शिष्यवृत्ती
  3. दीनदयाल स्पर्श योजना : भारतीय डाक विभागा मार्फत विद्यार्थ्यांना मिळणार ६ हजार रूपये प्रती वर्षी !
  4. १ ली ते पदवीधर विद्यार्थ्यांसाठी १५ ते ७५ हजार एचडीएफसी बँक स्कॉलरशिपसाठी ऑनलाईन अर्ज सुरु !
  5. अपार आयडी ‘एक राष्ट्र, एक ओळखपत्र’ प्रत्येक विद्यार्थ्याला बनवावे लागणार !
  6. शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.