महाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीमहाराष्ट्र शासन निर्णय - GRमहिला व बाल विकास विभागवृत्त विशेषसरकारी कामे

अंगणवाडी सेविकांची संपूर्ण माहिती – नियुक्ती प्रक्रिया, पात्रता, अटी व शर्ती

एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेतर्गत अंगणवाड्यांमधील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचा-यांच्या नियुक्तीसंदर्भात शासनाने यापूर्वी दिलेले आदेश व खालील शासन निर्णयातील संदर्भाधीन क्रमांक १ ते ३ येथील शासन निर्णय अधिक्रमित करून सुधारीत शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

अंगणवाडी सेविकांची संपूर्ण माहिती – नियुक्ती प्रक्रिया, पात्रता, अटी व शर्ती :-

एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेतर्गत अंगणवाड्यांमधील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचा-यांच्या नियुक्तीसंदर्भात शासनाने यापूर्वी दिलेले आदेश व संदर्भाधीन क्रमांक १ ते ३ येथील शासन निर्णय अधिक्रमित करुन खालीलप्रमाणे विहित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

थेट नियुक्ती :-

अ) एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत राज्यात ज्या ठिकाणी नवीन अंगणवाडया सुरु करण्यात येतील, अशा ठिकाणी यापूर्वी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका व कॅन्टोनमेंट बोर्ड (कटक मंडळे) समाज कल्याण विभाग, शिक्षण विभाग, केंद्रीय राज्य समाज कल्याण सल्लागार बोर्ड यांच्या बालवाडया सुरु असतील तर, अशी बालवाडी बंद करण्यात येऊन जर तेथील बालवाडी शिक्षिका १२ वी उत्तीर्ण असेल तर तिला नविन अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका” या मानधनी पदावर थेट नियुक्ती देण्यात यावी. यासाठी बालवाडी शिक्षिका म्हणून तिची किमान दोन वर्ष सेवा पूर्ण झालेली असावी व अशी बालवाड़ी अंगणवाडी केंद्र सुरु करतेवेळी कार्यरत असावी. या तरतूदीनुसार खाजगी अथवा स्वयंसेवी संस्थेमार्फत (जरी कोणत्याही विभागाकडून अनुदान मिळत असेल तरीही) चालविण्यात येणा-या बालवाडी केंद्रातील शिक्षिकांना अंगणवाडी सेविका म्हणून थेट नियुक्तीसाठी विचार करता येणार नाही.

ब) मिनी अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडी केंद्रांत रुपांतर झाल्यास मिनी अंगणवाडी सेविकेस जर ती किमान १२ वी पास असेल तर तिला अंगणवाडी सेविका म्हणून थेट नियुक्ती देण्यात यावी.

क) अंगणवाड़ी सेविकेचे पद रिक्त झाले असेल अथवा या क्षेत्रात नवीन अंगणवाडी केंद्र सुरु करावयाचे असेल तर त्या गावातील (ग्रामपंचायत नव्हे तर महसुली गाव) कार्यरत अंगणवाडी केंद्राच्या मदतनीस / मिनी अंगणवाडी सेविकेला सेवाज्येष्ठतेप्रमाणे शैक्षणिक अर्हता, स्थानिक रहिवाशी अट व मदतनीस किंवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून २ वर्षाची सेवा या अटींची पुर्तता करीत असल्यास तिला “अंगणवाडी सेविका म्हणून थेट नियुक्ती देण्यात यावी. त्या क्षेत्रातील एकापेक्षा जास्त मदतनीस / मिनी अंगणवाडी सेविकेचा अनुभव कालावधी समान असल्यास जास्त शिक्षण असलेल्या मदतनीस / मिनी अंगणवाडी सेविकेला प्राधान्य द्यावे. एखाद्या प्रकरणी अनुभव व शिक्षण समान असल्यास जास्त वय असलेल्या मदतनीस / मिनी अंगणवाडी सेविकेला प्राधान्य देण्यात यावे.

(ङ) नागरी प्रकल्पामधील कार्यरत अंगणवाडी केंद्रांच्या मदतनीस यांना सेवाजेष्ठतेप्रमाणे शैक्षणिक अर्हता स्थानिक रहिवाशी अट व मदतनीस म्हणून २ वर्षांची सेवा या अटींची पुर्तता करीत असल्यास तिला “अंगणवाडी सेविका म्हणून थेट नियुक्ती देण्याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करावी.

(१) जर एखादा नागरी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प हा एकाच महानगरपालिका / नगरपालिका/ नगरपंचायत क्षेत्रात कार्यान्वित असेल तर त्या नागरी बाल विकास प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेचे पद रिक्त झाल्यास अथवा या क्षेत्रात नवीन अंगणवाडी केंद्र सुरु करावयाचे असल्यास त्या संपूर्ण प्रकल्पाच्या अधिनस्त अंगणवाडी केंद्रातील मदतनीसांची एकत्रित सेवाजेष्ठता यादी करून सेवाजेष्ठतेनुसार थेट नियुक्ती देण्याबाबतची कार्यवाही करावी. तसेच एखाद्या नागरी प्रकल्पामधील महानगरपालिका एकापेक्षा अनेक शहरांची मिळून असेल अशा प्रकल्पातील अंगणवाडी मदतनीसांची एकत्रित सेवाजेष्ठता केल्यानंतर त्या प्रकल्प क्षेत्रातील अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्ती करताना तिला समुपदेशनाद्वारे नियुक्ती / पदस्थापना देण्याबाबतची कार्यवाही करावी.

२) जर एखादा नागरी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प हा एकापेक्षा अधिक महानगरपालिका / नगरपालिका / नगरपंचायत क्षेत्रात कार्यान्वित असेल तर त्या प्रकल्पामधील संबंधित महानगरपालिका / नगरपालिका / नगरपंचायत क्षेत्रातील अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेचे पद रिक्त झाल्यास अथवा या क्षेत्रात नवीन अंगणवाडी केंद्र सुरु करावयाचे असल्यास संबंधित महानगरपालिका / नगरपालिका / नगरपंचायत क्षेत्रनिहाय कार्यरत अंगणवाडी केंद्रामधील अंगणवाडी मदतनीसांची स्वतंत्र सेवाजेष्ठता याच्या करून त्यानुसार थेट नियुक्ती देण्याबाबतची कार्यवाही करावी.

इ) ग्रामीण / आदिवासी प्रकल्पांचे बाबतीत स्थानिक शब्दाचा अर्थ पुढीलप्रमाणे समजण्यात यावा :- ग्रामीण / आदिवासी प्रकल्पांचे बाबतीत संपूर्ण महसुली गाव, ज्यात वाडी / वस्ती / पाडे यांचा समावेश असेल, ते स्थानिक समजण्यात यावेत.

फ) अंगणवाडी मदतनीस / मिनी अंगणवाडी सेविका यांना अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्तीचा लाभ देण्यात आल्यानंतर अशा अंगणवाडी सेविकांना त्यांचे निवासस्थानापासून नियुक्ती देण्यात आलेल्या ठिकाणापर्यंत कोणताही प्रवास भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

अंगणवाडी सेविका / मिनी अंगणवाडी सेविका / मदतनीस पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अटी व शर्ती:

थेट नियुक्तीची प्रकरणे निकाली काढल्यानंतर रिक्त राहणा-या तसेच सेवानिवृत्तीमुळे अथवा अन्य कारणामुळे पद रिक्त झाल्यानंतर ३० दिवसांचे आत जाहिरात देऊन ही रिक्त पदे तसेच नविन निर्माण पदे सरळ नियुक्तीने (By Nomination) भरण्यासाठी अर्ज मागविण्यात यावेत. त्यानुसार उमेदवारांची निवड करण्यात यावी. यासाठी अटी व शर्ती खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहेत.

(अ) शैक्षणिक पात्रता :- अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस पदासाठी इयत्ता १२ वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक राहील.

(ब) वास्तव्याची (स्थानिक रहिवाशी असणे) अट: ग्रामीण आणि आदिवासी प्रकल्पातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदावर फक्त त्या गावातील ग्रामपंचायत नव्हे तर महसुली गाव / वाडी / वस्ती / पाडे यासह व नागरी प्रकल्पाचे बाबतीत त्या महानगरपालिका / नगरपालिका / नगरपंचायत मधील रहिवाशी व जर एखाद्या महानगरपालिकेमध्ये एकापेक्षा जास्त प्रकल्प असल्यास त्या प्रकल्पाच्या नागरी क्षेत्रातील रहिवाशी असतील त्यांनाच स्थानिक समजावे.

(क) वयाची अट :- अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदावर सरळ नियुक्तीसाठी (By Nomination) वयोमर्यादा किमान १८ व कमाल ३५ वर्षे अशी राहील. तथापि, विधवा उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा कमाल ४० अशी राहील. परंतु, वरील परिच्छेद १ च्या अ, ब, क आणि ड खालील तरतूदीनुसार करण्यात येणा-या थेट नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादेची अट लागू राहणार नाही.

(ङ) लहान कुटुंब :- अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या पदांवरील थेट व सरळ सेवेने नियुक्ती साठी लहान कुटुंबाची अट खालीलप्रमाणे लागू राहील.

1) लहान कुटुंब याचा अर्थ, उमेदवारास जास्तीत जास्त दोन हयात अपत्ये.

( उमेदवाराला दोन हयात अपत्यांपेक्षा (दत्तक दिलेल्या अपत्यांसह अधिक अपत्य असल्यास उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही. जर सदर बाब नियुक्तीनंतर निदर्शनास आल्यास उमेदवाराला सेवेतून तात्काळ सेवामुक्त करण्यात येईल. तसेच सेवा कालावधीमध्ये त्यास दोन हयात अपत्य (दत्तक दिलेल्या अपत्यांसह) असून देखील तिसरे अपत्ये झाल्यास त्यांच्या सेवा समाप्त करण्यात याव्यात.

(इ) भाषेचे ज्ञान:- ज्या अंगणवाडी / मिनी अंगणवाडी केंद्राकरीता अंगणवाडी सेविकेची / मदतनीसची / मिनी अंगणवाडी सेविकेची नियुक्ती करावयाची आहे, अशा अंगणवाडीमध्ये ५०% पेक्षा जास्त मुले मराठी भाषा व्यतिरिक्त इतर भाषा (उदा. उर्दू, हिंदी, माडिया, गोड, कोकणी, पाचरी, कन्नड, कोरकू, तेलगू, भिल्लोरी, बंजारा इत्यादी पैकी एक भाषा बोलणारी असतील तर तेथील अंगणवाडीमध्ये सेविका / मदतनीस / मिनी अंगणवाडी सेविका यांच्या पदावर सदर भाषेचे ज्ञान असलेल्या (लिहिता व वाचता येणे) उमेदवाराची नियुक्ती करण्यात यावी. तथापि, अशा उमेदवाराने इयत्ता १० वी अथवा परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हतेपैकी किमान एक अर्हता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक राहील. सदर अंगणवाडी केंद्रांची यादी आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई यांना कळविण्यात यावी. याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची राहील. तसेच वरील निदेशानुसारच भरती प्रक्रिया संपूर्ण जिल्हयामध्ये नियमानुसार होत असल्याची खातरजमा करण्याची अंतिम जबाबदारी ही ग्रामीण भागात संबंधित जिल्हयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांची तर नागरी भागात संबंधित विभागाचे विभागीय उपआयुक्त (महिला व बाल विकास विभाग) यांची राहील.

(ई) विधवा व अनाथ उमेदवारांबाबत तरतूद : विधवा व अनाथ उमेदवारांच्या बाबतीत अशा उमेदवारास “परिशिष्ट अ मध्ये नमूद केल्यानुसार १० अतिरिक्त गुण कागदपत्र पडताळणी अंती पहिली गुणवत्ता यादी तयार करताना देण्यात यावेत.

(फ़) बदली:- अंगणवाडी कर्मचारी हे एकाकी पद असल्यामुळे तसेच ती स्थानिक रहिवाशी असावी या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेता अंगणवाडी कर्मचा-यांना बदलीचे कोणतेही प्रावधान राहणार नाही.

पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करून प्रसिध्द करणे :-

अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांची पदे रिक्त झाल्यानंतर अथवा नवीन केंद्र मंजुर झाल्यानंतर संबंधित क्षेत्रात थेट नियुक्तीबाबत तात्काळ निर्णय घेऊन जेथे पदे रिक्त राहतील त्याबद्दल ३० दिवसांच्या आत ग्रामीण / आदिवासी प्रकल्पाचे बाबतीत गावाच्या ग्रामपंचायत / चावडी / सार्वजनिक वाचनालये/ प्राथमिक शाळा / इतर सार्वजनिक ठिकाणी जाहीर सूचना लावून तसेच २/३ दिवशी दवंडी पिटवून जाहिरात करावी. नागरी क्षेत्राच्या बाबतीत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मुख्यालय तसेच प्रभाग कार्यालये यांच्या नोटीस बोर्डवर (सर्वांना माहित होईल अशा ठिकाणी जाहिरात लावून तसेच स्थानिक वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द करुन अर्ज मागविण्यात यावेत.

जाहिरात प्रसिध्द केल्याच्या दिनांकापासून १० कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांत प्राप्त होणा-या अर्जांची छाननी करून उमेदवारांची प्राथमिक यादी ज्यात शिक्षण, विधवा व अनाथ, प्रवर्ग इत्यादीसाठी त्यांच्या प्रमाणपत्रावरुन त्यांना परिशिष्ट “अ” प्रमाणे निश्चित गुण देऊन परिशिष्ट “ब” मध्ये उल्लेख केलेल्या तक्त्याप्रमाणे नोटीस बोर्डावर १५ दिवसांच्या आत प्रसिध्द करण्यात यावी, पदवी व पदव्युत्तर गुणवत्तेच्या बाबतीत पदवी अथवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असावे. त्याशिवाय याकरिता विहित केलेले गुण ग्राह्य धरण्यात येऊ नयेत. जाहिरात प्रसिध्द केल्यापासून ९० दिवसांत भरती प्रक्रियेची सर्व कार्यवाही पूर्ण करावी. भरती प्रक्रियेसंदर्भात काही अडचणी निर्माण झाल्यास त्याबाबत आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांचे मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे कार्यवाही करावी.

सदर गुणवत्ता यादी परिशिष्ट “अ” मध्ये नमूद करण्यात आलेल्या गुणांप्रमाणे जाहीर करण्यात यावी त्यामध्ये सर्वात जास्त गुण असलेल्या उमेदवाराचे नाव सर्वात वर व त्यापेक्षा गुणानुक्रमे कमी गुण प्राप्त असलेल्या उमेदवाराचे नाव त्याखाली याप्रमाणे असावे. परंतु, उमेदवाराची निवड निश्चित करतांना एकापेक्षा जास्त उमेदवारांना सारखेच गुण प्राप्त झाल्यास अशा प्रसंगी सर्वात जास्त शैक्षणिक अर्हता असलेल्या उमेदवाराची निवड करावी. शैक्षणिक पात्रता सुध्दा समान असल्यास जास्त वय असलेल्या उमेदवाराची निवड करावी. सदर निकष लागूनही गुणवत्ताक्रम समान येत असल्यास चिठ्ठी टाकून निवड करावी. अर्ज प्राप्त करण्याच्या अंतिम तारखेनंतर ५ दिवसांच्या आत गुणवत्ता यादी तयार करावी. त्यानंतर १० दिवसांच्या आत गुणवत्ता यादी पडताळणी समितीची मान्यता घेऊन जिल्ह्याचे कार्यालय, संबंधित पंचायत समिती / बाल विकास प्रकल्प कार्यालय व संबंधित क्षेत्राच्या नोटीस बोर्डावर लावण्यात यावी. सदर यादी प्राथमिक असून उमेदवारांनी स्वतः दिलेल्या माहितीच्या तसेच अर्जासोबतच्या प्रमाणपत्रांच्या आधारावर लावण्यात यावी. उदा. शिक्षण, वय, प्रवर्ग, अपत्य, विधवा इ. तसेच नोटीस बोर्डावरील यादीतील कोणत्याही उमेदवाराचे प्रमाणपत्र व त्याबाबतचे दिलेले गुण याबाबत तक्रार असल्यास अर्ज केलेल्या उमेदवारांनी, यादी घोषित केल्याच्या दिनांकापासून १० दिवसांच्या आत संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करावी. तक्रारीची १० दिवसांच्या आत शहानिशा करून, जर उमेदवाराच्या एकूण गुणात बदल झाला असेल तर तशी लाल शाईने गुणवत्ता यादीत (MERIT LIST) सुधारणा करण्यात यावी.

जाहिरातीनुसार केलेल्या अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची काळजीपूर्वक तपासणी करुन घ्यावी. अर्जासोबत असलेल्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती सक्षम प्राधिका-याकडून साक्षांकित केलेल्या असाव्यात. ज्या प्रमाणपत्रात खाडाखोड असेल किंवा त्या प्रमाणपत्राबाबत शंका वाटत असल्यास, मुळ प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊन सदर कागदपत्रांची सत्यता पडताळून पहावी.

वरीलप्रमाणे प्राप्त तक्रारीची शहानिशा झाल्यानंतर व सखोल तपासणी केल्यानंतर सुधारीत केलेल्या यादीमधील भरावयाच्या पदासाठी गुणानुक्रमानुसार उमेदवारांची निवड करण्यात यावी.

कमी उमेदवारांकडून प्रतिसाद: जर पहिली जाहिरात दिल्यानंतर एकाही पात्र उमेदवाराकडून अर्ज प्राप्त झाला नाही किंवा फक्त एकच पात्र उमेदवाराकडून अर्ज प्राप्त झाला, तर संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी पुनश्चः ८ दिवस कालावधीसाठी योग्य प्रसिध्दी देऊन फेर जाहिरात यावी. त्यानंतर देखील अर्ज प्राप्त झाले नाहीत अथवा एकच पात्र अर्ज प्राप्त झाला तर पुनः ८ दिवसांच्या कालावधीसाठी जाहिरात प्रसिध्द करावी. त्यानुसार या दोन मुदतवाढ देण्यात आल्यानंतर देखील केवळ एकाच पात्र उमेदवाराचा अर्ज प्राप्त झाला असेल तर त्या उमेदवाराची निवड करण्यात यावी. मात्र त्या उमेदवाराचे कागदपत्र व दाखले संबंधित शासकीय यंत्रणेमार्फत पडताळून घ्यावे.

गुणवत्ता यादी पडताळणी समिती:- अर्ज प्राप्त करण्याच्या अंतिम तारखेनंतर ५ कार्यालयीन कामकाजाच्या दिवसात बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी गुणवत्ता यादी अंतिम करून पडताळणी समितीकडे सादर करावी. पडताळणी समितीने सदर गुणवत्ता यादी सादर झाल्यापासून पडताळणीची कार्यवाही १० कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांत आत पूर्ण करावी. त्यानुसार गुणवत्ता यादी विहित पध्दतीने व अर्जासोबतच्या प्रमाणपत्रांच्या आधारावर केल्याची खात्री पडताळणी समितीने करावी. सदर गुणवत्ता यादी पडताळणी समितीमध्ये पुढीलप्रमाणे अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश राहील,

  • दुस-या नजीकच्या प्रकल्पाचे बाल विकास प्रकल्प अधिकारी
  • प्रकल्पातील एक कर्मचारी
  • प्रकल्पातील एक पर्यवेक्षिका / मुख्यसेविका
  • इतर प्रकल्पातील एक कर्मचारी

सदर गुणवत्ता यादी पडताळणी समितीची नियुक्ती ग्रामीण व आदिवासी प्रकल्पाकरीता संबंधित जिल्हयाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास), जिल्हा परिषद तर नागरी प्रकल्पाकरिता संबंधित प्रकल्पाचे विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास विभाग यांनी करावी.

प्रतिक्षा यादी :- एकूण प्राप्त आलेल्या गुणांच्या आधारावर (Merit List) उमेदवाराची प्रतिक्षा यादी ठेवण्यात यावी. काही कारणामुळे जर उमेदवार नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून ३० दिवसांपर्यंत रुजू झाला नाही किंवा त्यास अपात्र ठरविण्यात आले, तर प्रतिक्षा यादीतील गुणानुक्रमानुसार उमेदवारास नियमानुसार त्वरीत नियुक्ती यावी व सदर क्षेत्रात अंगणवाडी सेविकेने / मदतनीसने / मिनी अंगणवाडी सेविकेने राजीनामा दिल्यास अथवा अन्य कारणास्तव पद रिक्त झाले अथवा नवीन अंगणवाडी मंजूर झाली तरीही प्रतिक्षा यादीतील उमेदवारास गुणानुक्रमानुसार थेट नियुक्ती देण्यात यावी यासाठी पुन्हा अर्ज मागविण्याची गरज राहणार नाही. सदर प्रतिक्षा यादी निकाल जाहीर झाल्यापासून एका वर्षापर्यंत वैध राहील.

नियुक्ती झाल्यानंतरची कार्यवाही :- उमेदवाराची अंतिम निवड झाल्यानंतर बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी तातडीने नियुक्ती आदेश (Appointment Letter)द्यावेत व त्यांना येत्या पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेपासून रुजू करुन घ्यावे, संबंधित अंगणवाडी पर्यवेक्षिका / मुख्यसेविका यांनी त्यांना त्वरीत प्रशिक्षण देण्याची सुरुवात करावी, नवीन नेमणुका झालेल्या अंगणवाडी सेविकांनी सेविकेच्या मासिक बैठकीत उपस्थित राहण्याची सुरुवात करावी. नवीन अंगणवाडी कार्यकर्तीची नेमणूक झाल्यानंतर त्यांना पायाभूत प्रशिक्षण मिळेपर्यंत स्थानिक पातळीवर किमान २ ते ३ दिवसाचे प्राथमिक (विषयाची तोंडओळख Induction Training) प्रशिक्षण देण्यात यावे व यासाठी आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांनी संनियंत्रण करावे व मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात.

नवीन अंगणवाड़ी सुरु करण्याची जबाबदारी नवनियुक्त सेविका व मदतनीस यांची राहील. जुन्या अंगणवाडी सेविकेपासून दैनंदिन कामे शिकावीत. नवीन अंगणवाडीसाठी स्वतंत्र इमारत उपलब्ध होईपर्यंत तातडीची व्यवस्था म्हणून भाड्याच्या इमारतीत किंवा इतर उपयुक्त जागेत (उदा. प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा खोली समाजमंदिर, इ) नवीन अंगणवाडी भरण्याची सुरुवात करावी व याची जबाबदारी नवीन अंगणवाडी सेविकेची राहील प्रत्यक्षात अंगणवाडी केंद्र सुरु झाल्यापासूनच सेविका / मदतनीस / मिनी अंगणवाडी सेविका यांना मानधन देय होईल. नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी करीत त्यांच्या कार्यक्षेत्रात लाभार्थीचे फेर सर्वेक्षण करण्याची सुरुवात करावी. जेणेकरून त्यांना लवकरात लवकर आहार व इतर सेवा पुरविण्याची सुरुवात करता येईल.

निवड प्रक्रियेविरुध्द तक्रार व अपिल करणे : अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी पदावरील घोषित निवडीसंदर्भात कोणत्याही उमेदवाराची त्याच्यावर अन्याय झाल्याची तक्रार असल्यास त्यांनी ग्रामीण व आदिवासी प्रकल्पाच्या बाबतीत संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद) व नागरी प्रकल्पाच्या बाबतीत संबंधित विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास विभाग यांचेकडे निवड यादी घोषित झाल्यापासून ३० दिवसाच्या आत तक्रार करावी. त्यानंतर आलेल्या तक्रारीची दखल घेण्यात येऊ नये. या अधिकाऱ्यांनी तक्रारीची सत्यता पडताळून निर्णय घ्यावा. आवश्यक असल्यास तक्रारदारास त्याचे म्हणणे मांडण्याची संधी देऊन (सुनावणी घेऊन निर्णय घ्यावा. अशाप्रकारे मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद) किंवा विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास विभाग यांनी दिलेल्या निर्णयामुळे तक्रारदाराचे समाधान झाले नसल्यास या अधिका-यांच्या निर्णयाविरुध्द ग्रामीण व आदिवासी प्रकल्पांच्या बाबतीत संबंधित विभागीय आयुक्त (महसूल) व नागरी प्रकल्पाच्या बाबतीत आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांचेकडे पुढील ६० दिवसात अपिल करता येईल.

सेवासमाप्तीसाठी वयाची अट: एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस हे मानधनी कर्मचारी असल्यामुळे त्यांना शासकीय कर्मचा-यांप्रमाणे नियत वयोमानाचे सेवानिवृत्तीच्या वयाची अट म्हणजे ५८ वर्षे वयाची अट लागू नाही, या शासन निर्णयान्वये नियुक्त होणा-या अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची सेवा ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा त्या शारीरिकदृष्ट्या काम करण्यास सक्षम नसल्यास यापैकी जे आधी घडेल तोपर्यंतच सुरु ठेवण्यात यावी. तथापि, सद्यस्थितीत कार्यरत अंगणवाडी कर्मचा-यांच्या बाबतीत संदर्भाधीन क्रमांक ४ येथील दिनांक ३० नोव्हेंबर, २०१८ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदी लागू राहतील.

गुणानुक्रमानुसार ज्या उमेदवारांची निवड केली असेल त्या उमेदवाराने अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या मूळ कागदपत्रांची तिला हजर करुन घेण्यापूर्वी न चुकता पडताळणी करुन घ्यावी. ज्या प्रकरणी कोणत्याही प्रकारची शंका असेल अशी प्रकरण तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावीत. निवड झाल्यानंतर खोटे प्रमाणपत्र सादर केल्याचे निदर्शनास आल्यास झालेली निवड रद्द करण्यात यावी तसेच कामावर रुजू करून घेतले असेल तर कामावरुन कमी करण्यात यावे.

सदर शासन निर्णयातील तरतुदी शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून पुढे देण्यात येणा-या जाहिरातींना लागू राहतील. तसेच ज्या ठिकाणी या शासन निर्णयापूर्वीच्या अटी व शर्तीनुसार जाहिराती देण्यात आल्या आहेत त्याठिकाणची भरती प्रक्रिया पूर्वीच्याच अटी-शर्ती नुसार ३० दिवसात पूर्ण करण्यात यावी. त्याप्रमाणे सदर भरती प्रक्रिया ३० दिवसात पूर्ण न झाल्यास भरती बाबतची संपूर्ण प्रक्रिया रद्द करण्यात यावी व सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार नव्याने जाहिरात देऊन भरती प्रक्रिया राबविण्यात यावी.

बाबएकूण गुणअंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका (किमान अर्हता १२ वी उत्तीर्ण)
शैक्षणिक अहर्ता द्यावयाचे गुण
शैक्षणिक अहर्ता ७५ गुणांपर्यंत१) बारावी
८०% पेक्षा जास्त६०
७०.०१ ते ८०%५५
६०.०१ ते ७०%५०
५०.०१ ते ६०%४५
५०% ते ४०%४०
टिप:- ज्या उत्तीर्ण उमेदवारांना ४० % पेक्षा कमी गुण असतील तर त्यांना सरासरी ३५ गुण ग्राह्य धरण्यात येतील.
२) पदवीधर५ पर्यंत
८०% पेक्षा जास्त
७०.०१% ते ८०%
६०.०१% ते ७०%
५०.०१% ते ६०%
४०.०१% ते ५०%
३) पदव्युत्तर
४) डी. एड.
५) बी. एड.
६) शासकीय मान्यता संस्थेचे संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र (MS-CIT)
अतिरीक्त गुण२५ गुणांपर्यंत
विधवा / अनाथ१०
अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती१०
इतर मागास प्रवर्ग / विमुक्त जाती / भटक्या जमाती / आर्थिकदृष्टया दुर्बल घटक / विशेष मागास प्रवर्ग
अंगणवाडी सेविका / मदतनीस / मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी २ वर्षांचा अनुभव असल्यास

टिप:-

  • निवड यादीत अर्ज केलेल्या उमेदवारांची नावे त्यांनी धारण केलेल्या शैक्षणिक अर्हतेनुसार व गुणपत्रिकेमध्ये मिळालेल्या गुणांच्या गुणानुक्रमानुसार व अतिरिक्त गुणांनुक्रमानुसार दर्शविण्यात यावीत.
  • यादीतील कोणत्याही उमेदवारांची वैयक्तिक माहिती खोटी असल्याची अर्ज केलेल्या उमेदवारांची तक्रार असल्यास, यादी प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसांच्या आत संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करावी. त्यानंतर प्राप्त झालेल्या तक्रारीची कोणत्याही परिस्थितीत दखल घेतली जाणार नाही.
  • प्रसिद्ध केलेल्या यादीतील कोणत्याही उमेदवारास मिळालेल्या गुणांबाबत तक्रार प्राप्त झाल्यास, तक्रारीची शहानिशा करून त्यानंतर निश्चित केलेल्या यादीतील गुणानुक्रमे रिक्त पदासाठी उमेदवाराची निवड करण्यात यावी.

महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – आशा स्वयंसेविकांची संपूर्ण माहिती – नियुक्ती प्रक्रिया, प्रशिक्षण, मानधन आणि जबाबदाऱ्या/कामे

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.