सातबारावर नाव लावून घेण्यासाठी काय केले पाहिजे? जाणून घ्या महत्वाच्या बाबी
आपण या लेखात सातबारा नावावर लावताना महत्वाच्या बाबी कोणत्या याची सविस्तर माहिती घेणार आहोत. प्रत्येकाला कधी ना कधी सातबारावर किंवा मिळकत पत्रिकेवर नाव लावण्याचा प्रसंग येतो, तलाठी कार्यालयातील भ्रष्टाचार आणि अडवणुकीला सामोरे जावे लागते, अशावेळी लाच न देता सातबारावर नाव लावून घेण्यासाठी काय केले पाहिजे, याविषयी माहिती घेऊ. जेणे करून तुमचे काम सहज आणि सोपे होईल.
सातबारावर नाव लावून घेण्यासाठी काय केले पाहिजे?
खरेदी खत, अभिहस्तांतरण, गहाणखत व इतर हक्क संपादन केल्यावर, विहित नमुन्यात तलाठी कार्यालयात अर्ज जमा करायचा. प्रत्येक अर्जावर तलाठ्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवही (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, 1971 मधील तरतुदीनुसार कार्यवाही करणे आवश्यक असते. अर्ज प्राप्त झाल्यावर तलाठ्याने फेरफार नोंदवहीमध्ये ताबडतोब नोंद केली पाहिजे. तलाठी फेरफार नोंदवही मध्ये नोंद करेल, त्या नोंदी ची संपूर्ण प्रत चावडी मध्ये ठळक ठिकाणी लावली पाहिजे, आता ऑनलाइन चावडीवर सूचना टाकली जाते. त्यानंतर अधिकार अभिलेख किंवा फेरफार नोंदवही वरून त्या फेरफारांमध्ये ज्यांचे हितसंबंध असण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींना लेखी कळवले पाहिजे. ही फेरफार नोंद पेन्सिलीने लिहिली जाते आणि फेरफार नोंद रीतसर प्रमाणित करण्यास आलेली नाही, असा शेरा लिहावा लागतो.
फेरफारावर हरकत न आल्यास:
फेरफारावर आक्षेप अथवा हरकत घेण्याचा कालावधी 15 दिवसांचा असतो, जर पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये आक्षेप अथवा हरकत न आल्यास मंडळ निरीक्षक अथवा भूमापन अधिकारी फेरफार नोंदवही मधील नोंद प्रमाणित करतो. ही प्रमाणित नोंद तलाठ्यांनी अधिकार अभी लेखांमध्ये शाईने अभीलिखित करायची असते. या संपूर्ण प्रक्रियेला जास्तीत जास्त ३० दिवस लागू शकतात. म्हणजे हरकत न आल्यास जास्तीत जास्त तीस दिवसात तुमचे नाव सातबारा व मिळकत पत्रिकेवर लागले पाहिजे.
फेरफारावर आक्षेप आल्यास:
फेरफार नोंदवहीमध्ये केलेल्या नोंदीवर तलाठ्याकडे मौखिक किंवा लेखी आक्षेप घेण्यात आल्यास, तलाठ्याने विवादग्रस्त प्रकरणांच्या विहित नोंदवहीमध्ये त्या आक्षेपाच्या तपशीलाची नोंद केली पाहिजे. तलाठ्याने आक्षेप घेणाऱ्या व्यक्तीला आक्षेप मिळाल्याबद्दल ची विहित नमुन्यातील लेखी पोच ताबडतोब दिली पाहिजे. त्यानंतर दोन्ही पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेऊन मंडळ निरीक्षक किंवा भूमापन अधिकारी फेरफार नोंद प्रमाणित करतात किंवा रद्द करतात. नोंद प्रमाणित केल्यास तलाठ्याने ती अधिकार अभिलेखा मध्ये शाईने अभीलिखित करायची असते आणि नोंद रद्द केल्यास अधिकार अभिलेखात पेन्सिलीने केलेली नोंद खोडून टाकायची असते.
तलाठी टाळाटाळ करत असल्यास?
काही अप्रामाणिक आणि भ्रष्ट तलाठी (वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने) फेरफार नोंदी धरण्यास टाळाटाळ करण्याची शक्यता असते.
त्यामुळे तलाठ्याला अर्ज केल्यावर चौथ्या पाचव्या दिवशीच माहिती अधिकार अंतर्गत अर्ज करून तुम्ही खालील माहिती घ्या .
१) (अर्ज केल्याचा दिनांक) रोजी केलेल्या अर्जावर आपल्या कार्यालयाने केलेल्या कार्यवाहीसंबंधित कागदपत्रांची साक्षांकित प्रत द्यावी.
२) जमीन महसूल अधिनियम कलम १५० (२) अन्वये सूचना काढली असल्यास त्याची एक प्रत देण्यात यावी, तसेच या फेरफारवर हरकत आली असल्यास विवादग्रस्त नोंदवहीतील संबंधित हरकत नोंद असलेल्या पृष्ठाची साक्षांकित प्रत देण्यात यावी.
३) (अर्ज केल्याचा दिनांक) रोजीच्या अर्जानंतर मंडळ अधिकारी यांनी आपल्या कार्यालयास भेट दिली असल्यास त्या दिवसाच्या मंडळ निरीक्षक यांच्या भेटीच्या नोंदींची साक्षांकित प्रत देण्यात यावी. लक्षात घ्या. असा माहिती अधिकार अंतर्गत अर्ज केल्यावर तुमचे काम मोठी झेप घेईल, तसेच जर अर्जात त्रुटी असतील, तर तुम्हाला कळवल्या जातील.
तलाठी दाद देतच नसेल तर ?
तलाठी माहिती अधिकार अंतर्गत अर्ज करूनही तुमच्या अर्जास दाद देत नसेल, तर मात्र तुम्ही शासकीय कर्तव्य पार पाडण्यास होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ (यालाच दप्तर दिरंगाई कायदा असेही म्हणतात.) मधील कलम १० चे उल्लंघन केल्याबाबत तलाठी आणि मंडळ निरीक्षक अथवा भूमापन अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी प्रधान सचिव (महसूल), विभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना लेखी तक्रार करा. ही तक्रार पोस्टाने पाठवा. त्यानंतर प्रधान सचिव महसूल, विभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना माहिती अधिकार अंतर्गत अर्ज करून तुमच्या तक्रारींवर केलेल्या कारवाईबाबत माहिती मागा, पाठपुरावा घ्या. दप्तर दिरंगाई कायद्यामधील कलम १० च्या तरतुदीनुसार प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याने त्यांच्याकडे आलेल्या अर्जावर ७ दिवस कार्यवाही सुरू करायची आहे, तसेच अर्ज ४५ दिवसांत निकाली काढायचा असतो.
हेही वाचा – गाव नमुना सातबारा (७/१२) उतारा म्हणजे काय? सातबारा उताऱ्या विषयीची संपूर्ण माहिती
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!
माझ्या भावाकडे माझी जमीन आहे ती मला स्वतः स्वतंत्र करून घ्यायची तिच्याकडून माझी जमीन घ्यायची आहे ती मला काय कराव लागेल