वृत्त विशेष

आषाढी वारीत सहभागी दिंड्यांना मिळणार वीस हजारांचे अनुदान

पंढरपूर आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या दिंड्याना वीस हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केली. यंदाची आषाढी वारी स्वच्छ, निर्मल आणि सुरक्षित व्हावी यासाठी शासन सर्वतोपरी नियोजन करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पंढरपूर तीर्थक्षेत्र आषाढी एकादशी वारी पालखी सोहळा पूर्व नियोजनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सह्याद्री अथितीगृह येथे विशेष बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.

या बैठकीत वारकरी प्रतिनिधींनी मागणी केल्यानुसार दौड येथील भीमा नदी काठी होणारा कत्तलखाना रद्द करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. या निर्णयाचे मी वारकरी संप्रदायाने टाळ्या आणि हरिनामाच्या गजरात स्वागत केले. आषाढी वारीसाठी वारकऱ्यांसाठी गटविमा योजना लागू करतानाच वारकऱ्यांच्या वाहनांना गतवर्षीप्रमाणेच यावेळीही टोल माफी देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी वारकऱ्यांच्या सुरक्षेबाबत गृह विभागाने आवश्यक त्या सर्व गोष्टीची वेळीच दखल घेऊन पुरेपूर तयारी करण्याचे निर्देश या बैठकीत दिले.

या बैठकीस आमदार समाधान आवताडे, मुख्य सचिव नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मख्य सचिव डॉ. आय. एस. चहल यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर, अक्षय महाराज भोसले, श्री. से विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या विश्वस्त माधवी निगडे-देसाई, यांच्यासह मानाच्या दहा पालख्यांचे प्रमुख उपस्थित होते. आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पुणे, सोलापूर आणि साताराचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

पालखीतील वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधांचे नियोजन होणार

आपाढी पालखी सोहळ्यादरम्यान पंढरपूर, पालखी मार्ग, पालखीतळ आदी ठिकाणी पाणी, वीज, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिले. विधान भवन येथे झालेल्या श्रीक्षेत्र देह व श्रीक्षेत्र आळंदी पालखी सोहळा-२०२४ पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर उपस्थित होते. पवार म्हणाले की, पालखी सोहळ्यासाठी फिरते शौचालय आणि टँकरची पुरेशी व्यवस्था करण्यात यावी. शौचालयाच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे. राज्य शासनाकडून पालखी सोहळ्यासाठी आवश्यक कामांसाठी उपलब्ध करून देण्यात येणारा निधी प्राप्त होईपर्यंत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खर्च करावा.

वारीसाठी जास्तीच्या एसटी बसेसची सुविधा

पालखी मार्ग असणाऱ्या रस्त्यांची दुरूस्तीसाठी विशेष लक्ष पुरवण्यात येत आहे. या मार्गालगतच्या वृक्ष लागवडीसाठी संबंधित यंत्रणांना देशी वाणाची झाडे लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वारीसाठी जास्तीच्या एसटी बसेसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. स्वच्छतेसाठी सक्षम आणि तज्ज्ञ यंत्रणाचा सहभाग घेण्यात येत आहे. पिण्याचे शुद्ध पाणी, दर्शन मंडपातील हवेशीर व्यवस्था, महिलांसाठी कपडे बदलण्यासाठीची स्वतंत्र आणि पुरेशी व्यवस्था, आरोग्य सुविधा- महाआरोग्य शिबीरांचे आयोजन, रुग्णवाहिकांची पुरेशी संख्या, मोबाईल स्वच्छतागृहांची उपलब्धता या सर्व बाबींचे काटेकोर नियोजन केल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.