पुढील वर्षापासून ‘युवा शेतकरी’ व ‘कृषि संशोधक’ पुरस्कार देणार
राज्यात दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शेतकरी व संस्थेस राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. नुकतीच कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सन २०१८ व २०१९ या दोन वर्षांच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. शेती क्षेत्रातील सर्वोच्च अशा डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील संजीव गणपतराव माने (सन २०१८ करिता), तर सन २०१९ करिता बारामती तालुक्यातील पिंपळी येथील राजेंद्र दिनकरराव पवार व नागपूर जिल्ह्यातील सोनेगाव येथील श्रीमती सुनंदा संतोषरावजी सालोटकर (जाधव) यांना जाहीर झाल्याची घोषणा कृषीमंत्र्यांनी केली आहे.
बैठकीस सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार, कृषि सचिव एकनाथ डवले, कृषि विस्तार संचालक विकास पाटील यावेळी उपस्थित होते.
शेती क्षेत्राशी संबधित डॉ पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित पुरस्कार, कृषिभुषण (सेंद्रिय शेती) व कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचेसाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार इत्यादि पुरस्कारांने प्रगतीशील शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येते.
पुढील वर्षापासून ‘युवा शेतकरी’, कृषि शास्त्रज्ञांसाठी ‘कृषि संशोधक’ पुरस्कार नव्याने सुरु करण्यात आल्याचे सांगून आता पुरस्कारांची संख्या ६३ ऐवजी ९९ इतकी केली असल्याचे व पुरस्कारांच्या निकषांमध्ये बदल केले असल्याचे कृषिमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.
आर्थिक व कृषि हवामान परिस्थिती अडचणीची असूनदेखील काही शेतकरी आपल्या परीने नवीन प्रयोग व नविन तंत्रज्ञानाचा अवलंब करून परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक होईल असे काम करीत आहेत. अशा शेतकऱ्यांच्या बाबत कृषि विभागाने स्वत: पुढाकार घेऊन संबंधित शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी पुरस्काराचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करावेत. याकामी तालुका कृषि अधिकारी यांच्यावर तालुक्यातील प्रस्ताव तयार करण्याची विशेष जबाबदारी देणार असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.
सन २०१८ व २०१९ साठीच्या पुरस्कारार्थींची नावे जाहीर करण्यात आली असून २०१८ मध्ये ५८ पुरस्कार आहेत. त्यामध्ये डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार एक, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार १०, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार एक, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार ३, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार २५, उद्यानपंडित पुरस्कार ८, कृषिभूषण (सेंद्रीय शेती) पुरस्कार ८, पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे-पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार २ अशा एकूण ५८ शेतकऱ्यांना जाहीर झाले आहेत. सन २०१९ साठी काही पुरस्कारांमध्ये पुरस्कारार्थींची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामध्ये डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार एक ऐवजी दोन जणांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर जिजामाता कृषिभूषण पुरस्कार पाच जणांना तर पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे-पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार दोन ऐवजी तीन जणांना देण्याचा निर्णय झाला असून उर्वरित अन्य पुरस्कारांमध्ये पुरस्कारार्थींची संख्या समान असल्याने २०१९ च्या पुरस्कारार्थींची संख्या ५८ वरुन ६४ झाली आहे.