वृत्त विशेष

संविधानाचा आदर : भारतीयांचे कर्तव्य (Constitution India)

स्वतंत्र भारताने 75 व्या वर्षात पदार्पण केले आहे. 2021 हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्ष म्हणून देशभरात साजरे केले जात आहे. केंद्र शासन ‘आझादी का अमृत महोत्सव’ ही टॅगलाईन वापरून हा महोत्सव साजरा करण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहे.

महाराष्ट्र राज्यातसुध्दा हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी विविध प्रसार माध्यमांमधील प्रचार व प्रसिध्दी दिमाखाने केली जात आहे. राज्य शासनाद्वारे विविध उपक्रम, योजना तसेच विविध माध्यमातून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. महाराष्ट्रात हा महोत्सव एका विशेष शैलीत आणि व्यापक स्वरुपात होताना दिसत आहे.

देशाच्या स्वातंत्र्याची ही 75 वर्ष यशस्वीरित्या पूर्ण होण्यामागे भारतीय संविधानाचा सिंहाचा वाटा आहे. संविधान नसते तर ? हा प्रश्न जरी मनात आला तरी अंगावर काटा उभा राहतो. याचे कारण आज आपण अफगाणिस्तानसारख्या देशाची परिस्थिती पाहिलीच आहे. संविधान नसते तर स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी गाठताच आली नसती, हे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यामुळे आजचा संविधान दिन प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि महत्त्वाचा आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि संविधानाच्या महत्त्वाची भारतीयांना जाणीव राहावी या उद्देशाने 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 26 नोव्हेंबर 1949 आणि 26 जानेवारी 1950 भारतीय इतिहासातील या दोन महत्त्वाच्या तारखा आहेत. 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण संविधानाचा स्वीकार केला होता, तर 26 जानेवारी 1950 रोजी हे संविधान संपूर्ण देशभर लागू करण्यात आले.

दुसऱ्या महायुद्धानंतर जुलै 1945 साली ब्रिटीश सरकारने भारताबद्दल त्यांची पुढची रणनीती काय असेल, याची घोषणा केली. 15 ऑगस्ट 1947 साली देश स्वतंत्र झाल्यानंतर संविधान निर्मितीबाबतच्या सभांना सुरुवात झाली. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस चर्चा, वादविवाद करून एकूण 12 अधिवेशने घेण्यात आली. यासाठीदेखील निवडणुका घेण्यात आल्या. संविधान सभेच्या पहिल्या बैठकीनंतरच भारत आणि पाकिस्तानची विभागणी झाली. त्यामुळे संविधान सभादेखील दोन भागात विभागली गेली.

भारताची संविधान सभा आणि पाकिस्तानची संविधान सभा असे संविधान सभेचे दोन भाग झाले. भारताचे संविधान लिहिणाऱ्या सभेमध्ये 299 सदस्य होते. आणि सभेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्रप्रसाद होते. तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे प्रारुप समितीचे अध्यक्ष होते. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे व विस्तृत संविधान आहे. यामध्ये 25 भाग, 448 अनुच्छेद आणि 12 परिशिष्ट आहेत. मूळ संविधानात 395 आर्टिकल्स आणि 9 परिशिष्ट होते. संविधानातील बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी व घटना इतर देशांच्या संविधानातून घेण्यात आल्या आहेत.

संविधानाबाबत अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत. संविधान लिहिण्यासाठी कोणतेही यांत्रिकी साधन वापरले गेले नाही. संपूर्ण संविधान हे हस्तलिखित आहे. दिल्ली येथील रहिवासी प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी स्वत:च्या हातांनी इटालिक शैलीत संपूर्ण संविधान हे प्रचंड पुस्तक लिहिले आहे. प्रेम बिहारी हे त्या काळातील सुप्रसिध्द सुलेखन लेखक होते. त्यांचे आजोबा रामप्रसाद सक्सेना कॅलिग्राफर होते. ते पर्शियन व इंग्रजी भाषेचे अभ्यासक होते. स्वातंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना संविधान हे प्रिंटऐवजी हस्तलिखित सुलेखात हवे होते.

पंडित जवाहरलाल नेहरूंनी प्रेम बिहारी यांना संविधान तिरक्या ( Italic Letters ) शैलीत लिहिण्यास विनंती केली. या लिखाणाबद्दल ते किती फी घेणार असे विचारले. प्रेम बिहारी यांनी नेहरूजींना सांगितले “एक पैसाही घेणार नाही. देवाच्या कृपेने माझ्याकडे सर्व गोष्टी आहेत आणि मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे.” असे बोलल्यानंतर त्यांनी नेहरूजींना विनंती केली की, “माझी एक अट आहे – घटनेच्या प्रत्येक पानावर मी माझे नाव लिहीन आणि शेवटच्या पानावर माझ्या आजोबांच्या नावाबरोबर माझे नाव लिहीन.

“नेहरूजींनी त्यांची विनंती मान्य केली. ही घटना लिहिण्यासाठी त्यांना घर देण्यात आले होते. तिथे बसून प्रेमजींनी संपूर्ण घटनेचे हस्तलिखित लिहिले. शांतिनिकेतनमधील नंदलाल बोस आणि त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी संविधानातील रिक्त जागा निर्दोष प्रतिमांनी भरल्या. मोहनजो दारो सील, रामायण, महाभारत, गौतम बुद्धांचे जीवन, सम्राट अशोक, बौद्ध धर्म, विक्रमादित्य, सम्राट अकबर व मुघल साम्राज्याची बैठक, महाराणी लक्ष्मीबाई, टीपू सुलतान, गांधीजींची चळवळ, नेताजी सुभाषचंद्र बोस हे सर्व प्रतिबिंबित आहेत. एकूणच हे भारताच्या इतिहासाचे आणि भूगोलाचे प्रतिबिंब आहे. घटनेतील मजकूर आणि परिच्छेदांनुसार त्यांनी चित्रे अतिशय विचारपूर्वक रंगविली.

संपूर्ण भारतीय संविधान घटनेची हस्तलिखित सहा महिने सभागृहात एका खोलीत लिहिली. संविधान लिहिण्यासाठी 251 पानांच्या चर्मपत्र कागदाचा (Parchment Paper) वापर करावा लागला. घटनेचे वजन 3 किलो 650 ग्रॅम आहे. घटना 22 इंच लांबी आणि 16 इंच रुंद आहे. प्रेम बिहारी यांचे 17 फेब्रुवारी 1986 रोजी निधन झाले. भारतीय राज्यघटनेचे मूळ पुस्तक आता संसद भवन दिल्लीच्या ग्रंथालयात जतन केले गेले आहे. नंतर, देहरादूनमधील सर्व्हे ऑफ इंडियाच्या देखरेखीखाली काही पुस्तके छापण्यात आली आहेत.

संविधानाचा आदर, सन्मान करणे हे प्रत्येक भारतीयाचे प्रथम कर्तव्य आहे. आज 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा होत आहे. चला तर, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संविधान दिन जल्लोशात साजरा करूया!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.