वृत्त विशेष

आदिवासी विकास विभागाकडून विद्यार्थ्यांना ‘स्वयं’ योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार कोरोना पार्श्वभूमीवर 2020-21 शैक्षणिक वर्षात इयत्ता 8 वी ते 12 वीचे वर्ग उशिरा सुरु झाले आहेत. त्याअनुषंगाने स्वयं योजनेसाठी 2019-20 व 2020-21 या वर्षात पात्र विद्यार्थ्यांना त्यांचा लाभ आयुक्तालयाकडून त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित होणार असल्याने अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी https://swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

प्रसिद्धीपत्रकात नमुद केल्यानुसार, आदिवासी विकास विभागाकडून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वसतिगृहात प्रवेश दिला जातो. परंतु शासकीय वसतिगृहाच्या मंजूर प्रवेश क्षमतेच्या अधीन आणि गुणवत्तेआधारे सर्व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना आदिवासी विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश देणे शक्य होत नाही. अशा प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी 2016 पासून ‘पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना’ विभागाकडून दरवर्षी राबविली जाते. यानुसार स्वयंम योजनेसाठी 2019-2020 वर्षातील पात्र विद्यार्थ्यांची प्रलंबित रक्कम विद्यार्थीच्या बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही आदिवासी विकास विभागाकडून करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2020-2021 शैक्षणिक वर्ष उशिरा सुरु झाले असल्याने स्वयंम योजनेसाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थीनी पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी https://swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत.

संपूर्ण राज्यात विभागीय व जिल्हा स्तरावर इयत्ता 12 वी नंतर विविध पदवी, पदव्युत्तर पदवी व 10 वी आणि 12 वीचे गुणांवर पदविका शिक्षण घेण्याकरिता शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेले विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये; या उद्देशाने विभाग, जिल्हा व तालुकास्तरावरील आदिवासी विभागांतर्गत कार्यान्वित असलेल्या वसतिगृहांच्या ठिकाणी उच्च अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजने अंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना भेाजनासाठी मुंबई शहर व उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे,पिंपरी-चिंचवड, नागपूरसाठी रूपये 32 हजार, इतर महसुली विभागीय शहरातील क वर्ग व महानगरपालिका क्षेत्राकरिता रूपये 28 हजार, इतर जिल्ह्याच्यां ठिकाणी रूपये 25 हजार तर तालुक्यासाठी रूपये 23 हजार अशी रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. तसेच निवासी भत्त्यासाठी मुंबई शहर व उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे,पिंपरी-चिंचवड, नागपूरसाठी रूपये 20 हजार, इतर महसुली विभागीय शहरातील क वर्ग व महानगरपालिका क्षेत्राकरिता रूपये 15 हजार, इतर जिल्ह्याच्यां ठिकाणी रूपये 12 हजार तर तालुक्यासाठी रूपये 10 हजार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरीत करण्यात येते. त्याचप्रमाणे निर्वाह भत्त्याच्या अनुषंगाने मुंबई शहर व उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे,पिंपरी-चिंचवड, नागपूरसाठी रूपये आठ हजार, इतर महसुली विभागीय शहरातील क वर्ग व महानगरपालिका क्षेत्राकरिता रूपये आठ हजार, इतर जिल्ह्याच्यां ठिकाणी रूपये सहा हजार तर तालुक्यासाठी रूपये पाच हजार बँक खात्यात हस्तारीत करण्यात येते.

यानुसार मुंबई शहर व उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर येथील प्रती विद्यार्थ्यांला प्रतिवर्षी रूपये 60 हजार, इतर महसुली विभागीय शहरातील क वर्ग व महानगरपालिका क्षेत्रातील प्रती विद्यार्थ्यांला प्रतिवर्षी रूपये 51 हजार, इतर जिल्ह्याच्या ठिकाणी प्रती विद्यार्थ्यांला प्रतिवर्षी रूपये 43 हजार तर तालुकास्तरावर प्रति विद्यार्थ्यांला प्रतिवर्षी रूपये 38 हजार इतकी रक्कम अदा करण्यात येते. तसेच शैक्षणिक बाबींसाठी वैद्यकीय व अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक पाच हजार आणि इतर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना वार्षिक दोन हजार रूपयांची रक्कम हस्तांतरीत करण्यात येते, अशी माहितीही आदिवासी विकास विभागाने प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.