गाव नमुना सातबारा (७/१२) उतारा म्हणजे काय? सातबारा उताऱ्या विषयीची संपूर्ण माहिती
गावातील बरेचजण नोकरीधंद्यानिमित्ताने किंवा इतर काही कारणाने आपल्या मूळ गावापासून इतर ठिकाणी म्हणजे शहरात किंवा इतरत्र स्थायिक झालेले असतात. त्यांची मूळ गावात काही वडिलोपार्जित किंवा स्वकष्टार्जित मिळकती तसेच जमिनीदेखील असतात. आपल्या आजी-आजोबा,आई-वडिलांच्या पिढीला जमिनीसंदर्भातल्या थोड्यातरी कायदेशीर बाबी ते त्या गावच्या ठिकाणी राहात असल्याने माहीत असायच्या. आपल्या पिढीला मात्र गावापासून लांब राहील्यामुळे सातबाराचे उतारे,फेरफारपत्रक्,वारसाहक्क व त्याबद्दलचे कायदे इत्यादीविषयी फार माहिती असलेली दिसत नाही. तेव्हा आपण सातबारा (७/१२) उतारा या जमिनीसंदर्भात अत्यंत महत्वाच्या अशा उतार्याची माहिती करुन घेणार आहोत.
आपल्या महाराष्ट्रा राज्यामध्ये जिल्हे, तालुके, गावे-खेडी यात विभागणी झालेली आहे. यात जे जमिनीचे क्षेत्र आहे, या सर्व क्षेत्रात सर्वसाधारणपणे जे डोंगर, नदी नाले व समुद्राच्या किनार्याच्या भरतीच्या खुणेपर्यंतचा जो भाग असतो तो शासकिय मालकीचा असतो. इतर राहिलेले जमिनीचे जे क्षेत्र असते त्यात शेतीसाठी वापरात असलेली जमिन, पडिक जमिन, माळरान जमिन, गावठाण अशा बर्याच प्रकारच्या जमिनीचा समावेश होतो.
जमीन खरेदी किंवा विक्री करताना अनेक गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. यामध्ये सातबारा (७/१२) हा महत्वाचा दस्तऐवज आहे. खरेदी किंवा विक्रीच्या जमीनीचे रेकॉर्ड थोडक्यात व विशिष्ट नमुन्यात ठेवल्याखेरीज सर्वांना समजणार नाही व त्यातील झालेले बदल देखील कळणार नाहीत. ७/१२ उतारा हा जोपर्यंत बेकायदेशीर ठरविला जात नाही, तोपर्यंत तो कायदेशीर आहे असेच मानले जाते. त्यामुळे तो जमीन मालकी हक्कासंदर्भात प्राथमिक पुरावा म्हणून मानतात. परंतु ७/१२ हा जमीन मालकीचा निर्णायक पुरावा मानता येत नाही.
सर्वसाधारणपणे दर दहा वर्षांनी ७/१२ पुस्तके नव्याने लिहीली जातात. ज्यांचा हक्क उरलेला नाही, अशा जुन्या नोंदी वगळून नव्याने ७/१२ उतारे लिहिले जातात. ७/१२ वरील मालकीहक्काच्या सदरातील किंवा इतर हक्कातील कोणतेही महत्वाचे लिखाण हे फेरफार नोंद केल्याशिवाय ७/१२ वर येऊ शकत नाही.
याचा अर्थ असा की, कोणत्याही शेतकऱ्याला जर अशी शंका आली की, पूर्वी अमुक नांव ७/१२ वर कसलाही कायदेशीर आधार नसतांना नोंदलेले आहे, तर त्याने जुने ७/१२ उतारे काढून, फेरफार नोंदीच्या नकला घेऊन ते नांव कशाच्या आधारे नोंदविले त्याची खात्री केली पाहिजे.
७/१२ उतारा हा प्रत्येक शेतकऱ्याला वाचता आला पाहिजे:
७/१२ उतारा हा जमीन खरेदी करताना महत्वाचा दस्तऐवज असल्याने त्याचे वाचन करूनच जमिनीचे निर्णय घेणे गरजेचे आहे. त्यासाठी पहिल्यांदा त्या सातबाऱ्याचे वाचन करणे प्रत्येक शेतकऱ्याला आले पाहिजे. उदाहरण घ्यायचे झाले तर रमेश नावाच्या शेतकऱ्याने त्याच्या मालकीची १ एकर जमीन ११ जानेवारी २००६ रोजी सुरेश नावाच्या शेतकऱ्यास रजिस्टर खरेदीखताने विकली. रजिस्टर दस्त ११ जानेवारी २००६ रोजीच नोंदवून घेतला. पण जर १२ जानेवारी २००६ रोजी या जमीनीचा मालक कोण असा प्रश्न विचारला तर खरेदीदार सुरेश हाच मालक ठरतो. परंतु १२ जानेवारी ला ७/१२ वर रमेश चे नाव असू शकते , कारण बऱ्याचवेळा जमीन खरेदी विक्रीनंतर ३-४ महिन्यांनी ७/१२ वर नोंदी होतात, म्हणून खरेदीदाराचा मालकीहक्क ३-४ महिन्यांनी निर्माण होतो असे नाही.
जमिनीचा सातबारा (७/१२) चा उतारा म्हणजे नेमक काय?
तलाठी कार्यालयामध्ये गाव नमुना सात आणि गाव नमुना बारा या दोन्ही नमुन्यातील माहिती एकमेकांना पूरक असल्यामुळे हे दोन्ही नमुने एकत्र, एकाच पानावर ठेवले गेले आहेत. त्यामुळे यांना “सातबारा” (७/१२) म्हणण्याचा प्रघात आहे. सातबारा हा जमिनीशी संबंधित आहे. (जमिनीची व्याख्या “महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ कलम २(१६) मध्ये नमूद आहे.)
सातबारा (७/१२) उतारा काय दर्शवितो?
गावातील प्रत्येक जमिनधारकास स्वत:कडे असलेली जमिन किती व कोणती हे सातबारा (७/१२) उतार्यावरून कळू शकते. गाव नमुना ७ हे अधिकारपत्रक आहे व गाव नमुना १२ हे पीकपाहणी पत्रक आहे.जमिन व महसूलाच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावच्या तलाठ्याकडे हे गाव नमुने असतात.
१) गाव नमुना ७:
या गाव नमुन्याला महसुली भाषेत “अधिकार अभिलेख पत्रक” असेही म्हणतात. “महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्तिथित ठेवणे) नियम १९७१” यातील नियम ३, ५, ६, आणि ७ मध्ये पहिल्यांदा सातबारा (७/१२) कसा तयार करावा याचे मार्गदर्शन केले गेले आहे.
गाव नमुना सातबारा (७/१२) मधील वरील भाग हा गाव नमुना सात असतो जो गाव नमुना सहा (फेरफाराची नोंदवही) ची सूची असतो. यात मुख्यत्वे तीन स्तंभ (रकाने) असतात. १) डावीकडील स्तंभ २) मध्य स्तंभ ३)उजवीकडील स्तंभ. सातबाऱ्याच्या वरील भागात प्रथम गावाचे (मौजे) नाव आणि नवीन 02-09-2020 च्या शासन निर्णया नुसार सोबत गावाचा कोड क्रमांक(LCD – Local Government Directory), तालुक्याचे नाव आणि जिल्ह्याचे नाव नमूद असते.
गाव नमुना ७ (02-09-2020 च्या नवीन शासन निर्णया नुसार):

१) गाव नमुना सात डावीकडील स्तंभ:
गाव नमुना सातच्या (गावाच्या, तालुक्याच्या, जिल्ह्याच्या नावाखाली), डावीकडील स्तंभात (रकान्यात) शेतजमीनीचा भूमापन क्रमांक व उपविभाग, (भूमापन क्रमांकाची व्याख्या “महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६, कलम २(३७) मध्ये नमूद आहे.) उपविभाग/पोट हिस्सा क्रमांक नमूद असतो. (उपविभाग/पोट हिस्सा क्रमांकाची व्याख्या “महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६, कलम २(३५) मध्ये नमूद आहे.) पोट हिस्स्यांची नोंद गाव नमुना सहा-ड मध्येही केली जाते.
याच्या खालील ओळीत त्या शेतजमिनीची भूधारण पद्धती (भोगवटादार वर्ग १ किंवा वर्ग २ किंवा शासकीय पट्टेदार) नमूद केली जाते.
भोगवटादार -१ म्हणजे ज्या शेतजमिनीचा मालक शेतकरी स्वतः असतो. अशा जमिनीची विक्री करण्यासाठी त्या शेतकऱ्यावर कोणतेही बंधन नसते किंवा कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नसते. अशा शेतजमिनीला बिनदुमाला किंवा खालसा जमीनही म्हणतात. ( भोगवटादार – वर्ग १ ची व्याख्या “महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६, कलम २९(२) मध्ये नमूद आहे.)
भोगवटादार -२ म्हणजे ज्या शेतजमिनीचा मालक शेतकरी स्वतः नसतो. अशा जमिनीचे हस्तांतरण करण्याचा हक्कावर शासनाचे निर्बंध असतात. अशा जमिनीची विक्री करण्यासाठी त्या शेतकऱ्यावर काही निर्बंध /अटी असतात. आणि त्यासाठी सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगी आणि काही सोपस्कार पूर्ण करण्याची आवश्यकता असते. अशा शेतजमिनीला दुमाला किंवा नियंत्रित सत्ता प्रकारची, शर्तीची जमीन असेही म्हणतात. ( भोगवटादार – वर्ग २ ची व्याख्या “महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६, कलम २९(३) मध्ये नमूद आहे.) भोगवटादार -२ ची नोंद गाव नमुना क्रमांक एक क मध्येही केली जाते.
शासकीय पट्टेदार म्हणजे ज्यांना ठराविक मुदतीसाठी शासनाकडून वहिवाटण्यासाठी भाडेतत्वावर जमीन देण्यात आली आहे असे शेतकरी. ( शासकीय पट्टेदार व्याख्या “महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६, कलम २(११) मध्ये नमूद आहे.)
गाव नमुना सातवर शेत जमिनीची धारणा पद्धतीच्या पुढे ओळीत त्या शेत जमिनीला ज्या स्थानिक नावाने ओळखले जाते असे स्थानिक नाव लिहले जाते.
स्थानिक नावाखालील ओळीत लागवडीयोग्य क्षेत्र लिहले जाते. या लागवडीयोग्य क्षेत्राचे (१) जिरायत क्षेत्र आणि (२) बागायत क्षेत्र असे प्रकार लिहले जातात. जिरायत क्षेत्र आणि बागायत क्षेत्र स्वतंत्रपणे लिहून त्याखाली त्या दोघांचे एकूण क्षेत्र लिहले जाते.
जिरायत क्षेत्र म्हणजे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेले क्षेत्र आणि बागायत क्षेत्र म्हणजे इतर सिंचन साधनांपासून (कालवा ,कुप नलिका ई.) पाणी मिळणारे क्षेत्र.
प्रचलित पद्धतीनुसार शेतीचे क्षेत्र हेक्टर-आर मध्ये लिहले जाते.
- एक आर म्हणजे १०७६ चौरस फूट किंवा शंभर चौरस मीटर
- एक एकर म्हणजे चाळीस आर किंवा चार हजार चौरस मीटर किंवा ४३०५६ चौरस फूट किंवा शून्य हेक्टर ४१ आर.
- एक हेक्टर म्हणजे शंभर आर किंवा २.४७ एकर किंवा दहा हजार चौरस मीटर
- नवीन 02-09-2020 च्या शासन निर्णया नुसार शेती क्षेत्रासाठी ‘हेक्टर आर चौरस मीटर’ हे एकक वापरण्यात येणार असून बिनशेती क्षेत्रासाठी ‘आर चौरस मीटर’ हे एकक वापरण्यात येणार आहे.
जिरायत आणि बागायत क्षेत्राच्या बेरजे खाली “पोटखराब क्षेत्र” लिहले जाते . पोटखराब क्षेत्र म्हणजे ज्या क्षेत्रात लागवड करता येणे शक्य नाही असे लागवडीयोग्य नसलेले क्षेत्र.
या पोटखराब क्षेत्राचे “वर्ग अ ” आणि “वर्ग ब”असे दोन भाग पडतात.
पोटखराब -वर्ग अ म्हणजे खडकाळ क्षेत्र ,नाले ,खंदक ,खाणी इत्यादीने व्याप्त असलेले क्षेत्र. पोटखराब -वर्ग अ अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रावर महसुलाची आकारणी करण्यात आलेली नसते. पोटखराब -वर्ग अ प्रकाराखाली येणारी जमीन शेतकऱ्यास कोणत्याही लागवडीखाली आणता येते. तथापि, अशी जमीन आकारणीस पात्र असणार नाही. पोटखराब वर्ग १ प्रकाराखाली येणाऱ्या जमिनीची आकारणी करायची असेल तेव्हा त्याबाबतचा प्रस्ताव तहसिलदारांमार्फत मा. जमाबंदी आयुक्त यांना सादर करून आदेश प्राप्त करावा लागतो. अशा आदेशानंतरच पोटखराब-वर्ग – अ प्रकाराखाली येणाऱ्या जमिनीची आकारणी करता येते. पोटखराब-वर्ग – अ प्रकाराखाली येणाऱ्या जमिनीत जर काही पिके घेतली असतील तर पीक पाहणीच्या वेळेस अशा पिकांची नोंद घेता येते.
पोटखराब वर्ग ब म्हणजे सार्वजनिक प्रयोजनार्थ म्हणजे रस्ते ,पदपथ किंवा जलप्रवाह ,कालवे, तलाव ,किंवा घरगुती प्रयोजनासाठी वापरण्यात येणारे तलाव. किंवा ओढा यांनी व्यापलेली किंवा कोणत्याही जाती -जमाती मार्फत दहनभूमी किंवा दफनभूमी म्हणून वापरात असणारी किंवा पाण्याची टाकी , रहिवास वापर अशा काही विशिष्ट प्रयोजनार्थ राखून ठेवलेली, आणि त्यामुळे लागवडीसाठी उपलब्ध नसलेले क्षेत्र. पोटखराब वर्ग ब क्षेत्रावर कोणत्याही प्रकारची आकारणी करण्यात येत नाही.
पोटखराब वर्ग अ आणि वर्ग ब याची क्षेत्र पडताळणी(जिल्हा भूमापन कार्यालयातील माहितीशी तसेच उपलब्ध अभिलेखातील लागवडीयोग्य नसलेल्या ( गाव नमुना एकचा गोषवारा ) क्षेत्राशी करावी.
पोटखराब वर्ग अ आणि वर्ग ब चे क्षेत्र स्वतंत्रपणे लिहून त्याखाली एकूण पोटखराब क्षेत्र लिहले जाते.
एकूण पोटखराब क्षेत्राखालील त्या शेतजमिनीसाठी आकारण्यात येणाऱ्या महसुलाची रक्कम लिहिली जाते. हि रक्कम “रुपये पैसे” या स्वरूपात लिहिली जाते व त्याप्रमाणे खातेदाराकडून जमीन महसूल स्वरूपात तलाठी यांच्या मार्फत वसुल केली जाते. (जमीन महसुलाची व्याख्या “महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, कलम २(१९) मध्ये नमूद आहे.)
नवीन 02-09-2020 च्या शासन निर्णया नुसार लागवडी योग्य क्षेत्र आणि पोटखराब क्षेत्र स्वतंत्ररित्या दर्शवून त्यांची एकूण बेरीज करून एकूण क्षेत्र नमूद करण्यात येणार आहे.
कायदेशीर तरतुदी:
- सर्व जमिनी करासाठी पात्र आहेत (म.ज.म.अ. कलम ६४).
- जमिनींचा कर त्यांच्या वापरानुसार निश्चित होतो. (म.ज.म.अ. कलम ६७).
- करातून अंशतः सूट असलेल्या जमिनींचे कर निर्धारित जिल्हाधिकारी करतात. (म.ज.म.अ. कलम ६८).
- जमीन महसूल हा जमिनीवरील सर्वक्ष्रेष्ठ भर असतो. (म.ज.म.अ. कलम ७२).
- जमीन महसूल प्राधान्याने देणे आवश्यक आहे. (म.ज.म.अ. कलम १६८).
- महसूल अधिकारी/कर्मचारी यांनी जमीन महसूल वसूल केल्यानंतर त्याची पावती देणे बंधनकारक आहे. म.ज.म.अ. कलम ७६).
ज्या गावची पैसेवारी पन्नास पैशापेक्षा कमी असते तेथील जिरायत शेत जमिनीवरील शेतसारा माफ असतो, परंतु स्थानिक उपकर अदा करावे लागतात. - महसूल व वन विभाग, अधिसूचना क्र. आर.ई.व्ही. १०७७-१६४४७-ल-२ दिनांक- २९/१२/१९७७ आणि आर.ई.व्ही. १०७८-३३३३८-ल-२ दिनांक ०८-०५-१९७९ अन्वये खालील खातेदारांना जमीन महसुलात सूट देण्यात आली आहे.
अ) ज्या खातेदारांचे संपूर्ण राज्यातील एकूण जिरायत (कोरडवाहू) जमीन धारणा क्षेत्र ३ हेक्टर पेक्षा जास्त नाही आणि त्यांच्या कोणत्याही जमिनीचा, कोणताही भाग, कोणत्याही प्रकारे, सिंचनाखाली येत नाही, अशा खातेदारांना जमीन महसूल आकारणी वसुलीत सूट आहे. परंतु जि.प. तसेच ग्रा.प. हे स्थानिक उपकर माफ नाहीत.
ब) ज्या खातेदारांचे संपूर्ण राज्यातील एकूण एकूण शेत जमीन धारणेवर वार्षिक जमीन महसूल आकारणी रुपये ५/- पर्यंत आहे, अशा खातेदारांना जमीन महसूल तसेच जि.प. तसेच ग्रा.प. हे स्थानिक उपकरांच्या वसुलीत सूट आहे.
क) ज्या खातेदारांचे संपूर्ण राज्यातील एकूण एकूण शेत जमीन धारणेवर वार्षिक जमीन महसूल आकारणी रुपये ५/- ते रुपये १०/- दरम्यान आहे, तसेच त्यांच्या कोणत्याही जमिनीचा, कोणताही भाग, कोणत्याही प्रकारे, सिंचनाखाली येत नाही, अशा खातेदारांना जमीन महसूल आकारणी वसुलीत सूट आहे. परंतु जि.प. तसेच ग्रा.प. हे स्थानिक उपकर माफ नाहीत.
शेतजमिनीची आकारण्यात येणाऱ्या महसुलाच्या रक्कमेखाली “जुडी किंवा विशेष” या प्रकारच्या रकमेचा उल्लेख असतो. “जुडी” म्हणजे इनामदाराकडून देण्याजोगे कोणतेही मूल्य जे सरकार जमा केले जाते. या खाली खातेदाराकडून वसूल करण्याची एकूण रक्कम नमूद केली जाते.
आता नवीन 02-09-2020 च्या शासन निर्णया नुसार गाव नमुना-7 मधील सर्व जुने फेरफार क्रमांक आता नवीन नमुन्यात सर्वात शेवटी ‘जुने फेरफार क्रमांक’ या नवीन रकान्यात एकत्रीतरित्या दर्शवण्यात येणार आहे.
२) गाव नमुना सात मध्य स्तंभ:
गाव नमुना सातच्या मध्य स्तंभात भोगवटादाराचे नाव लिहिलेले असते. भोगवटादार म्हणजे जमिनीचे मालक, कायदेशीररित्या जमीन कब्ज्यात असणाऱ्या व्यक्ती. (भोगवटाची व्याख्या “महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६, कलम २(२४) आणि भोगवटादाराची व्याख्या “महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६, कलम २(२३) मध्ये नमूद मध्ये आहे.)
त्या भोगवटादाराकडे सदर जमीन कशी व कोणत्या हक्काने आली त्याबाबत फेरफाराचा क्रमांक त्याच्या नावाखाली वर्तुळात लिहिलेला असतो.
आता नवीन 02-09-2020 च्या शासन निर्णया नुसार दोन खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेष काढण्यात येईल, जेणेकरूण खातेदारांची नावं स्पष्टपणे दिसतील.
३) गाव नमुना सात उजवीकडील स्तंभ:
यामध्ये यापूर्वी खाते क्रमांक ‘इतर हक्क’ या रकान्यात नमूद केला जात असे. आता तो नवीन 02-09-2020 च्या शासन निर्णया नुसार खातेदाराच्या नावासमोरच नमूद केला जाणार आहे. हा खाते क्रमांक गाव नमुना आठ-अ (खातेदारांची नोंदवही) मधील खाते क्रमांक असतो.
खाते क्रमांकाखाली गाव नमुना सात अ (कुळ हक्काबाबतची नोंदवही) ची थोडक्यात माहिती असते, यात “कुळाचे नाव”, “इतर हक्क”, याची माहिती असते. त्या शेतजमिनीत काही कुळ हक्क असतील तर त्या कुळाची नावे व त्याखाली सादर कुळाचा त्या जमिनीत कसा व काय हक्क आहे त्याबाबतचा फेरफार क्रमांक कुळांच्या नावाखाली वर्तुळात लिहिलेला असतो.
याशिवाय कुळाच्या नावाखाली “इतर हक्क” खाली त्या जमिनीत इतर व्यक्ती किंवा संस्था यांचे काही हक्क असल्यास, जसे कर्ज, बँक बोजा, आरक्षण इत्यादिंशी संबंधित नावे आणि त्याबाबतचा फेरफारचा क्रमांक नावाखाली वर्तुळात लिहिलेला असतो. शेत जमिनीत विहीर, बोरवेल यांचा उल्लेखही “इतर हक्क” सदरी केला जातो. काही ठिकाणी या स्तंभाच्या शेवटी सीमा आणि भूमापन चिन्हे याची माहिती नमूद असते. यालाच हद्दीची निशाणी म्हणतात. (हद्दीची निशाणीची व्याख्या “महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६, कलम २(३) मध्ये नमूद आहे.
आता नवीन 02-09-2020 च्या शासन निर्णया नुसार जे फेरफार प्रलंबित आहेत, ते इतर हक्क रकान्यात स्वतंत्रपणे ‘प्रलंबित फेरफार’ म्हणून नोंदवण्यात येणार आहे. गट क्रमांकाशी संबंधित शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख म्हणजेच गट क्रमांकाशी संबंधित जमिनीचा जो शेवटचा व्यवहार झाला आहे, त्याची माहिती इतर हक्क रकान्यात सगळ्यात शेवटी ‘शेवटचा फेरफार क्रमांक’ आणि दिनांक या पर्यायासमोर नमूद करण्यात येणार आहे.
२) गाव नमुना १२:
महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्तिथित ठेवणे) नियम, १९७१ यातील नियम २९ अन्वये असलेल्या गाव नमुना बारा (पिकांची नोंदवही) हा तक्ता स्वरूपात असतो. हा नमुना पीक पाहणी आणि पैसेवारीसाठी अत्यंत महत्वाचा असतो. याची नोंद गाव नमुना अकरा मध्येही असते. या गाव नमुना बारामध्ये त्या शेत जमीनींतील पिकांची आणि जलसिंचनाच्या साधनांची सविस्तर माहिती असते. दिनांक १/१/१९७६ पासून “महाराष्ट्र जमीन महसूल नियम पुस्तिका-खंड ४” मध्ये विहित करण्यात आलेला गाव नमुना बारा, अंमलात आला. यामध्ये पंधरा स्तंभ होते, पंधरावा स्तंभ “शेरा” हा होता. दिनांक १० मे १९७६ रोजीच्या शासन परिपत्रकानुसार, गाव नमुना बारामध्ये एक स्तंभ वाढवण्यात यावा आणि स्तंभ पंधरा मध्ये “प्रत्यक्ष लागवड करणाऱ्याचे नाव” लिहावे आणि नवीन सोळावा स्तंभ शेऱ्यासाठी ठेवावा असा आदेश पारित झाला होता. मात्र महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्तिथित ठेवणे) नियम, १९७१ यातील नियम २९, ३० व ३१ यांचे एकत्रित वाचन केल्यास फक्त ज्या व्यक्तींना अधिकार अभिलेखातील नोंदींप्रमाणे जमीन कसण्याचा अधिकार आहे अशाच व्यक्तींची नावे स्तंभ पंधरा मध्ये लिहिणे योग्य ठरते त्यामुळे प्रचलित गाव नमुना बारामध्ये पंधराच स्तंभ ठेवण्यात आले आहेत.
गाव नमुना १२ (02-09-2020) च्या नवीन शासन निर्णया नुसार):

स्तंभ-१: यामध्ये वर्षाचा उल्लेख असतो.
स्तंभ-२: यामध्ये हंगामाचा उल्लेख असतो. खरीप पिके (१ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर) आणि रब्बी पिके (१५ नोव्हेंबर ते ३१ जानेवारी) यांचा उल्लेख असतो.
“मिश्र पिकाखालील क्षेत्र”: या मध्ये एकूण (३ ते ८) स्तंभ येतात.
स्तंभ-३: मिश्रनाचा संकेत क्रमांक: या मध्ये शेत जमिनीतील मिश्र पिकाचा संकेतांक याचा उल्लेख असतो. मिश्र पिकांना हे संकेतांक शेतकी विभागाकडून दिले जातात.
स्तंभ-४: जल सिंचित: या मध्ये शेत जमिनीतील मिश्र पिकाखालील जल सिंचित क्षेत्र असल्यास ते क्षेत्र किती ते येथे हेक्टर-आर मध्ये लिहिले जाते.
स्तंभ-५: अजल सिंचित: या मध्ये शेत जमिनीतील मिश्र पिकाखालील अजल सिंचित क्षेत्र असल्यास ते क्षेत्र किती ते येथे हेक्टर-आर मध्ये लिहिले जाते.
स्तंभ-६: पिकाचे नाव: यामध्ये शेत जमिनीत काही घटक पिके असल्यास त्या घटक पिकाचे नाव लिहिले जाते.
स्तंभ-७: जल सिंचित: या मध्ये शेत जमिनीतील घटक पिकाखालील जल सिंचित क्षेत्र हेक्टर-आर मध्ये लिहिले जाते.
स्तंभ-८: अजल सिंचित: या मध्ये शेत जमिनीतील घटक पिकाखालील अजल सिंचित क्षेत्र हेक्टर-आर मध्ये लिहिले जाते.
निर्भेळ पिकाखालील क्षेत्र:
स्तंभ-९: पिकाचे नाव: या मध्ये निर्भेळ पिकांचे नाव लिहिले जाते.
स्तंभ-१०: जल सिंचित: या मध्ये शेत जमिनीतील निर्भेळ पिकाखालील जल सिंचित क्षेत्र हेक्टर-आर मध्ये लिहिले जाते.
स्तंभ-११: अजल सिंचित: या मध्ये शेत जमिनीतील निर्भेळ पिकाखालील अजल सिंचित क्षेत्र हेक्टर-आर मध्ये लिहिले जाते.
लागवडीसाठी उपलब्ध नसलेली जमीन: या मध्ये एकूण (१२ ते १३) स्तंभ येतात.
स्तंभ-१२: स्वरूप: यामध्ये लागवडीसाठी उपलब्ध नसलेल्या जमिनीच्या स्वरूपाचे वर्णन लिहितात, म्हणजेच कोणत्या कारणामुळे सदरचे क्षेत्र लागवडीसाठी उपलब्ध नाही. उदा. विहिरींमुळे, पड असल्यामुळे, घर असल्यामुळे, इत्यादी. गाव नमुना बाराच्या स्तंभ बारा मध्ये पडीक जमिनीचा उल्लेख करताना खालील नमूद आठ विविध प्रकाराखालील जमिनींचा स्वतंत्रपणे उल्लेख करावा.
लागवडीस अयोग्य, पडीक जमीन: (१) गावातील सरकारी तसेच खाजगी वनांखालील जमिनीचे क्षेत्र, (२) डोंगराळ, खडकाळ भाग, वाळवंट, नद्यांखालील क्षेत्र (३) इमारती, रेल्वे, रस्ते, दफनभूमी, सैनिक छावण्या, पाणीपुरवठा साधने इत्यादी.
लागवडीस योग्य, पडीक जमीन: (४) काही विशिष्ठ कालवधीसाठी (५ वर्ष किंवा अधिक काळासाठी) पडीक ठेवलेल्या जमिनी, (५) गवताळ आणि गुरे चारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जमिनी, (६) वनांव्यतिरिक्त उपयुक्त झाडे असलेल्या जमिनी, (७) इतर पडीक जमिनी (१ ते ५ वर्ष काळासाठी), चालू पडीक (वर्षामध्ये फक्त एकाच हंगामात (खरीप किंवा रब्बी) पडीक ठेवलेल्या जमिनी.
स्तंभ-१३: क्षेत्र: यामध्ये लागवडीसाठी नसलेल्या जमिनीचे क्षेत्र हेक्टर-आर मध्ये लिहिले जाते, म्हणजेच वरील प्रमाणे विहीर किती क्षेत्रात बांधणी आहे, किती क्षेत्र पड आहे, किती क्षेत्रात घर बांधले आहे, इत्यादी.
स्तंभ-१४: जल सिंचनाचे साधन: यामध्ये जमिनीत उपलब्ध असलेल्या जलसिचनाच्या साधनांचा उल्लेख असतो. उदा. विहीर, बोअरवेल, पाट, कालवा इत्यादी. जलसिंचनाच्या साधनांची नोंद गाव नमुना चौदामध्येही असते.
स्तंभ-१५: शेरा: यामध्ये शेरा लिहिण्यासाठी वापरला जातो.
पीक पाहणीच्या वेळेस मालक अथवा कुळ यांचे व्यतिरिक्त अन्य व्यक्ती जमीन कसत असेल तर तलाठी फॉर्म नंबर १४ भरून तहसीलदारांकडे पाठवतात. गाव नमुना सात-ब मध्ये त्या त्या व्यक्तीची पेन्सिलने नोंद करतात. अशा वेळेस गाव नमुना बाराच्या स्तंभ १५ मध्ये कोणतीही नोंद न घेता पेन्सिलने “फॉर्म १४ भरून पाठवला, निर्णयाधीन” असे लिहावे. मात्र पिकांच्या नोंदी वस्तुस्थितीप्रमाणे घ्याव्यात.
तहसीलदार यांनी “नमुना १४ च्या फॉर्ममध्ये नाव असणारी व्यक्ती जमीन कसत होती” असा निकाल दिला तर गाव नमुना बाराच्या स्तंभ १५ मध्ये आणि गाव नमुना सात-ब मध्ये तहसीलदार यांनी सदर बाबत दिलेल्या निकालाचा क्रमांक व दिनांक लिहून तशी नोंद करावी. जर तहसीलदार यांनी “नमुना १४ च्या फॉर्म मध्ये नाव असणारी व्यक्ती अधिकाराने जमीन कसत आहे” असा निकाल दिला तर गाव नमुना बाराच्या उचित स्तंभामध्ये जमीन मालकाचे नाव दाखल करावे आणि गाव नमुना सात-ब मधील पेन्सिलची नोंद खोडून टाकावी.
आता नवीन 02-09-2020 च्या शासन निर्णया नुसार बिनशेतीच्या सातबारा (७/१२) उताऱ्यात सगळ्यात शेवटी “सदरचे क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रुपांतरित झाले असल्याने या क्षेत्रासाठी गाव नमुना नंबर-12 ची आवश्यकता नाही” अशी सूचना देण्यात येणार आहे.
सातबारा (७/१२) च्या संदर्भात असणारे महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे :
- गाव नमुना सातबारा (७/१२) सदरी कोणतीही नोंद किंवा बदल फेरफारशिवाय होत नाही.
- गाव नमुना सातबारा (७/१२) लिहिताना प्रत्येक भूमापन क्रमांक/पोट हिस्सा क्रमांक यासाठी स्वतंत्र पण वापरले जाते. गाव नमुना सातबारा
- (७/१२) पुस्तकातील प्रत्येक पान तहसीलदारांनी त्यांच्या सही आणि गोल शिक्क्यासह प्रमाणित केलेले असावे.
- खरेदी, विक्री, वाटप किंवा अन्य कारणामुळे जमिनीचा पोट हिस्सा झाला असेल तर त्याची नोंद गाव नमुना सातबारा (७/१२) पुस्तकात स्वतंत्र पानावर घ्यावी आणि त्यासाठी गाव नमुना सातबारा (७/१२) पुस्तकातील शेवटचे कोरे पान वापरावे. दहा वर्षांनंतर गाव नमुना सातबारा
- (७/१२) पुनर्लेखनाच्यावेळेस असे लिहिलेले शेवटचे पान योग्य त्या अनुक्रमांकाने लिहावे.
- मालक अथवा कुळ यांचे व्यतिरिक्त अन्य व्यक्ती जमीन कसत असेल तर दरवर्षी फॉर्म नंबर १४ भरून तहसीलदारकडे पाठवावा आणि गाव
- नमुना ७ब मध्ये त्या व्यक्तीची पेन्सिलने नोंद करावी.
- फॉर्म नंबर १४ बाबत तहसीलदारांच्या निकालान्वयेही पीक पाहणी फक्त एका वर्षासाठी लावता येते. मागील काही वर्षाची पीक पाहणी लावता येत नाही.
गाव नमुना सातबारा (७/१२) लिहिताना घ्यावयाची काळजी:
- दर दहा वर्षांनी गाव नमुना सातबाऱ्यांचे पुनर्लेखन करण्यात येते.
- गाव नमुना सातबारा (७/१२) पुस्तक १०० ते १५० पानाचे असावे. ते चांगले बांधलेले असावे तसेच त्याला जाड पुठ्ठयाचे कव्हर असावे.
- गाव नमुना सातबाराचे पुस्तक लिहिताना कुठेही, कधीही खाडाखोड करू नये.
- गाव नमुना सातबाराचे पुनर्लेखनाच्यावेळेस जुन्या नमुना सातबाराच्या पानावरील सर्व फेरफार क्रमांक पुनर्लिखित गाव नमुना सातबाराच्या पानावर (कंसात) वरील बाजूला लिहिणे आवश्यक आहे. याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे.
- रद्द झालेली, अधिकार संपलेली (कंस झालेली) नावे पुनर्लेखनाच्यावेळेस नवीन गाव नमुना सातबाराच्या पानावर लिहिण्याची आवश्यकता नसते, परंतु त्याचे फेरफार क्रमांक न चुकता लिहावेत.
- पुनर्लेखनानंतर गाव नमुना सातबारा (७/१२) पुन्हा तपासून पाहावा. जुनी गाव नमुना पुस्तके तहसीलदार कार्यालयातील अभिलेख कक्षात जमा करावी.
- यापूर्वी मयत खातेदार, कर्ज बोजे, ई-कराराच्या नोंदी कंस करून दाखवल्या जात होत्या. आता नवीन 02-09-2020 च्या शासन निर्णया नुसार ही माहिती कंस करून त्यावर एक आडवी रेष मारून त्यांना खोडलेलं दाखवण्यात येणार आहे.
हेही वाचा – डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उतारा (7/12) ऑनलाईन कसा डाउनलोड करायचा? जाणून घ्या सविस्तर
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!