वृत्त विशेष

सेकंड हँड कारसाठी कर्ज घेण्यासाठी असा करा अर्ज

स्वतःची गाडी असणे असे अनेकांचे स्वप्न असते, पण आजच्या महागाईच्या युगामध्ये सर्वसामान्य जनतेला ते परवडणार नसते. अशा वेळी अनेकजण नवीन कार घेण्यापेक्षा जुनी, वापरलेली म्हणजेच सेकंड-हँड कार (Second Hand Car) घेणं पसंत करतात. काही जणांना नव्यानेच ड्रायव्हिंग करत असल्यानं नवीन कारपेक्षा जुनी कार वापरणं फायदेशीर वाटतं. अनेकांच्या बजेटमध्ये नवीन कार बसत नाही. नवीन कारच्या तुलनेत सेकंड हँड कार किमतीत खूप स्वस्त पडते.

कारची किंमत ती जुनी होत जाईल तशी कमी (Depreciation) होत जाते. कार जितकी जुनी, तितकी तिची किंमत कमी असते. त्यामुळे जुनी कार अगदी कमी किंमतीत मिळू शकते. अशा विविध कारणांमुळे अनेक जण सेकंड हँड कार घेणं पसंत करतात. सेकंड हँड कार घेणाऱ्यांचं प्रमाणही आपल्या देशात मोठं आहे. त्यामुळे बँका (Bank)आणि वित्तीय संस्थांनी (NBFC) नवीन कारसाठी कर्ज देण्याच्या सुविधेप्रमाणे जुनी कार घेण्यासाठीही कर्ज सुविधा उपलब्ध केली आहे.

आपल्या देशामध्ये सेकंड हँड कारची बाजारपेठ प्रचंड आहे. आता अनेक कार उत्पादक कंपन्याही सेकंड हँड कार विक्री बाजारपेठेत उतरल्या आहेत. महिंद्रा, मारुती, टाटा अशा देशातल्या लोकप्रिय कंपन्याही ही सेवा देत आहेत. त्यामुळे ग्राहकांना अत्यंत खात्रीशीररीत्या उत्तम दर्जाची सेकंड हँड कार योग्य किमतीत मिळण्याची सोय झाली आहे. या कंपन्या त्यांच्याकडे विक्रीसाठी येणाऱ्या कार्सची पूर्ण तपासणी करून ती उत्तम स्थितीत असेल तरच विक्रीसाठी उपलब्ध करतात. त्यासाठी योग्य किंमतही निश्चित करतात.

नवीन कारच्या तुलनेत जवळपास निम्म्या किंमतीत चांगली, जुनी कार मिळू शकते. यामुळे अनेकदा लक्झरी श्रेणीतली सेकंड-हँड कार छोट्या कारच्या किमतीत घेता येते. नवीन कारच्या तुलनेत विमा आणि देखभाल खर्च, अन्य करही कमी असतात. त्यामुळे आजकाल अनेक जण सेकंड हँड कार घेणं पसंत करतात. अनेक बँका आणि वित्तसंस्था सेकंड हँड कारसाठी कर्ज देतात. हे कर्ज कसं घेता येतं, याविषयी माहिती घेऊ या.

सेकंड हँड कारसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया:

या कर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी असून, ती ऑफलाइन किंवा ऑनलाइनदेखील करता येते. या कर्जासाठी अर्ज करताना पासपोर्ट आकाराचे फोटो, कार मूल्यांकन अहवाल, आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, एलआयसी पॉलिसी, वीज बिल, रेशनकार्ड इत्यादी कागदपत्रं लागतात. उत्पन्नाचा पुरावा म्हणून ऑडिट अहवाल, फॉर्म 16, पगाराची स्लिप, बँक स्टेटमेंट इत्यादींपैकी कागदपत्रं द्यावी लागतात.

ऑफलाइन पद्धतीत तुम्ही ज्या बँकेतून किंवा वित्तीय संस्थेतून कर्ज घेऊ इच्छित असाल त्या बँकेच्या शाखेत किंवा वित्तीय संस्थेच्या कार्यालयाला भेट द्या. त्यांचा विहित नमुन्यातला अर्ज भरा. बँक किंवा वित्तीय संस्था तुम्ही कर्जासाठी पात्र आहात की नाही याची पडताळणी करण्यासाठी काही कागदपत्रांची मागणी करतील, त्यानुसार ती कागदपत्रं जमा करावीत.

सेकंड हँड कार व्याज किती ?

नवीन कारसाठी दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या तुलनेत याचा व्याजदर (Interest Rate) काहीसा जास्त असतो. तसंच कर्ज परतफेडीची मुदत (Tenure) कमी असते. परतफेडीची मुदत 5 वर्षं किंवा नवीन कारच्या कर्जाइतकी म्हणजे 7 वर्षांपर्यंत असते. या कर्जाचा व्याजदर 9.75 टक्क्यांपासून 16 ते 17 टक्क्यांपर्यंतही असू शकतो. काही बँका कारच्या किंमतीच्या 100 टक्क्यांपर्यंत कर्ज देतात. सेकंड हँड कार 3 वर्षांपेक्षा जुनी असल्यास काही बँका आणि वित्तीय संस्था कर्ज देत नाहीत.

नवीन कारच्या कर्जाच्या तुलनेत मिळणारी कर्जाची रक्कम कमी असू शकते. त्यामुळे मासिक कर्ज हप्ता (EMI) कमी असतो. आयसीआयसीआय, स्टेट बँक ऑफ इंडिया, टाटा कॅपिटल, पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी, अॅक्सिस बँक, महिंद्रा फायनान्स या संस्था हे कर्ज देतात. सेकंड हँड कार विक्री करणारे डीलर्स डाउन पेमेंटचीही मागणी करतात. त्यामुळे त्याची तरतूद करणंही आवश्यक आहे.

प्रत्येक बँकेचा व्याज आकारण्याचा दर हा वेगवेगळा असतो. वाहन कर्ज घेताना महत्वाचा मुद्दा म्हणजे व्याजाची टक्केवारी. हे व्याज 10.50 ते 18 टक्क्यांपर्यंत वार्षिक आकारले जाते. यासाठी गाडीला झालेली वर्षे पाहिली जातात. कार घेताना ग्राहक ऑनलाईनही कर्जाचे व्याज पडताळू शकतात. एसबीआय सेकंड हँड कार लोनसाठी 12.60 टक्क्यांपासून पुढे व्याज आकारते. तर एचडीएफसी 9.25 टक्क्यांपासून पुढे व्याज आकारते. या शिवाय कारची बाजारातील किंमतीच्या किती टक्के कर्ज मिळू शकेल याचाही विचार करावा. काही बँका 80 ते 85 टक्के रक्कमेचे कर्ज देतात  तर काही बँकां यापेक्षा जास्त रक्कमेचे कर्ज देतात.

कर्ज मंजुरीसाठी लागणार वेळ:

आपल्याला जर नवीन कार घ्यायची असेल तर नवीन कारच्या कर्ज मंजुरीसाठी जास्त वेळ लागच नाही. मात्र, जुन्या कारवर कर्ज मंजुरीसाठी खूप वेळ लागतो. कारण कारची मूळ मालक आणि नवीन मालक यांच्यामध्ये करार करावा लागतो. यानंतर कार नवीन मालकाच्या नावावर व्हावी लागते. हे कागदपत्र, इन्शुरन्स आदी नव्या मालकाच्या नावावर झाल्यानंतर कर्ज मंजुर केले जाते. या प्रक्रियेसाठी कमीतकमी 4 ते 5 दिवस लागतात. तर नवीन कार घेण्यासाठी केवळ 1 दिवस लागतो.

कर्जाचा कालावधी:

अनेक बँका 5 वर्षांसाठी कर्ज देतात. जर कार खुपच जुनी असेल तर हा कालावधी कमी होतो. हा कालावधी कारच्या प्रकृतीवरही अवलंबून असतो. जर देखभाल खर्च जास्त येणार असेल तर बँका कमी कर्ज देतात. जर कारचे वय 5 वर्षांपेक्षा जास्त असले तर राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज फेटाळण्याचे प्रमाण जास्त असते. मग खासगी बँका किंवा फायनान्सचा पर्याय उरतो. या कारची तपासणी करण्य़ासाठी बँका निरिक्षक पाठवितात. तो कारसाठी किती कर्ज द्यायचे याचा निर्णय घेतो.

कागदपत्रांची तपासणी:

जुनी कार घेण्याआधी कागदपत्रे नीट तपासणे गरजेचे आहे. यासाठी आरटीओशीही संपर्क साधावा. गाडीचा क्रमांक आणि तिचा इंजिन क्रमांक हे तपासून घ्यावेत. यानंतरच ही कागदपत्रे बँकेकडे पाठवावीत. तसेच यापूर्वी कारचे मालक किती होते, यावरही कारचे लोन रक्कम अवलंबून असते. एकापेक्षा जास्त कारचे मालक झाले असतील तर कारची किंमत कमी होते.

कार विमा:

बँका 10 वर्षांपेक्षा जास्त वर्षे झालेल्या कारना कर्ज देत नाहीत. तसेचु जर कागदपत्र विकणाऱ्याच्या नावावर नसतील तर बँका कर्ज देत नाहीत. यामुळे इन्शुरन्स नुतनीकरण करावा किंवा इन्शुरन्स ट्रान्सफर करून घ्यावा.

तुम्हाला नवीन कार न घेता सेकंड हँड कार घ्यायची असेल आणि पैशांअभावी तुमचं स्वप्न पूर्ण होत नसे, तर बँका किंवा वित्तीय संस्थांना भेट देण्यास कचरू नका. एखादी चांगली कार मिळत असेल तर कर्ज घेऊन तुम्ही कार घेण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता.

हेही वाचा – लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स काढा फक्त आधार कार्डने, जाणून घ्या सविस्तर ऑनलाईन प्रोसेस – Aadhaar-Based Learning Driving Licence Apply

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.