वृत्त विशेष

‘सीएआर-टी’पेशी जनुकीय उपचार पद्धती कर्करूग्णांना नवजीवन देण्यात यशस्वी होणार

भारताच्या पहिल्या जनुकीय उपचार प्रणालीची सुरुवात ही कर्करोगाविरुध्दच्या लढ्यातील मोठी प्रगती आहे. ‘सीएआर-टी सेल उपचार पद्धती’ असे नाव असलेली ही उपचार पद्धती सुलभतेने तसेच परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार असल्याने संपूर्ण मानवजातीसाठी ही उपचार प्रणाली नवी आशा देणारी ठरणार आहे. ही उपचार पद्धती असंख्य कर्करोगग्रस्तांना नवजीवन देण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज व्यक्त केला.

भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात कर्करोगासाठी भारतातील पहिल्या स्वदेशी जनुकीय उपचार पद्धती (जीन थेरपी) चे लोकार्पण आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राष्ट्रपती बोलत होत्या. कार्यक्रमासाठी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. सुभाशीष चौधरी, टाटा मेमोरियल रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुदीप गुप्ता उपस्थित होते. तसेच शैक्षणिक तसेच पायाभूत सुविधा विषयक व्यवहार विभागाचे उपसंचालक प्रा.एस.सुदर्शन, वित्त आणि परराष्ट्र व्यवहार विभागाचे उपसंचालक प्रा.के.व्ही.के. राव यांच्यासह आयआयटी मुंबईच्या जैवविज्ञान आणि जैवअभियांत्रिकी विभागाचे प्रा.राहुल पुरवार, टाटा मेमोरियल केंद्राचे डॉ.हसमुख जैन आणि शस्त्रक्रिया विभाग तज्ज्ञ डॉ.गौरव नरुला आदी या उपचार पद्धतीमधील महत्त्वाचे भागधारक यावेळी उपस्थित होते.

सीएआर- टी सेल थेरपी ही वैद्यकीय शास्त्रातील सर्वात अभूतपूर्व प्रगती मानली जात असल्याचे सांगत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, सीएआर-टी पेशीवर आधारीत उपचार प्रणाली ही वैद्यकीय शास्त्रातील सर्वात अभूतपूर्व प्रगतीच्या बाबींपैकी एक समजली जाते. विकसित देशांमध्ये काही काळापासून ही प्रणाली उपलब्ध आहे, मात्र ती अत्यंत खर्चिक असल्याने जगभरातील बहुतांश रुग्णांच्या आवाक्याबाहेरील आहे. आज सुरु करण्यात आलेली उपचार पद्धती ही जगातील सर्वात परवडण्याजोगी असल्याचे समजून त्यांनी आनंद व्यक्त केला.

मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि टाटा मेमोरियल रुग्णालय यांच्यातील सहकार्यासह आणि इम्युनोअॅक्ट या उद्योग क्षेत्रातील भागीदाराच्या सहकार्याने भारताची ही पहिलीच सीएआर-टी सेल उपचार प्रणाली विकसित करण्यात आली आहे. देशातील शिक्षणक्षेत्र आणि उद्योगक्षेत्र यांच्यातील भागीदारीचे हे उत्कृष्ट उदाहरण असून त्यातून अशा पद्धतीच्या इतर प्रयत्नांना प्रेरणा मिळेल, असेही राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांनी सांगितले.

>

राष्ट्रपती पुढे म्हणाल्या, तंत्रज्ञान शिक्षणाचे मॉडेल म्हणून आयआयटी मुंबई केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात प्रसिद्ध आहे. सीएआर-टी पेशी उपचार पद्धती विकसित करण्यामध्ये संस्थेसोबत उद्योगाशीही भागीदारी केली जात आहे. आयआयटी मुंबईने गेल्या तीन दशकांमध्ये संशोधन आणि विकासावर लक्ष केंद्रीत केल्यामुळे हे शक्य झाले आहे. आयआयटी मुंबई इतर तत्सम संस्थांमधील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचे ज्ञान, कौशल्ये संपूर्ण भारताला सध्या सुरू असलेल्या तांत्रिक क्रांतीमध्ये खूप उपयोगी ठरणार आहेत.

कर्करूग्णांना ‘सीएआर –टी’ उपचार पद्धती वरदान ठरेल 

आजचा दिवस हा देशासाठी व विशेषत्वाने आयआयटी मुंबई, टाटा मेमोरियल रूग्णालय यांच्या इतिहासातील महत्वाचा दिवस आहे. देशातील दोन प्रमुख संस्थांनी एकत्र येऊन वैद्यकीय क्षेत्रातील हा अत्युत्कृष्ट उपक्रम सुरू केला आहे. आज आपण काही प्रकारच्या कर्करोगांवर उपचार करण्यात मदत करणाऱ्या नव्या कर्करोग उपचार प्रणालीची सुरुवात करीत आहोत. ही उपचार पद्धती कर्करोगाशी लढत असलेल्या रूग्णांना वरदान ठरणारी असून खेळण्याच्या वयात आजाराशी झुंज देणाऱ्या लहान बालकांना कुठल्याही संजीवनीपेक्षा कमी असणार नाही, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

सीएआर – टी उपचार पद्धती काही मोजक्याच देशांमध्ये उपलब्ध होती. भारताने ही उपचार पद्धत संशोधित करून जगालाही आशेचा किरण दाखविला आहे. देशाच्या दुर्गम भागात सिकलसेल आजार दिसून येतो. या आजारावरसुद्धा कायमस्वरूपी उपाय करण्याची गरज आहे. भारत हा जगामध्ये मधुमेहाची राजधानी बनत आहे, ही चिंतेची बाब असून आयआयटी मुंबई सारख्या अन्य संस्थांनी याबाबत संशोधन केले पाहिजे. कृत्रिम बुद्धीमत्तेच्या जोरावर संशोधन करून दुर्धर आजारांच्या निदानाचा कालावधी कमी करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे मतही राज्यपाल श्री. बैस यांनी व्यक्त केले.

आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. सुभाशीष चौधरी व टाटा मेमोरियल केंद्राचे संचालक डॉ.सुदीप गुप्ता यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला मान्यवरांसह आयआयटी संस्थेतील प्राध्यापक, विद्यार्थी, टाटा मेमोरियल केंद्र आणि इम्युनोॲक्ट या संस्थेचे अधिकारी सहभागी झाले होते.

‘सीएआर-टी’ सेल उपचारपद्धती विषयी

नेक्ससीएआर 19 सीएआर-टी उपचारपद्धती ही शिक्षण क्षेत्र आणि उद्योगक्षेत्र यांच्या भागीदारीतून स्वदेशी पद्धतीने भारतात पहिल्यांदाच विकसित करण्यात आलेली सीएआर-टी उपचार प्रणाली आहे. नेक्ससीएआर 19 ही जगातील सर्वात परवडण्याजोगी सीएआर-टी उपचारपद्धती आहे. या प्रणालीच्या विकसनामुळे पेशी तसेच जनुकीय उपचार पद्धती विषयक जागतिक नकाशात भारताचे स्थान ठळक झाले आहे. टाटा मेमोरियल केंद्र आणि इम्युनोॲक्ट यांच्या संपूर्ण सहकार्यासह प्रा. राहुल पुरवार आणि त्यांच्या पथकाने आयआयटी मुंबई या संस्थेतील बीएसबीई विभागात ही उपचार पद्धती विकसित केली.

हेही वाचा – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना – CM Medical Assistance Fund Scheme

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.