गाव नमुना २ (अकृषिक महसुलाची नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती – Gav Namuna 2

गाव नमुना एक मध्ये सर्व कृषिक जमीन महसुलाचा हिशोब ठेवला जातो. हा नमुना जमाबंदीच्या मुदतीपर्यंत चालू असतो. या गाव नमुना दोन मध्ये गावातील सर्व कायम बिनशेती ( अकृषिक ) जमिनींची नोंद असते. तात्पुरत्या बिनशेतीची ( उदा. विटभट्टी ) ची नोंद गाव नमुना नंबर चार मध्ये घेतली जाते. गाव नमुना नंबर दोन हा महाराष्ट्र जमीन महसूल ( महसूल भूमापन व भूमापन क्रमांकाचे उपविभाग ) नियम, १९६९ चे नियम २२ अन्वये तयार केलेल्या अकृषिक भोगवट्यांच्या नोंदवहीवर आधारित असतो. यात आपण बिनशेती असणाऱ्या जमिनींपासून येणारा कायम स्वरूपी महसूल दर्शवतो. कायम बिनशेती नसणाऱ्या नोंदींसाठी समांतर गाव नमुना नंबर दोन ठेवण्यात यावा.

गाव नमुना २ (अकृषिक महसुलाची नोंदवही) – Gav Namuna 2:

गाव नमुना नंबर दोन हा दोन भागांमध्ये असतो. गाव नमुना नंबर दोनची विभागणी दोन मुख्य भागात केलेली आहे. गावठाणाबाहेरील

अ. गावठाणातील बिनशेती जमीन

ब. गावठाणाबाहेरील बिनशेती जमीन ( गावठाण म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १२२ अन्वये निश्चित केलेली जागा.

नंतर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ६७, ११० आणि ११४ मधील तरतुदींनुसार याचे पाच उपविभाग करण्यात येतात.

( १ ) निवास कारणासाठी

( २ ) औद्योगिक कारणासाठी

( ३ ) वाणिज्य कारणासाठी

( ४ ) जमीन महसूल कमी किंवा जास्त दराने आकारण्यात आलेल्या विशेष प्रयोजनांसाठी

( ५ ) महसूल माफ प्रयोजनांसाठी

बिनशेती आदेशाची कार्यवाही :

अ. बिनशेती आकारणी झाल्यावर करून सक्षम अधिकाऱ्याच्या आदेशान्वये बिनशेती आदेशाच्या दोन प्रती तहसिल कार्यालयाकडे पाठविल्या जातात. आदेशाची एक प्रत आणि संबंधित जमिनीचे नकाशे जिल्हा निरीक्षक, भूमी अभिलेख यांचेकडे पाठवली जातात.

आ. तहसिल कार्यालयातील जमाबंदी लिपीकाने या आदेशाची नोंद तालुका नमुना दोन मध्ये घ्यावी व आदेशाच्या दुसऱ्या प्रतीवर तालुका नमुना दोन मध्ये घेतलेल्या नोंदीचा अनुक्रमांक नमूद करून ती प्रत तलाठी यांचेकडे पाठवावी.

इ. जमाबंदी लिपीकाकडून प्राप्त झालेल्या या आदेशाच्या प्रतीच्या माहितीवरून तलाठी यांनी गाव नमुना नंबर दोन मध्ये नोंद घ्यावी.

फ. तलाठी यांनी गाव नमुना नंबर दोन मध्ये नोंद घेतल्यानंतर सदर नोंद गाव नमुना नंबर एक, सहा, सात, आणि आठ-ब यात सुद्धा घ्यावी.

तलाठी यांनी गाव नमुना नंबर दोन मध्ये नोंद करण्याची पद्धत :

गाव नमुना नंबर दोन मध्ये एकूण अकरा स्तंभ आहेत.

गाव नमुना दोन – स्तंभ १ – अनुक्रमांकासाठी आहे.

गाव नमुना दोन – स्तंभ २ – मध्ये जमिनीचा सर्वे नंबर, प्लॉट नंबर नमूद करावा. हा स्तंभ अधिक काळजीपूर्वक भरावा. उदा. फक्त ‘गावठाण किंवा खुले मैदान’ असे मोघम लिहिण्याऐवजी ‘अमुक यांच्या घराजवळील गावठाण किंवा खुले मैदान’ असे नेमके लिहावे.

गाव नमुना दोन – स्तंभ ३ – मध्ये जमिनीच्या बिनशेती खालील क्षेत्र, चौरस मिटरमध्ये नमूद करावे.

गाव नमुना दोन – स्तंभ ४ – मध्ये बिनशेती उपयोगाचा प्रकार आणि त्या संबंधित अटी / शर्ती नमूद कराव्यात. उदा. किराणा दुकान / हॉटेल/ पिठाची गिरणी / राहते घर इ. हा स्तंभ फार महत्वाचा आहे. तपासणी करतांना या स्तंभांच्या आधारावर नियमभंग, वापरातील बदल कळणे शक्य होते.

गाव नमुना दोन – स्तंभ ५ – मध्ये जमिनीची भोगवटाधिकार किंमत नमूद करावी.

गाव नमुना दोन – स्तंभ ६ – मध्ये आकारण्यात आलेल्या बिनशेती जमीन महसुलाची नोंद करावी. परंतु स्तंभ – ६ मध्ये थकबाकी, वसूल, रूपांतर कर किंवा दंड यांची नोंद करू नये. सन २००७ पासून शासनाने १० पैसे प्रति चौरस मिटर असा बिनशेती दर कायम केला आहे. ( कृपया अद्ययावत तरतूद बघावी )

गाव नमुना दोन – स्तंभ ७ ( अ ) आणि ७ ( ब ) मध्ये जमीन महसुलाच्या कालावधीची नोंद करणे अपेक्षित आहे. हि आकारणी जमिनीचा प्रत्यक्ष अकृषिक वापर सुरु केल्यापासून पंधरा वर्षाच्या कालावधीनंतर फेरतपासणी होईपर्यंत अंमलात राहते. या स्तंभावरून महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६, कलम ११६ अन्वये आकारणीची फेरतपासणी करण्यास मदत मिळते.

गाव नमुना दोन – स्तंभ ८ – मध्ये सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या आदेशाचा क्रमांक व दिनांक नमूद करावा.

गाव नमुना दोन – स्तंभ ९ – मध्ये तालुका नमुना नंबर दोन मध्ये ज्या अनुक्रमांकाने सदर बिनशेती आदेशाची नोंद करण्यात आली आहे तो क्रमांक लिहावा.

गाव नमुना दोन – स्तंभ १० – मध्ये पहिल्या भोगवटादाराचे नाव लिहावे.

गाव नमुना दोन – स्तंभ ११ – हा शेरा स्तंभ आहे. यात प्रत्यक्ष बिनशेती वापर सुरु झाल्याचा दिनांक नोंदवावा.

गाव नमुना २ (अकृषिक महसुलाची नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती - Gav Namuna 2
गाव नमुना २

गाव नमुना दोनच्या या स्तंभानंतर खालील भागात दोन भागातील नोंदी असतात. भाग अ – गावठाणातील आणि भाग ब – गावठाणाबाहेरील.

भाग अ मध्ये – गावठाणातील – ( एक ) निवास विषयक प्रयोजनासाठी वापर केलेल्या जमिनी, ( दोन ) औद्योगिक प्रयोजनासाठी वापर केलेल्या जमिनी, ( तीन ) वाणिज्यिक प्रयोजनासाठी वापर केलेल्या जमिनी, ( चार ) महसूल माफ प्रदानांव्यतिरिक्त, कमी केलेल्या किंवा वाढवलेल्या दराने इतर कोणत्याही वापर केलेल्या जमिनी, ( पाच ) महसूल माफ करून प्रदान केलेल्या जमिनी या पाच प्रकारातील जमिनींचे क्षेत्र आणि महसुलाची नोंद असते. याची एकूण बेरीज एकूण भाग ( अ ) या स्तंभात केली जाते.

भाग ब मध्ये – गावठाणाबाहेरील – ( एक ) निवास विषयक प्रयोजनासाठी वापर केलेल्या जमिनी, ( दोन ) औद्योगिक प्रयोजनासाठी वापर केलेल्या जमिनी, ( तीन ) वाणिज्यिक प्रयोजनासाठी वापर केलेल्या जमिनी, ( चार ) महसूल माफ प्रदानांव्यतिरिक्त, कमी केलेल्या किंवा वाढवलेल्या दराने इतर कोणत्याही वापर केलेल्या जमिनी, ( पाच ) महसूल माफ करून प्रदान केलेल्या जमिनी या पाच प्रकारातील जमिनींचे क्षेत्र आणि महसुलाची नोंद असते. याची एकूण बेरीज एकूण भाग ( ब ) या स्तंभात केली जाते.

शेवटी भाग ( अ ) मध्ये समाविष्ट एकूण क्षेत्र आणि महसूल व भाग ( ब ) मध्ये समाविष्ट एकूण क्षेत्र आणि महसूल तसेच दोन्ही भागांचे एकूण क्षेत्र आणि महसूल याचा वार्षिक गोषवारा काढला जातो.

हा नमुना जुना किंवा जीर्ण / खराब झाल्यास तहसिलदाराने त्याच्या पुनर्लेखनाचे आदेश द्यावेत, तलाठी यांनी सदर आदेशानुसार अचूक पुनर्लेखन करून त्यावर सही करावी व तहसिलदाराने पुनर्लिखित नमुना तपासून त्यावर सही करावी.

हेही वाचा – तलाठी कार्यालयातील – गाव नमुना १ ते २१ नोंदवही विषयीची संपूर्ण माहिती

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.