तलाठी कार्यालय नोंदवह्यामहाराष्ट्र जमीन महसूल कायदावृत्त विशेषसरकारी कामे

गाव नमुना ३ (दुमाला जमिनींची नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती – Gav Namuna 3

दुमाला जमीन म्हणजे ‘शासनाने महसूल माफ किंवा कमी करून विशिष्ट कामांसाठी प्रदान केलेल्या जमिनी’. अशा जमिनींना ‘इनाम जमिनी’ सुद्धा म्हणतात.

गाव नमुना नंबर एक मध्ये शेतीसाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या जमिनींवरील महसुलाची नोंद केली जाते तर गाव नमुना नंबर दोन मध्ये बिनशेतीसाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या जमिनींवरील महसुलाची नोंद केली जाते.
या गाव नमुना नंबर तीन मध्ये शेतीसाठी आणि बिनशेतीसाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या सर्व ( सरंजाम / देवस्थान इनाम ) दुमाला जमिनीच्या महसुलाची नोंद केली जाते.

गाव नमुना ३ (दुमाला जमिनींची नोंदवही) – Gav Namuna 3:

इनाम जमीन म्हणजे राजकीय अथवा अन्य कामाचा मोबदला म्हणून शासनाने प्रदान केलेली जमीन. याच जमिनींना ‘दुमाला जमीन म्हणतात. या सरंजाम व इनाम कायद्यातील तरतुदी व सनदेतील अटींना अधीन राहून उपभोगण्याचा हक्क शासनाने काही लोकांना प्रदान केला होता. इनाम जमिनींची नोंद महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम ७५ अन्वये जिल्हा किंवा तालुका रजिस्टर ला ठेवली जाते, या रजिस्टरला एलिनेशन रजिस्टर असे म्हणतात.

‘जुडी’ म्हणजे इनामदाराकडून वसूल केलेल्या जमीन महसुलापैकी जो भाग सरकार जमा केला जातो त्या भागाला जुडी म्हणतात.
‘नुकसान’ म्हणजे इनामदाराकडून वसूल केलेल्या जमीन महसुलापैकी जो भाग इनामदार स्वतःकडे ठेवतो त्या भागाला नुकसान म्हणतात.

इनामाचे प्रकार :

वर्ग – १ : सरंजाम, जहागीर व इतर तत्सम राजकीय कामाचा मोबदला म्हणून दिलेली जमीन.
वर्ग – २ : जात इनाम – एखाद्या व्यक्तीने केलेल्या भूषणावह कामगिरीबद्दल दिलेली जमीन.
वर्ग – ३ : देवस्थान इनाम – देवदेवता किंवा अन्य धार्मिक स्थळांच्या व्यवस्थेसाठी दिलेली जमीन.

स्वातंत्र्यपूर्व काळात ७ प्रकारची इनामे असली तरी सध्या खालील तीन प्रकारची इनामे अस्तित्वात आहेत.
१. संकीर्ण इनाम- ( इनाम वर्ग -७ ) : काही ठराविक कामांकरिता महसूल माफीने दिलेल्या जमिनी इनाम वर्ग -७ जमिनींमध्ये शाळा, महाविद्यालये, दवाखाने, क्रीडांगणे इत्यादींना काही अटींवर दिलेल्या जमिनींचा समावेश होतो. यांची नोंद तलाठी यांच्याकडील गाव नमुना २ व ३ मध्ये असते. अशा प्रकारच्या संकीर्ण इनाम म्हणून दिलेल्या जमिनीची तपासणी महसूल अधिकाऱ्यांनी जरूर करावी. याबाबत शर्तभंग असल्यास तलाठी यांनी त्याचा अहवाल वरिष्ठाना पाठवावा आणि त्याची नोंद गाव नमुना नंबर ३ च्या रकाना क्रमांक १६ मध्ये घ्यावी. संकीर्ण इनाम म्हणून प्रदान केलेल्या जमिनीच्या वापराबाबत शर्तभंग झाल्यास अशी जमीन काढून घेतली जाऊ शकते.

२. देवस्थान इनाम – ( इनाम वर्ग – ३ ): देवस्थान इनाम म्हणजे देवदेवता किंवा अन्य धार्मिक स्थळांच्या व्यवस्थेसाठी दिलेली जमीन. हे इनाम फक्त पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्वात आहे. पूर्वीच्या काळात काही जमिनी मंदिर / मशिदीसाठी बक्षीस म्हणून दिल्या गेल्या आहेत. देवस्थानाचे दोन प्रकार आहेत.

( १ ) सरकारी देवस्थान : यांची नोंद गाव नमुना तीन मध्ये असते.
( २ ) खाजगी देवस्थान : यांचा महसूल दफ्तराशी संबंध नसल्याने त्यांची नोंद गाव नमुना तीनमध्ये नसते.

देवस्थान इनाम जमिनीतून येणाऱ्या उत्पनांतून, संबंधित मंदिर/ मशीदीसाठी पूजा, दिवाबत्ती, साफसफाई, उत्सव यांचा खर्च भागवला जातो.

देवस्थान इनाम जमिनीच्या ७ /१२ सदरी भोगवटादार ( मालकी ) म्हणून देवाचे /देवस्थानाचे नाव लिहावे. त्याखाली रेषा ओढून वहिवाटदार / व्यवस्थापकाचे नाव लिहिण्याची प्रथा आहे. परंतु या प्रथेमुळे कालांतराने, ७/१२ चे पुनर्लेखन करतांना, चुकून देवाचे नाव लिहिणे राहून जाते किंवा मुद्दाम लिहले जात नाही. त्यामुळे पुढे अनेक वाद निर्माण होतात. त्यामुळे ७/१२ सदरी भोगवटादार ( मालक ) म्हणून देवाचे /देवस्थानाचे नाव लिहावे, वहिवाटदार / व्यवस्थापकाचे नाव इतर हक्कात ठेवावे.

देवस्थान इनाम जमिनीच्या भोगवटादार ( मालक ) म्हणून ७/१२ सदरी पुजारी, महंत, मठाधिपती, ट्रस्टी, मुतावली, काझी यांची नावे कुळ म्हणून दाखल करू नये.

देवस्थान इनाम जमिनीचे हस्तांतरण, विक्री किंवा वाटप करता येत नाही. असे झाल्यास अशी जमीन सरकार जमा केली जाऊ शकते. असा अनधिकृत प्रकार तलाठी याना आढळल्यास त्यांनी तात्काळ तहसिलदाराला कळवावे.

अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत शासनाची पूर्व परवानगी आणि धर्मादाय आयुक्तांच्या मान्यतेने असे हस्तांतरण किंवा विक्री करता येते.

देवस्थान इनाम जमिनीत कुळाचे नाव दाखल होऊ शकते परंतु जर देवस्थानच्या ट्रस्टने कुळ वहिवाट अधिनियम कलम ८८ ची सूट घेतली असेल तर अशा कुळास कुळ वहिवाट अधिनियम ३२ ग प्रमाणे जमीन विकत घेण्याचा अधिकार नसतो.

देवस्थान इनाम जमिनीला वारसांची नोंद होऊ शकते, परंतु येथे जन्माने वारस ठरण्या ऐवजी मयतानंतर प्रत्यक्ष पूजाअर्चा करणारा वारस ठरतो. म्हणजेच पदामुळे मिळणारा उत्तराधिकार हे तत्व येथे लागू होते. एखाद्या मयत पुजाऱ्याला चार मुले वारस असतील तर पूजाअर्चा व वहिवाटीसाठी पाळी पद्धत ठरवून द्यावी असे अनेक न्यायालयीन निर्णयात म्हटले आहे. मठाचा प्रमुख/ पुजारी, अविवाहित असला किंवा त्याला वारस नसल्यास तो त्याच्या मृत्यूआधी शिष्य निवडून त्याला उत्तराधिकार देऊन जातो. परंतु या जमिनीचे वारसांमध्ये वाटप होत नाही तसेच एका कुटुंबाकडून दुसऱ्या कुटुंबाकडे हस्तांतरण होत नाही.

३. सरंजाम इनाम – ( इनाम वर्ग – १ ): महाराष्ट्रात फक्त सातारा जिल्ह्यात सरंजाम इनाम अस्तित्वात आहे.

गाव नमुना तीन मध्ये एकूण १६ स्तंभ आहेत, ते खालीलप्रमाणे भरावेत.

गाव नमुना तीन – स्तंभ १ मध्ये वर्ग लिहिणे अपेक्षित आहे. उपरोक्त चर्चेनुसार तीन प्रकारचे इनाम अस्तित्वात आहेत. त्यामुळे या स्तंभात १, ३ किंवा ७ हा आकडा लिहावा.

गाव नमुना तीन – स्तंभ २ मध्ये इनामाचा प्रकार ( संकीर्ण इनाम; देवस्थान इनाम ; सरंजाम इनाम; ) लिहावा, आणि सदर इनाम किती काळ चालू राहवयाचा आहे याचा उल्लेख असल्यास त्याची नोंद करावी.

गाव नमुना तीन – स्तंभ ३ मध्ये प्रत्येक वर्गातील चालू क्रमांक ( असल्यास ) तो नोंदवावा.

गाव नमुना तीन – स्तंभ ४ मध्ये दुमाला जमिनीच्या नोंदवहीतील क्रमांक, धारणा प्रकार ( कायमची, तात्पुरती इ. ) आणि काही निर्णय असल्यास तो नोंदवावा.

गाव नमुना तीन – स्तंभ ५ मध्ये प्रत्येक दुमाला जमिनीचा सनद क्रमांक नमूद करावा. सनद म्हणजे इनामदाराला शासनाकडून सदर जमिनीबाबत दिलेले प्रमाणपत्र.

गाव नमुना तीन – स्तंभ ६ मध्ये दुमाला जमिनींचे भूमापन क्रमांक आणि असल्यास हिस्सा क्रमांक नमूद करावे.

गाव नमुना तीन – स्तंभ ७ मध्ये दुमाला जमिनींचे निव्वळ लागवडी योग्य क्षेत्र ( कृषिक क्षेत्र ) हेक्टर – आर मध्ये लिहावे.

गाव नमुना तीन – स्तंभ ८ मध्ये दुमाला जमिनीची कृषिक क्षेत्राची आकारणी रु. पै. मध्ये लिहावी.

गाव नमुना तीन – स्तंभ ९ मध्ये दुमाला जमिनीचे अकृषिक वापराखालील क्षेत्र ( कृषिक क्षेत्र ) हेक्टर – आर मध्ये लिहावे.

गाव नमुना तीन – स्तंभ १० मध्ये दुमाला जमिनीची अकृषिक क्षेत्राची आकारणी रु. पै. मध्ये लिहावी.

गाव नमुना तीन – स्तंभ ११ ते १३ मध्ये इनामदाराकडून त्या दुमाला जमिनीची शासनाला येणे असलेली जुडीची अथवा जमाबंदीची रक्कम स्वतंत्रपणे रु. पै. मध्ये लिहावी.

गाव नमुना तीन – स्तंभ १४ मध्ये एकूण रकमेचा हिशोब रु. पै. मध्ये लिहावा.

गाव नमुना तीन – स्तंभ १५ मध्ये दुमालादाराकडील (इनामदाराकडील ) शिल्लक रक्कम किंवा नुकसान रक्कम ( इनामदाराकडून वसूल केलेल्या महसुलापैकी जो भाग स्वतःकडे ठेवतो ) रक्कम रु. पै. मध्ये लिहावी.

गाव नमुना तीन – स्तंभ १६ हा शेरा स्तंभ आहे. शर्तभंग असल्यास तलाठी यांनी त्याचा अहवाल वरिष्ठाना पाठवावा आणि त्याची नोंद या स्तंभात घ्यावी.

[ गाव नमुना तीन हा एकूण १६ स्तंभांचा असून, तो व्यवस्थित कळावा म्हणून त्याचे नमुन्यादाखल स्वतंत्र भाग केलेले आहेत याची नोंद घ्यावी.]

गाव नमुना ३
गाव नमुना ३

इनाम वर्ग एक आणि तीनच्या जमिनीबाबत शर्तभंग झाला तर जमीन महसुलातील सवलत रद्द करून पूर्ण जमीन महसूल आकारता येतो. इनाम वर्ग सातच्या जमिनीबाबत शर्तभंग झाला तर प्रदान केलेली जमीन काढून घेता येते.

त्यावर्षी काही बदल झाला असेल त्यावर्षी इनामदाराचे वर्ग, भाग आणि बेरीज यानुसार गोषवारा तयार करण्यात येतो. ज्यावर्षी काही बदल झाला नसेल त्यावर्षी तलाठी यांनी ‘ ……. या वर्षात कोणताही बदल नाही’ असा शेरा लिहावा.

गाव नमुना तीनची मुदत जमाबंदीच्या मुदतीपर्यंत असते, परंतु यातील जमिनीच्या तपशिलात बरेच बदल झाले असतील किंवा हा नमुना जुना किंवा जीर्ण / खराब झाल्यास तहसिलदाराने त्याच्या पुनर्लेखनाचे आदेश दयावेत, तलाठी यांनी सदर आदेशानुसार अचूक पुनर्लेखन करून त्यावर सही करावी व तहसिलदाराने पुनर्लिखित नमुना तपासून त्यावर सही करावी.

हेही वाचा – तलाठी कार्यालयातील – गाव नमुना १ ते २१ नोंदवही विषयीची संपूर्ण माहिती

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

One thought on “गाव नमुना ३ (दुमाला जमिनींची नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती – Gav Namuna 3

  • सचिन जाधव सातारा

    सर आपच्या पंजोबांना इनामी जमीन होत्या पण त्या आत्ता कोणालाच माहिती नाहीत तर त्या जमिनीची माहिती एलिनेशन रजिस्टर मध्ये सापडेल का ?

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.