महाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषशालेय शिक्षण व क्रीडा विभाग

इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी साठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करणेबाबत शासन निर्णय जारी !

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ दिनांक १ एप्रिल २०१० पासून संपूर्ण देशात लागू करण्यात आलेला आहे. प्रस्तुत कायद्यातील कलम-१६ मध्ये, कोणत्याही बालकास त्याचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईंपर्यंत एकाच वर्गात ठेवता येणार नाही अथवा बालकास शाळेतून काढून टाकता येणार नाही असे नमूद केलेले आहे.

अन्वये केंद्र सरकारने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १६ मध्ये सुधारणा केलेली आहे. त्यानुसार इयत्ता ५ वी व ८ वी वर्गांसाठी वार्षिक परीक्षा अनिवार्य केलेली आहे.

महाराष्ट्र शासनाने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम २०११ मधील नियम- ३ व नियम १० मध्ये सुधारणा केलेली आहे. त्यानुसार, इयत्ता ५ वी व ८ वी वर्गासाठी वार्षिक परीक्षा असेल. जर बालक वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाही, तर त्यास अतिरिक्त पूरक मार्गदर्शन प्रदान करुन वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत पुनर्परीक्षेची संधी देण्यात येईल. जर ते बालक पुनर्परीक्षेत देखील नापास झाले, तर त्याला इयत्ता ५ वी च्या वर्गात किंवा इयत्ता ८ वी च्या वर्गात, जसे असेल तसे ठेवले जाईल. मात्र प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही बालकास शाळेतून काढून टाकले जाणार नाही, अशी तरतूद करण्यात आलेली आहे. या अनुषंगाने इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी साठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार हक्क नियम, २०२३ (सुधारणा) शासन निर्णय:-

>

इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी साठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती सन २०२३-२४ पासून खालीलप्रमाणे लागू करण्यात येत आहे.

प्रचलित कार्यपद्धती व कायदेशीर बाबी:-

महाराष्ट्र राज्यामध्ये सन २०१०-११ या शैक्षणिक वर्षापासून पासून इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी साठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धती लागू करण्यात आलेली आहे. त्यानुसार इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी मधील विद्यार्थ्यांचे आकारिक व संकलित मूल्यमापन करण्यात येते. सदर कार्यपद्धतीमधील मुद्दा २.१० नुसार “ड” व त्याखालील श्रेणी मिळाल्यास अशा विद्यार्थ्यांना अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून किमान श्रेणी “क-२” पर्यंत आणणे शाळा व शिक्षकांवर बंधनकारक राहील. मात्र, अशा विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत त्याच इयत्तेत ठेवता येणार नाही, असे नमूद करण्यात आलेले आहे.

सबब, इ. ८ वी पर्यंत कोणत्याही बालकास कोणत्याही इयत्तेमध्ये अनुत्तीर्ण ठरविणेत येत नाही अथवा बालकास त्याच वर्गात ठेवले जात नाही.

इयत्ता ५ वी व ८ वी साठी वार्षिक परीक्षेची आवश्यकता (प्रचलित मूल्यमापन २ पद्धतीच्या मर्यादा):-

१) इयत्ता ८ वी पर्यंत विद्यार्थी नापास होत नाहीत, म्हणजे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होत नाही असा बऱ्याच पालकांचा समज आहे. पूर्वीप्रमाणे वार्षिक परीक्षा घेण्यात याव्यात अशी समाज भावना दिसून येते.

२) सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार काही कारणास्तव एखाद्या बालकाने अपेक्षित अध्ययन संपादणूक (क-२ श्रेणी) प्राप्त केलेली नसल्यासही बालकास त्याच वर्गात ठेवता येत नव्हते. त्यास पुढील वर्गात प्रवेश देणे अनिवार्य होते.

३) इयत्ता ८ वी पर्यंत अनुत्तीर्ण होत नसल्याने विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दूर्लक्ष होत होते.

४) बालकास वयानुरूप प्रवेश द्यावयाचा असल्याने वरच्या वर्गात प्रवेश मिळाल्यास पाठीमागील इयत्तांची अध्ययन संपादणूक अपेक्षित प्रमाणात प्राप्त झालेली नसते, त्यामुळे बालकाच्या पुढील अध्ययनात अडथळे येतात.

इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी साठी वार्षिक परीक्षेबाबत नवीन पद्धतीमुळे होणारे अपेक्षित फायदे:-

१) इयत्ता १ ली ते इयत्ता ५ वी या प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची वस्तुनिष्ठपणे खात्री होईल.

२) इयत्ता ६ वी ते इयत्ता ८ वी या उच्च प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची वस्तुनिष्ठपणे खात्री होईल.

३) प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम करूनच विद्यार्थ्यांना उच्च प्राथमिक व माध्यमिक स्तरावर प्रवेश देता येईल.

४) उच्च प्राथमिक स्तरावर वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश देण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी प्राथमिक स्तरावरील अध्ययन निष्पत्ती प्राप्त केल्या आहेत याची सुनिश्चिती करता येईल.

५) वार्षिक परीक्षेसाठी आवश्यकतेनुसार सवलतीचे वाढीव गुण, अतिरिक्त पूरक मार्गदर्शनाची सोय व पुनर्परीक्षेची संधी या विशेष प्रयोजनांमुळे विद्यार्थ्यामध्ये परीक्षेबाबत असणारी भीती दूर करता येईल.

इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी साठी वार्षिक परीक्षेचा उद्देश:-

१) इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी मधील प्रत्येक विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन वर्षाअखेर प्रत्येक विषयामध्ये अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त झाली आहे किंवा नाही याची खात्री करणे.

२) इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी मधील प्रत्येक विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन वर्षाअखेर ज्या विषयामध्ये अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त झाली नाही अशा विद्यार्थ्यास संबधित विषयासाठी अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून पुनर्परीक्षा घेऊन अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त झाली आहे याची खात्री करणे.

३) विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासाची सवय लावणे आणि पुढील शैक्षणिक आव्हानांना / स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी तयार करणे.

इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी साठी वार्षिक परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती:-

इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी साठी वार्षिक परीक्षा:-

१) इयत्ता ५ वी व ८ वी साठी प्रथम व द्वितीय सत्रामध्ये आकारिक मूल्यमापन शासन निर्णय दि. २० ऑगस्ट, २०१० अन्वये विहित करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार करण्यात येईल.

२) सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार द्वितीय सत्रातील संकलित मूल्यमापन २ हे वार्षिक परीक्षा म्हणून संबोधण्यात येईल.

३) मात्र संकलित मूल्यमापन १ चे मूल्यमापन प्रचलित सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार होईल.

४) वार्षिक परीक्षा प्रती विषय गुणांचा भारांश पुढीलप्रमाणे:

इयत्ता वार्षिक परीक्षा
तोंडी / प्रात्यक्षिक लेखी परीक्षा एकूण गुण
५ वी १० ४० ५०
८ वी १० ५० ६०

५) वार्षिक परीक्षा ही शैक्षणिक वर्षाच्या द्वितीय सत्रातील अभ्यासक्रम/पाठ्यक्रम / अपेक्षित अध्ययन निष्पत्ती यावर आधारित असेल.

६) वार्षिक परीक्षेसाठी पुढील विषयांचा समावेश असेल.

इयत्ता विषय
५ वी प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, संदर्भ अभ्यास भाग १ व २
८ वी प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र

७) कला, कार्यानुभव, आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयांसाठी शासन निर्णय दि. २० ऑगस्ट, २०१० अन्वये विहित केलेल्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार फक्त आकारिक मूल्यमापन करण्यात यावे. या विषयांसाठी वार्षिक परीक्षा व पुनर्परीक्षा असणार नाही.

८) इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी साठी वार्षिक परीक्षेचे आयोजन द्वितीय सत्राचे अखेरीस साधारणपणे एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शाळास्तरावर करण्यात यावे.

९) सत्राअखेरीस अन्य इयत्तांसोबतच इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी इयत्तांचाही निकाल जाहीर करण्यात करण्यात यावा.

इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी वर्गोन्नतीसाठी निकष:-

१) इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी साठी वार्षिक परीक्षा यांचे प्रती विषय एकूण गुण यांचे आधारावर उत्तीर्ण / अनुत्तीर्ण ठरविण्यात येईल.

२) इयत्ता ५ वी साठी प्रती विषय किमान १८ गुण (३५%) प्राप्त करणे आवश्यक राहील.

३) इयत्ता ८वी साठी प्रती विषय किमान २१ गुण (३५%) प्राप्त करणे आवश्यक राहील.

४) गुणपत्रकामध्ये श्रेणी ऐवजी गुण देण्यात येतील.

५) वार्षिक परीक्षेमध्ये विद्यार्थी कोणत्याही विषयामध्ये अनुत्तीर्ण झाल्यास अथवा कोणत्याही कारणामुळे वार्षिक परीक्षेस गैरहजर राहिल्यास तो अनुत्तीर्ण समजण्यात येईल. मात्र त्याला पुनर्परीक्षा देण्याची संधी उपलब्ध असेल.

६) इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी तील विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असल्यास सवलतीचे गुण विहित केल्याप्रमाणे देण्यात येतील. मात्र सवलतीचे गुण देऊनही विद्यार्थी एक किंवा एकापेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण होत असल्यास अशा विषयाची पुनर्परीक्षा घेण्यात येईल.

७) पुनर्परीक्षा घेण्यापूर्वी अनुत्तीर्ण झालेल्या विषयासाठी विद्यार्थ्यांना शाळेमार्फत अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करण्यात यावे. पुनर्परीक्षा देण्यासाठी पात्र ठरलेला एकही विद्यार्थी अतिरिक्त पूरक मार्गदर्शनापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी.

८) अतिरिक्त पूरक मार्गदर्शनासाठीचे वेळापत्रक, विद्यार्थी उपस्थिती, शिक्षक उपस्थिती याबाबतच्या नोंदी शाळास्तरावर ठेवण्यात याव्यात.

इयत्ता ५ वी व ८ वी साठी पुनर्परीक्षा:-

१) पुनर्परीक्षा केवळ इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी च्या वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येईल.

२) वार्षिक परीक्षेत ज्या विषयामध्ये विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेला आहे, अशा विषयांसाठी पुनर्परीक्षा घेण्यात येईल.

३) कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण व आरोग्य शिक्षण या विषयांची पुनर्परीक्षा असणार नाही.

४) पुनर्परीक्षेमधील गुणांच्या आधारेच विद्यार्थ्यास उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण ठरविण्यात यावे.

५) पुनर्परीक्षा प्रती विषय भारांश पुढीलप्रमाणे असेल.

इयत्ता पुनर्परिक्षा
तोंडी / प्रात्यक्षिक लेखी परीक्षा एकूण गुण
५ वी १० ४० ५०
८ वी १० ५० ६०

६) पुनर्परीक्षा ही पाठीमागील शैक्षणिक वर्षाच्या द्वितीय सत्रामधील अभ्यासक्रम/ पाठ्यक्रम / अध्ययन निष्पत्ती यावर आधारित असेल.

७) वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता गुण सुधारण्यासाठी पुनर्परीक्षा असणार नाही.

८) इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी साठी वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून विदर्भ वगळता जूनच्या पहिल्या आठवड्यात पुनर्परीक्षा घेण्यात याव्यात. विदर्भामध्ये जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पुनर्परीक्षा घेण्यात याव्यात.

९) नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्याच्या आत पुनर्परीक्षा घेऊन निकाल प्रसिद्ध होईल, यादृष्टीने नियोजन व अंमलबजावणी शाळांनी करावी. जेणेकरून पुनर्परीक्षा देणारा विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात यावा.

१०) पुनर्परीक्षेतही विद्यार्थी एक किंवा एका पेक्षा जास्त विषयात अनुत्तीर्ण होत असल्यास त्यास त्याच वर्गात ठेवण्यात येईल. (वर्गोन्नती दिली जाणार नाही)

११) पुनर्परीक्षेचा निकाल नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्याच्या किमान तीन दिवस अगोदर प्रसिद्ध करणे व संबधित विद्यार्थ्याला उपलब्ध करून देणे शाळेवर बंधनकारक राहील.

१२) पुनर्परीक्षा घेण्याबाबतची आवश्यक ती पूर्वतयारी केंद्रप्रमुख व शाळा मुख्याध्यापक यांनी समन्वयाने केंद्रस्तरावर अथवा शाळास्तरावर करावी.

१३) इयत्ता पाचवी पुनर्परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या प्रत्येक विषयासाठी किमान १८ गुण (३५%) विद्यार्थ्याने प्राप्त करणे अनिवार्य आहे.

१४) इयत्ता आठवी पुनर्परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या प्रत्येक विषयासाठी किमान २१ (३५%) गुण विद्यार्थ्याने प्राप्त करणे अनिवार्य आहे.

१५) इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी तील विद्यार्थी पुनर्परीक्षेत अनुत्तीर्ण होत असल्यास सवलतीचे गुण विहित केल्याप्रमाणे देण्यात येतील.

सवलतीचे गुण :-

अ) वार्षिक परीक्षा अथवा पुनर्परीक्षा / तत्सम परीक्षेसाठी सवलतीचे गुण:-

१) वार्षिक परीक्षेनंतर वर्गोन्नतीसाठी अपात्र ठरणाऱ्या / अनुतीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यास उत्तीर्ण होण्यासाठी वाढीव सवलतीचे गुण (Grace Marks) देय असतील. एका विद्यार्थ्यास सवलतीचे कमाल १० गुण देता येतील. कमाल तीन विषयांसाठी विभागून असे गुण देता येतील मात्र एका विषयासाठी कमाल ०५ गुण देता येतील.

२) सवलतीचे गुण देऊन विद्यार्थी उत्तीर्ण होत असेल तरच सवलतीचे गुण देण्यात यावेत.

ब) वयानुरुप समकक्ष वर्गात प्रवेश:-

१) इयत्ता ५ वी पर्यंत विद्यार्थ्यांना वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश देण्यात येईल.

२) इयत्ता ६ वी ते ८ वी च्या वर्गात वयानुरूप प्रवेश द्यावयाचा असेल तर त्या विद्यार्थ्यास इयत्ता ५ वी ची वार्षिक / पुनर्परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल.

३) विद्यार्थी पाचवी इयत्तेची वार्षिक परीक्षा/पुनर्परीक्षा उत्तीर्ण नसल्यास ज्या शाळेत वयानुरूप प्रवेश विद्यार्थी घेणार आहे, अशा शाळेने इयत्ता ५ वी वर्गासाठीच्या पुनर्परीक्षेप्रमाणे त्या विद्यार्थ्यासाठी अशा तत्सम परिक्षेचे आयोजन करावे व सदर परीक्षेचा तात्काळ निकाल प्रसिद्ध करावा. अशा तत्सम परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्यास वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश देण्यात यावा. अथवा तो विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्यास इयत्ता ५ वी च्याच वर्गात प्रवेश देण्यात यावा.

४) इयत्ता ६ वी ते ८ वी च्या वर्गात वयानुसार प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता ५ वी ची वार्षिक परीक्षा / पुनर्परीक्षा यासाठी असणाऱ्या प्रश्नपत्रिकेप्रमाणे समांतर प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर काढण्यात याव्यात. यासाठी अभ्यासक्रम द्वितीय सत्रातील असेल. यासाठी प्रश्नपत्रिका निर्मितीसाठी राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे च्या वेबसाईट वरील प्रश्न पेढी व नमुना प्रश्नपत्रिका यांचा आधार घेता येईल. अशा विद्यार्थ्याने प्रत्येक विषयात वार्षिक परीक्षा अथवा पुनर्परीक्षेप्रमाणे किमान गुण मिळवून उत्तीर्ण होणे आवश्यक असेल. उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यकता असल्यास परीक्षा अथवा पुनर्परीक्षाप्रमाणे सवलतीचे गुण देय असतील.

५) वयानुरूप प्रवेशित बालक द्वितीय सत्रात उशिराने दाखल झाल्यास त्यास वार्षिक परीक्षेस प्रविष्ट होण्याची संधी देण्यात येईल.

सर्वसाधारण सूचना:-

१) विद्यार्थी इयत्ता ५ वी किंवा ८ वी मध्ये अनुत्तीर्ण झाला म्हणून अथवा कोणत्याही कारणास्तव त्यास प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत शाळेतून काढून टाकले जाणार नाही.

२) इयत्ता ५ वी व ८ वी साठी शाळास्तरावर शिक्षकांनी वार्षिक परीक्षा व पुनर्परीक्षा घ्याव्यात. तसेच उत्तरपत्रिका तपासणी करून शाळास्तरावर विहित कालावधीत निकाल प्रसिद्ध करावा.

३) विद्यार्थी इयत्ता ५ वी किंवा ८ वी च्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास तसेच त्याने शाळा बदलण्याचा निर्णय घेतल्यास तो ज्या शाळेत प्रवेशित होईल त्या शाळेने त्या विद्यार्थ्याची पुनर्परीक्षा घ्यावी.

४) दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबतीत दि. १६ ऑक्टोंबर २०१८ च्या शासन निर्णयातील त्यांच्या अध्ययन शैलीनुसार मूल्यांकनाबाबत व शैक्षणिक सवलतीबाबत मार्गदर्शक सूचनांनुसार अंमलबजावणी करण्यात यावी.

५) सदर मूल्यमापन कार्यपद्धती राज्यमंडळाचा अभ्यासक्रम लागू असणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांना लागू राहील.

६) याव्यतिरिक्त महाराष्ट्रात इतर अभ्यासक्रम राबविणाऱ्या सर्व मंडळांनी इयत्ता ५ वी व ८ वी च्या परीक्षेबाबत संदर्भ क्र. ६ नुसार कार्यपद्धती निश्चित करावी.

७) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत वार्षिक परीक्षा / पुनर्परीक्षा यासाठी नमुना प्रश्नपत्रिका, प्रश्नपेढी, प्रश्नपत्रिका भारांश इत्यादीबाबत वेगळ्याने सूचना आवश्यकतेनुसार निर्गमित करण्यात येतील.

८) संकलित मूल्यमापनासाठी १ साठी प्रश्नपत्रिका शाळास्तरावर तयार करण्यात याव्यात.

९) वार्षिक परीक्षा/पुनर्परीक्षा प्रश्नपत्रिका शाळास्तरावर तयार करण्यात याव्यात.

१०) सदर मूल्यमापन कार्यपद्धती केवळ इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी साठी लागू राहील. उर्वरित इयत्तांच्या मूल्यमापनासाठी शासन निर्णय दि. २० ऑगस्ट २०१० नुसार सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धत्तीचा अवलंब करावा.

११) सदर मूल्यमापन कार्यपद्धती शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून लागू राहील.

१२) त्यांचे साठी प्रचलित सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धत्ती लागू असेल.

१३) गुणपत्रक नमुना (परीक्षा व पुनर्परीक्षा) परिशिष्ठ १ व २ मध्ये देण्यात आलेला आहे

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग : महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार हक्क नियम, २०२३ (सुधारणा) अधिसूचनेनुसार इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी साठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – कायदेविषयक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘विधी विधान इंटर्नशिप’

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.