माझी वसुंधरा अभियान – २.0 राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्याबाबत शासन निर्णय जारी
पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित “माझी वसुंधरा अभियान” हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक २ ऑक्टोबर, २०२० ते दिनांक १५ एप्रिल, २०२१ या कालावधीत राबविण्यात आले. स्पर्धेत राज्यातील एकुण ६८६ स्थानिक स्वराज्य संस्था सहभागी झाल्या. त्यामध्ये ४३ अमृत शहरे, २२२ नगर परिषदा, १३० नगरपंचायत व २९१ ग्रामपंचायती यांचा समावेश होता.
स्थानिक स्वराज्य संस्थांनी माझी वसुंधरा अभियान कालावधीत केलेल्या कामाचे डेस्कटॉप मुल्यमापन करण्यात आले. राज्यातील कोरोनाची स्थिती विचारात घेवून प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन मुल्यमापन करण्याऐवजी डेस्कटॉप मुल्यमापनामध्ये ज्या स्थानिक संस्था सर्वोत्तम आल्या त्या स्थानिक संस्थांचे अभासी मुल्यमापन (Virtual Assessment) करण्यात आले.
या दोनही मुल्यमापनातील एकूण गुणांच्या आधारे माझी वसुंधरा अभियानातील सर्व पुरस्कार प्राप्त स्थानिक संस्थांना व अधिकाऱ्यांना जागतिक पर्यावरण दिनी म्हणजे, दिनांक ५ जून, २०२१ रोजी आयोजित माझी वसुंधरा अभियान सन्मान सोहळ्यात सन्मानित करण्यात आले आहे.
जागतिक पर्यावरण दिनी झालेल्या कार्यक्रमात माझी वसुंधरा अभियान २.० ची सुरवात मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आली असून, त्याअनुषंगाने “माझी वसुंधरा अभियान २.०” हे राज्यातील स्थानिक संस्थांमध्ये राबविण्याच्या सविस्तर सूचना व माझी वसुंधरा अभियान २.० ची अंतीम टूलकीट निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
माझी वसुंधरा अभियान २.०:
पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित माझी वसुंधरा अभियान २.० हे राज्यातील खालील शासन निणर्यातील नमूद केलेल्या ११,९६८ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्यास शासन मान्यता देत आहे.
या अभियानांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांनी पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर केलेल्या कामांचे मुल्यमापन करण्यासाठी खालील शासन निर्णयातील दिलेल्या विगतवारीनुसार अमृत गटासाठी ६००० व अमृत गट वगळून इतर गटांसाठी ५५०० गुण ठेवण्यात आले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सदर अभियान प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी संबंधित आयुक्त, महानगरपालिका, मुख्याधिकारी, नगरपरिषद/नगरपंचायत व ग्रामसेवक, ग्राम पंचायत यांची राहील. तर, जिल्हयाच्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रमुख म्हणून संबंधित जिल्हयाचे जिल्हाधिकारी, जिल्हयाच्या ग्रामीण संस्थांचे प्रमुख म्हणून संबंधित जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित महसूली विभाग प्रमुख म्हणून विभागीय आयुक्त यांनी त्यांचे विभागातील/जिल्हयातील स्थानिक संस्थांना प्रोत्साहन देवून त्यांच्याकडून सदर अभियानात उच्चत्तम कामगिरी करून घेण्याची जबाबदारी सोपविण्यात येत आहे.
सदर अभियानाचा कालावधी दिनांक १६ एप्रिल, २०२१ ते दिनांक ३१ मार्च, २०२२ असा राहिल. या अभियानांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थेने केलेल्या कामाचे डेस्कटॉप मुल्यमापन दिनांक १ एप्रिल, २०२२ ते दिनांक ३१ एप्रिल, २०२२ या कालावधीत करण्यात येईल व डेस्कटॉप मुल्यमापनात यशस्वी ठरलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे फिल्ड असेसेमेंट दिनांक १ मे, २०२२ ते ३१ मे, २०२२ या कालावधीत त्रयस्त यंत्रणां मार्फत करण्यात येईल व त्याचा निकाल जागतिक पर्यावरण दिनी म्हणजे दिनांक ५ जून रोजी जाहिर करून बक्षिस वितरण करण्यात येईल.
शासन निर्णय: माझी वसुंधरा अभियान -२.० राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ग्रामविकासाचे विविध उपक्रम राज्यात राबविणेबाबत शासनाचे निर्देश
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!