Pensioners :निवृत्तीवेतनधारकांनी ऑनलाईन रक्कम भरण्यासाठी येणाऱ्या संदेशाबाबत सावध रहा
अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई आणि राज्यातील सर्व जिल्हा कोषागार कार्यालयांमधून निवृत्तीवेतनधारक, कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना (Pensioners) निवृत्तीवेतन, सुधारित निवृत्तीवेतन, कुटुंबनिवृत्तीवेतन तसेच निवृत्तीवेतन विषयक इतर लाभ प्रदान करण्यात येतात. सदर लाभ प्रदान करताना कोणत्याही प्रकारे वसुलीबाबत, प्रदान करण्यात येणाऱ्या रकमेबाबत कोषागार कार्यालयांमार्फत फोन करून संपर्क साधला जात नाही. तसेच ऑनलाईन व्यवहार करण्याविषयी सूचित केले जात नाही. अधिदान व लेखा कार्यालय, कोषागार कार्यालयांमार्फत फक्त लेखी स्वरूपात पत्रव्यवहार केला जातो. अशा येणाऱ्या संदेशाबाबत सावध राहून कुणीही प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन लेखा व कोषागारे संचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
याबाबत काही निवृत्तीवेतनधारकांना (Pensioners) दूरध्वनी, भ्रमणध्वनीद्वारे ऑनलाईन रक्कम भरल्यानंतर कोषागारांतील थकीत रक्कम मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबतच्या तक्रारी कोषागार कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. अशा कोणत्याही प्रकारचा दूरध्वनी अधिदान व लेखा कार्यालय तसेच जिल्हा कोषागार कार्यालयांमार्फत केला जात नाही. तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यास निवृत्तीवेतनधारकांच्या घरी पाठविले जात नाही.
दूरध्वनी, भ्रमणध्वनीवरून प्रदानासंदर्भात संपर्क साधून रक्कम ऑनलाईन, गुगल पे, फोन पे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे भरणेबाबत अधिदान व लेखा कार्यालय तसेच जिल्हा कोषागार कार्यालयांमार्फत कळविले जात नाही. अशा दूरध्वनी, भ्रमणध्वनीला प्रतिसाद देऊन निवृत्तीवेतनधारकांनी (Pensioners) परस्पर रक्कम भरल्यास ती निवृत्तीवेतनधारकांची वैयक्तिक जबाबदारी राहील, याची नोंद घ्यावी.
तसेच अशा प्रकारचा दूरध्वनी प्राप्त झाल्यास कृपया आपण निवृत्तीवेतन घेत असलेल्या अधिदान व लेखा कार्यालय अथवा जिल्हा कोषागार कार्यालयास अवगत करावे. तसेच कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी अथवा शंका असल्यास प्रथमत: संबंधित निवृत्तीवेतन घेत असलेल्या कार्यालयांशी संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन लेखा व कोषागारे संचालनालयाचे संचालक दीपा देशपांडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
हेही वाचा – शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!