महाराजस्व अभियानाअंतर्गत अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी जमिनीचे पट्टे देणार !
विविध शासकीय जमिनीवर अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून असलेल्या रहिवाशांना कायमस्वरूपी पट्टे देण्याचा शब्द आपण दिला होता. त्याची सुरवात ब्रम्हपुरी येथून झाली आहे. महाराजस्व अभियानाअंतर्गत या नागरिकांना कायमस्वरूपी पट्टे देतांना जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून अतिशय आनंद होत आहे. इतरही ठिकाणी अतिक्रमण धारकांना पट्टे वाटप करण्यात येईल, अशी ग्वाही मदत व पुनर्वसनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार यांनी दिली.
ब्रम्हपुरी येथे महाराजस्व अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांचा लाभ देतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर उपविभागीय अधिकारी संदीप भस्के, उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे, कार्यकारी अभियंता हेमंत कोठारी, तहसीलदार उषा चौधरी, प्रभाकर सेलोकर, खेमराज तिड़के, विलास विखार, प्रा. जगनाडे आदी उपस्थित होते.
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीपासून महाराजस्व अभियानाला सुरवात झाली आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, समाजातील सर्व जाती-धर्माच्या व शेवटच्या घटकातील लोकांना न्याय देण्याची महाराजांची भूमिका होती. याच संकल्पनेवर राज्यशासन काम करत आहे. अतिक्रमण धारकांना पट्टे देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने सर्वांना पट्टे देण्यात येईल.
ब्रम्हपुरीची वाटचाल विकासाच्या दिशेने होत आहे. प्रशासन येथे स्थिरावण्यासाठी 19 कोटी रुपये खर्च करून अधिकारी – कर्मचा-यांच्या निवासस्थानाच्या बांधकामाचे भूमिपूजन आज होत आहे. शहरात उद्यान आणि जलतरण तलावासाठी 9 कोटी रुपये, क्रीडा संकुलासाठी 8 कोटी दिले आहे.
येथील पंचायत समिती इमारतकरीता 14 कोटी मंजूर आहे. 100 बेडेड रुग्णालय येथे होत असून अतिरिक्त 12 कोटी रुपये आयसीयू बेडसाठी मिळाले आहे. शहरात शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ़ पुतळा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 15 फूट उंचीचा पुतळा उभारण्यासाठी दीड कोटी रुपये खर्च करण्यात येईल. पाणी पुरवठा योजना आणि 100 कोटी रूपयांची भूमिगत गटार योजना प्रस्तावित आहे. विशेष म्हणजे गारमेंट क्लस्टरच्या माध्यमातून तीन हजार महिलांना येथे रोजगार उपलब्ध होत आहे, असेही त्यांनी सांगितले.
गत 40 वर्षांपासून ब्रम्हपुरी येथील शारदा कॉलनीचा प्रलंबित असलेला कायमस्वरूपी पट्ट्याचा विषय पालकमंत्र्यांच्या विशेष पुढाकराने निकाली काढण्यात आला. यावेळी येथील 42 कुटुंबांना एकत्रित पट्ट्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत नानाजी सावरकर, शोभा सोनटक्के, जीजाबाई पारधी, विद्या ठाकरे यांना तसेच शेतकरी आत्म्यहत्याग्रस्त कुटुंबातील माया पारधी यांना धनादेश देण्यात आला.
सर्वांसाठी घरे अतिक्रमण नियमनाकुल करणे अंतर्गत रविंद्र देशमुख, युवराज बगमारे, पुष्पा गेडाम, मनोहर मेश्राम यांना, नगर परिषद क्षेत्रातील जीजाबाई चाफले, सुषमा भेदरे, मंदा बोरकर यांना प्रमाणपत्र तर प्राधान्यकुटुंब लाभार्थी योजनेअंतर्गत जया करबे, वैशाली प्रधान, तेजस्विनी दलाल आदींना शिधापत्रिका वाटप करण्यात आले.
सुरुवातीला पालकमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. प्रस्ताविक तहसीलदार उषा चौधरी यांनी केले. संचालन नरेश बोधे यांनी तर आभार श्री. राऊत यांनी मानले.
या विकास कामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन : सा.बा. विभागाच्या निवासी इमारत बांधकामाच्या भुमिपूजन (19 कोटी), सावलगाव येथे रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या भुमिपूजन (4 कोटी 90 लक्ष), मालडोंगरी येथे उंच पुलाच्या बांधकामाच्या भुमिपूजन (5 कोटी), पारडगाव येथे रस्ता (30 लक्ष), बोढेगाव येथे रस्ता (52 लक्ष), रणमोचन येथे रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या भुमिपूजन (52 लक्ष).
हेही वाचा – महाराष्ट्र ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमण नियम
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!