जिल्हा परिषदनिवडणूकमहानगरपालिकामहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेषसरकारी कामे

आता होणार वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी ! – Voter Registration

आतापर्यंत मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी हा अर्हता दिनांक असायचा. म्हणजे १ जानेवारी किंवा त्या आधी १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता यायची. मात्र, २०२३ पासून जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या एक तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची अठरा वर्षे पूर्ण होतील, त्यांना ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या विशेष मोहिमे-अंतर्गत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

निवडणुका पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. ९ नोव्हेंबर रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप यादी प्रकाशित केली जाईल. मतदारांनी आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इ. तपशील मतदार यादीत तपासून ते अचूक आहेत का याची खात्री करणे आवश्यक आहे. बरेचदा ऐन मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाही, अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. त्यामुळे मतदारांनी प्रारूप मतदार यादीतील आपले तपशील आत्ताच तपासणे महत्त्वाचे असल्याचे श्री.देशपांडे यांनी सांगितले.

९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ हा कालावधी मतदार नोंदणीचा आहे, तसा तो एखाद्याच्या नावासंबंधी हरकती घेण्याचाही आहे. एखाद्या मतदारसंघातील एखादा मतदार, यादीत दिलेल्या पत्त्यावर राहत नसेल, तर अशा नावाबद्दल त्याच मतदारसंघातील अन्य मतदार आक्षेप घेऊ शकतो. त्यामध्ये जर तथ्य आढळून आले तर पडताळणी करून संबंधित मतदाराच्या नावाची वगळणी केली जाते. मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण होण्यासाठी अशा अपात्र मतदारांची वगळणीही महत्त्वाची असते.

यंदाच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने १९ व २० नोव्हेंबर आणि ३ व ४ डिसेंबर या दिवशी राज्यभर विशेष शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. तसेच वंचित घटकांसाठी खास शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. महिला आणि दिव्यांग यांच्या नाव नोंदणीसाठी १२ व १३ नोव्हेंबर रोजी, तर २६ व २७ नोव्हेंबर रोजी तृतीयपंथी नागरिक, देह व्यवसाय करणाऱ्या महिला आणि घर नसलेले भटक्या व विमुक्त जमातीचे नागरिक यांच्या नाव नोंदणीसाठी राज्यभर विशेष शिबिरे घेतली जातील. तसेच तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, नेहरू युवा केंद्र संघटन, भारत स्काऊट यांच्या सहकार्याने राज्यभर मतदार नोंदणीची शिबिरे राबवण्यात येणार आहेत. शिवाय, मतदार नोंदणी, नाव वगळणी, तपशिलातील दुरुस्त्या या सुविधा NVSP, Voter Portal या संकेतस्थळावर आणि Voter Helpline या मोबाइल ॲपवर उपलब्ध आहेत.

ग्राम विकास व पंचायतराज विभागाच्या सहकार्याने ११ नोव्हेंबर रोजी राज्यभर विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे. या दिवशी राज्यभरातील ग्रामसभांमध्ये मतदार यादीचे वाचन केले जाईल. त्याअंतर्गत नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, विवाहानंतर गावात आलेल्या स्त्रिया, गावात कायमस्वरूपी नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक यांची नाव नोंदणी केली जाईल. तसेच दुबार नावे, मृत व्यक्ती, गावातून कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या व्यक्ती, लग्न होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रिया यांच्या नावांची मतदार यादीतून वगळणी केली जाईल.

मतदार नोंदणीसाठी पात्र युवांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवावे, तसेच प्रत्येक मतदाराने प्रारूप मतदार यादीतील आपले तपशील अचूक आहेत का याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.

हेही वाचा – घरबसल्या मतदान कार्ड ऑनलाईन कसे काढायचे? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस – Voting Card Apply Online

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.