कृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६२ वरून ६० वर्ष
कृषि व पदुम विभागाच्या संदर्भाधीन क्र. १ येथील दि.४.४.२०१५ च्या शासन निर्णयान्वये राज्यातील कृषि विद्यापीठामधील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, अधिष्ठाता आणि संचालक दर्जातील अध्यापक यांच्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६० वर्षावरुन ६२ वर्षे करण्यात आली आहे. संदर्भाधीन क्र. २ येथील उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय दि. १२ जुलै, २०१६ अन्वये राज्यातील अकृषी विद्यापीठे / शासकीय / अशासकीय अनुदानित महाविद्यालये / शासकीय तंत्र महाविद्यालये/पदवी संस्था या राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापकांच्या सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षे वयावरुन ६० वर्षे करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने सिव्हील अपील क्र.५५२७-५५४७/२०१३ यामध्ये सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादेमध्येबाबत निर्णय घेण्याचे अधिकार राज्य शासनाला राहतील, असा निर्णय दिलेला आहे.
सद्य:स्थितीत राज्यातील कृषी विद्यापीठातील शिक्षकवर्गीय पदांसाठी पात्रताधारक उमेदवार उपलब्ध आहेत व त्यांना संधी देऊन कार्यक्षम मनुष्यबळाची निर्मिती करणे आवश्यक आहे. तसेच, भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या पाचव्या अधिष्ठाता समितीच्या शिफारशीनुसार, कृषि विषयक नवीन अभ्यासक्रम विहित करण्यात आला आहे. ह्या नवीन अभ्यासक्रमाचे अध्यापन करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणारे कुशल अध्यापकीय मनुष्यबळ दीर्घकालीन विचार करता निर्माण करणे आवश्यक असून, नवीन भरतीमुळे विद्यापीठामध्ये संशोधन, शिक्षण या क्षेत्रामध्ये दीर्घ स्वरुपात अनुभवी व कुशल अध्यापकीय मनुष्यबळ उपलब्ध होईल. त्यामुळे राज्यातील कृषि विद्यापीठामधील
आणि संलग्नित व अनुदानित कृषि विद्यापीठांमधील शिक्षकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या नियतवयोमानानुसार सेवानिवृत्तीच्या वयात, संदर्भ क्र. १ येथील दि.४.४.२०१५ च्या शासन निर्णयाद्वारे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे वयावरुन ६२ वर्षे वाढ करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
कृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६२ वरून ६० वर्ष शासन निर्णय:
राज्यातील कृषि विद्यापीठांमधील आणि संलग्नित व अनुदानित महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, विभागप्रमुख, सहयोगी अधिष्ठाता, शारीरिक शिक्षण निदेशक, क्रिडा अधिकारी, ग्रंथपाल, अधिष्ठाता आणि संचालक दर्जातील अध्यापकांची नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६२ वर्षे वयावरुन ६० वर्षे करण्यात येत आहे.
परिणामी, असे सर्व अध्यापकीय कर्मचारी ज्या महिन्यात ६० वर्षांचे होतील, त्या महिन्याच्या अखेरच्या दिवशी मध्यान्नोत्तर सेवेतून निवृत्त होतील आणि ज्या अध्यापकीय कर्मचा-यांची जन्मतारीख महिन्याच्या एक तारखेला असेल ते अध्यापकीय कर्मचारी ६० वर्षे वयाचे होताच मागील महिन्याच्या शेवटच्या दिवशी मध्यान्नोतर सेवानिवृत्त होतील.
कृषि व पदुम विभागाच्या दि.४.४.२०१५ च्या शासन निर्णयास अनुसरून ज्या अध्यापकीय कर्मचा-यांनी, सेवानिवृत्ती वयोमर्यादा ६० वर्षावरुन ६२ वर्ष केलेल्या निर्णयाचा लाभ घेतलेला आहे, असे ६० वर्षावरील अध्यापकीय कर्मचारी, वयाची ६२ वर्षे पूर्ण होताच सेवानिवृत्त होतील.
सदर शासन निर्णय मा. मंत्रिमंडळाच्या दि.०५.०२.२०२४ रोजीच्या बैठकीतील मान्यतेनुसार व वित्त विभागाच्या अनौपचारीक संदर्भ क्र.२१/१९/सेवा-४ दि.२५.०१.२०१९ अन्वये मिळालेल्या सहमती नुसार निर्गमित करण्यात येत आहे.
कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय: राज्यातील कृषि विद्यापीठाअंतर्गत शिक्षकवर्गीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षे वयावरुन ६० वर्षे करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक निश्चित !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!