पंप संच व पाईप अनुदान योजना (पोकरा अंतर्गत) ऑनलाईन अर्ज करा
हवामान बदलाचा राज्याच्या शेतीवर विपरीत परिणाम दिसून येत असून, भविष्यात देखील सदर परिणामांची व्याप्ती वाढणार असल्याचे राज्याच्या हवामान बदला विषयक कृती आराखडयामध्ये नमूद केले आहे. मराठवाडा व विदर्भातील शेतक-यांना गेल्या काही वर्षांपासून मोठया दुष्काळास सामोरे जावे लागत असून भू-गर्भातील पाणीसाठयावर व जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. परिणामी शेतीमधील पिकांची उत्पादकता घटत आहे. तसेच पूर्णा नदीच्या खो-यातील भू-भाग हा निसर्गतः क्षारपड असल्याने शेतीसाठी सिंचनास मर्यादा येत आहेत. या प्रतिकूल परिस्थीती मध्ये अल्पभू-धारक शेतक-यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थीतीशी जुळवून घेण्यास शेतक-यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाचा जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरु करण्यात आलेला आहे.
राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीची संरक्षित सिंचनाच्या माध्यमातून उत्पादकता वाढवण्यासाठी यापूर्वी विविध योजनामधून अनुदानावर संरक्षित सिंचन सुविधा राबविण्यात आलेल्या आहेत व येत आहेत. त्यामुळे शेतक-यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. सद्यस्थितीत राज्यातील टंचाईग्रस्त परिस्थिती पाहता व शेतक-यांकडे पिकास संरक्षित सिंचन देणेकरिता व्यवस्था निर्माण करण्यासाठी जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत संरक्षित सिंचनाकरिता पाण्याची उपलब्धता या उपघटकांतर्गत पाणी उपसा साधने (पंप संच) व पाईप (एच.डी.पी.ई./पी.व्ही.सी.) हे वैयक्तिक लाभाचे घटक राबववणे प्रस्तावित आहे.
पंप संच व पाईप अनुदान योजनाची उद्दिष्टे:
1. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये समावेश करण्यात आलेल्या गावसमुहातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम बनवणे.
2. पाणी उपसा साधनांचा वापर करून सिंचनाची सोय करणे व कार्यक्षमता वाढवणे.
लाभार्थी निवडीचे निकष :
१. प्रकल्पांतर्गत निवड केलेल्या गावासाठीच्या ग्राम कृषी संजीवनी समितीने (VCRMC) मान्यता दिलेले अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांना, अनु. जाती/जमाती, महिला, दिव्यांग व इतर शेतकरी या प्राधान्यक्रमाने निवड करून लाभ देण्यात येईल.
२. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनासाठी पाणी उपलब्ध आहे, परंतु पाणी उपसा साधना अभावी पीक उत्पादनात घट येते अशा शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा.
३. पाणी उपसा साधने उपलब्ध असलेले तसेच या घटकाचा इतर कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना लाभ देय नाही.
अर्थसहाय्य:
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत राबविण्यात येणाऱ्या पाणी उपसा साधने अंतर्गत विदयुत पंप संच /डिझेल इंजिन व पाईप साहित्य घटकासाठी अनुज्ञेय अनुदानाचा तपशील खालीलप्रमाणे;
पंप संच /डिझेल इंजिन अनुदान :
- जास्तीत जास्त अनुदान मर्यादा : 75 %
- जास्तीत जास्त अनुदान रक्कम (Rs.): 15000
पाईप अनुदान:
- जास्तीत जास्त अनुदान मर्यादा : 75 %
- जास्तीत जास्त अनुदान रक्कम (Rs.): 22500
अंमलबजावणीची कार्यपद्धती: अंमलबजावणीतील विविध स्तरावरील जबाबदाऱ्या:
१.इच्छुक शेतकऱ्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या https://dbt.mahapocra.gov.in संकेत स्थळावर समूह सहाय्यकाच्या मदतीने नोंदणी करून अर्ज करावा. तसेच आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावीत.
२.मार्गदर्शक सूचनानुसार दिलेल्या तांत्रिक निकषाप्रमाणे साहित्य खरेदी करणे बंधनकारक राहील.
३.लाभार्थ्याने आवश्यक यंत्र सामुग्री उपलब्ध करुन घेण्याची जबाबदारी त्या लाभार्थ्याची राहील. तसेच कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम (अग्रीम ) मिळणार नाही.
४.निवडलेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार सेवा पुरवठादार संस्थानकडून पंप संच व पाईप खरेदी करण्याची मुभा राहणार आहे.
५.साहित्य प्रकल्प स्थळी पुरवठा झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे स्वसाक्षांकित करावीत व ऑनलाईन अनुदान मागणी करावी.
६.उपविभागीय व विभागीय कृषी अधिकारी यांनी ऑनलाईन पूर्वसंमती दिल्यानंतर घटकाची प्रत्यक्ष अंमलबजावणी- मांडणी व जोडणी करावी. सेवा पुरवठादार संस्थेकडील बिले शेतकऱ्याने स्वत:ची स्वाक्षरी करून ऑनलाईन अपलोड करणे आवश्यक आहे.
अधिक माहिती करिता इथे क्लिक करा.
हेही वाचा – नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध पोकरा अनुदान योजना – POCRA Yojana
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!