राज्यात ७०० ठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’! रुग्णांना मिळणार ‘या’ सेवा !
राज्यातील जनतेला प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व महानगरपालिका रुग्णालय यांच्यामार्फत आरोग्य सेवा उपलब्ध करुन दिली जाते. शहरी भागातील अतिशय दाटीवाटीने वसलेल्या भागापासून तसेच झोपडपट्टी वस्तीपासून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे अंतर जास्त असणे, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामकाजाच्या अयोग्य वेळेमुळे काही झोपडपट्ट्या व झोपडपट्टीसदृश भाग आरोग्य सेवापासून वंचित राहत आहे. तसेच राज्यातील दवाखाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने अद्ययावत बनविण्यासाठी, सातत्यपूर्ण आरोग्य, गुणवत्तापूर्ण सेवा तसेच सुलभ आणि परवडणारी जागतिक दर्जाची आरोग्य सेवा प्रदान करुन राज्याचा आरोग्य निर्देशांक वाढविण्याचे शासनाचे धोरण आहे. शहरी भागातील झोपडपट्ट्या व झोपडपट्टीसदृश भागामध्ये आरोग्य केंद्रे उपलब्ध नाहीत. त्यामुळे सदर भागातील सर्वसामान्य जनता आरोग्य सेवेपासून वंचित राहत आहे.
देशातील बऱ्याच राज्यांमध्ये दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी व आरोग्य निर्देशांक वाढविण्यासाठी शहरी भागातील अतिशय दाटीवाटीने वसलेल्या भागात व झोपडपट्टी क्षेत्रात दवाखाने स्थापन करुन आरोग्य सेवा देण्याचे प्रयोग सुरु करण्यात आलेले आहेत. याच धर्तीवर मुंबई महानगरपालिकेने सन २०२२-२३ मध्ये “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” केंद्राची स्थापना केली आहे. सदर आपला दवाखाना केंद्रांना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने एकूण १५५ ठिकाणी आपला दवाखाना केंद्र मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरु करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये त्यांनी एप्रिल २०२३ पर्यंत एकूण ७,४३,५७० रुग्णांना बाह्यरुग्णसेवा दिली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर राज्यामध्ये एकूण ७०० ठिकाणी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” स्थापन करण्याबाबत मा. उपमुख्यमंत्री महोदयांनी राज्याच्या अर्थसंकल्पिय भाषणाच्या वेळी घोषणा केलेली आहे. त्या अनुषंगाने “ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” स्थापन करण्यासाठी व त्यास आवश्यक असलेले अनुदान मंजुर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.
“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” स्थापन करण्यासाठी शासन निर्णय :-
मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर राज्यामध्ये ७०० “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” स्थापन करण्यास व त्यासाठी आवश्यक असलेला निधी सन २०२३ २४ या आर्थिक वर्षासाठी आगामी पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे रु.२१०.०१ कोटी (रु.१८९.०१ कोटी आवर्ती खर्च + रु.२१ कोटी अनावर्ती खर्च) मंजुर करण्यास याद्वारे मंजुरी देण्यात येत आहे.
(१)“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” या योजनेसाठी मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर आरोग्य केंद्रासाठी औषधे, चाचण्या, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, ५०० चौ. फुट जागा, फर्निचर, स्वच्छता व सुरक्षा उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
(२) सदर योजनेसाठी वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारीका, औषध निर्माण अधिकारी, सफाई कर्मचारी व अटेंडंट एवढा कर्मचारी वर्ग उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
(३) सदर योजनेतुन ३० प्रकारच्या चाचण्या, १०५ प्रकारच्या औषधी, ६६ प्रकारची वैद्यकीय उपकरणे, ४४ प्रकारची फर्निचर व वैद्यकीय साहित्य सामुग्री, सॉप्टवेअर, हॉर्डवेअर उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
(४) सदर आपला दवाखान्याची वेळ दुपारी २.०० ते रात्री १०.०० अशी ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे.
(५) सदर योजना नविन असल्यामुळे त्यासाठी नविन लेखाशिर्ष उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे.
(६) सदर योजना ५ वर्षासाठी कार्यरत राहणार असल्याने सदर योजनेसाठी दयावयाची प्रशासकीय मान्यता ५ वर्षासाठी देण्यात येत आहे.
“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” या योजनेचे कार्यक्षेत्र राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, कटकमंडळे इ. ठिकाणी साधारणत: १५००० लोकसंख्यामागे १ याप्रमाणे दवाखान्यांची निर्मिती करण्यात येईल.
“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” आरोग्य केंद्र स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या जागेची निवड १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच निधीच्या विनियोगाबाबत नियोजन व संनियंत्रण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग क्र. पंविआ – ५०२१/प्र.क्र.७९/भाग- १/२१/आरोग्य-७, दि. २२ नोव्हेंबर, २०२१ अन्वये गठित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीकडून करण्यात येईल.
“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ” योजनेत खालील बाबींचा अंर्तभाव असेल :
१. सदर आरोग्य सेवा लाभार्थ्यांना मोफत पुरविण्यात येईल.
२. सदर आरोग्य केंद्रांची वेळ दुपारी ०२.०० ते रात्री १०.०० पर्यंत असेल.
३. जिल्हा आरोग्य सोसायटीने भाड्याने जागा घ्यावी, त्यामध्ये आवश्यक बदल करावेत, सोयीसुविधा पुरवाव्यात, यंत्रसामुग्री, औषधे व डॉक्टरसहीत इतर कर्मचारी वर्ग उपलब्ध करावा.
४. सदर ५०० चौरस फुट भाड्याची जागा “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” साठी उपलब्ध करावी.
५. सदर दवाखान्यामध्ये औषधी वितरण मोफत पुरविण्यात येईल.
६. सदर आपला दवाखाने करीता लागणारा हार्डवेअर घेण्यात येईल.
७. प्रत्येक दवाखान्यामध्ये एकूण ३० प्रकारच्या चाचण्या करणे आवश्यक राहील.
८. सदर आपला दवाखान्यामध्ये एकूण १०५ प्रकारच्या औषधी असतील.
९. सदर आपला दवाखानामध्ये एकूण ६६ प्रकारचे वैद्यकीय उपकरणे तसेच ४४ प्रकारचे फर्निचर व वैद्यकीय साहीत्य सामुग्री जिल्हा स्तरावर निविदा प्रक्रियेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येतील.
१०. वैद्यकीय अधिकारी यांनी दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाचे आभा कार्ड काढून देणे आवश्यक राहील.
“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” या आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध करुन दयावयाचा अधिकारी व कर्मचारी वर्ग :
प्रत्येक आपला दवाखान्यामध्ये एम.बी.बी.एस. ही शैक्षणिक अर्हता असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करावी. तसेच प्रत्येक केंद्रात वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, औषधनिर्माण अधिकारी, सफाई कर्मचारी व अॅटेंडंट यांची शैक्षणिक अर्हता व पदांची संख्या पुढीलप्रमाणे राहील.
अ. क्र. | पदनाम | शैक्षणिक अहर्ता | पदांची संख्या |
१ | वैद्यकीय अधिकारी | एम.बी.बी.एस. | १ |
२ | अधिपरीचारिका | बी.एस.सी. नर्सिंग | १ |
३ | बहुउद्देशिय कर्मचारी | १२ वी विज्ञान शाखेत पास + पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम / स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम | १ |
४ | अटेंड / गार्ड | दहावी | १ |
५ | सफाई कर्मचारी | दहावी | १ |
एकूण | ५ |
“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” या योजनेव्दारे पुढीलप्रमाणे आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात येतील.
१. बाह्यरुग्णसेवा (मोफत तपासणी व उपचार)
२. मोफत औषधोपचार
३. मोफत प्रयोगशाळा तपासणी
४. गर्भवती मातांची तपासणी
५. मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा
६. आवश्यकतेनुसार संदर्भ सेवा
७. मोफत लसीकरण सेवा
राज्यात ७०० ठिकाणी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना स्थापन करण्यासाठी जिल्हानिहाय दवाखान्यांची संख्या निश्चित करण्यासाठी ठोस निकष आणि त्या निकषानुसार दवाखान्यांची जिल्हानिहाय संख्या.
अ. क्र. | जिल्हा | शहरी भागातील लोकसंख्या | अपेक्षित आपला दवाखान्यांची संख्या | राज्य शासनाच्या निधीतून नियोजित दवाखाने |
१ | ठाणे | ७२९२२८८ | ४८६ | १३३ |
२ | पालघर | १२२२३९० | ८१ | २२ |
३ | रायगड | ९७०१९५ | ६५ | १८ |
४ | रत्नागिरी | २६३७२३ | १८ | ५ |
५ | सिंधुदुर्ग | १०७००६ | ७ | २ |
६ | नाशिक | २५९७३७३ | १७३ | ४७ |
७ | धुळे | ५७१०३६ | ३८ | १० |
८ | नंदुरबार | २७५४७४ | १८ | ५ |
९ | जळगाव | १३४२७११ | ९० | २५ |
१० | अहमदनगर | ९१२६१७ | ६१ | १७ |
११ | पुणे | ५७५११८२ | ३८३ | १०५ |
१२ | सोलापूर | १३९९०९१ | ९३ | २६ |
१३ | सातारा | ५७०३७८ | ३८ | १० |
१४ | कोल्हापूर | १२३०००९ | ८२ | २३ |
१५ | सांगली | ७१९३५७ | ४८ | १३ |
१६ | औरंगाबाद | १६२०१७० | १०८ | ३० |
१७ | जालना | ३७७४२९ | २५ | ७ |
१८ | परभणी | ५६९८०६ | ३८ | १० |
१९ | हिंगोली | १७८७३३ | १२ | ३ |
२० | लातूर | ६२४९८० | ४२ | ११ |
२१ | उस्मानाबाद | २८१०५७ | १९ | ५ |
२२ | बीड | ५१४२९८ | ३४ | ९ |
२३ | नांदेड | ९१३८९८ | ६१ | १७ |
२४ | अकोला | ७१९७४१ | ४८ | १३ |
२५ | वाशिम | २११४१३ | १४ | ४ |
२६ | अमरावती | १०३७२८७ | ६९ | १९ |
२७ | यवतमाळ | ५९८१५३ | ४० | ११ |
२८ | बुलढाणा | ५४८८६० | ३७ | १० |
२९ | नागपूर | ३१७८७५९ | २१२ | ५८ |
३० | वर्धा | ४२३३०० | २८ | ८ |
३१ | भंडारा | २३३८३१ | १६ | ४ |
३२ | गोंदिया | २२५९३० | १५ | ४ |
३३ | चंद्रपूर | ७७५३७८ | ५२ | १४ |
३४ | गडचिरोली | ११८०३३ | ८ | २ |
एकूण | ३८३७५८८६ | २५५९ | ७०० |
सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय : राज्यातील विविध शहरांतील झोपडपट्टीमध्ये राहणा-या सर्वसामान्य व गोरगरीब नागरिकांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात 700 ठिकाणी हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना बाहय यंत्रणेद्वारे स्थापन करण्यासाठी व त्यासाठी आवश्यक असलेल्या अनुदानास मंजुरी देण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना – CM Medical Assistance Fund Scheme
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!