महाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषशालेय शिक्षण व क्रीडा विभागसरकारी कामे

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून इयत्ता 2 री ते इयत्ता 8 वी च्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने समाविष्ट करणार !

शिक्षण व शिक्षणाचे साहित्य त्यांचे सार्वत्रिकरण होणे, प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणे. पाठ्यपुस्तके व वह्या यांच्या वजनाने दप्तराचे ओझे वाढले जाणे, दप्तराच्या वाढत्या वजनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरित परिणाम व सोबतच राज्यातील खेडोपाडी असणाऱ्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना शाळेत शिकायला जाताना पुरेसे लेखन साहित्य उपलब्ध नसते. या सर्व मुद्यांचा विचार करून शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, राज्य परिक्षा मंडळ व बालभारतीचे अधिकारी यांच्या समवेत चर्चा करण्यात आली. या तज्ज्ञ मंडळींनी केलेल्या सखोल चर्चेअंती उपरोक्त परिणामांचा विचार करून विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकात वह्यांची पृष्ठे जोडून देण्याविषयीचे सकारात्मक अभिप्राय प्राप्त झाले आहेत.

पाठ्यपुस्तकात वह्यांची पृष्ठे जोडण्याबाबत महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळामार्फत तयार करण्यात येणाऱ्या सर्व माध्यमांच्या सर्व विषयांच्या तसेच या माध्यमांच्या सेमी-इंग्रजी माध्यमासह प्रत्येक पाठ्यपुस्तकात पाठ / कविता नंतर आवश्यकतेनुसार एक ते दोन पृष्ठे (एक पान) समाविष्ट करावीत, असे तज्ज्ञांनी सुचवले आहे. वरील सर्व चर्चांमधून पाठ्यपुस्तकांमध्ये प्रत्येक घटक / पाठ / कविता यांच्या शेवटी वहीची एक ते दोन पृष्ठे जोडण्याबाबतचा निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. यासंदर्भात निर्गमित करण्यात आलेले आदेश सुधारित करण्यात येत आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून इयत्ता 2 री ते इयत्ता 8 वी च्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने समाविष्ट करणार !

राज्यांमधील शासनाच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांची पाने जोडलेली चार भागांतील एकात्मिक पाठ्यपुस्तके शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ पासून पथदर्शी स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व पाठ्यपुस्तकांसाठी ही योजना लागू करण्यात येणार आहे. या पाठ्यपुस्तकांमध्ये प्रत्येक घटक / पाठ / कविता यांच्या शेवटी वहीची एक ते दोन पृष्ठे (एक पान ) जोडण्यात येतील. या पृष्ठांवर विद्यार्थ्यांकडून वर्गकार्यामध्ये शिक्षक शिकवत असताना/अध्यापन सुरू असताना महत्त्वाच्या मुद्यांच्या नोंदी होणे जसे शब्दार्थ, महत्त्वाचे सूत्र, महत्त्वाचे संबोधन, महत्त्वाची वाक्ये, टिपण इत्यादी अपेक्षित आहे. यामध्ये श्रुतलेखन / शुद्धलेखन नोंदवणे अपेक्षित नाही. पाठ्यपुस्तकातील ही पाने माझी नोंद या सदराखाली मुलांनी वापरणे आवश्यक आहे, शाळेमध्ये शिक्षक प्रत्यक्ष काय शिकवतात याच्या नोंदी या पृष्ठांवर करण्यात येतील. यावरून वर्ग कार्याचा स्तर कसा आहे हे समजू शकते. आवश्यक तेथे या संदर्भाने सुधारणा होण्यासाठी सूचनाही करता येतील. पाठ्यपुस्तकांमध्ये दिलेल्या प्रश्नांव्यतिरिक्त सराव, वर्गकार्य, गृहपाठ इत्यादींसाठी मुलांनी वेगळ्या वह्या ठेवण्यास मुभा राहील.

पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने जोडल्याने पुस्तकांचे आकारमान, वजन व किंमत वाढणार असल्याने या संदर्भात पुढीलप्रमाणे कार्यपध्दती अंमलात आणण्यात यावी.

१. राज्यातील सर्व शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, शासकीय व अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता इयत्ता २ री ते इयत्ता ८ वी या इयत्तांकरीताची पाठ्यपुस्तके एकात्मिक स्वरूपात एकूण ४ भागांमध्ये विभागून तयार करण्यात यावीत व त्यामध्ये प्रत्येक घटक / पाठ / कविता यानंतर गरजेनुसार वहीचे १ पान समाविष्ट करण्यात यावे.

२. इयत्ता १ ली ची पाठ्यपुस्तके सुध्दा एकूण ४ भागांमध्ये तयार करण्यात येऊन त्यामध्ये आवश्यकतेनुसार सरावासाठी पृष्ठ समाविष्ट करण्यात यावीत.

३. खाजगी आणि विना अनुदानित शाळांमधील इयत्ता २ री ते इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांना नियमित पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात यावीत. पाठ्यपुस्तक मंडळाकडे नियमित पाठ्यपुस्तकांचा शिल्लक असलेला यापूर्वीचा साठा तसेच पुस्तक विक्रेत्याकडे असलेला साठा संपुष्ठात आल्यानंतर सदर पाठ्यपुस्तके एकूण ४ भागांमध्ये उपलब्ध करुन देण्यात यावीत. या पाठ्यपुस्तकांमध्येही वह्यांची पाने समाविष्ट करण्यात यावीत.

४. विद्यार्थ्यांकरिता पाठ्यपुस्तकांमध्ये अनिवार्य विषयांची एकूण ४ भागांमध्ये विभागणी करण्यात यावी. परंतु श्रेणी तसेच वैकल्पिक विषयांची पुस्तके स्वतंत्ररित्या उपलब्ध करुन देण्यात यावीत.

५. श्रेणी व वैकल्पिक विषयांची पाठ्यपुस्तके ४ भागांमध्ये समाविष्ट न करता विद्यार्थी/पालक/ विक्रेते व शासकीय योजनेत होणाऱ्या मागणीनुसार स्वतंत्र पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात यावीत.

६. कागदाच्या दरात झालेल्या वाढीमुळे पाठ्यपुस्तकांच्या किंमतीवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे समग्र शिक्षा योजनेअंतर्गत व खुल्या बाजारात पुरवठा होणाऱ्या सर्व पाठ्यपुस्तकांचे मंडळाच्या नियामक मंडळाने मान्यता दिलेल्या मूल्यांकन सुत्रानुसार

नव्याने मूल्यांकन करून त्यानुसार पुस्तकांच्या किंमती निश्चित करण्यात याव्यात व सदर पाठ्यपुस्तके ४ भागांमध्ये उपलब्ध करून देण्यात यावीत.

७. उपरोक्तप्रमाणे पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने जोडल्यामुळे पाठ्यपुस्तकांच्या किंमतीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तकांच्या सद्या असलेल्या किंमतीत वाढ होणार आहे. या वाढीव किंमतीचा बोजा पाठ्यपुस्तक मंडळावर पडू नये यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्याकडून सदर वाढीव किंमतीची प्रतिपूर्ती करण्यात येईल.

८. प्रस्तुत योजनेची यशस्विता लक्षात घेऊन शालेय वर्ष २०२४-२५ पासून सदर योजना पुढे सुरू ठेवावी.

९. वरील बाबींवरील होणाऱ्या खर्चाची प्रतिपुर्ती होण्यासाठी राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा यांनी केंद्रपुरस्कृत समग्र शिक्षा योजनेच्या वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रकामध्ये (AWP &B) मध्ये आवश्यक निधीची तरतूद करावी व या व्यतिरिक्त लागणाऱ्या निधी साठीचा प्रस्ताव राज्यशासनास सादर करावा.

शासन निर्णय: शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून इयत्ता 2 री ते इयत्ता 8 वी च्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने समाविष्ट करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा – आर.टी.ई. २५ टक्के ऑनलाईन प्रवेश सुरु – R.T.E. 25% Online Admission Process (Year:- 2022 – 2023)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.