महिला बचतगटांच्या वस्तूंना आता पोस्टाच्या कुरिअर सेवेचे बळ
बचत गट हा एक सामाजिक-आर्थिक उपक्रम आहे. ही प्रक्रिया संघटितपणे एकमेकांना समजून घेत होत असल्याने या रचनेला स्वयंसाहाय्य गट असेही संबोधले जाते. गटाला काहीतरी विशिष्ट नाव ठेवले जाते, उदा. जागृती बचत गट, अस्मिता बचत गट इ. बचत गट म्हणजे ठराविक काळाने बचत जमा करण्याच्या निमित्ताने एकत्र येणारा गट होय. हा नाबार्डचा सूक्ष्म वित्त पुरवठ्याचा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचतगटाच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तू देशभरातील ग्राहकांना जलद गतीने आणि रास्त दरात मिळाव्यात यासाठी महामंडळाने भारतीय टपाल खात्याशी करार केला आहे. या करारामुळे महिला बचतगटाच्या उत्पादित वस्तू देशभरात पोहचण्यास मदत होणार असून बचतगटाच्या आर्थिक सक्षमीकरणास हातभार लागणार आहे. राज्यातील हा पथदर्शी प्रकल्प प्रारंभी ठाणे, रायगड आणि मुंबईतील महिला बचतगटांसाठी राबविण्यात येत आहे.
महिलांच्या कलागुणांना वाव आणि त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी, याद्वारे त्यांचे आर्थिक सबलीकरण व्हावे, यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने राज्यात महिला बचतगटांची बांधणी करण्यात आली आहे. बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महामंडळ विविध प्रकारची प्रदर्शने विविध माध्यमातून भरवत असते. परंतू प्रदर्शनांच्या शिवाय बचतगटांच्या वस्तूंना मोठ्या प्रमाणात बाजारपेठ मिळविण्यात अडचणी येत असत, आणि वस्तूंना ऑर्डर मिळाली तरी या वस्तूंना खासगी कुरिअर द्वारे विशेषतः शहरी भागात पाठवितांना वस्तूंच्या किंमतीत तफावत दिसत असे, किंमतीतील तफावतीमुळे ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण होत असे. या सगळ्या प्रश्नांना महिला आर्थिक विकास महामंडळाने टपाल (पोस्ट) खात्याशी केलेल्या करारामुळे पूर्णविराम मिळाला आहे. बचतगटांनी तयार केलेल्या वस्तू पोस्टाच्या कुरिअर सेवेद्वारे पोहचवण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचलित साधन केंद्रे त्या-त्या भागातील पोस्टाशी समन्वय साधणार आहेत. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात पोस्टाचे जाळे आहे, त्यामुळे बचतगटांच्या वस्तूंना व्यापक बाजारपेठ मिळणार आहे. खासगी कुरिअर सेवेच्या तुलनेत टपाल खात्याची कुरिअर सेवा ही विश्वासू आणि रास्त दरात आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळाने टपाल खात्याशी केलेल्या केलेल्या करारामुळे महिला बचतगटांच्या वस्तूंना कायमस्वरूपी देशव्यापी बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे. टपाल खात्याचे जाळे हे देशभर आहे. त्यामुळे महिला बचतगटांच्या वस्तूंचे विपणन वाढण्यास मदत होईल. या करारामुळे महिला बचतगट खऱ्या अर्थान सक्षम होतील. ठाणे जिल्ह्यात सुमारे १० हजार, रायगडमध्ये सुमारे ३ तर मुंबईत १ हजारांच्या घरात बचतगट आहेत. या बचतगटांद्वारे गोधड़ी, मसाले, पापड, कुर्डर्सी, कपडे, ज्वेलरी, हस्तकलेच्या वस्तू आर्युवेदिक औषधे, कडधान्याचे उत्पादन केले जाते. या सगळ्या आणि इतर मौसमी वस्तुंना आता देशव्यापी बाजारपेठ मिळेल.
हेही वाचा – महिलांच्या विकासाचा महामार्ग – ‘माविम’
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!