ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प व लेखे (ग्रामपंचायत बजेट) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ६२ नुसार (Gram Panchayat Budget)
ग्रामपंचायत मध्ये पुढील आर्थिक वर्षासाठी गावाच्या जमाखर्चाचा अंदाज बांधणे म्हणजेच ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प व लेखे (अंदाजपत्रक) तयार करणे होय. त्यास ‘ग्रामपंचायत अर्थसंकल्प’ किंवा ‘ग्रामपंचायत बजेट’ असेही म्हणतात. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ६२ नुसार ग्रामपंचायतीचे अर्थसंकल्प व लेखे (ग्रामपंचायत बजेट) तयार करण्याची तरतूद आहे, तसेच कलम ६२अ नुसार सुधारित किंवा पुरवणी अर्थसंकल्प विवरण तयार करण्याची तरतूद आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ६२ (१) मधील तरतुदीनुसार सरपंच हा अर्थसंकल्प दरवर्षी प्रत्येक वर्षाच्या 28 फेब्रुवारी रोजी किंवा त्यापूर्वी, विहित करण्यात येईल अशा नमुन्यातील विवरणाद्वारे पंचायत समितीला सादर करावा लागतो.
या अर्थसंकल्पात निधीतील प्रारंभिक शिल्लक व पुढील वित्तीय वर्षासाठी पंचायतीची अंदाजित प्राप्ती व आस्थापने साठी व कलम 45 अन्वये आपली कर्तव्य पार पाडण्यासाठी योजलेला खर्च, तसेच कलम 133 अन्वये स्थापन केलेल्या जिल्हा ग्रामविकास निधीला द्यावयाची अंशदानाची रक्कमआणि खंड (अ),(ब) किंवा, यथास्थिती,(क) अन्वये तयार केलेले विवरण, इत्यादी तपशील सरपंच पंचायती समोर ठेवील.
(१-ब) पोट कलम (१अ) नुसार प्रत्येक वर्षी पुढील वर्षाचे अर्थसंकल्प व लेखे (ग्रामपंचायत बजेट) तयार तयार करण्यात येते. सरपंच ग्रामपंचायतीच्या मासिक सभेची मान्यता देऊन सदर अंदाजपत्रक ग्रामसभेमध्ये मंजुरीसाठी सादर करतात.त्यास ग्रामसभा त्याच वर्षाच्या 15 मार्च रोजी किंवा त्यापूर्वी अनु समर्थन देईल आणि ग्रामसभेचा निर्णय पंचायत समितीला सादर करण्यात येईल.
ग्रामपंचायत अर्थसंकल्प व लेखे तरतुदी:
कलम ६२ (१) नुसार सरपंच, दरवर्षी विहित करण्यात येईल अशा नमुन्यातील विवरणाद्वारे पुढील बाबी संबंधीच्या रकमा प्रत्येक वर्षाच्या 28 फेब्रुवारी रोजी किंवा त्यापूर्वी निर्धारित करील.
(अ) निधीतील प्रारंभिक शिल्लक व पुढील वित्तीय वर्षासाठी पंचायतीची अंदाजित प्राप्ती;
(ब) आस्थापने साठी व कलम 45 अन्वये आपली कर्तव्य पार पाडण्यासाठी योजलेला खर्च;
(क) कलम 133 अन्वये स्थापन केलेल्या जिल्हा ग्रामविकास निधीला द्यावयाची अंशदानाची रक्कम;
(ड) खंड (अ),(ब) किंवा, यथास्थिती,(क) अन्वये तयार केलेले विवरण सरपंच पंचायती समोर ठेवील;
(१-अ) पंचायत, उक्त विवरण बाबतच्या, आपल्या शिफारशींना त्याच वर्षाच्या 7 मार्च रोजी किंवा त्यापूर्वी अंतिम स्वरूप देईल.
(१-ब) पोट कलम (१अ) खालील पंचायतीच्या शिफारशींसह ते विवरण ग्रामसभेपुढे तिच्या अनु समर्थनार्थ ठेवण्यात येईल, त्यास ग्रामसभा त्याच वर्षाच्या 15 मार्च रोजी किंवा त्यापूर्वी अनु समर्थन देईल आणि ग्रामसभेचा निर्णय पंचायत समितीला सादर करण्यात येईल.
कलम ६२ (१-क) नुसार जर, (अ) पोट कलम (१) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या दिनांकास किंवा त्यापूर्वी सरपंचाने विवरण सादर न केल्यास; किंवा (ब) पोटकलम (१अ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या दिनांकास किंवा त्यापूर्वी पंचायतीने विवरणा संबंधीच्या शिफारशी न दिल्यास; किंवा (क) पोट कलम (१ब) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या दिनांकास किंवा त्यापूर्वी ग्रामसभेने सदर शिफारशींच्या अनु समर्थनार्थ निर्णय न घेतल्यास,- सचिव, करावयाच्या अनिवार्य व कार्यालयीन खर्चासंबंधी चे विवरण तयार करील, आणि ते उक्त पोट कलमान्वये विहित केलेल्या नमुन्यात, पंचायत समितीला सादर करील.
कलम ६२ (२) नुसार पंचायत समिती, दरवर्षी 31 मार्च रोजी किंवा यापूर्वी, एकतर त्या विवरणास मान्यता देईल किंवा कलम 45 खाली येणाऱ्या कोणत्याही कर्तव्या बाबतचा खर्च वाढविण्याचा किंवा तो कमी करण्याचा निर्देश देईल. या कलमाच्या पोट कलमे (१),(१अ) आणि (१ब) मध्ये निर्धारित केलेली अर्थसंकल्पीय प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दिनांकापर्यंत अशा विवरणा नुसार खर्च करण्यात येईल:
परंतु, पंचायत समितीला विवरण अमान्य करण्याचा अधिकार असणार नाही किंवा पुढील वित्तीय वर्षासाठी पंचायतीच्या अंदाजित प्राप्तीपेक्षा व निधीतील प्रारंभिक शिलकीपेक्षा योजलेला एकूण खर्च जास्त केला जावा, असा निर्देश देण्याचाही अधिकार असणार नाही:
परंतु आणखी असे की, पंचायत समिती अशा विवरणास प्रत्येक वर्षाच्या 31 मार्च रोजी किंवा त्यापूर्वी, आणि सुधारित व पूरक विवरणाच्या बाबतीत, असे विवरण मिळाल्याच्या दिनांकापासून दोन महिन्यांच्या आत, एक तर मान्यता देण्यात किंवा कलम 45 अन्वये येणाऱ्या कोणत्याही कर्तव्या वरील खर्च वाढवावा किंवा कमी करावा, असा निर्देश देण्यात कसूर करील तर, पंचायत समितीने विवरणास रीतसर मान्यता दिली असल्याचे मानण्यात येईल.
कलम ६२ (३) नुसार पंचायत, प्रत्येक वित्तीय वर्षी कलम 133 अन्वये घटित केलेल्या जिल्हा ग्रामविकास निधीस राज्य शासनाकडून मिळालेल्या अंशदानाचा अंतर्भाव करून पण राज्य शासन, जिल्हा परिषद, किंवा पंचायत समिती यांच्याकडून कोणत्याही विशिष्ट कामासाठी अनुदानाच्या किंवा कर्जाच्या रूपाने मिळालेल्या कोणत्याही रकमांचा अंतर्भाव न करता तिला सर्व साधनांपासून मिळालेल्या प्राप्तीची विहित करण्यात येईल अशी त्याच्या दहा टक्क्यांपेक्षा अधिक नसेल अशी टक्केवारी अंशदान म्हणून देईल.
कलम ६२ (४) नुसार सचिव, पंचायतीचे लेखे, विहीत करण्यात येईल अशा नमुन्यात ठेवील. तो पंचायतीच्या प्रशासनाचे वार्षिक अहवाल तयार करील व असे लेखे व अहवाल मान्यतेसाठी पंचायती पुढे ठेवील. मान्य केलेल्या अशा लेख्यांची वार्षिक विवरणे व वार्षिक अहवाल विहित करण्यात येईल अशा दिनांकाला किंवा त्यापूर्वी व अशा नमुन्यात जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात येतील.
कलम ६२-अ नुसार सुधारित किंवा पुरवणी अर्थसंकल्प:
कलम ६२-अ नुसार सरपंचास, ज्या वित्तीय वर्षासाठी अशा कोणत्याही विवरणास पूर्वोक्त प्रमाणे मान्यता दिली असेल या वित्तीय वर्षात कोणत्याही वेळी सुधारित किंवा पुरवणी विवरण तयार करण्याची व्यवस्था करता येईल. पंचायत समिती, असे प्रत्येक सुधारित किंवा पुरवणी विवरण, जणू काही ते मूळ विवरणच होते असे समजून त्याप्रमाणे, विचारात घेईल आणि त्यास मान्यता देईल आणि कलम 62 च्या तरतुदी अशा सुधारित किंवा पुरवणी विवरणास लागू होतील.
अर्थसंकल्प ठराव व वार्षिक अर्थसंकल्प तयार करण्यासाठीच्या सूचना:
ग्रामपंचायत अर्थसंकल्प नमुना 1 (अभिलेख) तयार करताना प्रथम आपल्या ग्रामपंचायतचे नाव, पंचायत समिती, जिल्हा आणि पंचायतीने मान्यता दिल्याप्रमाणे वर्ष, अर्थसंकल्प ठराव क्रमांक आणि दिनांक नमूद करावे लागते. अर्थसंकल्प ठराव व वार्षिक अर्थसंकल्प तयार करण्यासाठीच्या खालील सूचना दिल्या आहेत.
१) पंचायत, पुढील वर्षाचा वार्षिक अर्थसंकल्प, वित्तिय वर्षाच्या ३१ तारखेस किंवा त्यापूर्वी पंचायत समितीला सादर करील.
२) अर्थसंकल्पीय अंदाज पत्रकातील जमा रकमा या कर, शुल्क व फी यावर आधारित असतील.
३) अंदाजित महसूल संबंधित माहितीवर आधारित असेल.
४) १ एप्रिल पासून मार्च अखेर पर्यंत जमा करणे अपेक्षीत असलेली प्रत्यक्ष रक्कमच केवळ सादर करण्यात येईल.
५) अंदाजित खर्चाची परिगणना करताना, मागील ३ वर्षातील सरासरी सर्वसाधारण खर्च विचारात घेण्यात येईल.
६) वेतन यात सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, रजा प्रवास भत्ता यांचा समावेश असेल. वर्षाच्या वेतन वाढीचा यात समावेश करण्यात येईल.
७) प्रवासभत्ता यात पंचायतीच्या कामासाठी प्रवास करण्याकरीता कर्मचाऱ्यांना व सदस्यांना मिळणारा सर्व प्रकारचा वाहन भत्ता व प्रवास भत्ता यांचा समावेश असेल.
८) कार्यालयीन खर्च- यात फर्निचर, टपाल खर्च, कार्यालयीन कामासाठी लागणारे साहित्य, आणि अन्य साधनसामग्रीची खरेदी, तिचे परिक्षण, उष्ण हवामान, थंड हवामान, दूरध्वनी खर्च, विज खर्च, कार्यालयीन लेखन सामग्री, मुद्रित नमुने, पंचायतीच्या वापरातील वाहनांचे (रुग्णवाहीका, टाकावू वहान, प्रवासी वहान, अनिशामक दल वगळून) परिरक्षण, पंचायत समित्यांच्या बैठकावरील खर्च, अत्यावश्यक सामग्रीवरील खर्च आणि अन्य आकस्मिक खर्च यांचा समावेश होईल.
९) आस्थापनेवरील खर्च – ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या ३५% पर्यंत मर्यादित असेल.
१०) जिल्हा ग्राम विकास निधी – जिल्हा ग्राम विकास निधीच्या अंशदानासाठी ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या ०.२५% इतक्या रकमेची तरतूद करण्यात येईल.
११ ) मागासवर्गीय लोकांसाठी करावयाच्या खर्चासाठी ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या १५% इतकी रक्कम खर्च करण्याची तरतूद करण्यात येईल.
१२) अपंग लोकांकरीता करावयाच्या खर्चासाठी ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या ५% इतकी रक्कम खर्च करण्याची तरतूद करण्यात येईल.
१३ ) कलम १३१ व १३२ नुसार, जमीन महसुलाखाली जमा झालेल्या रक्कमेच्या ३५% इतकी रक्कम पंचायतीचे अंशदान म्हणून ग्रामीण रोजगार निधीत जमा करण्यात येईल.
अंदाजपत्रक जमा आणि खर्च बाबी:
ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प व लेखे (ग्रामपंचायत बजेट) मध्ये ग्रामपंचायत अर्थसंकल्प नमुना 1 (अभिलेख) मध्ये विविध जमा आणि खर्च या बाबी नमूद केलेल्या असतात.
(१) जमा शीर्ष (२)या वर्षासाठी पंचायतीची अंदाजित प्राप्ती (३) या वर्षासाठी मंजूर केलेली अंदाजित रक्कम (४) मागील वर्षी मिळालेली प्रत्यक्ष रक्कम (५) गतपूर्व वर्षात मिळालेली प्रत्यक्ष रक्कम
जमा ग्राम निधी:
कर – (१) मालमत्ता कर, जमिनी व इमारती यावरील कर (२) दिवाबत्ती कर (३) स्वच्छता कर (४) दुकाने, लघु उद्योग व हॉटेल चालविणे यावरील कर (५) यात्रा कर (६) जत्रा, उत्सव व इतर मनोरंजन कर (७) सायकल व इतर वाहना वरील कर (८) टोल टॅक्स (९) उतारू व मालावरील कर (१०) वन विकास कर (११) सेवा कर (१२) व्यापारी किंवा आजिविका यावरील कर (शेतीव्यतिरिक्त) (१३) गुरांच्या बाजारातील दलालीचा व्यवसाय व आजिवीकेवरील कर (१४) इतर कर.
करेत्तर उत्पन्न – (१) बाजार फी (२) टांगा स्टॅन्ड फी (३) कार स्टॅन्ड फी (४) पाणीपट्टी (५) स्वच्छता फी (६) गाय वरण फी (७) डीव्हीडीएफ व्याज २.५% (८) जमीन भाडेपट्टी (९) व्याज जमा (१०) जागा भाडे (११) कोंडवाडा जमा (१२) देणगी (१३) इतर जमा.
अभिहस्तांतरित रकमा – (१) मुद्रांक शुल्क (२) उपकर (३) जमीन महसूल (४) जमीन समानीकरण (५) गौण खनिजे (६) पथ दिवाबत्ती देयकाचा भरणा करण्यासाठी अनुदान (७) नळ पाणी पुरवठ्यातील देयकासाठी 50 टक्के अनुदान (८) मागास व आदिवासी क्षेत्रासाठी सहाय्य (९) यात्राकराऐवजी अनुदाने (१०) जकात नुकसान भरपाई अनुदाने (११) इतर अनुदाने.
राज्यशासन सहाय्यक –
अनुदाने जमा – (१) शौचालय (२) दलित वस्ती सुधार (३) पाणीपुरवठा/टी.सी.एल. (४) बांधकाम (५) शिक्षण शाळा (६) मानधन, किसान वेतन व बैठक भत्ता (७) आरोग्य (८) इतर
तसेच यामध्ये आमदार, खासदार, डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत जि.ग्रा.वि. यंत्रणेकडून आलेला निधी इ.
केंद्र शासन अनुदाने जमा – (१) स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना (२) जवाहर ग्राम समृद्ध योजना (३) इतर
संकीर्ण जमा – (१) अनामत/प्रतिभूती (२) ठेवी (३) कर्जे (४) इतर
प्रारंभीची शिल्लक – (१) अनामत प्रतिभूती (२) ठेवी (३) कर्ज (४) इतर.
तसेच प्रारंभीची शिल्लक मध्ये – (१) जवाहर ग्राम समृद्धी योजना (२) ग्राम पाणीपुरवठा निधी खाते (3) प्रामपंचायत निधी खाते
ग्रामपंचायतीचा खर्च:
१) या वर्षातील पंचायतींचा अंदाजित खर्च २) या चालू वर्षांसाठी मंजूर केलेली खर्चाची अंदाजित रक्कम ३) मागील वर्षातील प्रत्यक्ष खर्च ४) गतपूर्व वर्षातील प्रत्यक्ष खर्च वर्षातील प्रत्यक्ष खर्च
ग्राम निधीतून खर्च – (१) सरपंच मानधन (२) सदस्य बैठक भत्ता (३) सदस्य/सरपंच प्रवास भत्ता (४) कर्मचारी वेतन (५) कर्मचारी प्रवास भत्ता (६) कार्यालयीन खर्च (७) दुरुस्ती व देखभाल (८) स्वच्छता (९) पाणी पुरवठा (१०) वीज देयके (अ) पाणीपुरवठा (ब) रस्त्यावरील दिवाबत्ती ११) पथ दिवाबत्ती, साहित्य व इतर (१२) शिक्षण (१३) आरोग्य (१४) रस्ते व गटार (१५) अन्य बांधकाम (१६) वाचनालय (१७) जलशुद्धीकरण/टी.सी.एल (१८) बाग व मैदान (१९) समाज कल्याण (आदिवासी व मागास वर्ग) (२०) डी.व्ही.डी.एफ. वर्गणी (२१) महिला व बालकल्याण (२२) सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम (२३) कोंडवाडा (२४) साहित्य खरेदी (२५) शेती (२६) इतर
राज्यशासन सहायक अनुदान – (१) शौचालय (२) दलित वस्ती सुधार (३) पाणीपुरवठा/टी.सी.एल. (४) बांधकाम (५) शिक्षण शाळा (६) मानधन, किसान वेतन व बैठक भत्ता (७) आरोग्य (८) इतर
केंद्र शासन अनुदाने व खर्च – (१) स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजना (२) जवाहर ग्राम समृद्धी योजना (३) इतर
संकीर्ण खर्च – (१) अग्राम/अनामत (२) ठेवी (३) कर्जे, हप्ता व व्याज प्रदाने (४) इतर.
अखेरची शिल्लक – (१) अनामत (२) ठेवी (३) कर्जे (४) इतर
तसेच अखेरची शिल्लक मध्ये (१) जवाहर ग्राम समृद्धी योजना (२) पंचायत निधी खाते (३) ग्राम पाणीपुरवठा निधी (४) इतर
हेही वाचा – ग्रामपंचायतीच्या विविध बँक खात्यांचा हिशोब पहा ऑनलाईन; असे करा ग्रामपंचायत बँक पासबुक डाऊनलोड
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!