महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत “ग्राम समृध्दी दिवस”
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना दि. ०१ एप्रिल २००८ पासून महाराष्ट्रात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. सदर योजनेंतर्गत अनुसुचित जाती/जमाती, द्रारिद्रय रेषेखालील कुटुंब शेतकरी, शेतमजूर व दुर्बल घटकांना कामाचा व सन्मानाने जगण्याचा कायदेशीर अधिकार प्राप्त झाला आहे. या योजनेचा मजूर हा मुलभुत घटक आहे, त्यामुळे मजूरांना त्यांच्या हक्काविषयी जाणीव असणे महत्त्वाचे आहे. सदर योजना अधिकाधिक पारदर्शक होण्यासाठी मजूरांना योजनेची पूर्ण माहिती असणेही आवश्यक आहे. या बाबतीत केंद्राच्या मार्गदर्शक सुचना २०१३ मधील परिशिष्ट ३ मधील ३.३ कलमामध्ये मजूर हक्क दिवस / रोजगार दिवसाचे आयोजन करण्याची तरतूद आहे. सबब केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनान्वये प्रत्येक ग्राम पंचायतीने महिन्यातून कमीत कमी एकदा ग्राम रोजगार दिवसाचे आयोजन करणे आवश्यक आहे. यास्तव महाराष्ट्र दशवार्षिक नियोजन ही प्रक्रिया राबवून ” मी समृध्द तर गाव समृध्द ” पर्यायाने माझा महाराष्ट्र समृध्द ” ही संकल्पना साध्य होईल या दिशेने कार्यवाही करण्यात येत आहे. करिता ग्रामपंचायतीत महिन्यातून दोन दिवस ग्राम रोजगार दिवसाचे आयोजन करण्याऐवजी महिन्याच्या पहिल्या आठवडयात तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत समृध्दी दिवसाचे आयोजन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.
क्षेत्रीय स्तरावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी तसेच शेतकरी, भूमिहीन व इतर कुटुंबास मनरेगा व इतर विभागाच्या योजनेची माहिती देऊन कुटुंबाला लखपती करण्याकरिता गावामध्ये विविध उपक्रमाच्या माध्यमातून माहिती उपलब्ध करून देण्यात येणारा एक दिवसीय उपक्रम म्हणजे ” समृध्दी दिवस ” होय.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत “ग्राम समृध्दी दिवस”:
राज्यात दर महिन्याला ग्राम पंचायत स्तरावर रोजगार दिवस साजरा केला जातो. या रोजगार दिवसाचा प्रमुख उद्देश लोकांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेबद्दल सर्व माहिती देऊन सर्व गरजू लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा असतो. रोजगार उपलब्ध होऊन या लोकांच्या राहणीमानामध्ये सुद्धा सुधारणा होईल अशी अपेक्षा असते. राज्यामध्ये चिखलदरा तालुक्याचे उदाहरण जर पाहिल तर दर वर्षी ५०,००० ते ६०,००० व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून सरासरी ३० लक्ष ते ३५ लक्ष मनुष्यदिवस निर्मिती केली जाते. राज्यात सर्वात जास्त मनुष्यदिवस निर्मिती करणाऱ्या तालुक्यात चिखलदरा तालुक्याचे नाव आहे. इतक्या मोठ्याप्रमाणात मुनष्य दिवस निर्मिती करून सुद्धा आपण ठामपणे हे सांगू शकत नाही की, आपण या तालुक्यात वैयक्तिक किंवा सार्वजनिक टिकाऊ आणि उत्पादक मत्ता निर्माण करण्यास यशस्वी झालो आहोत, जेणे करून या गावाचा सर्वांगीण विकास शक्य झाला असता.
ज्याअर्थी आपण समृध्द गाव आणि समृध्द महाराष्ट्राकडे वाटचाल सुरु केली आहे, आणि शेतकरी किंवा भूमिहीन मजूर कुटुंबाला केंद्रबिंदू गृहीत धरून संपूर्ण योजनेला एक नवीन वळण दिलेले आहे, याआर्थी आता लोकांना फक्त रोजगार देणेच नव्हे तर समृध्दीच्या मार्गाकडे घेऊन जाणे हे या योजनेचे उद्दिष्ट समजून दर महिन्याला समृध्दी दिवस साजरा करण्याची आवश्यकता आहे. मागेल त्याला कामाच्या ऐवजी पाहिजे ते काम हे ब्रीदवाक्य घेऊन समृध्दी दिवस साजरा करण्याची आवश्यकता आहे. या योजनेतून होणाऱ्या प्रत्येक कामातून टिकाऊ आणि उत्पादक मत्ता निर्माण होईल, लोकांचे राहणीमानामध्ये प्रगती होईल, या उद्देशाने सर्व गावकरी यांनी ” समृध्दी दिवस ” रोजी गावाच्या विकासाबद्दल चर्चा करून पुढील नियोजन करण्याची आवश्यकता आहे. समृध्दी दिवसाच्या निमित्ताने सर्व गावकरी एकत्र येऊन गावाच्या विकासाच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर करण्याबद्दल चर्चा करतील आणि समृध्दीच्या मार्गाकडे नवीन प्रेरणेने व उत्साहाने वाटचाल करतील.
१ ) समृध्दी दिवसाचे आयोजन :
१) समृध्दी दिवस प्रत्येक महिन्याचा पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात यावा.
२) समृध्दी दिवस साजरा करताना आपल्या सोयीनुसार वेळ न घेता गावक-यांच्या सोयीच्या वेळेनुसार नियोजन असावे.
३) समृध्दी दिवसाची सुरुवात नाविन्यपूर्ण उपक्रमाने व्हावी. वर्षामधून १२ दिवस आपण समृध्दी दिवस साजरा करणार आहोत, तर १२ वेगवेगळे उपक्रम असावे जे जनजागृती संबंधी असेल. ( ज्यामध्ये गावफेरी, कुटुंब भेटी, रंगरंगोटी करणे, यशस्वी यशोगाथा, प्रत्यक्ष क्षेत्रभेटी इ. )
समृध्दी दिन साजरा करताना खालील मुद्यावर चर्चा करणे अपेक्षित आहे.
१) गावात किती वैयक्तिक व सार्वजनिक कामे सुरु आहेत व त्यावर किती मजूर कार्यरत आहेत याबाबत चर्चा करावी.
२ ) किती कामे शेल्फवर ( प्रशासकीय मान्यता व तांत्रिक मान्यता मिळालेली कामे ) आहेत. त्यामध्ये वैयक्तिक कामे किती व सार्वजनिक कामे किती याबाबत चर्चा करावी.
३) आराखड्यात मंजूर परंतु अजूनही तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यात न आलेल्या कामाचे वाचन करावे. जेणेकरून या कामाबाबत तात्काळ निर्णय घेणे सोयीचे होईल.
४) गावात पूर्ण झालेल्या कामातून मत्ता निर्मितीबाबत व निर्माण झालेल्या मत्तेद्वारे उत्पन्नात किती वाढ झाली याबाबत चर्चा करावी. जेणेकरून इतरांना त्यामधून प्रोत्साहन मिळेल.
५) गावात किती अपूर्ण कामे आणि ती पूर्ण करण्यास अडचणी बाबत चर्चा करावी. जेणेकरून अपूर्ण कामे पूर्ण करून अधिकाधिक मत्ता निर्माण होईल.
६) काही मजूरांची मजूरी तसेच कुशल खर्चाची प्रदाने शिल्लक असल्यास त्याबाबत चर्चा करावी. जेणेकरून ग्रामपंचायत स्तरावरून तालुकास्तरावर तात्काळ पाठपुरावा करणे सोयीचे होईल.
७) गावात जास्तीत जास्त कुटुंबांनी कामाची मागणी करावी याबाबत मार्गदर्शन करणे.
८) योजनेतून लाभ घेऊन लखपती झालेल्या कुटुंबाच्या यशोगाथाचे वाचन करणे.
९) सदर दिवशी वेगवेगळ्या विभागात काम करणाऱ्या NGO, सामाजिक संस्था, पोलिस पाटील, शाळेचे शिक्षक, अंगणवाडी ताई, आरोग्य सेविका किंवा तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन ठेवल्यास त्यामधूनही लोकांना वेगवेगळ्या विषयाची माहिती प्राप्त होईल.
१०) दश वार्षिक नियोजन झालेल्या गावात त्या त्या आर्थिक वर्षात केलेल्या नियोजनानुसार किती कामे सुरु झाली व अद्याप किती कामे सुरु व्हायची आहेत, काही कामाचे प्रस्ताव अजून मंजूर झाले नाही त्याची कारणे काय आहेत, याबाबत चर्चा करावी. कामे तात्काळ सुरु होतील यासाठी नियोजन करावे.
११) ज्या कुटुंबाकडे जॉब कार्ड नाहीत त्यांची नोंदणी करून त्याच दिवशी जॉब कार्ड उपलब्ध करून द्यावे. ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवक यांनी याबाबत पूर्व तयारी करावी. तसेच ज्या जॉबकार्डची विभागणी करणे गरजेचे कुटुंबाना त्याच दिवशी विभक्त करून नवीन जॉब कार्ड देणे, याकरिता कॅम्प आयोजित करणे.
१२) लाभ न मिळालेल्या कुटुंबातील अडचणी जाणून घेणे व अडचणी सोडवण्या संदर्भात प्रयत्न करणे.
१३) सुरू असलेल्या कामांची पाहणी करणे काम गुणवत्तापूर्ण होईल यासंदर्भात मार्गदर्शन करणे, सोबतच मत्ता निर्माण होईल याविषयी चर्चा करणे.
१४) गावातील कुटुंब लखपती करण्यासंदर्भात पुढील १ महिन्याचे नियोजन तयार करणे, विभागानुसार आपली भूमिका लक्षात घेणे व अहवाल तयार करून अंमलबजावणीला सुरवात करणे.
१५) गावपातळीवरील प्रत्येक विभागातील कर्मचारी, पदाधिकारी यांचा समावेश असावा, यासाठी गावातील ५ समृध्द मित्र यांची निवड करून ग्रामपंचायत पातळीवर उपरोक्त सर्वांची ग्राम समृध्दी समन्वय समिती तयार करावी.
१६) प्रत्येक विभागातील अधिकारी / कर्मचारी यांनी त्यांच्या विभागामार्फत करण्यात येणाऱ्या कामाची माहिती सभेत द्यावी. उदा : – कृषी सहाय्यक फळबाग लागवड.
१७) २६३ कामाची माहिती नागरिकांना द्यावी. जर काही लाभार्थ्यांनी वैयक्तिक कामाची मागणी केल्यास योजनेच्या निकषानुसार पात्र लाभार्थ्याची मागणी मान्य करण्यात यावी.
१८) गावात जलसंधारणाची कामे घेऊन पाण्याच्या पातळीमध्ये वाढ करण्याबाबत चर्चा करावी. त्याचप्रमाणे नवीन कामाची आवश्यकता असल्यास त्याच सभेत काम मंजूर करून घ्यावे.
१९) अभिसरणाअंतर्गत काही कामाचे नियोजन करावयाचे असल्यास त्याच सभेत त्या विभागाला पाचारण करून त्याचे नियोजन करावे. याबाबतची कार्यवाही ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवक यांनी करावी.
२०) मनरेगा ही फक्त अकुशल रोजगार देणारी योजना नसून यातून वैयक्तिक व सार्वजनिक कामाचा लाभ घेऊन लखपती होता येते हे पटवून देणे.
२१) काही अडचणी असल्यास त्याचे निराकरण तात्काळ करावे.
२ ) तालुका समृध्दी दिवसाचे आयोजन :
१) तालुका समृध्दी दिवस प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयोजित करावा.
२) तालुका समृध्दी दिवस हा समृध्दी दिवस साजरा केलेल्या एका प्रगतीशील गावापैकी एक गाव निवड करुन साजरा करावा.
३) सदर दिवस हा तालुका पातळीवरील तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, वन परिक्षेत्र अधिकारी ( वनविभाग ), लागवड अधिकारी ( सामाजिक वनीकरण ), जलसंधारण विभागाचे अधिकारी, रेशीम विकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच इतर विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच NGO चे प्रतिनिधी इत्यादी यांनी एकत्र येऊन महिन्यातील शेवटच्या आठवड्यात तालुक्यातील निवडक एका गावामध्ये मागेल त्याला काम नव्हे तर, पाहिजे ते काम या ब्रीदवाक्यानुसार तालुका समृध्द व्हावा यासाठी तालुक्यातील एका गावामध्ये गटविकास अधिकारी याच्या नेतृत्वाखाली सर्व यंत्रणा मिळून समृध्दी दिवस साजरा करणे अपेक्षित आहे.
४) तालुक्यातील ज्या अधिकारी/ कर्मचारी यांनी सक्रिय राहुन तालुक्याला समृध्द करण्याच्या दिशेने नेण्याचे कार्य केले, अशा अधिकारी/कर्मचारी यांचे सत्कार करणे.
५) तालुक्यातील संबंधित लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात यावे.
तालुका समृद्धी दिन साजरा करताना खालील मुद्यावर चर्चा करणे अपेक्षित आहे.
१) तालुका समृध्दी दिवसात तालुक्यातील सर्व यंत्रणा एका छताखाली आल्याने तालुक्यातील नरेगाच्या कामाची सर्व विभागाने सविस्तर चर्चा करावी. कुटुंबाना लखपती करण्याचा दृष्टीने कोणत्या विभागाने अजून जास्त कामे सुरू करून अधिक वेगाने काम करण्याची आवश्यकता आहे याबाबत चर्चा करावी.
२) दश वार्षिक नियोजन पूर्ण झालेल्या गावामध्ये नियोजनानुसार काम होत आहेत का, यावर चर्चा करावी.
३) तालुक्यातील गावात उपलब्ध पाण्याची संसाधने, पीक पद्धती, जमिनीचा प्रकार यावर चर्चा करणे व त्या चर्चेमधून कोणत्या गावात अधिक काम करण्याची गरज आहे हे ठरविणे व त्यानुसार नियोजन करावे.
४) २६३ कामांची चर्चा करणे. कुटुंबाना लखपती करण्यासाठी ज्या कामांची जास्त आवश्यकता आहे ती कामे प्राधान्याने करण्याबाबत चर्चा करणे.
५) सर्व तालुक्यातील यंत्रणा एक टीम वर्क म्हणून काम केल्यास कुटुंबाना विविध लाभ देऊन लखपती करणे व सार्वजनिक कामाद्वारे गाव समृध्द करणे सुलभ होईल ..
महत्वाची सूचना :
१) महिन्यातील पहिल्या आठवडयात एक दिवस हा समृध्दी दिवस म्हणून घोषित करावा. त्यासंदर्भात गटविकास अधिकारी व तहसीलदार यांनी पत्र तयार करावे.
२) समृध्दी दिनाच्या आयोजनाची प्रमुख जबाबदारी संबंधित ग्रामसेवक यांची असावी.
३) समृध्दी दिवसाचे प्रतिनिधीत्व फिरत्या स्वरूपाचे असावे. एका समृध्दी दिवसाचे नियोजन ग्राम रोजगार सेवक यांनी केले असल्यास पुढील समृध्दी दिवसाचे नियोजन कृषी सहायक त्यापुढील दिवसाचे व वनपाल/तलाठी याप्रमाने तालुका पातळीवर नियोजन असावे. यासंदर्भात महिन्यातून १ दिवस सर्व तालुक्यातील गावांची आढावा मिटिंग असावी.
४) तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, RFO, विस्तार अधिकारी, सहायक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहायक तसेच इतर तालुका स्तरीय अधिकारी यांना प्रत्येकी किमान २ किंवा ३ गावात समुध्दीदिनी उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात येत आहे.
५) आयुक्त ( रोहयो ) यांनी विभागीय नोडल अधिकारी म्हणून तसेच प्रकल्प संचालक यांना जिल्हा नोडल अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. सदर अधिकाऱ्यांनी किमान ५ गावात ग्रामसमृध्दी दिवसासाठी उपस्थित राहून मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.
६) समृध्दी दिवसाच्या आयोजनाची अंमलबजावणी अधिक पारदर्शक व्हावी यासाठी जिल्हाधिकारी तथा उपजिल्हाधिकारी यांनी अभिप्राय फोटो पुराव्यासह आयुक्त कार्यालयात दर महिन्याला सादर करणे अपेक्षित आहे.
७) राज्यस्तरावर ” ग्रामसमृध्दी समृध्दी दिवस कक्ष तयार करण्यात येत असून या कक्षाद्वारे राज्यातील ग्रामसमृध्दी दिवसाचे संनियंत्रण करण्यात यावे.
शासन निर्णय: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गंत ग्राम समृध्दी दिवस राबविण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
हेही वाचा – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!