वनक्षेत्रालगतच्या गावातील शेतकऱ्यांसाठी सौर कुंपण योजनेच्या मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
वन्यप्राण्यांमुळे होणारे शेतपिकाचे नुकसान टाळण्यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेअंतर्गत अशा घटना ज्या ठिकाणी अधिक प्रमाणात घडतात अशा संवेदनशील गावांमध्ये शेतकऱ्यांना वैयक्तिक सौर कुंपणाचा लाभ देणाऱ्या योजनेच्या मार्गदर्शक सूचना लवकरात लवकर जारी कराव्यात अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. यासाठी लागणाऱ्या अतिरिक्त निधीच्या प्रस्तावासही त्यांनी मंजूरी दिली.
मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या उपाययोजनांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा:
चंद्रपूर जिल्ह्यातील मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या उपाययोजनांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या या बैठकीस मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये उपस्थित होते. प्रधानमुख्य वन संरक्षक- वनबल प्रमुख जी साई प्रकाश, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगांवकर, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक एन. प्रविण, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने हे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या वाढत असल्याने निर्माण होणाऱ्या मानव-वन्यजीव संघर्षावर उपाययोजना सुचवण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीने यासंदर्भात आपले धोरण निश्चित करावे अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेअंतर्गत सध्या ९३९ गावांचा समावेश असून योजनेत आणखी काही गावांचा समावेश करण्यात यावा तसेच योजनेत स्थानिकांना उपयुक्त ठरणाऱ्या आणखी कोणत्या गोष्टी देता येतील याचा विचार केला जावा असे सांगून मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, ज्या गावाजवळ वाघांचा सातत्याने वावर आहे आणि त्यामुळे शेती करता येत नाही अशा शेतजमीनीमध्ये बांबू लागवड, फळझाड लागवड, चारा लागवड करता येऊ शकेल ज्या माध्यमातून शेतकऱ्याना उत्पन्नाचे साधन मिळू शकेल यादृष्टीनेही विचार करावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.
सोलर बोअरवेल
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेत वनालगत असलेल्या ५ संवदेनशील गावांमध्ये प्रायोगिक तत्वावर वन सीमेवर लोखंडी जाळीचे कुंपण उभारण्यात यावे असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात २१८ ठिकाणी सोलर बोअरवेल तयार करून त्यावर खोदतळे निर्माण करण्यात यावेत, जेणेकरून या पाणवठ्यामुळे वन्यजीवांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटू शकेल असे सांगून यासाठी लागणारा ६ कोटी रुपयांचा खर्च कॅम्पा निधीतून करण्यात यावा असे सांगितले. जिल्ह्यात सहा ठिकाणी जंगल सफारी सुरु करण्यात आली असली तरी निसर्ग पर्यटनाला असलेला वाव लक्षात घेऊन आणखी स्थळांचा शोध घेतला जावा असेही ते यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, ज्या गावानजिक वन्यजीव विशेषत: वाघांचा वावर आढळून येतो त्याठिकाणी कॅमेरे बसवण्यात येऊन त्यांच्या हालचालीवर नजर ठेवण्यात यावी तसेच काही वाघांना रेडिओ कॉलर लावण्यात येऊन त्यांच्यावरही लक्ष ठेवण्यात यावे, जेणेकरून लोकांना सजग करता येईल व मानव वन्यजीव संघर्ष टाळता येईल.
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वाढती वाघांची संख्या व होत असलेला मानव वन्यजीव संघर्ष याची माहिती यावेळी दिली. त्यांनी यासंबंधीच्या विविध उपाययोजनांबाबत माहिती देतांना म्हटले की, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेची व्याप्ती वाढवून आणखी काही गावांचा त्यात समावेश करावा, या योजनेत कौशल्य विकासाचा समावेश करून वनौपजावर प्रक्रिया करणारे उद्योग स्थानिकांना उपलब्ध करून द्यावेत, जिल्ह्यात निसर्ग पर्यटन वाढवले जावे, त्यामुळे त्यांच्या हाताला रोजगार मिळू शकेल असे सांगितले. त्यांनी जिल्ह्यातील काही वाघ इतरत्र स्थानांतरीत करण्याची मागणीही यावेळी केली.
हेही वाचा – डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत शेतीला लोखंडी तार कुंपण देणारी योजना
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!
लोखंडे कुपंण करणन्यासाठी अर्ज कसा करावा