कन्येच्या जन्मानिमित्त शेतकऱ्यांना होणार रोपांचे वाटप – कन्या वनसमृद्धी योजना
कन्येच्या जन्मानिमित्त शेतकऱ्यांना होणार रोपांचे वाटप, कन्या वनसमृद्धी योजनेचा लाभ घेण्याचे सामाजिक वनीकरण विभागाचे आवाहन. ज्या शेतकऱ्याच्या कुटुंबात यावर्षी मुलीचा जन्म झाला आहे त्यांना सामाजिक वनीकरण विभागामार्फत १ जुलै रोजी १० रोपांचे वाटप करण्यात येणार असून त्या अनुषंगाने कन्या वन समृध्दी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाने केले आहे.
ज्या शेतकरी दाम्पत्यास मुलगी होते त्यांना मुलीच्या जन्मानंतर येणाऱ्या पहिल्या पावसाळ्यामध्ये नजीकच्या सामाजिक वनीकरणाच्या रोपवाटिकेतून १० रोपे ग्रामपंचायतीमार्फत विनामूल्य दिली जातात. त्यामध्ये ५ रोपे सागाची/सागवान जडया, २ रोपे आंबा, १ फणस, १ जांभूळ आणि १ चिंच अशी रोपे असतात. भौगोलिक परिस्थितीनुसार अन्य प्रकारच्या फळांच्या रोपांचा समावेश असतो. लागवड केलेल्या झाडांपासून मिळणारे सर्व उत्पन्न मुलीचा कौशल्य विकास, उच्च शिक्षण आणि रोजगार मिळविणे व मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या ऐच्छिकतेनुसार वापरण्यास मुभा आहे. ही योजना ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये जास्तीत जास्त २ मुली जन्माला येतात व त्यानंतर कुटुंबातील अपत्यांची संख्या नियंत्रित केली जाते त्यांच्याचपुरती मर्यादित असून, १ मुलगा किंवा १ मुलगी अथवा दोन्ही मुली ज्या कुटुंबात असतील त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जातो. मागील २ वर्षांत ५६ हजार ९०० लाभार्थींनी या योजनेचा लाभ घेतला असून या योजने अंतर्गत ५.६९ लक्ष एवढी वृक्ष लागवड झालेली आहे.
या योजनेमध्ये संबंधित तालुक्याचे वनक्षेत्रपाल, सामाजिक वनीकरण यांनी ग्रामपंचायतीकडून माहिती घेऊन ती संकलित करून दि. ३० जून पर्यंत संबंधित ग्रामपंचायतींना रोपे उपलब्ध करून द्यावयाची आहेत. ज्या शेतकऱ्याच्या कुटुंबात मुलीचा जन्म झाला आहे त्या शेतकऱ्यांना ग्रामपंचायतीमार्फत १ जुलै या एकाच दिवशी रोपांचे वाटप करण्यात येणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज त्वरित भरुन ग्रामपंचायतीकडे द्यावा व सामाजिक वनीकरण विभागाच्या या योजनेचा लाभ घ्यावा. कन्या वन समृध्दी या योजनेसंबंधीचा शासन निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. या योजनेसंबंधी अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण अथवा आपल्या गावाशी संबंधित सामाजिक वनीकरणाचे कर्मचाऱ्यांशी किंवा ग्रामपंचायतीशी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन वन विभागाने केले आहे.
ज्या कुटुंबामध्ये मुलगी जन्माला येईल अशा शेतकरी दाम्पत्याला १० रोपे विनामूल्य देऊन प्रोत्साहित करणे; वनक्षेत्राव्यतिरिक्त जास्तीत जास्त वनेतर क्षेत्र वृक्ष लागवडीखाली आणणे, पर्यावरण, वृक्ष लागवड व संगोपन आणि संवर्धन, जैवविविधता आदींबाबत सध्याच्या आणि भावी पिढीमध्ये आवड आणि रुची निर्माण करणे, अशा योजनेमधून मुलगा आणि मुलगी समान असून महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण यासाठी सामाजिक संदेश देणे तसेच मुलींच्या घटत्या संख्येवर काही प्रमाणात नियंत्रण मिळविणे अशा प्रमुख उद्देशांनी ही योजना सुरु करण्यात आली आहे.