उद्योगनीतीवृत्त विशेषसरकारी योजना

नवउद्योजकांसाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाचे आयोजन; ऑनलाईन अर्ज करा !

राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत तरुण आणि नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये सहभागी होण्याकरिता अर्ज करण्यासाठी इच्छुक स्टार्टअप्सनी https://msins.in/startup-week या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन विभागाचे मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. अर्ज करण्याची मुदत दि. ३० मे २०२२ पर्यंत आहे.

स्टार्टअप्सना शासनासोबत काम करण्याची संधी देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह हा एक प्रमुख उपक्रम आहे. स्टार्टअप्सची नाविन्यपूर्ण उत्पादने आणि सेवा यांचे प्रकल्प शासकीय यंत्रणेत राबवून प्रशासनात नाविन्यता आणणे हे या सप्ताहाचे मुख्य उद्दिष्ट आहे. याअंतर्गत प्राप्त अर्जांपैकी अव्वल १०० स्टार्टअप्सना त्यांच्या नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा यांचे सादरीकरण मंत्री, वरिष्ठ शासकीय अधिकारी, गुंतवणूकदार, तज्ज्ञ यांच्या समितीसमोर करण्याची संधी भेटते व त्यातील विजेत्या २४ स्टार्टअप्सना त्यांची नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा प्रायोगिक तत्त्वावर संबंधित शासकीय विभागांबरोबर राबविण्यासाठी नाविन्यता सोसायटीमार्फत १५ लाख रुपयांपर्यंतचे कार्यादेश (वर्क-ऑर्डर्स) दिले जातात. यामध्ये कृषी, शिक्षण व कौशल्य विकास, आरोग्य, प्रशासन, शाश्वतता (स्वच्छ ऊर्जा, जलव्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन), स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशीलता आणि संकीर्ण या क्षेत्रांचा समावेश आहे, असे मंत्री श्री. टोपे यांनी सांगितले.

स्टार्टअपविषयक उपक्रमांचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्काराने गौरव:

यासंदर्भात अधिक माहिती देताना कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा म्हणाल्या की, महाराष्ट्र ‘स्टार्टअप सप्ताह’ या उपक्रमाच्या आतापर्यंत चार आवृत्त्या आयोजित केल्या गेल्या असून विजेत्या स्टार्टअप्सनी राष्ट्रीय आरोग्य मिशन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महावितरण, ग्रामविकास विभाग, विविध महानगरपालिका, जिल्हा कार्यालये अशा विविध शासकीय संस्था, विभागांसोबत काम पूर्ण केले आहे.

या उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीस नुकताच मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता उपक्रमाचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यंदा आयोजित केलेल्या स्टार्टअप सप्ताहामध्ये राज्यासह देशभरातील कल्पक नवउद्योजक, तरुण-तरुणींनी निश्चित सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यंदाच्या सप्ताहातूनही नवनवीन संकल्पना, कल्पक संशोधन पुढे येईल, असा विश्वास श्रीमती वर्मा यांनी व्यक्त केला.

नाविन्यता सोसायटीमार्फत विविध उपक्रम:

महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरणाची उद्दीष्ट्ये साध्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत राज्यातील सर्व घटकांकरिता स्टार्टअप व नाविन्यता क्षेत्राशी संबधित विविध योजना, उपक्रम व कार्यक्रम राबविले जातात. या धोरणांतर्गत स्टार्टअप सप्ताहाव्यतिरिक्त इनक्यूबेटर्सची स्थापना, स्टार्टअप व नाविन्यपूर्ण यात्रा, ग्रँड चॅलेंज, हॅकॅथॉन, गुणवत्ता परीक्षण आणि प्रमाणन अर्थसहाय्य योजना, बौद्धिक संपदा हक्क (पेटंट) अर्थसहाय्य योजना, महाराष्ट्र व्हर्चुअल इनक्युबेशन सेंटर आणि हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची यांसारख्या अनेक उपक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या उपक्रमांमुळे राज्यातील अनेक नवउद्योजकांना उद्योजकतेशी निगडीत विविध प्रकारचे सहाय्य व मार्गदर्शन उपलब्ध होत आहे, अशी माहिती नावीन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह यांनी दिली.

अधिक माहितीसाठी ईमेल [email protected] अथवा 022-35543099 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा – राष्ट्रीय करिअर सेवा : 10वी/12वी उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी; ऑनलाईन अर्ज करा ! – National Career Service

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.