वृत्त विशेषकृषी योजना

पीकनिहाय पीक कर्ज दर २०२१ : खरीप पीक कर्ज २०२१-२०२२ वाटप सुरू

महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय क्र.सीसीआर/१४१०/प्र.क्र.७२३/२- स दि.०८ जून २०११ व सुधारीत शासन निर्णय क्र.सीसीआर/१११३/प्र.क्र.६०१/ २ – स दि.५ मे २०१४ अन्वये सन २०२१-२२ साठी पीकनिहाय कर्जदर निश्चित करणे व पीक कर्जदरात एकसूत्रता आणणेसाठी गठीत केलेल्या राज्यस्तरीय समितीची सभा दि.०८.०३.२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता मा.सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अध्यक्षतेखाली मा.सहकार आयुक्त कार्यालय, पुणे यांचे सभागृहात पार पडली.

नाबार्डकडील दि.१५.०४.२०२० रोजीच्या परिपत्रकातील सुचनेप्रमाणे सदर सभा मा. कृषी सचिव/आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली होणे आवश्यक होते. तथापि, कृषी आयुक्तालयाकडील दि.२६.२.२०२१ रोजीच्या पत्राद्वारे विनंती केल्यानुसार सदर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

मा.समिती अध्यक्ष श्री. कवडेसाहेब (सहकार आयुक्त) यांनी शेतकऱ्यांचे दृष्टिने असलेले पीक कर्जदराचे महत्व विषद करुन, योग्य ती कर्ज पुरवठा शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावा यासाठी योग्य पीक कर्जदर निश्चित करणेसाठी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे, तरी सर्व सदस्यांनी चर्चेमध्ये सक्रिय सहभाग घेवून योग्य पीक कर्जदर निश्चित करणेसाठी सहकार्य करावे असे नमूद करून समितीचे सचिव यांना पीकनिहाय कर्जदर निश्चित करणेबाबत पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या.

मा.समिती सचिव यांनी सदर सभेस दूरचित्रवाणी परिषदेद्वारे सभेस उपस्थित असलेल्या सभासदांनी एकावेळी एकानेच मत मांडावे व इतरांनी आपले माईक बंद ठेवावेत जेणेकरुन सभेचे कामकाज सुरळीत चालेल असे सांगितले. पीक कर्जदर निश्चित करणेसाठी राज्यातील/विभागातील भौगोलिक परिस्थिती, उपलब्ध सिंचन व्यवस्था, जमिनीचा पोत, घेतल्या जाणाऱ्या पीकाचा प्रकार, पीक उत्पादनासाठी आवश्यक बि-बियाणे, खते, औषधे इत्यादि गरज, पीक घेण्याची पध्दत, मजूरीचे दर पाहून पीक उत्पादनासाठी येणारा खर्च व उत्पन्न, होऊ शकणारी वसुली याचा विचार करून पीक कर्जदर ठरविणेबाबत विचार व्हावा असे सभेपुढे मांडले. तसेच जिल्हा बँकांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रासाठी निश्चित केलेल्या पीक कर्जदरात बरीच मोठी तफावत असल्याची बाब विचारात घेऊन सभेस योग्य कर्जदर निश्चित करावे लागतील असे नमूद केले. यासाठी सर्वांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे असे सांगितले.

>

तद्नंतर सन २०२१-२२ साठी पीक कर्जदर ठरविणेनुषंगाने चर्चेस सुरुवात करण्यात आली.

खरीप पीक:

भात पीक कर्जदर अनुषंगाने चर्चा करण्यात आली असता, प्रगतशील शेतकरी श्री. प्रशांत पाटील व श्री. यज्ञेश सावे यांनी भात पीकासाठी गतवर्षीच्या तुलनेत १०% ते १५% वाढ करावी असे सुचविले तर गडचिरोली जिल्हा बँक प्रतिनिधी यांनी परतफेड क्षमता पाहूनच दर ठरवावेत असे सुचित केले. तसेच कृषी आयुक्तालयाचे प्रतिनिधी श्री.सिगेदार यांनी एम.एस.पी. विचारात घेवून दर ठरवावेत असे सुचित केले.

सदर सभेचे मत विचारात घेवून यात सर्व प्रकारच्या भात पीकासाठी गतवर्षीच्या तुलनेत १०% वाढ करावी असे ठरले.

तसेच ज्वारी, बाजरी, भुईमूग, सोयाबिन या पीकाचेही दरामध्ये गतवर्षीच्या तुलनेत १०% वाढ करावी असे ठरले तर मका, तुर, मुग, उडिद, सुर्यफुल, तीळ, जवस या पीकांचे पीक कर्जदर गतवर्षी इतपत ठेवावेत असे ठरले.

कापूस पीकासाठी वाढलेल्या लागवडीचा खर्च विचारात घेता, गतवर्षीच्या पीक कर्जदरात १० ते १५% वाढ करणेबाबत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी श्री.सचिन मोरे, शेतीतज्ञ श्री.मनोज जवंजाळ यांनी सुचविले. यावर इतर सदस्याचे मत विचारात घेवून १५% ने वाढ करावी असे सर्वानुमते ठरले.

ऊस पीकासाठी वाढलेल्या लागवडीचा खर्च विचारात घेता, गतवर्षीच्या पीक कर्जदरात २०% वाढ करणेबाबत शेतीतज्ञ श्री. प्रशांत पाटील यांनी सुचविले. मात्र अकोला व पुणे जिल्हा बँकेच्या प्रतिनिधींनी कर्ज परतफेड क्षमता व साखरेस मिळालेला दर व एफआरपी किंमत विचारात घेवून दर निश्चित करावेत असे सुचविले. एफआरपी पेमेंट साखर कारखान्यांना द्यावे लागते. उत्पादन खर्च वाढला उतारा जास्त आहे. त्यामुळे साखरेचा दर व शेतकऱ्यांना पेमेंट देणे हे अडचणींचे होत असल्याचे मा.समिती सचिव यांनी सांगितले. यावर सर्व सदस्यांचे मत विचारात घेऊन ऊस (पूर्व हंगामी व सरूसाठी ) १५% वाढ तर ऊस (खोडवासाठी) १०% वाढ करावी असे सर्वानुमते ठरले.

रब्बी पीके :

रब्बी ज्वारी पीकासाठी वाढलेला लागवडीचा खर्च विचारात घेता, गतवर्षीच्या पीक कर्जदरात १०% ते १५ % वाढ करणेबाबत महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी प्रतिनिधी श्री. निरगुडे यांनी सुचित केले. यावर सर्व सदस्याचे मत विचारात घेवून १०% ने वाढ करावी असे ठरले.

तसेच गहू, हरबरा, करडई या पीकांचे पीक कर्जदर गतवर्षी इतपत ठेवावेत असे ठरले.

श्री. पी.बी.चव्हाण, पुणे जिल्हा बँक प्रतिनिधी यांनी सन २०२०-२१ करीता राज्यस्तरीय समितीने निश्चित न केलेल्या व काही थोडया क्षेत्रापुरतेच मर्यादित पीकाबाबतचे (जसे बांबुसाठी कर्जदर) पीक कर्जदर हे त्या त्या जिल्हयातील गरजे प्रमाणे जिल्हास्तरीय तांत्रिक समितीमध्ये ठरवावेत असे सुचित करुन सदर पीकाचा राज्यस्तरीय समितीच्या पीक कर्जदरात समावेश करु नये असे सुचविले. त्यास मा. समिती अध्यक्ष यांनी दुजोरा दिला. यावर इतर सदस्यांचे मत विचारात घेवून सन २०२०-२१ करीता राज्यस्तरीय समितीने निश्चित न केलेल्या व मर्यादित क्षेत्रातील पीकांच्या पीक कर्जदराचा समावेश करू नये असे ठरले.

भाजीपाला पीके :

पालघर जिल्हयात मिरची लागवड मोठया प्रमाणावर असून, सदर मिरची प्रामुख्याने निर्यात केली जाते असे श्री. यज्ञेश सावे, शेतीतज्ञ यांनी सभेच्या निदर्शनास आणले. त्यामुळे मिरची पीकासाठी लागवडीचा खर्च विचारात घेता, मिरची निर्यातीचा व नियमित मिरचीचा दर वेगळा असावा असे श्री. यज्ञेश सावे व पुणे जिल्हा बँक प्रतिनिधी, श्री.पी.बी. चव्हाण यांनी सुचित केले. यावर सर्व सदस्याचे मत विचारात घेवून अध्यक्ष यांनी साधी मिरचीसाठी गतवर्षी इतपत तर निर्यातीसाठी मिरचीच्या दरामध्ये २०% वाढ करावी असे सूचित केले. त्यानुसार मिरची (साधी) साठी गतवर्षी इतपत तर मिरची (निर्यातीसाठीची) यामध्ये गतवर्षीच्या कर्जदरात २०% ने वाढ करावी असे ठरले.

टोमॅटो व कांदा पीकासाठी वाढलेला लागवडीचा खर्च विचारात घेता, पीक कर्जदरामध्ये वाढ करावी असे शेतीतज्ञ श्री. देवरे यांनी सुचित केले. यावर मा.समिती सचिव यांनी मार्केट दर व उत्पादन दर विचारात घेता, दर वाढवून दिले तर शेतकरी कर्जबाजारी होतील असे सांगितले. तर पुणे जिल्हा बँक प्रतिनिधी, श्री. पी. बी. चव्हाण यांनी टोमॅटो व कांदा दर गतवर्षी इतपत ठेवावेत असे सुचविले. यावर इतर सदस्यांचे मत विचारात घेवून सदर पीकासाठी गतवर्षी इतपत कर्जदर ठेवावेत असे ठरले.

तसेच बटाटा, हळद, आले, कोबीवर्गिय पीके या पीकांचे पीक कर्जदर गतवर्षी इतपत ठेवावेत असे ठरले.

फुले पीके :

मोगरा पीकासाठी वाढलेला लागवडीचा खर्च विचारात घेता, पीक कर्जदरामध्ये १०% वाढ धरावी असे शेतीतज्ञ श्री. यज्ञेश सावे यांनी सुचविले. यावर सर्व सदस्याचे मत विचारात घेऊन मोगरा पीकासाठी गतवर्षीपेक्षा १०% वाढ करावी असे ठरले.

तसेच ऑस्टर, शेवंती, झेंडू गुलाब व जाई या पीकांचे दर गतवर्षी इतपत ठेवावेत असे ठरले.

फळ झाडे :

फळ झाडे पीकासाठी लागवडीचा खर्च विचारात घेता, बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, दापोली, प्रतिनिधी श्री. वाडकर यांनी आंबा, काजू पीक कर्जदरामध्ये १०% ते २०% वाढ करणेबाबत तर चिक्कू पीकामध्ये शेतीतज्ञ श्री. यज्ञेश सावे यांनी १०% वाढ करणेबाबत तसेच संत्रा/मोसंबी पीकामध्ये शेतीतज्ञ श्री. मनोज जवजाळ यांनी १५% वाढ करणेबाबत सुचविले. यावर सर्व सदस्यांचे मत विचारात घेवून काजू, पेरू, संत्री/मोसंबी या पीकासाठी गतवर्षीच्या पीक कर्जदरामध्ये १०% वाढ करावी. तर चिक्कू पीकासाठी ₹ ७००००/ -प्रति हेक्टरी, नारळ पीकासाठी ₹ ७५०००/ -प्रति हेक्टरी, आंबा पीकासाठी ₹ १५५०००/- प्रति हेक्टरी दर निश्चित करावेत. तर द्राक्षे, डाळींब, कागदी लिंबू, सिताफळ, केळी, बोर व आवळा या पीकासाठी गतवर्षी इतपत पीक कर्जदर ठेवावेत असे ठरले.

तसेच सर्व जिल्हयामध्ये पपईचे पीक मोठया प्रमाणात होत असल्याचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहूरी प्रतिनिधी श्री. निरगुडे व लातूर जिल्हा बँक प्रतिनिधी श्री. जाधव यांनी व इतर सदस्यांनी पपईचे पीकाचा राज्यस्तरीय तांत्रिक समितीमध्ये पीक कर्जदराचा समावेश करावा असे सुचविले.

मा.समिती अध्यक्ष व मा. समिती सचिव यांनी पपई पीकासाठी सर्व सदस्यांचे मत घेवून प्रति हेक्टरी २७००००/- दर निश्चित करून राज्यस्तरीय समिती पीक कर्जदरात समावेश करावा असे ठरले.

चारा पीके :

चारा पीकासाठी गतवर्षीच्या पीक कर्जदराइतपत पीक कर्जदर या वर्षी ठेवावेत असे ठरले.

इतर पीके :

इतर पीकामध्ये रेशम तुती पीकासाठी गतवर्षी इतपत पीक कर्जदर ठेवावेत तर पानमळा पीकासाठी प्रति हेक्टरी ₹ ५५०००/- इतका पीक कर्जदर ठेवावा असे ठरले.

पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसायासाठी खेळते भांडवली कर्जदर :

पशुपालन/दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन खर्च कर्जदरात वाढ करणेबाबत शेतीतज्ञ श्री. प्रशांत पाटील यांनी सुचविले. यावर पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसायासाठी खेळते भांडवली कर्जासाठी सर्व सदस्याचे मत विचारात घेवून गाय युनिट १ साठी ₹ १२०००/-, म्हैस युनिट १ साठी ₹ १४,000/-, प्रति हेक्टर शेत तळेसाठी तसेच पशुसंर्वधन व मत्स्य व्यवसाय विद्यापीठ, नागपूर, प्रतिनिधी यांनी सर्व जाती मत्स्य पालनासाठी प्रति हेक्टरी १२,२०,000/- व्यवस्थापन खर्च कर्जदर ठरविणेबाबत सुचित केलेनुसार त्यावर इतर सदस्यांचे मत विचारत घेवून कर्जदर ठरविण्यात आले. तर शेळी/मेंढी पालन व्यवस्थापन खर्च कर्जदर, कुक्कुट पालन व्यवस्थापन खर्च कर्जदर, नदी तलावामध्ये छोटया नावेच्या सहाय्याने, निम्न खारे पाण्यातील मत्स्यपालन प्रति हेक्टर सर्व जाती, निम्न खारे पाण्यातील कोळंबी संवर्धन प्रती हेक्टर, (माशाच्या इतर जातीसह) ट्रॉलर मच्छिमार नौका, पर्शिसन मच्छिमार नौका, गील नेटर मच्छिामार नौका, बिगर यांत्रिक मच्छिमारी नौका, यांत्रिक मच्छिमारी नौकाबाबत गतवर्षी इतपत खेळते भांडवली कर्जदर निश्चित करण्यात यावे असे ठरले.

राज्यात पीक कर्ज वाटपात जिल्हा बँकांचा मोठा वाटा असून, जिल्हा बँका प्राथ, सेवा संस्थांमार्फत कर्ज वाटप करतात. प्राथमिक सेवा संस्थांना पीक कर्जदर माहे जानेवारी पर्यंत कळविणे आवश्यक आहे. ही बाब तसेच राष्ट्रीय बँकेचे दि.१७.०२.२०२१ रीजीचे सुधारित पत्र विचारात घेऊन पुढील वर्षीपासून राज्यस्तरीय तांत्रिक समितीची (एसएलटीसी) सभा नेहमीप्रमाणे माहे ऑक्टोंबर मध्ये घेवून राज्यस्तरीय तांत्रिक समितीने (एसएलटीसी) पीक कर्जदर प्रसारीत केल्यानंतर जिल्हास्तरीय तांत्रिक समिती सभा (डीएलटीसी) घेणे संयुक्तिक राहील असे सर्वांनुमते ठरले.

अंतिमतः मा.समिती अध्यक्ष तथा मा.सहकार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, यांनी राज्य शासनाने नव्याने गठीत केलेल्या राज्यस्तरीय समितीमध्ये राज्यातील घटकांचा (शासनाचे विविध विभाग, बँकर्स, शेतीतज्ञ इ.) झालेला समावेश, यामुळे होवू शकलेली सांगोपांग व फलद्रुप चर्चा, उपलब्ध झालेली शास्त्रोक्त आकडेवारी, क्षेत्रिय अनुभवावर व्यक्त झालेली मते व सूचना इत्यादीची पीक कर्जदर ठरवितांना चांगल्याप्रकारे मदत झाल्याचे मत व्यक्त केले. राज्यस्तरीय समितीमार्फत पीकनिहाय कर्जदर ठरविणेबाबत व कर्जदरात एकसूत्रता आणण्यासाठी सदर चर्चा उपयुक्त ठरल्याचे नमूद केले.

सभेच्या शेवटी राज्यस्तरीय समितीचे सचिव तथा मा. व्यवस्थापकीय संचालक, डॉ.अजित आर. देशमुख, दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांनी सदर सभेस उपस्थित राहून पीककर्जदर ठरविण्यास्तव मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे तथा मा.समिती अध्यक्ष यांचे आभार मानले. तसेच सदर सभेत कृषी विद्यापीठांचे प्रतिनिधी, कृषी आयुक्तालयाचे प्रतिनिधी, राष्ट्रीय बँकेचे प्रतिनिधी, राज्यस्तरीय बँकर्स समितीचे प्रतिनिधी, व्यापारी व ग्रामिण बँकांचे प्रतिनिधी, पशुसंवर्धन/मत्स्य व्यवसाय आयुक्तालयाचे प्रतिनिधी जिल्हा बँकांचे प्रतिनिधी व शेतीतज्ञ यांनी उपस्थित राहून पीककर्ज दर ठरविण्यात सक्रीय सहभाग घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानून मा. अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहीर केले.

हेही वाचा – खरीप पीककर्ज मागणीसाठी ऑनलाईन अर्ज सुरु – २०२१-२२ साठी असा करा ऑनलाईन अर्ज

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.