आरोग्यवृत्त विशेषसरकारी योजनासार्वजनिक आरोग्य विभाग

निरोगी पिढीसाठी माता बाल आरोग्य योजना – Maternal Child Health Scheme

निरोगी महाराष्ट्राच्या दृष्टीने शासनाच्या वतीने विविध महाआरोग्य योजना साकारल्या आहेत. गरोदर महिला व बालकांचे आरोग्य चांगले राखता यावे, व प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सुविधा सहज साध्य व्हाव्यात, यासाठी असलेल्या काही महत्त्वाच्या आरोग्य योजनांचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे.

1. जननी सुरक्षा योजना

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्र्य रेषेखालील सर्व गर्भवती महिला या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र आहेत. यामध्ये ग्रामीण व शहरी भागातील दारिद्र्य रेषेखालील लाभार्थीची प्रसूती घरी झाल्यास ५०० रुपये, शहरी भागातील लाभार्थीची प्रसूती शासकीय किंवा शासन मान्य मानांकित आरोग्य संस्थेत झाल्यास ६०० रुपये, ग्रामीण भागातील लाभार्थीची प्रसूती शासकीय किंवा शासनमान्य मानांकित आरोग्य संस्थेत झाल्यास ७०० रूपये, तर सिझेरिअन शस्त्रक्रिया झाल्यास लाभार्थीस रू. १५०० चा लाभ देय आहे. या योजनेचा लाभ हा लाभार्थीच्या बँक खात्यावर डीबीटी, पीएफएमएसद्वारे धनादेशाद्वारे देण्यात येतो.

जननी सुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

या योजनेचा लाभ घेण्यासाठी रहिवासी दाखला, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्रे जोडावयाची आहेत. प्रसूती सेवा उपलब्ध असलेल्या सर्व शासकीय आरोग्य संस्था व शासन मानांकित खासगी आरोग्य संस्थांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर प्रसुतिनंतर ७ दिवसांच्या आत सेवा दिली जाते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळच्या आशा,आरोग्य सेविका, किंवा जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.

2. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम

या योजनेअंतर्गत गरोदर मातेस व प्रसूती पश्चात ४२ दिवसांपर्यंत मोफत सुविधा देण्यात येतात. प्रसूति, सिझेरियन शस्त्रक्रिया, प्रसूति संदर्भातील, गरोदरपणातील व प्रसूति पश्चात आवश्यक औषधे व साहित्य, प्रयोगशाळेतील तपासण्या, प्रसूति पश्चात आहार (स्वाभाविक प्रसूती ३ दिवस, सिझेरीयन प्रसूती ७ दिवस) मोफत रक्तसंक्रमण, घरापासून आरोग्य संस्थेपर्यंत, एका आरोग्य संस्थेतून दुसऱ्या आरोग्य संस्थेत तसेच आरोग्य संस्थेतून घरापर्यंत वाहतूक व्यवस्था या सेवा दिल्या जातात.

तसेच, या योजने अंतर्गत एका वर्षापर्यंतच्या आजारी बालकास उपचारासाठी आवश्यक औषधे व साहित्य, प्रयोगशाळेतील तपासण्या, मोफत रक्तसंक्रमण, घरापासून आरोग्य संस्थेपर्यंत, एका आरोग्य संस्थेतून दुसऱ्या आरोग्य संस्थेत तसेच आरोग्य संस्थेतून घरापर्यंत वाहतूक व्यवस्था या सेवा मोफत दिल्या जातात.

जन्मल्यापासून ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये जन्मापासून विकृती दोप, सकस व पौष्टिक आहाराचा अभाव, इतर आजार, मुलांच्या विकासामध्ये विलंब या चार विकारांसंबंधी प्रारंभिक तपासणी व उपचार केले जातात.

संबंधित शासकीय आरोग्य संस्थेत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर गरोदरपणाच्या काळात, प्रसुती दरम्यान गरोदर महिलांना, प्रसुतीनंतर ४२ दिवसांपर्यंत व १ वर्षे वयापर्यंतच्या आजारी बालकास सेवा पुरविली जाते.

3. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

कुटुंबातील पहिल्या जीवित अपत्यासाठी गर्भवती माता व स्तनदा मातांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ अनुज्ञेय असून, या योजनेअंतर्गत गर्भवती माता व स्तनदा मातांना काही निकष पूर्ण केल्यानंतर रू. ५००० ची रक्कम ३ टप्प्यांमध्ये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जातो. मात्र वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. राज्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये सेवा दिली जाते.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

योजनेचा लाभ मिळण्यासाठी माता आणि बाल सुरक्षा कार्ड, लाभार्थी आणि तिच्या पतीच्या आधार कार्डची झेरॉक्स, लाभार्थीच्या स्वतंत्र बँक पासबुकची झेरॉक्स आणि नवजात बालकाचे जन्मनोंदणी प्रमाणपत्र ही विहित कागदपत्रे जोडावयाची असून, फॉर्म नोंदणी आणि कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर लाभार्थीची माहिती केंद्र शासनाच्या पोर्टलवर भरल्यानंतर किमान ३० दिवसांच्या आत लाभार्थीच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली जाते.

4. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाचे आयोजन दर महिन्याच्या ९ तारखेला व ९ तारखेला रविवार किंवा सुट्टी असेल तर त्यापुढील कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी राबविण्यात येते.

या अभियानांतर्गत सर्व गरोदर मातांची गरोदरपणातील दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात एक सोनोग्राफी करण्यात येते. मोफत प्रयोगशाळा चाचण्या, लाभार्थीचा वैद्यकीय पूर्व इतिहास घेऊन तपासणी करुन व धोक्याची लक्षणे, गुंतागुंत व कोणतीही जोखीम नसल्याची खात्री करण्यात येते. प्रसुतीपूर्व तपासणीसाठी आलेल्या सर्व लाभार्थींचा रक्तदाब, पोटावरुन तपासणी व गर्भपिंडाच्या हृदयाचे ठोके तपासले जातात.

शोधलेल्या सर्व अतिजोखमीच्या मातांना उच्च संस्थेमध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले जाते आणि जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत उच्च संस्थेमध्ये योग्य ते उपचार दिले जातात. सर्व लाभार्थ्याला एमसीपी कार्ड देण्यात येते.

अभियानाच्या दिवशी आलेल्या सर्व लाभार्थीचे गरोदरपणातील तपासणी, गरोदरपणातील धोक्याची लक्षणे, बाळाच्या जन्माची तयारी, गरोदरपणातील गुंतागुंतीची तयारी, लोहयुक्त गोळ्या व कॅल्शियम च्या गोळ्यांचे सेवनाचे महत्त्व, संस्थात्मक प्रसुती, संदर्भ सेवा – जननी सुरक्षा योजनेंतर्गत व जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम अंतर्गत देण्यात येणारा लाभ, प्रसूतीपश्चात काळजी, स्तनपान व पूरक आहार, संस्थात्मक प्रसूती व प्रसूतीपश्चात कुटुंब नियोजनाबाबत समुपदेशन केले जाते.

5. नियमित लसीकरण कार्यक्रम

बालमृत्यु व त्यांच्यामधील आजारांचे प्रमाण कमी करण्यासाठी बालकांचे योग्य संपूर्ण लसीकरण करणे ही अत्यंत सोपी, कमी खर्चाची पण अत्यंत प्रभावी उपाययोजना आहे.

बालकांमधील क्षयरोग, घटसर्प, धनुर्वात, डांग्या खोकला, हिमोफिलस इन्फ्लुएन टाईप बी, पोलिओ, सबील गोवर व रुबेला या आजारांमुळे होणारे आजारपण व मृत्यू कमी करणे हे नियमित लसीकरण कार्यक्रमाचे महत्वाचे उद्दिष्ट आहे.

कार्यक्रमांतर्गत बीसीजी लस क्षयरोगाकरीता, डीपीटी लस ही घटसर्प, धनुर्वात, डांग्या खोकला या आजारांकरिता, पोलिओ लस पोलिओ आजारांकरिता तसेच गोवर – रुबेला लस गोवर व रूबेला आजारांकरिता, हिपॅटायटिस बी लस, काविळ आजारांकरिता व पेंटाव्हॅलंट लस ही घटसर्प, धनुर्वात, डांग्या खोकला, हिमोफिलस इन्फलुएन्झा टाईप बी व कावीळ या आजारांकरिता प्रतिबंधात्मक साधन म्हणून उपयोगात आणल्या जातात.

सर्व आरोग्य संस्थांमध्ये तसेच संपर्क कार्यक्षेत्रात लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात येते व लाभार्थींना लसी दिल्या जातात. लसींची क्षमता टिकून राहण्यासाठी लसींची वाहतूक शीतसाखळी अबाधित ठेवून करण्यात येते.

सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालये, सामान्य रुग्णालये, रुग्णालये आणि निमशासकीय संस्था यांच्यामार्फत कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते.

आरोग्य सेविका / आशा / अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधून आपल्या बाळाचे संपूर्ण लसीकरण करून घ्यावे.

हेही वाचा – आता तुमच्या आरोग्य सेतू ॲपवरुन तुमचा आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक तयार करा

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.