वृत्त विशेषआरोग्य

पावसाळ्यातील आजार आणि घ्यावयाची काळजी !

जून महिन्यात सर्वात जास्त पाऊस असतो, कधी कमी तर कधी जास्त प्रमाणात पडतो. त्यामुळे डासांना पोषक वातावरण तयार होऊन डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे किटकजन्य व जलजन्य आजार होतात. त्यासाठी पावसाळ्यात नागरिकांना आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

पाणी हेच जीवन असे संबोधले जाते. मानवी जीवनात स्वच्छ आणि शुद्ध पाण्याचे महत्त्व अन्यन साधारण आहे. असुरक्षित पिण्याचे पाणी व अस्वच्छ परिसर यामुळे समाजात आरोग्याच्या प्रमुख समस्या उद्गभवतात. पाण्याची गुणवत्ता हा सुरक्षित पाणी पुरवठ्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे. गावातील परिसर व वैयक्तिक स्वच्छतेची स्थिती ही पाण्याच्या गुणवत्तेसाठी प्रामुख्याने जबाबदार असते. काही वेळा स्त्रोतामधून मिळणारे पाणी योग्य गुणवत्तेचे नसते, प्रथमतः स्त्रोताच्या पाण्याची गुणवत्ता समजून घेणे आणि त्यानंतर स्त्रोतापासून ते प्रत्यक्ष घटकांपर्यंत पाण्याचा प्रवास समजून घेवून ज्या-ज्या ठिकाणी पाणी दूषित होण्याची शक्यता असते तेथे प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असते. (जसे लिकेज, व्हाल्व, गळती, नळ गळती नसणे, नळाचे खड्डे) पिण्याचे पाणी, जीवाणू व रासायनिक प्रदुषणापासून मुक्त हवे. जीवाणू प्रदुषणामुळे अतिसार, विषमज्वर, काविळ, हागवण यासारखे आजार होतात. तर अमर्याद पाण्याचा उपसा, रासायनिक खतांचा वापर व औषधांची फवारणी, स्त्रोता भोवती उकिरडे इत्यादीमुळे नाइट्रेटचे प्रमाण वाढून लहान बालकांत ब्ल्यूबेवी सिंड्रोम (मिथॅहिमोग्लोबिनीया) या सारखे आजार होतो. यामध्ये लहान बालकांची ऑक्सिजन वहन क्षमता कमी होते. तर पाण्यात फ्लोराइड प्रमाण वाढल्यास दंतविकार उद्भवतात यात दात वेडेवाकडे होणे, दात ठिसूळ होणे हाडांमध्ये बाक येतो. पाण्यात क्लोराइड व कॅल्शियमचे प्रमाण वाढल्यास मुतखडा, किडनीचे आजार कॅन्सर इत्यादी आजार होतात.

स्वच्छता असेल तेथे आरोग्य नांदेल. आरोग्य नांदेल तर भरभराट होईल असे म्हणतात. आपल्याला मिळणारे सर्व पाणी पावसापासून मिळते ते आपल्यापर्यंत दोन प्रकारच्या आवस्थाद्वारे पोहचते. एक भूपृष्ठावरील पाण्याचे स्त्रोताद्वारे म्हणजे नदी, नाले, तलाव, धरणे आदी माध्यमातून मिळते. तर दुसरा जमिनीखालील पाण्याचे स्त्रोत हातपंप, विद्युत पंप, विहीरी आदीच्या माध्यमातून मिळते. निसर्गातून मिळणारे पावसाचे पाणी शुध्द स्वरुपात असते, हे पाणी आकाशातून जमिनीवर येताना त्यात हवेतील वायू व धुलीकण मिसळतात तसेच जमिनीवरुन प्रवास करताना त्यामध्ये विविध घटक, भुगर्भातील विविध क्षार मिसळतात. नैसर्गिकरित्या पाणी काही प्रमाणात प्रदूषित होत असले तरी, मानवनिर्मित कारणाने पाण्याचे मोठया प्रमाणात प्रदूषण होते.

पाण्यात फ्लोराईड, क्लोराईड, कॅल्शियम, अर्सेनिक, लोह, नायट्रेट, खते इत्यादीचा अंश पाण्यातच मिसळल्यामुळे रासानियक प्रदूषण होते.

जिल्हा सर्वेक्षण अधिकारी श्रीमती डॉ. आश्विनी चौधरी :

  • पाण्यामध्येच जीवजंतू, जिवाणू, विषाणू, परोपजिवी पेशी (अमिबा), कृमी इत्यादीचे अस्तित्व असल्यामुळे जैविक प्रदूषण होते. शिवाय कारखान्यातील सांडपाण्याद्वारे किरणोत्सारी पदार्थ मिसळून पाणी प्रदूषित होते.
  • मानवनिर्मीत कारणामुळेही पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत असते. नदी, नाले, ओढे, झरे, तळे बांधांचे पाणी दूषित होण्याच्या कारणांमध्ये :
  • पात्रात किंवा काठावर शौचास बसणे, अंघोळ करणे, पोहणे, कपडे धूणे, गुरे जनावरे, वाहने धुणे.
  • कारखान्यातील टाकाऊ पदार्थ रासायनिक द्रव्य पाण्यात सोडणे. सांडपाणी, मलमूत्र, गटाराचे पाणी पात्रात सोडणे.
  • मानव, पशूपक्षी यांचे मृतदेह पाण्यात सोडणे.
  • धार्मिक विधी, मूर्ती विसर्जन, पूजेचे साहित्य (निर्माल्य) टाकणे, नदी काठावर जनावरांचे गोठे बांधणे.
  • हातपंपाभोवती उकीरडे असणे. शौचालयाचे सांडपाणी सोडणे, सिंमेटचा ओठा नसणे.
  • पाईपलाईन गळती असणे, उघडया विहीरीमध्ये पालापाचोळा पडणे. उघडयावर शौचास बसणे.
  • अशा प्रकाराने दूषित झालेले पाणी पिल्याने होणाऱ्या आजारांत अतिसार, आमांश (डिसेंट्री), विषमज्वर, काविळ, लेप्टोईस्पायरोसिस इत्यादीं आजारांचा समावेश होतो.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवकुमार हालकुडे :

अतिसार :

शौचाला पातळ होणे किंवा पाण्यासारखे पातळ जुलाब होणे याला अतिसार म्हणतात. पावसाळयात दूषित पाण्यामुळे साथीच्या स्वरुपात होणाऱ्या आजारापैकी एक पाण्यात विविध प्रकारचे ई-कोलाय सारखे जिवाणू व विषाणू पाणी दूषित होवून असे दूषित झालेले पिल्यामुळे अतिसार होतो. यात जलसुष्कता होवून उपचार न मिळाल्यास मृत्यूही संभावतो.

आमांश (डिसेंट्री) :

अमिबा या एकपेशीय जिवाणूमुळे पाणी दूषित होवून हा आजार होतो. यात पोटात कळ घालून शौचास होते. शौचातून चिकट आव (शेंम) पडते, कधी-कधी रक्तही पडते, कधी-कधी फेस पडतो.

कॉलरा :

व्हिब्रीओ कॉलरा या सुक्ष्म जिवाणूमुळे होणारा आजार. यात जुलाब हे अत्यंत पातळ म्हणजे भाताच्या पेजेसारखी होतात. तीव्र जलसुष्कता होते, त्यामुळे जीभ कोरडी पडते, डोळे खोल जातात, पोटावरील त्वचा ओढल्यास पुर्ववत होण्यास वेळ लागतो. वेळीच उपचार न मिळाल्यास तीव्र जलसुष्कता होवून मृत्यू संभावतो. जलसंजीवनी अथवा शिरेद्वारे सलाईन देवून जलसुष्कता कमी केली जाते.

कावीळ (यकृतदाह):

कावीळ हा विषाणूजन्य आजार आहे. हा दूषित पाण्याद्वारे होणारा आजार आहे. यात भूक मंदावते, अंगदुखी, पोटात दुखणे, अशक्तपणा जाणवतो, शरीराची त्वचा व डोळे पिवळे दिसतात. कावीळात योग्य आहार व विश्रांतीला महत्व आहे.

विषमज्वर:

दूषित पाण्याद्वारे प्रसारणारा आजार आहे. हा रोग सालमोनेला टायपी या सुक्ष्म जिवाणूमुळे होतो. विषमज्वरात सतत जास्त ताप असणे, डोकेदुखी, अंगदुखी, खूप थकवा, पोटदुखी इत्यादी लक्षणे असतात. उपचारात हलका पातळ आहार, पूर्ण विश्रांतीला महत्व आहे. यावर प्रतिजैविकांचा वापर करावा लागतो. पावसाळयात साठलेल्या पाण्यावर जसे- डबके, नाले, खड्डे इत्यादीच्या पाण्यात डासोत्पती होवून, डेंग्यू, हिवताप, फायलेरिया, चिकनगुनिया यासारखे किटकजन्य आजार होतात.

डेंग्यु या आजाराचा प्रसार हा ऐडिस या डासामुळे होतो तर हिवताप हा ऐनाफिलीस या डासाच्या मादीमुळे होतो. डेंग्यु डासाचे आयुष्य 21 दिवसाचे असते. डेंग्यु तापाचा डास हा घरातील स्वच्छ परिसरातील असलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालतो. डेंग्यु तापामध्ये तीव्र ताप येतो, डोकेदुखी, स्नायुदुखी, सांधेदुखी, उलटया होणे, मळमळ होणे, अशक्तपणा, भूक मंदावते, जास्त तहान लागते व तोंडाला कोरड पडणे. तापामध्ये कमी-जास्त पुरळ येणे, रक्त मिश्रीत किंवा काळसर संडास होणे, पोटदुखणे इतर लक्षणे दिसतात. असे आढळून आल्यास आपल्या नजीकच्या आरोग्य संस्थेमध्ये जावून रक्ताची तपासणी करुन घेणे आवश्यक आहे. तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावी. ही औषधे उपाशीपोटी घेवू नये तसेच मांत्रिक वैद्याचा सल्ला टाळावा. रक्ताच्या तपासणीकरिता शासकिय संस्थेत संपर्क साधावा. डासांची उगमस्थाने नष्ट करावी. निरोपयोगी विहीरीमध्ये गप्पी मासे सोडल्यास नियंत्रण ठेवल्यास प्रभावी साधन आहे, आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा (शनिवार), गावालगत साचलेले पाणी, डबके, नाल्या यामध्ये जळके ऑईल, रॉकेल इत्यादी टाकावे, टायर, नारळाच्या करवंट्या, फुलदाण्या, कुलर यामध्ये पाणी साचू देवू नये. शेवटी किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमात लोकांचा सहभाग महत्वाचा आहे. आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. पांचाळ साहेब यांनी आवाहन केले आहे.

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.