वृत्त विशेष

परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा !

अनुसूचित जमातीच्या मुलामुलींना परदेशातील शिक्षणाची संधी मिळावी व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा म्हणून परदेशातील विद्यापीठामध्ये विविध अभ्यासक्रमासाठी ज्या आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल अशा प्रतिवर्षी एकूण १० विद्यार्थ्यांचा परदेशातील शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यास विभागाच्या दि.३१.०३.२००५ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दि. ११.०४.२०१२ रोजीच्या शासन निर्णयानुसार सदर योजनेंतर्गत उत्पन्नाची मर्यादा वाढवून रु.४.५० लक्ष इतकी करण्यात आलेली आहे. सन २०१६ मध्ये सदर योजनेंतर्गत उत्पन्नाची मर्यादा वाढवून, रू.६ लक्ष इतकी करण्यात आली. या योजनेचा लाभ अधिकाधिक अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा आणि सर्व विभागांच्या परदेशी शिष्यवृत्ती योजनेत एकरूपता यावी यासाठी दिनांक ३०.१०.२३ च्या सामाजिक न्याय विभागाच्या शासन निर्णयातील तरतुदी विचारात घेऊन दिनांक ३१.०३.२००५ आणि १६.०३.२०१६ च्या शासन निर्णयातील तरतुदींमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा शासन निर्णय :-

परदेशातील विद्यापिठात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना त्या विद्यापीठातील उच्च शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यास या शासन निर्णयाद्वारे शासन मंजूरी देत आहे. ही शिष्यवृत्ती खाली नमूद केलेल्या नियमावलीतील अटी व शर्तीनुसार अनुज्ञेय होईल:-

शिष्यवृत्ती योजनेची नियमावली

(अ) योजनेची व्याप्ती :-

महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीचा जे विद्यार्थी पदव्युत्तर पदवीका, पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी क्यूएस वर्ल्ड रॅन्कींग (QS World Ranking) २०० च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतील, अशा ४० विद्यार्थ्यांना प्रतीवर्षी परदेश शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येईल.

(ब) लाभार्थी निवडीचे निकष :-

१. विद्यार्थी अनुसूचित जमातीचा, महाराष्ट्र राज्याचा रहीवासी असावा.

२. सदर विद्यार्थ्याकडे जमातीचे वैधता प्रमाणपत्र असावे.

३. विद्यार्थ्यांना परदेशातील क्यूएस अद्ययावत वर्ल्ड रॅन्कींग मध्ये २०० च्या आत असलेल्या शैक्षणिक संस्था / विद्यापीठामध्ये प्रवेश मिळालेला असावा.

४. विद्यार्थ्याने पदव्युत्तर अभ्यासक्रम किंवा पीएचडी साठी अर्ज करताना, या पुर्वी इतर कोणत्याही राज्य शासनाची अथवा केंद्र शासनाची परदेशी शिष्यवृत्ती घेतलेली नसावी.

५. परदेशातील विद्यापीठ / शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी हा पूर्ण वेळ (full time) विद्यार्थी म्हणून प्रवेशित असावा.

६. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी लाभार्थीच्या वयाची कमाल ३५ वर्ष आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी लाभार्थीच्या वयाची कमाल ४० वर्ष वयोमर्यादा असावी.

७. विद्यार्थ्यांच्या पालकांचे / कुटुंबाचे व विद्यार्थी नोकरी करीत असल्यास त्याचे स्वतःचे उत्पन्न धरुन सर्व मार्गानी मिळणारे वार्षिक उत्पन्न रु.८.०० लाखापेक्षा जास्त नसावे.

८. विद्यार्थी किंवा पालक किंवा दोन्ही नोकरीत असतील तर त्यांचे आयकर विवरणपत्र, फॉर्म नं.१६ व सक्षम प्राधिकारी (तहसिलदार किंवा नायब तहसिलदार पेक्षा कमी दर्जा नसलेल्या) यांच्याकडील मागील आर्थिक वर्षाचे कुटुंबाचे सर्व मार्गानी मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

९. इतर विद्यार्थ्यांसाठी साठी सक्षम प्राधिकारी (तहसिलदार किंवा नायब तहसिलदार पेक्षा कमी दर्जा नसलेल्या) यांच्याकडील मागील आर्थिक वर्षाचे कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

(क) अभ्यासक्रमाचा कालावधी : –

१. पीएचडी साठी ४ वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी या पेक्षा कमी असेल तो.

२. पदव्युत्तर पदवी ३ वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी या पेक्षा कमी असेल तो.

३. पदव्युत्तर पदवीका २ वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी या पेक्षा कमी असेल तो कालावधी.

४. एक्झ्युक्युटीव्ह (executive) पदव्युत्तर पदवी किंवा एक्झ्युक्युटीव्ह पदव्युत्तर पदविका व अर्धवेळ (part time) अभ्यासक्रमांस प्रवेशित विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असणार नाहीत.

(ख) एकाच कुटुंबातील कमाल पात्रता धारक :-

१. सदर योजनेचा लाभ एका विद्यार्थ्यास फक्त एकदाच घेता येईल.

२. एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त अपत्यांना ही शिष्यवृत्ती लागू राहणार नाही. यासाठी पालकांनी/विद्यार्थ्यांनी तसे हमीपत्र करुन देणे बंधनकारक असेल.

(ग) अर्ज करण्याची पध्दती :-

१. सदरची योजना या शासन निर्णयातील नियमावली, अटी व शर्तीनुसार राबविण्यासाठी शासन प्राधिकृत करेल त्या यंत्रणेकडुन अथवा आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचेमार्फत राबविण्यात येईल. परदेशी शिष्यवृत्तीसाठी ऑन लाईन प्रणाली विकासीत झाल्यानंतर अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील. अर्ज ऑनलाईन भरण्याकरिता संकेतस्थळ वर्षभर खुले असेल. उमेदवारांनी संपूर्णपणे भरलेला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन सबमिट करावा.

२. सदर अर्जासोबत विद्यार्थ्याने खाली नमुद केलेले कागदपत्र सादर करणे बंधनकारक आहे. :-

i. विहीत नमुन्यातील परिपूर्ण अर्ज,

ii. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला जमातीचा दाखला आणि जमातीचे वैधता प्रमाणपत्र,

iii. सक्षम प्राधिका-यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला,

iv. पदवी / पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे पुरावे. (सनद / मार्क लिस्ट).

v. परदेशातील QS World Ranking २०० पेक्षा कमी असलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश मिळाल्याबाबतचे विना अट (Unconditional) ऑफर लेटर,

vi. ज्या विद्यापीठामध्ये प्रवेश मिळाला आहे त्याचे सविस्तर माहिती पत्रकाची (Prospectus) प्रत.

vii. आवश्यक ते करारनामे व हमीपत्रे.

viii. शैक्षणिक पार्श्वभूमी आणि पदवीधर अभ्यासासाठी सज्जता दर्शविणारी दोन राजपत्रित अधिका-यांचे शिफारस पत्र अथवा विद्यार्थ्याने शिक्षण घेतलेल्या संस्थेतील दोन प्राध्यापकांची शिफारस पत्र.

ix. संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण होण्यासाठी वर्ष निहाय आवश्यक असणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक, ज्यामध्ये शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क, इतर शुल्क पाठयपुस्तके, स्टेशनरी, भोजन व राहण्याचा खर्च, येण्या-जाण्याचा विमान प्रवास याचा समावेश असावा.

x. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी अद्ययावत QS World Ranking ची जागतिक क्रमवारी.

(घ) निवड समिती व निवड प्रक्रिया :-

प्राप्त झालेल्या विद्यार्थ्याच्या यादी / प्रस्तावामधून पात्र विद्यार्थ्यांची अंतिम निवड करणेसाठी निवड समितीची रचना खालील प्रमाणे असेल :-

a. प्रधान सचिव/सचिव, आदिवासी विकास विभाग, मुंबई – अध्यक्ष

b. प्रधान सचिव/सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मुंबई / प्रतिनिधी – सदस्य

c. संचालक तंत्र शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई / प्रतिनिधी – सदस्य

d. संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय / प्रतिनिधी – सदस्य

e. लोकशाही, आदिवासी विकास, नाशिक सदस्य – सचिव

१. पात्र उमेदवारांना निवड समितीसमोर आवश्यक असल्यास वैयक्तिक अथवा “ऑनलाईन” मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल,

२. पदव्युत्तर अभ्यासक्रम / डॉक्टरेट पदवी (पीएचडी) साठी कला/सामाजिकशास्र, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन, अभियांत्रिकी, वैद्यकीय या शाखेमधील उमेदवारांचा विचार केला जाईल.

३. उपलब्ध असलेल्या एकूण लक्षांकापेक्षा अधिकच्या पात्र उमेदवारांनी अर्ज केला असल्यास निवडीमध्ये डॉक्टरेट पदवीच्या (पीएचडी) उमेदवारास प्राथम्य दिले जाईल. त्यानंतर QS रॅकिंगच्या ज्येष्ठतेचा विचार करून निवड करण्यात येईल. अशा परिस्थितीमध्ये वैविध्य राखण्यासाठी प्रत्येक शाखेमधील निवड करण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची कमाल संख्या मर्यादित करण्याची निवड समितीस मुभा असेल.

४. सदर शिष्यवृत्तीसाठी निवड करताना निवड समितीने अभ्यासक्रमांसाठी त्या बैठकीच्या वेळी उपलब्ध असलेल्या पात्र विद्यार्थ्यांची वरिल प्रमाणे स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करेल व शासन निर्णय निर्गमित करणेसाठी शासनास शिफारस करेल. ही गुणवत्ता विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेल्या शैक्षणिक संस्थांच्या अद्ययावत जागतिक क्रमवारीनुसार (QS World Ranking) असेल.

५. परदेशातील शैक्षणिक संस्था स्वायत्त स्वरूपाच्या असतात. प्रत्येक संस्थेची निवड प्रक्रिया व निवडीचे वेळापत्रक भिन्न स्वरूपाचे असते. त्यामुळे निवड समिती पात्र विद्यार्थ्यांची वेळोवेळी बैठक घेऊन निवड करेल व शासनाने निर्धारित केलेल्या लक्षांक्याच्या मर्यादेत शासनास शिफारस करेल.

६. निवड समितीने सदर शिष्यवृत्तीसाठी शिफारस केलेल्या विद्यार्थ्याच्या निवडीचा शासन आदेश शासन स्तरावरुन निर्गमित करण्यात येईल.

७. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे तसेच परदेशात अभ्यासक्रम पूर्ण करत असलेल्या विद्यार्थ्यांच्या दर्जावाढीसाठी आवश्यक असल्यास शिथीलीकरण करण्याचे अधिकार आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना असतील.

८. सदर शिष्यवृत्ती तसेच निवडीबाबत महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने घेतलेला निर्णय अंतिम असतील.

(च) लाभार्थी निवडीनंतर अपेक्षित प्रक्रिया :-

१. उमेदवाराच्या निवडीचा शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर १५ दिवसांत संबंधित विद्यार्थ्यांना कळवून त्यांच्याकडून आवश्यक ती माहिती मागविण्यात येईल. तसेच आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांची गृहचौकशी करण्यात येईल.

२. निवड झालेल्या विद्यार्थ्याला विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतर वरिल कारणाव्यतिरिक्त तात्काळ काही आगावू रक्कम भरण्याची आवश्यकता असल्यास, अशा रक्कमेस मान्यता देण्याचे अधिकार आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना राहतील. मात्र, अशी अग्रिम रक्कम पुढील देय हप्त्यामध्ये समायोजित करण्यात येईल

३. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेवून आवश्यक ती माहिती व अग्रीम रकमेचे (दिली असल्यास) उपयोगिता प्रमाणपत्र / पोचपावती संबंधित परदेशी शैक्षणिक संस्थेकडून प्रमाणित होऊन प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यास त्यावर्षीचे अग्रिम समायोजित करुन पहिला अर्धवार्षिक हप्ता अदा करण्यात येईल.

४. प्रत्येक सहा महिन्याने विद्यार्थ्यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीचे (शिक्षण फी, परिक्षा फी, निर्वाह भत्ता इ.चे) उपयोगिता प्रमाणपत्र आणि प्रगती अहवाल आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना सादर केल्यानंतर पुढील ६ महिन्याची शिष्यवृत्ती अदा करण्यात येईल. प्रत्येक ६ महिन्याला विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रगती अहवाल व उपयोगिता प्रमाणपत्र / खर्चाचा अहवाल प्राप्त झाल्याशिवाय संबंधित विद्यार्थ्यांस पुढील शिष्यवृत्ती अनुज्ञेय होणार नाही.

(छ) उमेदवाराच्या/लाभार्थ्याच्या जबाबदाऱ्या :-

१. नोकरीमध्ये असलेल्या उमेदवारांनी तो जेथे नोकरी करतो त्या यंत्रणेचे (Organization/ Employer) नाहरकत प्रमाणपत्र दाखल करणे अनिवार्य आहे.

२. उमेदवारास / विद्यार्थ्यास शासनाने विहीत करुन दिलेल्या नमुन्यात Record Release Consent Form हा बंधपत्राच्या स्वरुपात द्यावा लागेल.

३. उमेदवारास / विद्यार्थ्यास परदेशामध्ये प्रवेश मिळण्यासाठी QS World Ranking मधील २०० च्या आतील अद्ययावत जागतिक क्रमवारीत असलेल्या विद्यापीठ / शिक्षण संस्थामध्ये प्रवेशासाठी स्वतः प्रयत्न करावा लागेल व त्यासाठी आवश्यक त्या सर्व पात्रता परीक्षा देणे बंधनकारक असेल.

४. ज्या विद्याथ्यांना परदेशी शैक्षणिक संस्थांकडून Unconditional offer letter मिळालेले असेल, त्यांनाच ही शिष्यवृत्ती अनुज्ञेय राहील. संस्थेकडून आलेले conditional offer letter अग्रिम रक्कम बाबत असल्यास त्यासाठी विद्यार्थ्याने अग्रीमाची मागणी करणे गरजेचे असेल. याव्यतिरिक्त इतर कोणतीही conditional offer letter गृहीत धरले जाणार नाही.

५. विवाहीत उमेदवाराच्या पत्नी व मुले यांना परदेशामध्ये सोबत घेवून जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचे सहाय्य दिले जाणार नाही.

६. नोकरी करणाऱ्या उमेदवारांनी सर्व प्रशासकीय बाबी उदा. रजा, वेतन आणि इतर सेवेच्या बाबी या स्वतः प्रत्यक्षपणे निराकरीत करावयाच्या आहेत. याबाबत कोणत्याही प्रकारची सवलत शासना कडून मिळणार नाही.

७. (अ) अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये, परदेशामध्ये शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यास भारतामध्ये यावयाचे असल्यास त्यासाठी त्याने संबंधित शैक्षणिक संस्था आणि राज्य शासनाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असेल.

(ब) जेवढया कालावधीमध्ये तो परदेशातील शैक्षणिक संस्थेमधून दूर असेल, तेवढया कालावधीचा कोणताही खर्च त्यास अनुज्ञेय होणार नाही. तथापि, तो पुन्हा त्याच शैक्षणिक संस्थेत त्याच अभ्यासक्रमाचे पुढील शिक्षण पुर्ण करण्यासाठी हजर झालेल्या दिवसापासून त्यास देय लाभ अनुज्ञेय होतील.

(क) अशा परिस्थितीत विद्यार्थ्याने परत त्याच परदेशी शिक्षण संस्थेमध्ये हजर न होता शिक्षण अर्धवट सोडल्यास त्यास अदा करण्यात आलेले शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क इतर शुल्क व निर्वाह भत्ता याची व्याजासह वसूली करण्यात येइल, याबाबतचे लेखी हमीपत्र विद्यार्थ्यास / उमदेवारास द्यावे लागेल

८. पासपोर्ट व व्हिसा मिळविण्याची जबाबदारी उमेदवार / विद्यार्थी याची असेल.

९. उमेदवारास / विद्यार्थ्यांना केवळ ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये, ज्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेला आहे व शिष्यवृत्ती मिळाली आहे, त्याच कारणासाठी व्हिसा घेणे बंधनकारक असेल.

१०. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी मागणी केल्यानुसार आवश्यक ती कागदपत्रे सादर करणे व आवश्यक ते करारनामे देणे बंधनकारक असेल.

११. निवड झालेल्या विद्यार्थ्यास / उमेदवारास त्याच्या शैक्षणिक कालावधी मध्ये जास्तीची रक्कम अदा झाली असल्यास त्याची परतफेड करणे विद्यार्थ्यांवर बंधनकारक असेल. अथवा ती वसूल करणेबाबत प्रचलित कायदे व नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, याबाबतचे हमीपत्र देणे बंधनकारक असेल.

१२. प्रवेशित अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना नमूद केलेल्या विहीत कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करणे विद्यार्थ्यांवर बंधनकारक असेल.

१३. विद्यार्थ्यास वरील लाभ मिळण्यासाठी परदेशातील प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक वेळी उत्तीर्ण होणे बंधनकारक असुन तसे शैक्षणिक संस्था/विद्यापीठाचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका, प्रगती अहवाल प्रत्येक सत्रासाठी किंवा सहा महिन्यासाठी सादर करणे अनिवार्य आहे.

१४. प्रवेशित विद्यार्थ्याने प्रत्येक सहा महिन्याच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे (Utilisation Certificate), खर्चाच्या पावत्या इ. विद्यापीठ / शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाकडून प्रमाणित करुन सादर करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय पुढील हप्ता मंजूर होणार नाही.

१५. सुरवातीस परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणे आणि विहित कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्वरीत कालमर्यादेत भारतात परत येण्यासाठी नजिकच्या मार्गाने इकॉनॉमी क्लासचे विमान प्रवास भाडे देण्यात येईल. त्यासाठी विमानप्रवासाचे मुळ तिकीट, मुळ बोर्डीगपास, परतीचे प्रवासभाडे मिळण्यासाठी अभ्यासक्रम विहित कालावधीत यशस्वीपणे पुर्ण केल्याचा पुरावा इ. कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.

१६. विद्यार्थ्याने भारतात राष्ट्रीयकृत बँकेत व परदेशात अधिकृत बँकेत खाते उघडणे अनिवार्य आहे. त्याच खात्यावर त्यांना देय होणारी शिष्यवृत्ती CMP किंवा RTGS किंवा SWIFT ने अदा केली जाईल. या खात्याचा तपशिल त्याने परदेशात जाऊन प्रवेश घेतल्यानंतर तात्काळ आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना सादर करावा. तसेच शिष्यवृत्तीच्या अनुषंगाने आयुक्त, आदिवासी विकास, नाशिकयांनी आवश्यकतेनुसार मागणी केल्यास विद्यार्थ्याने संबंधित बँक खात्याचा तपशिल आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना सादर करावा.

१७. परदेशात अभ्यासक्रम संपल्यानंतर विद्यार्थ्याने दोन महिन्याच्या आत आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना अंतिम परिक्षेचे गुणपत्र, प्रमाणपत्र आणि प्रगती अहवाल व पदवीदान समारंभाचे छायाचित्रासह माहिती सादर करणे बंधनकारक असेल. त्याशिवाय विद्यार्थ्यास अंतिम विमान प्रवास व इतर लाभ दिले जाणार नाहीत.

१८. विद्यार्थ्याने कोणत्या दिनांकास व कोणत्या विमानाने परदेशात जाणार आहे, याची लेखी माहिती आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना सादर करणे आवश्यक आहे.

१९. परदेशी विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी GRE (Graduate Record Examination), TOFEL (Test of English as a foreign language), IELTS (International English Language Testing System) इ. प्रकारच्या परीक्षा जेथे अनिवार्य आहेत, त्या उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांवर बंधनकारक असेल.

(ज) लाभार्थ्यास मिळणारे लाभ :-

परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आलेल्या विद्यार्थ्यास / उमेदवारास खालील लाभ देण्यात येतील:

१. परदेशातील शैक्षणिक संस्थेने ऑफर लेटरमध्ये नमुद केलेल्या शैक्षणिक कालावधीसाठी लागू केलेली संपूर्ण शिक्षण फी ही आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या यंत्रणेमार्फत थेट संबंधित शैक्षणिक संस्थेस अदा करण्यात येईल.

२. विद्यार्थ्यास परदेशातील विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यासाठी व अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर भारतात परत येण्यासाठी कमीत कमी कालावधीचा आणि जवळच्या मार्गाचा (Shortest Route) दराचा इकोनॉमी क्लासचा विमान प्रवासाचा दर दिला जाईल.

३. प्रवेश घेतलेल्या संबंधित शैक्षणिक संस्थेने ठरवून दिलेल्या किंवा भारत सरकारच्या DOPT विभागाने विदेशी शिष्यवृत्तीसाठी ठरवून दिलेल्या दराप्रमाणे येणारा खर्च किंवा परदेशातील दूतावासाने प्रमाणित केलेला खर्च, अथवा महाराष्ट्र शासन वेळोवेळी या प्रयोजनासाठी जाहीर करेल ती रक्कम ही निर्वाह भत्ता म्हणून संबंधित विद्यार्थ्याच्या परदेशातील वैयक्तीक खात्यामध्ये जमा केला जाईल. निर्धारीत दरापेक्षा होणारा जास्तीचा खर्च विद्यार्थी/ उमेदवारास स्वतः सोसावा लागेल व अशा प्रकारचे हमीपत्र विद्यार्थ्यास व पालकांस अर्जासोबत द्यावे लागेल.

४. विद्यार्थी/उमेदवारास अभ्यासाकरिता क्रमिक पुस्तके, वह्या व स्टेशनरी, प्रबंध अहवाल, स्थानिक भेटी व इतर अभ्यास सहली प्रवास खर्च, इतर प्रासंगिक खर्च, इत्यादींसाठी खर्च करावा लागतो. या बाबींवर होणाऱ्या खर्चाचा भार हलका व्हावा म्हणून यु.एस.ए. व इतर देशांसाठी (यु.के. (UK) वगळून) १५०० यु. एस. डॉलर (USD) आणि यु. के. साठी ११०० जीबीपी (GBP) इतका आकस्मिक खर्च/इतर खर्च म्हणून देण्यात येईल. सदर खर्च विद्यार्थी जॉइन होईल त्यावेळी भारतातून निघतांना तसेच अभ्यासक्रमाच्या कालावधी दरम्यान दरवर्षी देण्यात येईल.

५. परदेशी शिक्षण संस्था / विद्यापीठाने ऑफर लेटरमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम कालावधीच्या निर्धारीत केलेल्या फी च्या मर्यादेतच लाभ संबंधित विद्यार्थ्यास अनुज्ञेय होतील. भविष्यात त्यामध्ये वाढ झाल्यास परदेशातील भारतीय उच्चायुक्तालयाच्या शिफारशीनंतरच ही वाढ संबंधित विद्यार्थ्यास अनुज्ञेय राहील.

६. विद्यार्थ्यास देण्यात येणारा वरीलपैकी प्रत्येक रोख स्वरूपाचा लाभ ज्या दिवशी रक्कम वितरीत करण्यात येते त्या दिवशीच्या परकीय चलन दराने देण्यात येईल.

(झ) इतर अटी व शर्ती :-

१. अभ्यासक्रम संपल्यानंतर या योजने अंतर्गत विद्यार्थ्यास व्हिसा मुदत वाढीसाठी परवानगी दिली जाणार नाही. अभ्यासक्रमानंतर वर्क व्हिसा आवश्यक असल्यास त्यासाठी विद्यार्थ्याने रितसर अर्ज करणे आवश्यक असेल. यासाठी अथवा अभ्यासक्रमाचा कालावधी कोणत्याही कारणास्तव वाढल्यास त्यासाठी अतिरीक्त निधी दिला जाणार नाही.

२. पदव्युत्तर पदवी किंवा पीएचडी अभ्यासक्रमासाठी आधीच प्रथम वर्षाकरीता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांस त्याने अर्ज केल्यास या शिष्यवृत्तीचा संपूर्ण लाभ देय राहील. द्वितीय व तृतीय

वर्षासाठी प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या द्वितीय व तृतीय वर्षामध्ये देखील परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करता येईल. अशा निवड झालेल्या विद्यार्थ्यांस उर्वरित अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती देय राहील. तथापि, प्रथम / द्वितीय वर्षातील पुर्ण केलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रतिपूर्ती त्यांना लागू होणार नाही.

३. या योजनेअंतर्गत पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम सुरु असतांना त्या विद्यार्थ्यास डॉक्टरेट पदवी (पीएचडी) साठी तत्सम विषयांत दर्जावाढ करण्याची संधी मिळाल्यास सदर विद्यार्थी याच योजनेअंतर्गत पुढील अभ्यासक्रमासाठी लाभ घेण्यास पात्र असेल. त्यासाठी विद्यार्थ्याने निवड समितीस रितसर अर्ज करून त्याबाबत मान्यता घेणे बंधनकारक राहील. अशा प्रकरणात संबंधित शैक्षणिक संस्थेची अद्ययावत जागतिक क्रमवारी ( QS World Ranking) त्यावेळी लागू असलेल्या शासन निर्णयाच्या मर्यादेत असणे आवश्यक आहे. मात्र अशा प्रकरणात विद्यार्थ्यास मिळणारा एकूण लाभाचा कालावधी त्यावेळी लागू असलेल्या शासन निर्णयाच्या मर्यादेपर्यंतच दिला जाईल. उदा. विद्यार्थ्याने दोन वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम करतांना डॉक्टरेट पदविका करण्यासाठी परदेशी शैक्षणिक संस्थेत दर्जावाढ प्राप्त केली तर त्या विद्यार्थ्याला निवड समितीने विहित प्रक्रियेद्वारे मान्यता दिल्यास त्यानंतरच्या पुढील दोन वर्षांसाठी शासन निर्णयातील नमूद सगळे लाभ घेता येतील. यानंतर येणारा पुढील खर्च मात्र उमेदवाराला करावा लागेल.

४. अर्जात नमूद केलेले विद्यापीठ व अभ्यासक्रमासाठी काही कारणास्तव विद्यार्थी प्रवेश घेवू शकत नसल्यास, त्याच विद्यापीठात त्याच अभ्यासक्रमासाठी पुढील एका सत्राचा (६ महिन्याचा) कालावधी, कोणतेही अतिरीक्त शुल्क न आकारता संबंधित विद्यापीठ अथवा शैक्षणिक संस्थेने विनाअट वाढवून दिल्यास आणि विद्यार्थ्याने त्यासाठी सबळ कारण/पुरावा सादर केल्यास, अशी मुदतवाढ देण्याचे अधिकार आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना असतील.

५. एकदा निवड झालेले विद्यापीठ व अभ्यासक्रम यात बदल करणे अपेक्षित नाही. मात्र, सबळ कारण विचारात घेवुन अशा बदलास मान्यता देण्याचे अधिकार निवड समितीस राहतील.

६. विद्यार्थ्यांना अर्ज करते वेळी विद्यापीठाकडून मान्य करुन घेतलेल्या संपूर्ण अभ्यासक्रमासाठीच्या कालावधीच्या शिक्षण फी, इतर फी, निवास व भोजन खर्च, निर्वाहभत्ता, आकस्मिक खर्चाची जी माहिती सादर केली आहे, त्यापेक्षा जास्तीचा खर्च अनुज्ञेय होणार नाही.

७. अपवादात्मक प्रसंगी, विद्यार्थ्यांनी / पालकांनी, परदेशी शिक्षण संस्था / विद्यापीठात, शिक्षण फी / इतर अनुज्ञेय फी स्वतः भरलेली असेल, अशावेळी आवश्यक त्या पावत्या व पुरावे सादर केल्यानंतर, अशी रक्कम विद्यार्थ्यास देय होणाऱ्या शिष्यवृत्तीमधून विद्यार्थ्याच्या परदेशातील खात्यावर जमा करणेसाठी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना प्राधिकृत करणेत येत आहे.

८. काही कारणास्तव विद्यार्थ्यास त्याची निवड होवूनही त्या वर्षी प्रवेश घेता आला नाही, तर त्यास वयोमर्यादेच्या अधिन राहून पुढील वर्षी नव्याने अर्ज करण्याची मुभा राहील.

९. परदेशातील भारतीय दूतावासात राज्य शासनाकडून संबंधित विद्यार्थ्यांचा प्रगती अहवाल, वर्तणूक खर्चाचा हिशोब इ. माहिती पुरविण्याबाबत विनंती करण्यात येईल. तसेच काही विपरीत बाबी असल्यास, परदेशातील भारतीय दूतावास त्याबाबी राज्य शासनास कळवतील. परदेशात प्रवेशित विद्यार्थ्याच्या प्रगती विषयी मार्गदर्शन व सल्ला देणेबाबत परदेशातील दुतावासास विनंती करण्यात येईल. त्याच बरोबर या विद्यार्थ्यांना परदेशात काही अडचणी उदभवल्यास मदत करण्यासाठी या दूतावासांना विनंती करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी विद्यापीठात / शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर तात्काळ तेथील भारतीय परदेशी दूतावासास संपर्क साधून आपली नोंदणी करावी व त्याचा तपशिल आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना सादर करावा.

१०. परदेशात अभ्यासक्रम संपल्यानंतर विद्यार्थ्याने त्याची व्यक्तिगत माहिती (research/employment/contact details/address) शासनास अवगत करणे व ती अद्ययावत ठेवणे अपेक्षित आहे. या योजनेमध्ये इच्छुक असणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करणे व त्यांचेसाठी निर्माण करण्यात येणाऱ्या माहितीसाठी हातभार लावणे, प्रचार/प्रसिद्धी करण्यास निरपेक्षपणे मदत करणे अपेक्षित आहे.

(त) कर्तव्यात कसूर (योजने अंतर्गत डिफॉल्ट):-

१. या योजनेखाली निवड झालेल्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेताना नियमांचे तसेच अटी व परदेशीय शैक्षणिक संस्थेने अभ्यासाविषयी अथवा वागणूकीविषयी अथवा गैरहजेरी विषयी प्रतिकूल अहवाल दिल्यास, विद्यार्थ्याने प्रवेश अर्धवट सोडला असल्यास, विद्यार्थ्याने जेथे प्रवेश घेतला आहे तो देश सोडून निघून गेला असल्यास किंवा विद्यार्थ्याने दुसरे विद्यापीठ / शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश विना परवानगी घेतला असल्यास, किंवा विद्यार्थ्याची ज्या अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे, तो अभ्यासक्रम त्याने विनापरवानगी बदलल्यास, किंवा तो भारतात कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता परत आल्यास, अशा विद्यार्थ्यास कर्तव्यनिष्ठुर (Defaulter) समजण्यात येईल आणि त्याला देण्यात आलेली शिष्यवृत्तीची सर्व रक्कम १२% वार्षिक व्याजाने वसूल करण्यात येईल, अशा प्रकारचे संयुक्त हमीपत्र विद्यार्थी व पालक यांनी सादर करणे आवश्यक राहील.

२. कोणतेही कारण अथवा सबबी सांगून अभ्यासक्रम पूर्ण न करणे, विहित प्रयोजनासाठी खर्च न करणे, खर्चात काटकसर न करणे, विहित लाभ मर्यादेपेक्षा जास्तीची मागणी परदेशात जावून करणे, कोणत्याही प्रकारचा दबाव आणणे, सदर नियमावलीतील तरतुदीचे उल्लंघन करणे, परदेशातील नियम / अटी / तरतुदीचे उल्लंघन करणे, वाममार्गास लागणे, परदेशातील शैक्षणिक कालावधीत कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य करणे व त्यासाठी दंड, शिक्षा होणे, भारतीय राष्ट्रीयत्वास हानी पोहचविणे, भारताची बदनामी करणे याबाबी कर्तव्यातील कसूर समजण्यात येतील. कर्तव्यात कसूर केलेल्या विद्यार्थ्यास / उमदेवारास अपात्र ठरवून त्याच्या परदेश शिक्षणासाठी शासनाने दिलेले सर्व लाभ व्याजासह वसूल केले जातील.

(थ) खोटी माहिती सादर करणे :-

कोणत्याही विद्यार्थ्यानी / उमेदवाराने खोटी माहिती / कागदपत्रे सादर केल्याचे सिध्द झाल्यास अथवा उपरोक्त परिच्छेद “त” प्रमाणे कर्तव्यात कसुर केल्यास, त्यास ताबडतोब पुढील शिक्षणासाठी अटकाव (Debar) केला जाईल व त्याच्याकडून झालेल्या खर्चाची १५% चक्रवाढ व्याजाने वसूली करण्यात येईल. अशा विद्यार्थी / उमेदवाराचा काळ्या यादीत समावेश केला जाईल. तसेच प्रचलित कायद्यानुसार त्याच्या विरुध्द कारवाई करण्यात येईल. आणि त्यांनी दिलेले जामीनदार आणि संदर्भ अधिकारी / व्यक्ती यांना सुध्दा ही बाब लेखी स्वरुपात कळविण्यात येईल.

(द) कायदेशीर बाबी :-

या संदर्भात कोणत्याही कायदेशीर बाबी उदभवल्यास, त्या नाशिक जिल्हा न्यायालय किंवा मुंबई उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात असतील. परदेशात उद्भवलेल्या कायदेशीर बाबीसाठी परदेशातील भारतीय उच्चायुक्त कार्यवाही करतील.

हेही वाचा – गुणवंत मुलामुलींना कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेत सुधारणा

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.