काजू बीला प्रतिकिलो १३० रुपये दर मिळणार
मागील दोन महिन्यांपासून काजू बीला खूप कमी दर प्राप्त होत होता. यामुळे काजू बागायतदार यांचं खूप नुकसान झालं आहे. पण आता काजू बी दराबाबतचा संभ्रम दूर झाला असून आता प्रतिकिलो १३० रुपये दर मिळणार आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या संयुक्त बैठकीत हा दर निश्चित करण्यात आला आहे.
काजू बी वाढीव मागणीच्या दरावरून गेले चार महिने जिल्ह्यात विविध शेतकरी संघटना, काजू उत्पादक आंदोलन करीत होते. प्रतिकिलो २०० रुपये हमीभाव मिळावा, अशी मागणी काजू बागायतदारांकडून केली जात होती. अनेक आंदोलने बागायतदारांनी केली, परंतु कारखानदार आणि व्यापाऱ्यांनी काजूच्या दरात कोणतीही वाढ केली नव्हती. सध्या बाजारपेठेत काजू बी प्रतिकिलो ११० रुपये सरसकट दिला जात आहे. त्यामुळे काजू बागायतदारांमध्ये नाराजी होती.
दरम्यान, केसरकर यांच्या उपस्थितीत काजू बागायतदार, कारखानदार, व्यापाऱ्यांची सयुंक्त बैठक सावंतवाडी येथे झाली. फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, संजय देसाई, आकाश नरसुले यांच्यासह शेकडो बागायतदार उपस्थित होते. बैठकीत कारखानदार आणि व्यापाऱ्यांनी सध्याच्या रकमेत पाच रुपये प्रतिकिलो वाढ करण्याचे मान्य केले. याशिवाय शासनाची रक्कम प्रतिकिलो दहा रुपये असा मिळून प्रतिकिलो १२५ ते १३० रुपये दर सरसकट काजू बीला मिळणार आहे.
आयात शुल्काचा मुद्दा देखील बागायतदारांनी मांडला. केसरकर यांनी आचारसंहिता संपल्यानंतर काजू बीवरील आयातशुल्क अडीच टक्क्यांवरून १८ टक्के होईल, असे स्पष्ट केले. शासनाने काजू बागायतदारांसाठी जाहीर केलेली रक्कम आचारसंहितेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असे स्पष्ट केले.
हेही वाचा – काजू फळपिक विकास योजना – Cashew Scheme
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!